दरवर्षी बैलपोळा आणि शिक्षक दिन हे दोन्ही सण अवघ्या काही दिवसांच्या फरकाने साजरे केले जातात. या दिवसांचं इतकं सान्निध्य असण्यात नियतीचा काही सुप्त संकेत असावा असे मला वाटते. वर्षभर अर्धपोटी ठेवून, चाबकाच्या धाकाखाली ऊनपावसात राबवून घेतले जाणे आणि वर्षातून केवळ एक दिवस शिंगे रंगवून, अंगावर झूल पांघरून, चांगलंचुंगलं खायला देऊन ‘आपले भाग्यविधाते’ म्हणून गौरविले जाणे ही बैल आणि शिक्षक या दोन्ही प्राण्यातील विलक्षण साम्याची आणि तितकीच खेदाची बाब आहे.
शिक्षक किंवा गुरु; शाळेतला असो की अध्यात्माचा, की आणखी कुठल्या क्षेत्रातला, त्यांचा सन्मान करणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्यच आहे. महाभारत काळापासून आजच्या महाआरती-हनुमानचालिसा काळापर्यंत, गुरूंचा उचित सन्मान करून त्यांची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. पण दुर्दैवाने शिक्षणाची दुकाने उघडून जेव्हा गुरूंचे टीचर झाले, तेव्हापासून गुरूंच्या आदर निर्देशांकाला सातत्याने लोअर सर्किट लागले आहे.
‘एक से मेरा क्या होगा’ हा आपल्या हावर्या वृत्तीचा लसावि असल्याने, कुठलीही महत्वाची घटना केवळ एकदा साजरी करून भारतीय समाजमानाचं समाधान होत नाही. म्हणून आपण आपला राष्ट्रीय सण २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट असा दोनदा साजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस दोनदा साजरा करतो. नवीन वर्ष तर डझनभर वेळा साजरे करतो आणि गुरूंच्या सन्मानार्थ देखील गुरु पौर्णिमा आणि शिक्षक दिन असे दोन दिवस साजरे करतो.
एक शिक्षक राष्ट्रपती झाला म्हणून त्याच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो हे ठीक आहे. पण ज्या दिवशी एखादा राष्ट्रप्रमुख, शिक्षकांचं राष्ट्राच्या उभारणीतील मोल जाणून, आपलं पद त्यागून शिक्षकी पेशा स्वीकारेल त्या दिवसाला खर्या अर्थाने शिक्षक दिन म्हणता येईल, असे मला वाटते.
मागे एकदा आमच्या एरियातल्या, पॅरोलवर जेलबाहेर आलेल्या नेता-कम-गुंडाकडून स्पॉन्सरशिप घेऊन आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करायचा घाट घातला होता. सत्कारमूर्ती म्हणून आम्ही एका आध्यात्मिक गुरूला आमंत्रण दिले. पण त्याचे एका टीव्ही चॅनेलसोबत लाखो रुपयांचे प्रवचनाचं कॉन्ट्रॅक्ट असल्याने आणि आम्ही केवळ शाल आणि श्रीफळ देणार आहोत हे कळल्याने मोहमायेवर विजय मिळविलेल्या त्या गुरूने येण्यास नकार दिला. सिनेक्षेत्रात उज्ज्वल कारकीर्द केलेल्या एका कलाकाराला गुरुपौर्णिमेला आमंत्रण घेऊन गेलो. पण आपण साधे गुरु नसून महागुरू असल्याने आमंत्रण स्वीकारणे आपल्या शान के खिलाफ असल्याचं त्याचं मत पडलं. एका राजकीय गुरूला गळ घातली तर ते म्हणाले की मला गुरु मानून, माझं बोट धरून राजकारणात आलेले आता मलाच उंगली करू लागले आहेत. त्यामुळे मला स्वतःला गुरु म्हणवून घ्यायची लाज वाटू लागली आहे.
एखाद्याला जोराची लघुशंका लागावी तसा आम्हाला जोराचा सत्कार लागला होता. कुणाचा तरी सत्कार करायचाच होता. मग आम्ही आमचा मोर्चा नजीकच्या सरकारी प्राथमिक शाळेकडे वळवला. आमच्या नेत्याने आम्हाला बजावले की, बर्या बोलाने हेडमास्तर आला तर ठीक, नाहीतर जो मिळेल त्या मास्तरला फरफटत घेऊन या.
