• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राजर्षींचा आशीर्वाद

- सचिन परब (प्रबोधन-१००)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 22, 2022
in प्रबोधन १००
0

भिक्षुकशाहीचे बण्ड या पुस्तकासाठी शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना घसघशीत मदत केली. सोबत त्यांनी संदर्भग्रंथांची दारं उघडी करून दिले. त्यात रॉबर्ट इंगरसॉलच्या विचारांची दीक्षा देणं महत्त्वाचं होतं.
– – –

पुराणांवर पुस्तिका लिहून देण्याच्या बदल्यात तब्बल पाच हजार रुपयांचा चेक पाठवून छत्रपती शाहू महाराजांनी प्रबोधनकारांची परीक्षा बघितली. त्यात ते फक्त पास झाले नाहीत, तर मेरिट लिस्टमध्येच आले. मी ज्याला विकत घेऊ शकलो नाही, असा एकमेव माणूस असं सर्टिफिकेटच महाराजांनी प्रबोधनकारांना दिलं. हा काळ १९२०च्या उत्तरार्धाचा किंवा १९२१च्या पूर्वार्धाचा असावा. या काळात प्रबोधनकार भिक्षुकशाहीचे बण्ड हे पुस्तक लिहित होते. त्याच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन मे १९२१मध्ये झालंय.
मुंबईतल्या पन्हाळा लॉजमध्ये शाहू महाराज, त्यांचे दिवाण सर रघुनाथराव सबनीस आणि प्रबोधनकार यांच्यात चर्चा सुरू होत्या. सध्या काय लिहिताय, अशी चौकशी महाराजांनी केली. प्रबोधनकार तेव्हा हे पुस्तक लिहित होते. त्याआधी त्यांनी नोकरशाहीचे बण्ड म्हणून ग्रामण्याचा इतिहास मांडला होता. आता त्याच्या पुढची तयारी सुरू होती. प्रबोधनकार त्यांच्या ग्रंथांसाठी फारच मेहनत घेत, हे त्यांची पुस्तकं बारकाईने वाचलं की कळतं. अनेकदा आक्रमक भाषेच्या प्रेमात पडल्याने वाचकांना प्रबोधनकारांनी कष्टाने मिळवलेले बारीक सारीक संदर्भ लक्षात येत नाहीत. पण ते देशविदेशातली पुस्तकं मिळवून ते भक्कम युक्तिवाद करत वाचकाला विचार करायला भाग पाडत.
त्यामुळे शाहू महाराजांच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर देणं प्रबोधनकारांसाठी सोपंच होतं. महाराजांनी विचारलं की संदर्भ ग्रंथ कोणते अभ्यासलेत? शाहू महाराज हे फक्त राजे नव्हते. ते क्रांतिकारकच होते. म्हणून ते असा प्रश्न विचारू शकले. त्या प्रश्नावर प्रबोधनकारांनी संदर्भग्रंथांची नावं सांगितली. त्यानंतर छोटासा पण महत्त्वाचा संवाद या दोघांमध्ये झाला. प्रबोधनकारांनी नोंदवलेला तो संवाद आणि त्यावरचा शेरा जसाच्या तसा वाचायला हवा, कारण त्यातून शाहूराजांच्या व्यासंगाची आणि विचारांची खोली लक्षात येते.
महाराज : सॅव्हेलचा प्रीस्ट्क्राफ्ट अँड किंगक्राफ्ट हा ग्रंथ नाही तुझ्याजवळ? वा वा. तो तर प्रथम अभ्यासला पाहिजे. भिक्षुकशाहीप्रमाणे राजेशाहीसुद्धा ह्युमॅनिटीला जाचक ठरलेली आहे.
मी (म्हणजे प्रबोधनकार) : मग आपणही त्या कक्षेत सापडता?
