चळवळीच्या मोठमोठ्या गोष्टी करायच्या, मदत मिळवायची आणि प्रलोभनांना बळी पडून कामाचं मातेरं करायचं, अशा आरंभशूरांचे अनुभव शाहू महाराजांना बरेच आले होते. त्यामुळे त्यांनी प्रबोधनकारांच्या विचारनिष्ठेची परीक्षा बघणं स्वाभाविक होतं.
– – –
`कोल्हापूर माझं आणि मी कोल्हापूरचा`, इतका या रसरशीत शहराशी प्रबोधनकारांचा जवळचा ऋणानुबंध तयार झाला. त्याचं मुख्य कारण छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला आधार हे होतं. महाराजांमुळेच या शहराचं बंडखोर व्यक्तिमत्व आकाराला आले. ते प्रबोधनकारांसारख्या माणसाला आवडणारंच होतं. या शहराने प्रबोधनकारांना आपलं मानलं कारण शाहू महाराजांनी त्यांना आपलं मानलं होतं. पण त्यासाठी प्रबोधनकारांना महाराजांनी योजलेल्या अग्निदिव्यातून पार व्हावं लागलं होतं.
प्रबोधनकारांनी `माझी जीवनगाथा`मध्ये शाहू महाराजांच्या आठवणी सांगितल्या आहेत. तो भाग राजर्षी शाहू गौरव ग्रंथातही आवर्जून घेण्यात आला आहे. त्यातून महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच पैलू उभे राहतात. प्रबोधनकारांना महाराजांविषयी असणारा आत्यंतिक आदर त्यांच्या शब्दांशब्दांतून जाणवतोच; पण ते शाहू महाराजच नाही, तर त्यांचे आराध्य असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचेही अंधभक्त नव्हते. त्यामुळे शाहू महाराजांच्या आठवणी सांगताना ते त्यांच्या अफाट व्यक्तिमत्त्वातला भला माणूस आपल्यासमोर ठेवतात. तो महत्त्वाचा आहे.
प्रबोधनकारांची महाराजांशी झालेली पहिली भेट १९१८च्या अखेरीची असावी. त्यानंतर वर्षभराने म्हणजे १९२१च्या जानेवारीतली ही आठवण आहे. नोकरी सांभाळून ग्रंथलेखनासाठी संशोधन, व्याख्यानांचे दौरे यामुळे त्यांची दगदग खूप झाली होती. त्यामुळे ते टायफॉइड आणि निमोनियाचं निमित्त होऊन अत्यवस्थ झाले. तीन महिने अंथरुणावर होते. एक महिन्याची भरपगारी रजा झाल्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट देऊन अर्ध्या पगारावर राहावं लागत होतं. खर्च वाढतच होता. आर्थिक अडचण भयंकर होती.
अशी आर्थिक तंगी असताना माणसाची कसोटी पाहता येते, हे शाहू महाराजांना माहीत होतं. त्यामुळे तत्त्वनिष्ठेचा अभिमान बाळगणार्या प्रबोधनकारांची खरी पारख करण्याची हीच वेळ आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. चळवळीच्या मोठमोठ्या गोष्टी करायच्या, मदत मिळवायची आणि काम करताना प्रलोभनांना बळी पडून कामाचं मातेरं करायचं, अशा आरंभशूरांचे अनुभव शाहू महाराजांना बरेच आले होते. त्यामुळे त्यांनी प्रबोधनकारांच्या विचारनिष्ठेची परीक्षा बघणं स्वाभाविक होतं. दरबारातही कुणाला काही कळू नये अशा पद्धतीने महाराजांनी प्रबोधनकारांसाठी एक पत्र तयार करून घेतलं. एकाकडून कोर्या कागदावर नुसता मजकूर लिहून घेतला. दुसर्याकडून लिहिलेला भाग दुमडून नावाचा मायना लिहून घेतला. पाकिटावरचा पत्ता तिसर्याकडूनच लिहिलेला होता. स्वतः सही करून पाकीट चौथ्याच्याच उपस्थितीत सीलबंद केलं. वर हे पत्र घेऊन भलत्याच तिघांना प्रबोधनकारांकडे मुंबईला पाठवलं. ही महाराजांची नेहमीची पद्धत होती.
या तिघांत `विजयी मराठा`चे संपादक आणि प्रबोधनकारांचे जवळचे मित्र श्रीपतराव शिंदे होते. मथुरे नावाचे एक महाराजांचे अधिकारी होते. त्याशिवाय तंजावर खटल्याचं काम पाहणारे वकीलही सोबत होते. दादरच्या मिरांडा चाळीतल्या खोलीत हे तिघे आले. प्रबोधनकार बिछान्यावर पडून होते. तब्येतीची चौकशी झाल्यानंतर त्यांनी महाराजांनी दिलेलं पत्र प्रबोधनकारांना दिलं. एका विषयावर पुराणांच्या आधारे ३०-३२ पानांची पुस्तिका लिहून देण्याचं स्वतःच्या सहीचं पत्र महाराजांनी पाठवलं होतं.