आम्ही शाळेत गेलो. मुख्याध्यापकाला भेटलो. त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी चूल पेटवली होती आणि आपला ‘सर’पणा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सरपणाची लाकडे फोडायची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. सबब, ते येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्याध्यापकांची चौकशी केली तेव्हा ते नव्या सरकारने, नव्याने लिहिलेल्या, इतिहासाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या महिन्याभराच्या प्रशिक्षणासाठी तालुक्याच्या गावी गेल्याचे कळले. त्या खालोखाल सिनियर असलेल्या शिक्षकाला सरकारने मतदार यादी बनवण्याच्या कामी जुंपले होते. शाळेतील एकमेव शिक्षिका पोलिओचे डोस देण्यासाठी गावोगाव भटकत होत्या. गणित आणि शास्त्र शिकविणारे शिक्षक शाळेच्या वेळात बाहेर ट्युशन घेत असल्याने त्यांच्याकडेही वेळ नव्हता. शेवटी शाळेत एकच शिक्षक उरले. जे एकाचवेळी पाच वर्ग सांभाळत होते. ते म्हणाले, तुमच्या नेत्याकडून मिळणार्या सन्मानापेक्षा मला माझे विद्यार्थी जास्त प्रिय आहेत. पण आम्ही त्यांना पुढे बोलायची संधी न देता अक्षरशः उचलून घेऊन आलो. डझनभर कॅमेर्यांच्या साक्षीने स्टेजवरून शाल, श्रीफळ देता देता नेताजींनी मास्तरांना, उशीर करून आपला वेळ खोटी केल्याबद्दल झापले आणि सन्मानाने हाकलून दिले. असो.
तर नुकताच देशभर शिक्षक दिन साजरा झाला आणि मागील आठवड्यात शिक्षकांशी संबंधित दोन बातम्या वाचनात आल्या. यातील पहिली बातमी, झारखंडच्या, डुमका जिल्ह्याच्या गोपीकंदर भागातील एका निवासी शाळेतील शिक्षकाने प्रात्यक्षिकांचे गुण कमी दिल्याबद्दल, विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकाला झाडाला बांधून मारहाण केल्याची आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी किंवा त्यांनी काही चूक केल्यास शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देत असत. सध्या अशा शारीरिक शिक्षेवर बंदी असली तरी विद्यार्थ्यांनी शिक्षकाला शिक्षा करण्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळेच बहुदा त्या शाळेने अद्याप या प्रकारची पोलिसांत तक्रार देखील दाखल केलेली नाहीये.
दुसरी बातमी आपल्या ‘सगळं ओक्के’ फेम महाराष्ट्रातील आहे. राज्यातील नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने, प्रत्येक शिक्षकाला वर्गात ‘ए-फोर साईजमध्ये चौकटबंद’ करण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येक वर्गशिक्षकाचे छायाचित्र वर्गात सर्व विद्यार्थ्यांना दिसेल, असे लावण्याचा आदेश निघालेला असून या निर्णयाचे पालन न केल्यास संबंधित शिक्षक शिक्षेस पात्र ठरणार आहेत. गावातले संडास मोजण्यापासून ते माध्यान्ह भोजन शिजवण्यापर्यंत आणि जनगणनेपासून ते आरोग्य अभियानापर्यंत सगळी कामे करून भागल्यानंतर उरलेल्या वेळात, शिकवण्याचेही काम करणार्या मास्तरांना आणि मास्तरणींना शाळेतल्या भिंतीवर लटकावण्याने शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार आहे हे तो निर्णय घेणारे सत्ताधारीच जाणोत. विद्यार्थी शाळेत येवोत अगर न येवोत, अभ्यास करोत अथवा न करोत तरीही आठव्या इयत्तेपर्यंत सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा एक फतवा देशभर लागू आहे. मागील सरकारातील एका शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांना रोज वर्गावर गेल्यानंतर त्यांच्या मोबाइलमधून विद्यार्थ्यांसमवेत ‘सेल्फी’ काढून ती सरकारजमा करण्याचे आदेश दिल्याचेही आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे, शिक्षणाचा खेळखंडोबा करण्यात आपण मागे राहू या भीतीने सद्य सरकारने, पोलीस ठाण्यातील गुन्हेगारांच्या छायाचित्रांप्रमाणे, वर्गात शिक्षकाचा फोटो लावण्याचा निर्णय घेतला असावा. त्यायोगे नाठाळ विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून, मास्तरांच्या फोटोला दाढीमिश्या काढण्याची आणि फोटोखाली ‘वॉन्टेड’ लिहिण्याची आयती संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण विभाग अभिनंदनास पात्र आहे.
शिक्षण विभागाच्या वरील निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध असल्याचे माझ्या कानावर आले आहे. माझे या संघटनांना असे म्हणणे आहे की सरकारचे सर्व विभाग आणि दस्तुरखुद्द सरकारचे मंत्री देशात रामराज्य आणण्याच्या दृष्टीने जीवतोड प्रयत्न करीत असताना केवळ तुम्ही शिक्षकांनी त्यात आडकाठी आणणे योग्य नव्हे. माझी मायबाप सरकारकडे मागणी आहे की अशा आडकाठी आणणार्या शिक्षकांना साधीसुधी शिक्षा नव्हे, तर सराईत गुन्हेगारांप्रमाणे थर्ड डिग्रीच लावायला हवी.
