त्या दिवशी पोक्या विजयी वीराच्या थाटात माझ्या घरी आला आणि मला टाळी देत म्हणाला, त्या दिवशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर अमित शहांनी केलेलं वादग्रस्त सविस्तर भाषण व्हायरल करणारा कोणीही छुपा रुस्तम नव्हता तर तो मीच होतो. त्यात घाबरायचं काय! बंद दाराआड वाटेल त्या गमजा मारून बाहेर मात्र आपल्याला हवा तो गाळीव भाग काढून उरलेला चोथा मीडियाला देण्यात काय अर्थ आहे? नाहीतर हे उद्या म्हणतील, मी तसं म्हणालोच नव्हतो. याला काय अर्थ आहे? म्हणून मी अमित शहांचे मुंबईतले ते ‘शिवसेना को पटक देंगे’ फेम भाषण मोबाईलवरून व्हायरल केलं. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि भाजपवाल्यांची गाळण उडाली. उद्या अमित शहा दिल्लीत जातील आणि इथे मुंबई महाराष्ट्रात आम्हाला निस्तरावे लागेल. शिवसैनिक किती खतरनाक असतात याचा अनुभव त्यांना अजून आलेला नाही. म्हणूनच मी विचार केला यांना कळू दे इथली शिवसेनेची ताकद. आम्ही भाजपात आमच्या स्वार्थासाठी गेलो असलो तरी त्यात त्यांचाही किती मोठा फायदा आहे याची त्यांनाही कल्पना आहे. शिवसेनेने जन्मापासून केलेले कितीतरी राडे आम्ही पाहिलेत. कधी त्या राड्यांत सामीलही होतो. नंतर दोन नंबरच्या धंद्यात पडून आम्ही एक नंबर झालो तेव्हा आम्हालाच अनेक पक्षांच्या ऑफर्स येऊ लागल्या. तेव्हाच ठरवलं, जो सत्ताधारी आहे तो पक्ष आपला. योगायोगाने मोदींची सत्ता आली. गुजरातला अमित शहांशी आमचे संधान आधीपासूनच होते. आमचे उद्योग त्यांना माहीत होते आणि त्यांचे धंदे आम्हाला माहीत होते. म्हणजे चांगल्या अर्थाने.
पोक्याच्या बोलण्यात तथ्य होतं. कारण पोक्या दिसायला यथातथाच असला तरी त्याचं डोकं फास्ट होतं. मुंबईतल्या गँगस्टर टोळ्या त्याला मानायच्या. कुणाचा पोलीस रस्त्यात गेम म्हणजे एन्काऊंटर करणार आहेत हे तो अगोदरच सांगायचा. तो मुंबईत पोलिसांचा खबर्या असला तरी त्याला गुजरातहून मोठमोठ्या ऑफर्स असायच्या. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. एकदा तर त्याला उत्तर प्रदेशच्या गृहमंत्र्यांची ऑफर होती. तेव्हापासून पोक्या अंडरग्राऊंडमध्ये ठरावीक लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये फेमस होता. म्हणूनच त्याला ईडी कार्यालयात बढती मिळाली. मात्र तिथले प्रकार बघून त्याच्या ज्ञानात भर पडली असली तरी खुनशी राजकारणाचा त्याला कंटाळा आला होता. त्या दिवशी बोलण्याच्या ओघात तो म्हणाला, सगळं ब्लॅकमेकिंग सुरू आहे. सत्तेसाठी राजकारणी या थराला जाऊ शकतात हे आता नव्याने पाहतोय. न्याय लावायचा तर सर्वांना समान लावा ना. फक्त विरोधकांना ईडी आणि जे शरण येतील त्यांना पक्षप्रवेश व चौकशीतून मुक्ती. हा कुठला न्याय? ईडी चौकशीतून नेते त्या खोलीतून हसत हसत बाहेर येताना दिसत असले तरी त्यांचे इतके मानसिक टॉर्चरिंग केलं जातं की त्यांची स्थिती बघवत नाही. अपशब्दांचा मारा तर असतोच, शिवाय दमबाजी तर इतकी केली जाते की त्यालाच ‘-ग्या दम’ म्हणतात. शिवाय तिथे तुमच्या पदाला, प्रतिष्ठेला काडीचीही किंमत देत नाहीत. तहानेने तुमचा घसा कोरडा पडला असला तरी तुमची पाणी मागण्याची हिंमत होत नाही. कारण तिथे बनावट पुराव्यांचे गठ्ठे पिशवीत घालून भाजपाने पाळलेले एक माकड अनेकदा आतबाहेर करत असतं. ते फिदीफिदी हसतं. दात विचकतं. आणि रस्त्यात विकत घेतलेल्या ढोकळ्याचे तुकडे रिचवत असतं. कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमधून सुटून आलेला वेडा असावा असं त्याचं ते ध्यान असतं. माझ्या हातात असतं तर मी त्यालाच ‘ईडी’ लावली असती.
