गणपती विसर्जन झाले की सुरू होतो श्राद्ध पक्ष. पूर्ण भारतात हा पक्ष, पंधरवडा असतो. आपले भारतीय थँक्स गिव्हिंग म्हणा. पूर्वजांचे स्मरण केले जाते. इथे त्यामागील विचार रूढी यांच्याबद्दल सांगायचे नाही. तर त्यावेळी काय काय केले जाते हे बघायचे आहे. पारंपरिक श्राद्धाच्या जेवणात हंगामी भाजी किंवा फळे वापरली जातात. काही जागी कांदा लसूण असते, काही ठिकाणी नाही. बरेच जागी मृत पूर्वजांना आवडायचे ते जेवण ठेवले जाते. अगदी मटण, कोंबडी, मासे, सिगारेट, विडी आणि मद्य सुद्धा. कोणतेही अन्न, कुठल्याही पद्धतीने केलेले असो, त्यामागील विचार महत्त्वाचा असतो. हल्ली बहुजन समाज, आदिवासी, मूलनिवासी यांच्या शतकानुशतके चालत आलेल्या खाणे-पिणे आहार धर्म यांना मिटवून, एक तद्दन उपरे रूप देण्याची कारवाई, अतिशय छुप्या पद्धतीने भारतभर केली जात आहे. लादलेला शाकाहार हे त्यातील एक. शाकाहार म्हणजे पवित्र आणि धार्मिक असे लोकांच्या अंगी बाणवले जाते आहे. आदिवासी आणि अन्य अनेक समाजांत मांसाहार हजारो वर्ष चालू आहे. त्यांच्या देवाला पण मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि पितरांना पण तसाच.
थोडक्यात मुद्दा काय की विविध प्रकारचे अन्न यावेळी भारतभर होते. प्रदेश, समाज, रीती यानुसार त्यात वेगळेपणा असतो आणि तो स्वाभाविक आहे. कोकणात श्राद्ध पक्ष म्हाळ म्हणून ओळखला जातो. दोन तीन प्रकारच्या भाज्या, उसळी, खीर, वडे, पुरी असे भरगच्च जेवण असते. काही समाजांत यावेळी गवार भोपळा भाजी, आमसूल चटणी असे पदार्थ आवर्जून केले जातात. महाराष्ट्रात तांदूळ खीर श्राद्ध प्रसंगी असायलाच हवी. बाकी भारतात तांदूळ खीर शुभप्रसंगी केली जाते. हा फरक आपण मान्य करायला हवा. आपले तेच योग्य असा दृष्टिकोन बरोबर नाही. तर आज आपण महाराष्ट्र आणि भारतातील काही राज्य यात काय पदार्थ असतात ते बघणार आहोत.
खीर पूर्ण भारतात होते. महाराष्ट्रात गव्हाचा रवा, गूळ, दुधी भोपळा यांची खीर असते. दक्षिण भारतात डाळ, गूळ, नारळ दूध, अन्य ठिकाणी तांदूळ साखर दूध. महाराष्ट्रात श्राद्धप्रसंगी तांदूळ खीर असायलाच हवी.
तांदूळ खीर
साहित्य : तांदूळ- आंबेमोहोर अथवा इंद्रायणी असावा. नसल्यास कोलम चालेल. अर्धी वाटी धुवून, पंचावर पसरून कोरडे करून दूध मलईचे १ लिटर नेहमीप्रमाणे तापवून साखर अर्धी वाटी, अर्धी वाटी मिल्क मेड आवडीने बदाम काजू वेलची पूड इत्यादी. चारोळी टाळावी.
कृती : तूप गरम करून त्यात दोन लवंग घालून तांदूळ हलके परतून घ्यावेत. त्यात अंगासोबत कडकडीत पाणी घालून किंचित शिजवून घ्यावे. आता दूध घालून, मंद आगीवर, तांदूळ शिजेतो सतत ढवळत राहावे.
दुधाचा रंग पालटला की साखर. ती विरघळली की मिल्क मेड. मग बदाम वेलची इत्यादी. साधारण तासाभरात खीर होते. गार झाल्यावर घट्ट होते त्या बेताने दूध घ्यावे.
—-
दुधी भोपळा/लाल भोपळा खीर
साहित्य : भोपळा साल काढून जाड किसून १ वाटी, पाणी टाकू नये. साखर आवडीने. गार दूध अर्धा लिटर. आधीच दुधात साखर घालून, थोडे आटवून, मग पूर्ण गार करावे. कारण गरम दूध ओतले की फाटू शकते. त्यासाठी गार दूध. वेलची.
कृती : तूप गरम करून त्यात दोन लवंग परतून घ्याव्यात.
त्यात भोपळा किस घालून पाणी आटेपर्यंत लालसर करावा.
बेताचे पाणी घालून शिजवावे. आता अटवलेले गार दूध घालून एक छोटी उकळ आणावी. फार उकळू नये. दूध आणि साखरेऐवजी नारळ दूध आणि गूळ घेता येतो. किस शिजवताना, गूळ, पाणी घालून, शिजवून, शेवटी घट्ट नारळ दूध घालून, एक छोटी उकळी घ्यावी.