महाराज आपलं सत्व बघत आहेत, हे प्रबोधनकारांच्या लक्षात आलं. कारण महाराज नेहमी म्हणायचे, पैशाच्या जोरावर अनेक माणसांची मी गाढवं बनवली आहेत. याच दरम्यान तसाच प्रसंग वर्तमानपत्रांत छापून आला होता. `संदेश`कार अच्युतराव कोल्हटकरांनी महाराजांविरुद्ध काहीतरी छापलं होतं. त्यानंतर शाहू महाराज आणि कोल्हटकर मिरज रेल्वे स्टेशनवर एकमेकांना अचानक भेटले. दोघांमध्ये हास्यविनोद झाले. महाराजांनी पाचशे रुपयांच्या नोटा कोल्हटकरांच्या हातात कोंबून `संदेश`चं तोंड बंद केलं. हे लोकांदेखत घडलं आणि त्याची बातमीही छापून आली. त्यावर कोल्हटकरांना कोणी विचारलं, तर ते म्हणायचे, `त्यात गवगवा करण्यासारखं काय आहे? राजाने दक्षिणा दिली, या भटाने घेतली. चुकलं कुठं?`
या सगळ्याची पूर्वकल्पना असल्यामुळे प्रबोधनकारांनी महाराजांच्या दूतांना उत्तर दिलं, `माझी अवस्था पहातच आहात. लेखन शक्य नसले तरी सांगता या विषयावर मी काहीही लिहिण्याचा स्पष्ट नकार देतो. पुराणे म्हणजे शिमगा मानणारा मी आहे.` पुराणांवर प्रबोधनकारांनी सातत्याने भयंकर टीका केली आहे. पुढे `देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे` या लेखांत त्यांनी पुराणांविषयी लिहिलं आहे, ते वाचलं तर पुराणांच्या आधारे पुस्तक लिहिण्यास ते का तयार झाले नाहीत, हे लक्षात येतं. ते लिहितात, `पुराणें म्हणजे हिंदू धर्माचे शौचकूप असे आमचे मत आहे. पुराणांत काही गोष्टी चांगल्या आहेत, असें काही भेदरट सुधारकही म्हणतात. असतील. शौचकूपांत पडलेल्या मोहरा, पुतळ्या ज्यांना उचलायच्या असतील, त्यांनी खुशाल उचलाव्या. आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही.` प्रबोधनकारांचा हा विचार माहीत असल्यामुळे आर्थिक अडचणीच्या काळात पैशाच्या मोहापायी ते तत्त्वभ्रष्ट होतात का याची परीक्षा शाहू महाराजांना करायची होती.
त्यामुळे महाराजांनी पाठवलेल्या वकिलाने सांगितलं की बरं झाल्यावर निवांतपणे लिहिलं तरी चालेल. त्यावर प्रबोधनकारांचं उत्तर महत्त्वाचं होतं, `बरा झाल्यावरही लिहिणार नाही. छत्रपतींसारखा नृपती असे भलभलते विषय काय सुचवतो? एखाद्या जमातीला नीचांतली नीच ठरविली म्हणजे आपली जमात श्रेष्ठ ठरत नाही.` असं उत्तर मिळताच वकिलांनी खिशातून पाच हजारांचा चेक काढला आणि तो महाराजांनी दिलाय असं सांगत प्रबोधनकारांना दिला. महिन्याचा पगार २०० ते २५० रुपये असणार्या प्रबोधनकारांसाठी ती प्रचंड मोठी रक्कम होती. आज त्याची किंमत लाख नाही तर कदाचित कोटीत होईल. बालपणापासून गरिबीत आयुष्य गेलेल्या प्रबोधनकारांनी ही रक्कम स्वीकारली असती, तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. पण त्यांनी हा मोह सहज टाळला. त्यांनी उत्तर दिलं, `हे कशाला? कशासाठी? सांगता ते लिहिणे करण्यासाठी? जा परत घेऊन तो.`
त्यावर श्रीपतराव शिंदे यांनी मैत्री खात्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, `हे पहा केशवराव, छत्रपतींचा प्रसाद आहे तो. नकार देणं बरं नव्हे.` त्यावर प्रबोधनकार उत्तरले, `असला प्रसाद छत्रपतीनेच काय, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने दिला तरी थुंकतो त्यावर. असल्या रकमा महाराज अशा कामीच उधळत असते, तर त्यांच्याविषयी माझा आदरही ओहोटीला लागला, असे सांगा जाऊन त्यांना.` प्रबोधनकारांचं उत्तर या तिघांनी महाराजांपर्यंत पोहोचवलं असणारच. ते महाराजांना आवडलंही असणार. कारण लवकरच महाराजांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावणं पाठवलं. प्रबोधनकार बरे झाले होते आणि ऑफिसात जायला लागले होते. तिथे फोन आला की महाराज मुंबईत आले आहेत आणि त्यांनी पन्हाळा लॉजवर भेटायला बोलवलं आहे.