पूर्वी शिक्षकांना पगार कमी असला तरी समाजात सन्मान खूप असायचा. लहानपणी आमच्या गावात शिक्षिका बर्याच असल्या तरी पुरुष शिक्षक (म्हणजे तेव्हाच्या भाषेत; मास्तर) केवळ एकच असल्याचे स्मरते. आश्चर्याची बाब म्हणजे, जिवंतपणी तर सोडाच, लिव्हर फुटून मृत्यू झाल्यावरही आमच्या गावातल्या त्या मास्तरांविषयी कुणी आदराने बोललेले मला तरी आढळले नव्हते. शिक्षक दिनानिमित्त, मला त्या मास्तरांची आठवण आली. एक पोस्ट लिहून त्यांना मानवंदना द्यावी म्हणून त्यांची माहिती विचारण्यासाठी गावातील एक वृद्ध जाणकाराला फोन केला. ते म्हणाले ‘अरे तो कसला आलाय मास्तर! तो स्वतः जन्मात कधी शाळेत गेला नाही, काही शिकला नाही. त्याच्याकडून कुणी काही शिकावं असं त्याचं वर्तनही नव्हतं. त्यामुळे त्याने कुणाला शिकवायचा किंवा कुणी त्याला मास्तर म्हणून संबोधायचा आणि मान द्यायचा प्रश्नच येत नाही. तो बेवडा, दोन पेग मारले की स्वतःच स्वतःला मास्तर म्हणवून घ्यायचा आणि त्याच्याकडून नवटाक-पावशेरचा लाभ झालेले दोनचार फुकटे त्याला मास्तर म्हणायचे. तो काही शिक्षक-बिक्षक नव्हता रे, आजच्या भाषेत बोलायचं तर तो विश्वगुरु होता!’ असो!
‘शाळेत व्यतीत केलेला काळ, हा आयुष्यातील सर्वांत सुंदर काळ आहे’ असं शाळेत असेपर्यंत मला एकदाही वाटलं नाही! उलट, शाळा-कॉलेजात जाऊन पायथागोरसचं प्रमेय, व्हर्निअर कैवार, स्पायरोगायरा, जलपर्णी, सूचिपर्णी, टुंड्रा प्रदेश, प्रकाशवर्षे, अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, द्विगु, बहुव्रीही समास, बाकोबा-कोबाको कसोट्या, चंचू पात्र, कर्कटक, लिटमस पेपर, आम्ल, अल्कली, रेंगूर मृदा, व्यत्यास, त्रिकोणमिती, इष्टिकाचिती, वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ, समशीतोष्ण कटीबंध, तहाची कलमे अन अटी, एका बाजूने येणार्या अन दुसर्या बाजूने जाणार्या पाण्याचे हौद, साइन-कॉस-थिटा अशा आयुष्यात कधीच उपयोगी न पडणार्या असंबद्ध भानगडी शिकण्यात आयुष्याची दहा-पंधरा वाया घालविल्याचा मला बर्याचदा पश्चाताप होतो. पण त्यामुळे अशा असंबद्ध गोष्टी शिकविणार्या शिक्षकांबद्दलचा माझा आदर कमी होत नाही. का? ते सांगतो…
एक बाटली गावठी दारू मंद आचेवर उकळवून त्याचा एक चतुर्थांश काढा बनवल्यास तो पावशेर चपटीमध्ये घालून सहज खिशात ठेवता येतो. आकारमान आणि वस्तुमान कमी होत असूनही त्या द्रव पदार्थाची ऊर्जावहन क्षमता वाढते. हा रसायनशास्त्राचा प्रयोग रोज करून उक्तीपेक्षा आपल्या कृतीद्वारे धडा घालून देणारे अल्कोपहारी शिक्षक आम्हाला भौतिकशास्त्र शिकविण्यास लाभले होते. आमच्या भौतिकच्या मास्तरांचे वस्तुमान कमी असल्याने एस्केप व्हेलोसिटीच्या नियमानुसार ते मुख्याध्यापकाच्या नजरेच्या गुरुत्वाकर्षणातून निसटायचे आणि शाळेमागच्या कृष्णविवरात गुडूप व्हायचे. तिथून परतताना त्यांच्यावरील हॉकिंग रेडिएशनचा प्रभाव आम्हाला पडणार्या रट्टयाच्या दबावावरुन आणि त्यांच्या मुखातून होणार्या वायूच्या उत्सर्जनावरुन स्पष्ट जाणवायचा. एरव्ही मुलींच्या वाट्याला न जाणारे मास्तर अशावेळी सरसकट सगळ्यांना बदडून, ते थिअरी ऑफ स्पेशल रिलेटीव्हिटीपेक्षा थिअरी ऑफ जनरल रिलेटीव्हीटी मानणारे आहेत हे सिद्ध करायचे.
हॉकिंगच्या ‘ब्लॅक होल्स एन्ट सो ब्लॅक’ ह्या प्रबंधाबद्दल ऐकल्यानंतर धीर करून एके दिवशी आम्ही मुलं शाळेमागच्या त्या कृष्णविवरात डोकावलो, तेव्हा तिथे सापडलेल्या चपटींच्या ढीगामुळे आम्हाला कळलेली ही एक क्वार्टर क्वांटम थियरी आजही आम्हाला रोज संध्याकाळी बसण्यासाठी उपयोगी पडते. टीचर्स डे चिरायू होवो! चीयर्स!