महाराज : सापडणारच. सध्याच्या राजेशाह्या काय अमरपट्टा घेऊन आल्या आहेत वाटतं? आजच आम्ही ब्रिटिशांच्या कृपेच्या धाग्यावर लोंबकळलेले आहोत. आज ना उद्या हा धागा तुटणारच. बरं ते असो. हे पहा, अमेरिकेतील आर.पी.ए. सिरीजची पुस्तके चांगली अभ्यास कर. इंगरसॉल्स रायटिंग्ज अँड स्पीचेस तर नेहमीच अभ्यासात असली पाहिजेत. इंगरसॉल
वाचल्याशिवाय समाजसुधारणेची भाषा कोणी बोलू नये.
अशा कितीतरी संदर्भ ग्रंथांची नावे महाराज भडाभड सुचवीत होते आणि कशात काय विषय आहे, यावर जिव्हाळ्याने प्रवचन करीत होते. या क्षणाला प्रथमच महाराजांच्या व्यापक ज्ञानसंग्रहाचा मला साक्षात्कार झाला. फार काय, पण कित्येक पुस्तकांतले काही महत्त्वाचे इंग्लिश परिच्छेद त्यांनी मला पाठ म्हणून दाखविले. वरवर पहाणार्‍यांना महाराज अडाणी नि हेंगाडे वाटले, तरी अंतरंगाचा, मुख्यत्वे त्यांच्या परिपक्व ज्ञानाचा मागमूस इतरेजनांना सहसा लागतच नसे. आज तो मला लागला नि मी अगदी चाट पडलो. जवळ जवळ अर्धा तास ते सारखे तन्मयतेने बोलत होते नि मी तितकाच तन्मय होऊन ऐकत होतो.`
आश्चर्य म्हणजे प्रचंड व्यासंग आणि ग्रंथसंग्रह असलेल्या प्रबोधनकारांकडे शाहू महाराजांनी सांगितलेल्या ग्रंथांपैकी एकही ग्रंथ नव्हता. प्रबोधनकार तेव्हा जसे चाट पडले होते, तसं चाट पडण्याची पाळी आपली असते. कारण शाहू महाराजांच्या ज्या अफाट विद्वत्तेचं दर्शन प्रबोधनकारांना घडलं ते आपल्यालाही नवीन असतं. कुणी त्यांच्या अभ्यासाची चर्चा करत नाही, अगदी त्यांचे अभ्यासकही नाहीत. त्यामुळे त्यांचा हा पैलू फारसा कधीच पुढे येत नाही. प्रबोधनकारांसारख्या वाचनवेड्या माणसाला माहीत नसलेले संदर्भ फटाफट सांगणं. कोणत्या पुस्तकात कोणते संदर्भ आहेत, हे सांगणं. त्याचबरोबर त्यातले परिच्छेद घडाघडा पाठ बोलून दाखवणं, हे भल्याभल्या विद्वानांना जमणारं नाही. पुरोहितशाही आणि राजेशाही यातला वैचारिक संघर्ष युरोपमध्ये चालला. त्याच्याशी संबंधित हे संदर्भ असावेत. ते अमेरिकेत सुरू प्रकाशित होणार्‍याएका रॅशनलिस्ट विचारांच्या पुस्तकांच्या शृंखलेचा संदर्भ देतात. म्हणजेच ते त्यांच्या काळातल्या जागतिक विचारविश्वाबद्दलही जागरूक होते. विशेष म्हणजे त्यांनी सांगितलेले संदर्भ आजही इंटरनेटसारख्या जगाला कवटाळणार्‍या माध्यमांतही शोधून सापडत नाहीत. अपवाद फक्त रॉबर्ट इंगरसॉल यांचा.
आपल्यावर प्रभाव टाकणार्‍या चार महान विचारवंतांमध्ये प्रबोधनकार इंगरसॉलचा उल्लेख करतात. चार विचारवंत या नावाने यापूर्वी प्रकाशित झालेल्या याच सदरामधील लेखात इंगरसॉलविषयी माहिती आली आहे. या महान बुद्धिवादी तत्त्ववेत्त्याच्या विचारांची दीक्षा शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना दिली. देव, धर्म, धर्मसंस्था, देवस्थानं, धर्मगुरू याविषयीचा प्रबोधनकारांचा चिकित्सक दृष्टिकोन आधुनिक पद्धतीने घडवण्याचं काम इंगरसॉलच्या वाचनाने केलं. प्रबोधनकारांच्या कार्याविषयी अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी नोंदवलेलं मत महत्त्वाचं आहे. ते लिहितात, `महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीला बुद्धिप्रामाण्यवादी रूप मिळवून देण्यात प्रबोधनकारांचा वाटा महत्त्वाचा आहे.` प्रबोधनकारांच्या या बुद्धिप्रामाण्यावर इंगरसॉलचा प्रभाव आहे आणि तो इंगरसॉल प्रबोधनकारांना शाहू महाराजांमुळे भेटला, हे विसरता कामा नये.