निरोप मिळाल्यावर प्रबोधनकार पन्हाळा लॉजवर गेले. पन्हाळा लॉज हे महाराजांनी मुंबईतल्या खेतवाडीत बांधलेलं संस्थानचं रेस्ट हाऊस होतं. महाराज मुंबईत आले की इथेच राहत. प्रबोधनकार पोचले तेव्हा त्यांना आधी दिवाण सर रघुनाथराव सबनीस भेटले. प्रबोधनकारांना बघताच ते ताडकन् उठले आणि त्यांनी प्रबोधनकारांना मिठीच मारली. प्रबोधनकारांना काही समजत नव्हतं. रघुनाथराव म्हणाले, `केशवराव शाब्बास, अब्रू वाचवलीत तुम्ही माझी.` असं म्हणत त्यांनी पत्र पाठवण्याआधीचा सगळा घटनाक्रम सांगितला. तो त्यांच्याच शब्दांत, `अनेकांना दाने देऊन वाकविले असले, तरी ठाकरे कदापि वाकणार नाही, असे मी महाराजांना स्पष्ट बजावले. पण ते म्हणाले, आज तो आजाराने झालाय जर्जर. त्यात पैशाची तंगी. कशाला तो अचानक द्रव्यलाभ नाकारेल? मी माझ्या शब्दांना चिकटून बसलो. ते शब्द खोटे पाडण्यासाठी तुमच्याकडे ती मंडळी गेली होती. ती परत आल्यावर आणि तुम्ही काय बोललात वगैरे सर्व सांगितल्यावर मात्र महाराज इंग्रजीत उद्गारले, ही इज द ओन्ली मॅन वुई हॅव कम अक्रॉस, व्हू कॅन नॉट बी बॉट ऑफ ब्राइब्ड. त्या क्षणाला मला इतका आनंद झाला की केव्हा भेटतो तुम्हाला नि कडकडून मिठी मारतो. तुमच्याविषयीचा माझा आत्मविश्वास सार्थ केलात.`
महाराजांच्या परीक्षेत प्रबोधनकार पास झाले होते. विकत घेता आला नाही असा एकमेव माणूस, असं सर्टिफिकेटच त्यांनी प्रबोधनकारांना दिलं होतं. रघुनाथरावांशी चर्चा सुरू असतानाच महाराज आले. प्रबोधनकारांना बघताच महाराज त्यांच्या शैलीत म्हणाले, `काय रे वांड, लयी गुर्मी आली व्हय? आमच्या चेकवर म्हणे थुंकतोस?` महाराजांच्या या शब्दांत कौतुक भरलेलं होतं. ते लक्षात घेऊनच प्रबोधनकारांनी त्यांना उत्तरही दिलंय, `महाराज, गुर्मी कशाची? रागावू नका. आजवर मी आपली किंवा दरबारची काय अशी मोठी सेवा चाकरी केली की त्यासाठी आपण अयाचित पाच हजारांचा चेक मला द्यावा? तशीच ठळक कामगिरी होईल माझ्या हातून तेव्हाचा प्रश्न न्यारा. माफ करा सरकार, पैशाच्या जोरावर गाढव बनणारा माणूस मी नव्हे.`
प्रबोधनकारांच्या या वाक्याने महाराज चमकले. पण त्यांनी गडगडाटी हास्यात विषयच संपवला. परीक्षेत प्रबोधनकार पास झाल्याच सर्वात मोठा आनंद महाराजांनाच झाला असणार. या दोन महामानवांमधल्या निरलस स्नेहाच्या पार्श्वभूमीवर हा प्रसंग पाहायला हवा. त्यात कुठेही प्रबोधनकारांचा उद्धटपणा नाही किंवा शाहू महाराजांचा अविश्वास आणि अपमानही नाही. पुढे शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना अनेकदा उदार हस्ते मदत केली आणि ती प्रबोधनकारांनी आनंदाने स्वीकारली, हे विसरता कामा नये.