आई एकविरा माता, तुळजाभवानी माता आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो!
ही एकच हाक ३० ऑक्टोबर १९६६ या दिवशी माझ्या आणि तमाम मराठी माणसांच्या कानांत घुमली! ते स्थळ होते शिवाजी पार्क. याच स्थळावर कुंचल्याचे जादुगार असलेल्या बाळ ठाकरे नामक व्यंगचित्रकाराने एक मोठा विचार दिला. मराठी माणसा जागा हो, ही साद घातली. याच विचारांतून प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले ते होते ‘शिवसेना’. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबईसाठी लढणारी, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारी एक लढाऊ संघटना.
तोपर्यंत या शिवाजी पार्क मैदानावर संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक सभा मी पाहिल्या होत्या. परंतु ३० ऑक्टोबरला गर्दी अलोट होती. वरील उद्गारांनी बाळासाहेबांनी मराठी माणसाला हाक दिली. त्यावेळी संपूर्ण मैदान पिनड्रॉप शांत झालं होतं. तिथेच शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जाण्याची परंपरा सुरू झाली. आजमितीस याच मैदानावर अखंडपणे मेळावे झाले. (अपवाद दोनवेळा पाऊस व दोन वर्षे कोरोना) त्यांची परंपरा शिवसेनेकडेच आहे. ती कोणाला हिरावून घेता येणार नाही.
शिवाजी पार्क मैदानावरून या महाराष्ट्र आणि मुंबईला सतत ५६ वर्षे आपल्या विचाराने मराठी माणसांना व शिवसैनिकांना भारावले गेले. त्यावर आज एक फुटीर गट हक्क सांगतो हे कसं शक्य होऊ शकेल आणि आम्ही शिवसैनिक ते कसं सहन करू? त्रिवार नाही. बाळासाहेबांच्या वाणीने संघटनेने अपार कष्ट करून सांभाळली. प्रत्येक वर्षाच्या दसर्याला मेळावा साजरा करून ते आम्हा शिवसैनिकांना आदेश देत असत. विचारांचे सोने वाटत असत. बाळासाहेबांना गटातटाचे राजकारण पसंत नसे. नियतीच्या हातात असलेल्या दोराने १७ नोव्हेंबर २०१२ रोजी आपली कृती केली आणि बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन झाले. याच मैदानावर अभूतपूर्व असा जनसागर लोटला. त्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले शिवाजी पार्क मैदान आहे.
लेको, आजघडीस बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणार्यांनो, त्याच शिवसेनेला तुम्ही खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहात. तसे होणे अशक्य आहे. या मैदानावर विश्वासघात करणार्यांना हक्क सांगण्याचा अधिकार कुणी दिला? अरे, तुम्ही गट स्थापन केला म्हणजे शिवसेना तुमची झाली काय? बाळासाहेबांनी २०१० साली दसरा मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्र व शिवसेना यांना आपला पुत्र उद्धव व नातू आदित्य यांना अर्पण केलं. ते तुम्ही ऐकले असेलच. वेगळा गट स्थापून तुम्ही याच मैदानावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मस्तके टेकलीत. त्या आसमंतात एक आवाज घुमत होता. गद्दार, गद्दार, गद्दार… विश्वासघातकी दर्शन घेतात. आज तुम्ही मुख्यमंत्री झालात. एका कटकारस्थान करणार्या माणसाच्या नादी लागून हे जे केलंत ते मराठी माणूस विसरू शकणार नाही.
आज बाळासाहेबांच्या नंतर पक्षप्रमुख म्हणून गेली १० वर्षे उद्धवजींनी जी शिवसेना नावारुपाला आणली त्याच शिवसेनेचे तुम्ही आमदार, खासदार आहात. ज्यावेळी २०१९ साली फुटिरांनो, उद्धवजींसमोर तुम्ही तिकीटांसाठी त्यांचे पाय धरत होतात आणि आता त्यांचा पदोपदी अपमान करत आहात? नियती तुम्हाला कधी माफ करणार नाही. शिवसेना नामक आईच्या उदरी जन्म घेऊन आपला उद्धार केलात. आपल्या तुंबड्या भरलात. ज्यावेळी भरलेल्या तुंबड्यांवर धाड पडण्याची वेळ आली त्यावेळी तुम्ही पळालात. आज तुम्हा सर्वांना त्यांचं नाव घेण्याची शरम वाटते आहे. शिवाजी पार्क या मैदानावर शिवसेनाप्रमुखांनी दसरा मेळावा, शिवसेनेचा दसरा मेळावा हे अग्निकुंड पेटवले होते. त्या अग्नीत आपल्या विचारांचे व मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांच्या समिधा टाकत होते.
जाता जाता फुटिरांना एवढेच सांगावेसे वाटते की, बाबांनो ज्या वटवृक्षाच्या छायेत दिवस काढलेत त्या शिवसेनेवर दगड मारत आहात. थांबवा ते. तुम्ही तुमच्या मार्गाने जा. आम्ही शिवसैनिक व मराठी जनता कायम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले. महाराष्ट्राला कोरोना या एका दुर्धर रोगाच्या तावडीतून वाचवले. मायबाप जनतेला देवासमान मानून त्यांचे रक्षण केले. मुख्यमंत्रीपद स्वत: सोडले, त्याच मायबाप जनतेला निरोपाचा रामराम कृतज्ञतापूर्वक जय महाराष्ट्र केला होता. ही जनता कायम त्यांच्याच पाठिशी राहील, हे काळजावर कोरून ठेवा.