आपला देश एखाद्या खंडाइतका मोठा आहे. तो विविधतेने नटलेला आहे. इथे अठरापगड जातीजमाती, असंख्य भाषा, अनेक प्रांत आणि उपप्रांत आहेत. प्रत्येक ठिकाणचे हवामान वेगळे, राहणीमान वेगळे, खानपान वेगळे. या देशात एकीकडे वैराण वाळवंट आहे, दुसरीकडे पावसाचा उच्चांक नोंदवणारी घनदाट वनराई आहे. घामाघूम करणारा उन्हाळा एकीकडे भाजून काढत असतो, दुसरीकडे हिमाच्छादित पर्वतशिखरे आहेत. एकीकडे अथांग सागर आहे, दुसरीकडे उत्तुंग पर्वतरांगा आहेत. अनेक देशांची वैशिष्ट्ये या एकाच देशात सामावलेली आहेत. या देशाला एकाच एका रंगात रंगवण्याचे, एकच संस्कृती बनवण्याचे करंटे प्रयत्न करणे म्हणजे या देशाचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य असलेली विविधता नाकारणे. पण, गेल्या काही वर्षांमध्ये एक देश, एक नेता, एक भाषा, एक देव, एक मंदिर, एकच पक्ष असा एकारलेपणा देशावर लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक देश एक आहार अशी घोषणा कोणी अधिकृतपणे दिलेली नाही. पण, ७० टक्के मांसाहारी नागरिक असलेल्या या देशावर शाकाहाराचा पगडा बसवण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू आहेत. मुंबईत विशिष्ट वस्त्यांमध्ये मांसविक्री सोडा, अंड्यांचीही विक्री करू दिली जात नाही, मांसाहारी मराठी भूमिपुत्रांना घरे दिली जात नाहीत.
याच प्रयत्नांचे पुढचे पाऊल म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात काही जैन याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली याचिका. एका ट्रस्टसह तीन याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात मांसाहारी पदार्थांच्या जाहिरातींविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मांसाहारी अन्नाच्या जाहिरातींमुळे आपल्या शांततेने जगण्याच्या आणि खासगीपणाच्या अधिकारांचा भंग होतो, त्याचबरोबर आमच्या समाजातील तरूण मुलांवर विपरीत परिणाम होतो, त्यांना मांसाहार करण्यास उद्युक्त केले जाते, असा दावा या याचिकेत केला गेला होता. त्याचबरोबर, मांसाहार आरोग्यदायी नाही, तो पर्यावरणविरोधी आहे, असेही दावे या याचिकेत केले गेले होते. वर असा कांगावाही केला गेला होता की आमचा काही कोणी मांस विकण्याला किंवा ते विकत घेऊन खाण्याला विरोध नाही. फक्त मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, विविध संकेतस्थळे आणि अन्य माध्यमांवर मांसाहारी पदार्थांच्या जाहिराती नकोत, अशी ही मागणी होती.
न्यायालयाने ती नि:संदिग्ध शब्दांत फेटाळून लावताना लोकांच्या खानपानाच्या मूलभूत अधिकारांची आठवण करून दिली. तुमचा इतरांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा आग्रह का, असा सवाल न्यायालयाने केला. तुम्ही राज्यघटना वाचली आहे का, हेही याचिकाकर्त्यांना विचारले आणि ज्यांना अशा जाहिराती पाहायच्या नाहीत, त्यांनी टीव्ही बंद करावा, अशीही सूचना केली. मुळात, अशा प्रकारचे कायदे करणे हा विधिमंडळांचा अधिकार आहे, त्यांच्याकडे जा, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले.
ज्या देशामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या मांसाहारी आहे, त्या देशात अशा प्रकारचे कायदे कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी होऊ शकणार नाहीत, हे याचिकाकर्त्यांना माहिती होते. म्हणूनच त्यांनी न्यायालयाच्या आडवाटेने ते रेडटण्याचा प्रयत्न केला. उत्तर भारतात गोमातेच्या नावाने विलाप करणार्या, गोरक्षणाचे ढोंग उभारून गोरक्षकांच्या खंडणीबाज टोळ्या उभ्या करणार्या भारतीय जनता पक्षाला गोव्यात आणि मेघालयात गोमांसाचा पुरवठा अबाधित राहील, असे आश्वासन द्यावे लागते, हा या देशातल्या खानपान वैविध्याचा आणि आहारस्वातंत्र्याचा विजय आहे. मुळात, कोणताही समाजघटक शाकाहारी असो, मांसाहारी असो वा मिश्राहारी असो, त्याने आपले खानपान आपल्या घरात जपायला हवे, खासगीपण त्याला म्हणतात. आमचे सण आहेत म्हणून तुमचा मांसाहार बंद ठेवा, दुकाने बंद ठेवा, मासे विकू नका, ही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न कोणीच करता कामा नये. जैन बांधवांच्या पर्युषण पर्वाशी अन्यधर्मीयांचा काहीही संबंध नाही. तरीही या पर्वाच्या प्रारंभी आणि अखेरीला दोन दिवस स्वेच्छेने मांस आणि मासे यांची दुकाने बंद ठेवली जातात. हा काळ पूर्ण पर्युषण पर्व सुरू असेपर्यंत वाढवावा, असेही प्रयत्न मुंबईच्या उपनगरांमध्ये झाले आहेत. हे म्हणजे रमझानच्या पवित्र महिन्यात आम्ही रोजे पाळतो आहोत, तर महिनाभर कोणीच पाणी सुद्धा पिऊ नका, असा आग्रह मुस्लीम बांधवांनी धरण्यासारखे आहे, तसा त्यांनी कधी धरल्याचे ऐकिवात नाही.
जो जे वांछील तो ते लाहो, ही आपली संस्कृती आहे. प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार आहार करण्याचा अधिकार आहे. मांसाहार आरोग्यदायी नाही, असा दावा कोणत्या संशोधनावर केला जातो? ज्या पाश्चिमात्य देशांचा सर्व प्रकारच्या क्रीडाप्रकारांवर वरचष्मा आहे, त्या देशांमध्ये मांसाहाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. या क्रीडाप्रकारांमध्ये त्यांना आव्हान देणारा चीन सर्वाहारी आहे. माणसाला आवश्यक प्रथिनांचा पुरवठा मोठ्या लोकसंख्येला मांसाच्या माध्यमातूनच होतो. शाकाहार म्हणजे अहिंसा या कल्पनेतून काही मंडळी स्वत:ला श्रेष्ठ मानू लागली आहेत. मांसासाठी जीवहत्या होऊ नये, असा आग्रह धरताना भाजीपाला, फळे, फुले यांच्यासाठी ओरबाडल्या जाणार्या वृक्षवल्ली, झाडाझुडपांनाही जीव असतो, याचा सोयीस्कर विसर कसा पडतो? दही, दूध, तूप आणि मिठायांसाठी दूध मिळवताना गायीगुरांशी केले जाणारे वर्तन अमानुष हिंसेसारखेच असते, म्हणूनच शाकाहाराच्या पुढच्या पायरीवर पोहोचलेला, दुधालाही नाकारणारा व्हेगनिझम जगभरात लोकप्रिय होत चाललेला आहे.
आपली काहीएक जीवनपद्धती आहे, तर ती आपल्या घरात पाळावी. ती इतरांवर लादत फिरता कामा नये. आपल्या ताटात काय पडले आहे, ते निमूटपणे खावे. इतरांच्या ताटात काय आहे, ते पाहणे याला असभ्यपणा म्हणतात. न्यायालयाने वेगळ्या शब्दांत याचिकाकर्त्यांना हेच सुनावले आहे.