—-
आमसूल चटणी
साहित्य : १०/१२ आमसूल किंचित पाण्यात भिजवून
मिरच्या, आले, गूळ, मीठ सर्व मिक्सरमधून खरबरीत वाटून घ्यावे.
—-
आल्याचे रायते
एकेकाळी कोकणात दूध कमी असायचे, तेव्हा दह्याऐवजी ओले खोबरे घेवून कोशिंबिरी केल्या जायच्या. हल्ली वेगन लोक असतात त्यांना हे नक्की आवडेल.
साहित्य : अर्धा बोट आले साल काढून जाड किसून, अर्धी वाटी ओले खोबरे, हिरवी मिरची, जिरे, मीठ साखर आणि हवे तर थोडे दही. फोडणीसाठी, किंचित जिरे, कढीलिंब, हिंग.
कृती : ओले खोबरे, मिरची, जिरे सर्व गुळगुळीत वाटावे.
आले आणि खोबरे वाटण व्यवस्थित एकत्र करून मीठ साखर घालून ठेवावे. दही हवे तर आताच घालावे. पळीत तूप, जिरे, हिंग, कढीलिंब फोडणी करून रायत्यावर ओतावी.
चवदार रायते तयार. असेच टोमॅटो, काकडी, बीट यांचे रायते होते.
—-
गवार भोपळा भाजी
साहित्य : कोवळी गवार शिरा काढून तुकडे करून पाव किलो,
लाल भोपळा साल काढून चौकोनी तुकडे करून गवारीच्या अर्धा,
हिरवी मिरची, ओले खोबरे, हळद, गूळ, मीठ, फोडणी साहित्य
आणि तेल.
कृती : फोडणी करून त्यात प्रथम भोपळा किंचित शिजवून घ्यावा
आता गवार, हळद, मीठ, गूळ घालून एक वाफ काढावी.
शेवटी ओले खोबरे घालावे.
—-
काळे वाटाणे/वाल/मटार/
चवळी/मटकी पातळ उसळ/सांबारे
नेहमी घेतो तसे कांदा लसूण घ्यायचे तर घेवू शकता. अथवा ही कृती बघा.
साहित्य : कोणतेही कडधान्य आवडीने मोड काढून, सोलून. अर्धी वाटी, सुके/ ओले खोबरे पाव वाटी, लवंग ३, मिरी ५/६, दालचिनी १ छोटा तुकडा, जिरे पाव चमचा, थोडी खसखस, छोटे आले तुकडा. हळद, गूळ, मीठ, तेल, फोडणी साहित्य.
कृती : कडधान्य किंचित उकडून घ्यावे.
खोबरे आणि गरम मसाला व्यवस्थित लालसर परतून, गुळगुळीत वाटून घ्यावा. तेल गरम करून फोडणी करावी. त्यात खोबरे वाटण घालून परतून घ्यावे. उकडलेले कडधान्य घालून, हळद, मीठ, गूळ, तिखट आणि जसे घट्ट पातळ हवे त्या बेताने पाणी घालून एक उकळी आणावी. घट्ट रस्सा हवा, तर खोबरे वाटताना चमचाभर कडधान्य घालून वाटावे.
—-
वडे
साधारणपणे भरडाचे वडे केले जातात. पण भरडा मिळणे शक्य नसल्यास तांदूळ पिठी वडे करावे.
साहित्य : तांदूळ पिठी १ वाटी,
एक चमचा उडीद डाळ भिजवून गुळगुळीत वाटून,
धने, जिरे, हिंग, बडीशोप सर्व एक चमचा. खरबरीत वाटून.
कृती : वडे करायच्या ५/६ तास आधी पीठ भिजवून घ्यावे.
पिठी, वाटलेली उडीद डाळ, मीठ, जिरे, वाटण, सर्व एकत्र करून, घट्ट पीठ भिजवावे. पीठ नंतर सैल होते म्हणून अधिक घट्ट भिजवून घ्यावे. भिजवताना त्यात पळीभर तेल कडकडीत गरम करून त्याचे मोहन घालावे.
तेल कडकडीत तापवून घ्यावे. प्लास्टिकवर तेल घालून त्यावर बोटाने पीठ थापून घ्यावे. थालीपीठ करतो तसेच. फार पातळ नको. वडे कडक होतात. आग कमी करून, लालसर तळून घ्यावेत. तळताना झार्याने तेल, वड्यावर उडवावे, की ते छान फुगतात.
वडे थापले जात नसल्यास जाड रवा घालावा. काही ठिकाणी वड्यात हळद घालतात. आवडीने ठरवावे. पीठ उरले तर दुसर्या दिवशी त्याची छोटी थालीपीठ करावीत.
प्रामाणिक भक्तीने केलेला कोणताही प्रसाद देव आणि पूर्वज यांना आवडतो हे ध्यानात हवे. त्यामुळे फार कर्मकांड आणि बाकी उपचार न करता श्रद्धा असू द्यावी.