प्रबोधनकारांसारखी अनेक मोठी माणसं घडवण्यात शाहू महाराजांचा हातभार होता. विशेष म्हणजे महाराज प्रबोधनकारांना संदर्भासाठी पुस्तकांची नावं सांगून शांत बसले नाहीत. महाराजांना कळलं की प्रबोधनकारांकडे त्यांनी सांगितलेले ग्रंथ नाहीत. तेव्हा त्यांनी दिवाण साहेबांना सांगितलं, `मुंबईतील काही ठळक बुकसेलर कंपन्यांना एक सर्क्युलर पत्र पाठवा, म्हणावं, ठाकरे तुमच्याकडून त्यांना लागतील ते ग्रंथ निवडून घेतील. ते त्यांना द्यावे आणि बिले दरबाराकडे पाठवावी. त्या पत्रांच्या प्रती याच्याजवळ द्या.` प्रबोधनकारांकडे वळून महाराज म्हणाले, `तुला लागतील ते ग्रंथ या बुकसेलरांकडून घे आणि संदर्भग्रंथाचा ठीक अभ्यास करून तुझा ग्रंथ पुरा कर.`
इतकं सगळं करूनही शाहू महाराज थांबले नाहीतच. प्रबोधनकार `भिक्षुकशाहीचे बंड` पुस्तकाच्या पाच हजार प्रती छापणार होते. प्रत्येक प्रतीची किंमत अडीच रुपये यानुसार शाहू महाराजांनी दोन हजार प्रती विकतही घेतल्या. त्याची किंमत म्हणून पाच हजार रुपयांचा अडव्हान्स प्रबोधनकारांना दिलाही. प्रबोधनकारांनी त्या पाच हजारांच्या चेकचा आनंदाने आणि प्रणिपातपूर्वक स्वीकार केला. पुराणाच्या आधारे पुस्तिका लिहिण्याच्या परीक्षेत पाच हजारांचा चेक धुडकावणार्‍या प्रबोधनकारांनी पुराणांच्या चिंधड्या करणार्‍या पुस्तकासाठी पाच हजार सन्मानाने स्वीकारले. ते देताना महाराजांनी गंमत केलीच. हसत हसत म्हणाले, `आता नाक मुरडशील तर ते इथंच छाटलं जाईल. मग पुढचं पुढं.`
इतकं प्रोत्साहन मिळाल्यामुळे पुढच्या दीड दोन महिन्यांतच प्रबोधनकारांनी अभ्यासाचा आणि लिखाणाचा धडाका लावला. ग्रंथ प्रकाशितही केला. शंकराचार्य मठातले गुंडोपंत पिशवीकर यांच्या हस्ते महाराजांसाठी दोन हजार प्रती पाठवूनही दिल्या. महाराजांनी त्यांच्या दौर्‍यात गावोगावच्या वाचनालयांना आणि अभ्यासकांना या प्रती वाटल्या. प्रबोधनकारांच्या विचारांचा प्रसार शाहू महाराजांनी जातीने केला. कारण त्या दोघांचे विचार वेगळे नव्हते.
राजा असूनही सत्तेच्या मोहापासून अलिप्त असणार्‍या रामायणातल्या राजा जनकाप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनाही राजर्षी म्हटलं जातं. त्यांच्यातलं हे ऋषीपण फक्त मंगल आचरणामुळे नव्हतं तर विद्वत्तेसाठीही होतं. पण त्यांच्या विद्वत्तेची चर्चा फारशी झाली नाही. त्याला ते स्वतःही कारण होते. प्रबोधनकारांनी सांगितलेल्या आणखी एका आठवणीतून हे लक्षात येतं.