पोक्याच्या या बोलण्याचं मला हसू आलं. पण तो बोलत होता त्यात सत्याचा अंश नक्कीच होता. पोक्या मला म्हणाला, भाजपला मुंबई महापालिका जिंकायचीय म्हणून हे सारे खेळ चाललेत. जे इतक्या वर्षांत कुणाच्या बापाला जमलं नाही ते यांना थोडंच जमणार आहे? मी पोपटवाल्या ज्योतिषापेक्षा राजकारणाचा अचूक अंदाज सांगतो, जरी भाजपवाला असलो तरी फोडाफोडी करून सत्ता हस्तगत करण्याचं तंत्र नेहमीच यशस्वी होत नाही. शिवसेनेच्या बाबतीत तर मुळीच नाही. या मुंबईत १९६०पासून शिवसेनेचीच वट आहे. तेव्हा बाळासाहेब होते. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर पहिल्या क्रमांकावर होते. आणि आता हे भाजपचे बूटचाटे शिवसेनेला हिंदुत्ववाद शिकवताहेत. शिवसेनेमुळेच या बूटचाट्यांना मोठमोठी पदं मिळाली. बाळासाहेब गेल्यानंतरही पक्षप्रमुख उध्दवजींनी तीच परंपरा कायम राखली. ज्यांची लायकी नव्हती अशांनाही मंत्रिमंडळात आणि महापालिकेत सन्मानाच्या खुर्च्या दिल्या. त्यांच्यावर विश्वासाने कारभार सोपवला. पण त्यातलेच काही गद्दार निघाले आणि भाजपशी आपले निष्ठावंत नेते आणि शिवसैनिक यांच्या सहाय्याने लढत असता अभिमन्यूला जसे कौरवांनी युद्धात एकटे पाडले तसे एकटे पाडून पाठीमागून वार केले. बाळासाहेब असतानासुद्धा शिवसेनेला एकाकी पाडण्याचे, नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. ते प्रयत्न करणारेच काळाच्या ओघात नष्ट झाले, पण शिवसेना अभेद्य राहिली. स्वत:च्या स्वार्थासाठी अनेकांनी शिवसेनेचा फक्त वापर केला आणि आपले काम झाल्याबरोबर शिवसेनेला अंगठा दाखवला.
गद्दारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्यामुळे शिवसेना मोठी झाली नाही, तर शिवसेनेमुळे तुम्हाला मोठेपण लाभले. उद्या लोक तुम्हाला निवडणुकीत लाथाडतील तेव्हाच तुम्हाला तुमची किंमत कळेल. आपण शून्य होतो, दगड होतो, नको त्यांच्या नादी लागून आईसमान असलेल्या शिवसेनेला लाथाडले आणि असंगाशी संग करून मुंबई गुजरातच्या घशात घालण्याच्या कारस्थानी व धूर्त लोकांच्या मोठ्या कटात सामील झालो. प्रबोधनकार, त्यांचे कुटुंब, मीनाताई, बाळासाहेब, त्यांची भावंडं हालअपेष्टा आणि दारिद्र्याशी झुंज देत पुढे आली. प्रबोधनकार आणि बाळासाहेबांनी इतिहास घडवला. शिवसेनेच्या लोकाधिकार सेनेने तर हजारो बेरोजगार तरुणांना एअर इंडियापासून एलआयसीपर्यंत आणि रेल्वेपासून अनेक आस्थापनांपर्यंत चांगल्या नोकर्या मिळवून दिल्या. हे काम फक्त शिवसेनेनेच केलं. भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षाने नव्हे. पण भाजपला आज प्रादेशिक अस्मिता कायम राखणारे देशातील पक्ष डोळ्यांत सलताहेत. त्यांना संपवण्यासाठी त्यांचे हात शिवशिवताहेत. गद्दारांच्या हे लक्षात येत नाही. तिकडे मोदी देशाची अर्थव्यवस्था जेवढी करता येईल तेवढी खिळखिळी करण्याचा प्रयत्न करताहेत आणि इकडे चार दिवसांचे बागुलबुवा हवी तशी वारेमाप आश्वासनं देऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला पांगळं करताहेत. मुळात राज्य चालवण्याची कुवत नसल्यामुळे शिवसेनेच्या विरोधकांना हाताशी धरून ही ढकलगाडी ‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ या पद्धतीने चालली आहे. तिचा अपघात कधी होईल आणि तो करणारे त्यांच्यातलेच असतील हे या पोक्याला माहीत आहे.
परवा माझा जुना शाळकरी मित्र भेटला होता. शाळेत असताना आम्ही वरळीच्या दूरदर्शन केंद्रावर तिथे नोकरीत असणार्या मराठी माणसांवर होणार्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या मोर्चात सामील होण्यासाठी वर्गात दप्तर ठेवून गेलो होतो. कुणालाही पत्ता लागला नाही. शाळा सुटण्याच्या वेळी वर्गात हजर. बाळासाहेबांची शिवाजी पार्कवरची भाषणे ऐकण्यासाठी आम्ही दोघे मित्र यायचो. अंगात जोश यायचा. दर गुरुवारी सकाळी तीस पैशांचा ‘मार्मिक’ विकत घेऊन वर्गात जायचो आणि आमचा वाचून झाला की सार्या वर्गात तो सर्क्युलेट व्हायचा. त्यातल्या व्यंगचित्रांनी आम्हा दोघांना माणसं वाचण्याची दृष्टी दिली. ती शाळेतील अभ्यासाने कधीच दिली नाही. आज त्या आठवणी जाग्या झाल्या की शिवसेनेचं मुंबईशी जडलेलं नातं लक्षात येतं.