एकदा प्रबोधनकार राजवाड्यातल्या अतिथीगृहात महाराजांची वाट बघत बसले होते. महाराज आंघोळीला गेले होते. तेवढ्यात इचलकरंजीचे सत्ताधीश श्रीमंत बाबासाहेब घोरपडे लवाजम्यानिसी आले. तेही वाट बघत बसले. तेवढ्यात महाराज उघड्या बोडक्या अवस्थेतच आले. कमरेभोवती मोठा टॉवेल गुंडाळला आहे, आंघोळीचं पाणी निथळत आहे, असं त्यांचं रूप बघून सगळे बुचकळ्यात पडले. महाराज अस्सल कोल्हापुरी ठेचात बोलू लागले, `बसा बसा माफ करा. टाईम चुकला. आंगोली धुवायची होती आमाला. म्हून याळ लागला. काय बाएसाहेब, आलात इलायत बघून?` बाबासाहेबांनी युरोपाच्या प्रवासवर्णनाचा मोठा सचित्र ग्रंथ महाराजांना अर्पण केला. महाराज ग्रंथ हातात धरूनच पानं उलटू लागले. त्यावर बाबासाहेब म्हणाले, `महाराज, ग्रंथ उलटा धरलात.`
महाराजांनी जाणीवपूर्वकच ते केलं होतं. ते म्हणाले, `आरिचभन, ह्योबि न्हाय आलं माज्या ध्येनात. हाय कुटं येवडं ग्यान आमाला तर उलटं सुलटं उमगायचं? वा, लइ छान गरांत लिवलास हां. न्हाय तर आमी. इलायतला जसं गेलो,तसं हात हालवीत परतलो. आरं असली इदुत्तीची कामं तुमी श्येना बामनानीच करावी. न्हाय तर आमचं ह्यं मर्राटं. रानगट्टच्या रानगट्ट.` इचलकरंजीचे संस्थानाधिपती घोरपडे हे जातीने ब्राह्मण. त्या काळात महाराजांना त्रास देणार्‍यांत त्यांच्या संस्थानातली ब्राह्मणी वर्तमानपत्रं आणि संस्था आघाडीवर होत्या. त्यामुळे महाराजांनी त्यांना बुचकळ्यात पाडण्यासाठी अडाणीपणाचं सोंग घेतलं. नंतर प्रबोधनकारांना म्हटलं, `काय कोल्हापूरचा छत्रपती कसा असतो पाहिलास ना? रांगडा हेंगाड्या!`
एरव्ही आपल्या सेवकांचेही उच्चार अचूक हवेत, यासाठी आग्रह असणार्‍या शाहू महाराजांनी रांगडेपणाचं नाटक अचूक वठवलं होतं. बालगंधर्व ते केशवराव भोसले या महान नाट्यकर्मींना घडवणार्‍या राजर्षींना नाटक जमणार नाही, असं थोडंचं होतं.
या प्रसंगानंतर वर्ष दीड वर्षातच शाहू महाराजांचं निधन झालं. शाहूपुत्र राजाराम महाराजांची राजवट सुरू झाली. तोवर दिवाण सबनीस यांनीही निवृत्ती घेतली होती. त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या ऑडिटरला प्रबोधनकारांना दिलेल्या पाच हजारांचा संदर्भ सापडेना. त्याने प्रबोधनकारांना नोटीस पाठवली की दरबारचे कर्जाऊ घेतलेले ५ हजार परत करावेत. त्यांच्याकडे पुरावा म्हणून पुस्तक विक्रेत्यांना दिलेल्या पत्राच्या कार्बन कॉपी फक्त होत्या. त्या त्यांनी पत्रासह नवे दिवाण अण्णासाहेब लठ्ठे यांना पाठवल्या. निवृत्त दिवाण रघुनाथराव सबनीस यांचीही साक्ष काढली. त्यामुळे हे सरकारदफ्तरी दाखवलेलं कर्ज `ग्रंथकारास सन्मानाचे अनुदान` म्हणून नोंदवलं गेलं.

Previous Post

चित्ते, कबुतर आणि मर्कट

Next Post

याचसाठी पाडले मविआ सरकार!

Next Post

याचसाठी पाडले मविआ सरकार!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.