स्त्रीपार्ट करण्याची मध्यंतरी लाटच आली होती. इथेही पॅडी आणि प्रसाद कथेची गरज म्हणूनच स्त्रीपार्ट करतात. अशा ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ची मजा काही औरच! ज्याची तुलना चॅनलवरल्या कार्यक्रमांशी करता येणार नाही. रसिकांची या प्रवेशाला उत्स्फूर्त दाद मिळते. रंगभूमीवरली ‘मार्मिक’ व्यंगचित्रे बघितल्याचे समाधान हशा-टाळ्या यातून प्रगट होते. ही अर्कचित्रे उभं नाट्यगृह दणाणून सोडतात.
– – –
अनिल बर्वे यांच्या ‘पुत्रकामेष्टी’ या नाटकात ‘उर्मिला’ला लग्नानंतर मूल होत नाही, तर रत्नाकर मतकरींच्या ‘जोडीदार’मध्ये पत्नी शरयू समोर दुसर्याच बाईची नवर्यापासून कूस भरते. पु. भा. भावे यांच्या ‘वर्षाव’ कादंबरीवरून शं. ना. नवरे यांनी नाटक दिले. त्यातली कुसुमची गोष्ट. तिचा नवरा नपुसक. षंढ नवरा पदरी पडतो. तर प्रशांत दळवी यांच्या ‘ध्यानीमनी’त दत्तक मूल घेणे हा पर्याय पुढे येतो. सतीश आळेकर यांच्या ‘शनिवार रविवार’मध्ये पत्नी सुमनला मूल होत नाही पण तिचा पती ते तिला जाणवू देत नाही. अशा अनेक नाटकांतून नवविवाहितांना मूल न होण्याच्या गंभीर समस्येवरचे शोकात्म नाट्य आणि त्याभोवतीचे अनेक कंगोरे आजवर रसिकांना हेलावून गेलेत. नेमक्या याच वाटेवरल्या विषयावर नाटककार, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी ‘कुर्रऽऽऽ’ या नव्या आविष्कारातून मनोरंजनाची खमंग फोडणीही दिलीय. जी तशी तारेवरची कसरत असली तरी कुठेही खटकत नाही.
‘कुर्रऽऽऽ’ हे नाटकाचं नाव. त्याचा संबंध पटकन कळत नाही. जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यानं म्हटलं होतं की ‘नावात काय आहे?’ याचं उत्तर- ‘खूप काही आहे’ किंवा ‘खूप काही नाही’ असं दुहेरी देता येतं. पण नावाभोवती एक अर्थ दडलेला असतो खरा. त्याभोवती विषय, व्यक्तिरेखा वैशिष्ट्य हे पटकन जाणवते. ‘कुर्रऽऽऽ’ म्हणजे नवजात बाळाच्या कानात बारशाच्या दिवशी आत्याबाई कुर्रर्रऽऽ करते, तो संदर्भ या नावाला असणार. या नावाला जागून नाट्यप्रयोग अगदी शंभर नंबरी सोन्यासारखा हास्य’कुर्रऽऽऽ’कुरकुरीत झालाय.
चॅनलवरल्या मालिकांचे लेखन करणारा आणि पॉश घरात वास्तव्याला असलेला एक लेखक अक्षर याच्या जीवनात घडलेले हे नाट्य. त्याची सुविद्य पत्नी पूजा. लग्नानंतर पाच वर्षे उलटलेली. दोघेही आपल्या बाळाची प्रतीक्षा करताहेत. या दांपत्यासोबतच पूजाची आई वंदना देखिल इथेच ‘घरोंदा’ करून आहे. पुत्रप्राप्तीसाठी पूजावर एकीकडे डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे आईचा ज्योतिष-बुवाबाजीवर विश्वास. दोन्हीकडून एकेक प्रयोग सुरू झालेत. पण काही केल्या अडथळे संपता संपत नाहीत. यात भर म्हणजे पंचवीस वर्षानंतर एके दिवशी अचानक एक जटाधारी साधू घरात प्रगटतो. तो घर सोडून गायब झालेला आईचा नवरा आहे. हिमालयात भटकंती केलेला बुवा झालाय. आयुर्वेद-जडीबुटीची पिशवी त्याच्यासोबत फिरवतोय. प्रत्येक आजारावर त्याच्याकडे उपचार आहेत. बाबाची ओळख पटते. आई चक्क पेट्रोलने नवर्याला आंघोळ घालते. माणसात आणण्याचा प्रयत्न करते. त्यातून नाट्य नव्या वळणावर पोहचते.
अपत्यहीन मुलीला बाप जडीबुडीचा जालीम डोस देतो आणि कमालीचा धक्कादायक गोंधळ उडतो. एकाच वेळी आई आणि मुलगी दोघीजणी गर्भवती राहातात. सारेजण चक्रावून जातात. जगाला कळलं तर चेष्टेचा, थट्टेचा विषय ठरेल या भयाने तणावाचे वातावरण. पण अक्षर ठाम भूमिका घेतो. जगाची पर्वा न करता दोघींच्या बाळंतपणासाठी सज्ज होतो. ‘कुणीतरी येणार येणार गं’च्या धर्तीवर डोहाळे जेवण, कार्यक्रम नाच-गाणी. पुढे प्रत्यक्ष डिलीव्हरीपर्यंत दोन्हीकडे म्हणजे कलाकार आणि रसिकांना पोट दुखेपर्यंत कळा सुरू होतात… कुर्रऽऽऽ पुढे प्रत्यक्ष बघणं उत्तम!
असं काहीसं हे कथानक. ज्यात एकाचवेळी आई-मुलगी बाळंतपणासाठी सामोरं जातात. जे आजच्या युगात न पटणारं. ‘फॅन्टसी’च्या जवळ जाणारं वाटेल पण आधीच्या पिढ्यांमध्ये मामापेक्षा भाचा वयाने मोठा, असेही प्रकार पाहायला मिळतातच की. शिवाय कथानक मजबुतीने बांधलंय. युक्तिवादाच्या फंदात पडण्याची वेळच यातल्या वेगवान सादरीकरणामुळे येत नाही. असंच आई-मुलींचं एकाच वेळी दोन ‘लिव्ह इन’चं प्रकरण हे देखिल सध्या ‘मी स्वरा आणि ते दोघे’ या नाटकात दिसतंय. तिथंही आई-मुलीचा भावनिक गुंता. यात मातृत्व तर त्यात प्रेमाचा आधार!
नाटककार आणि दिग्दर्शनाची सूत्रे एकाच हाती असल्याने प्रयोगाची बांधणी मजबुतीने झालीय. भावभावनांचे हास्यस्पर्शी दर्शन तसेच त्याजोडीला दुसरीकडे सातमजली विनोदाचे थरावर थर याचा समतोल प्रसाद खांडेकर यांने समर्थपणे पेरला आहे. हा विषय मांडणे तसे आव्हानात्मक, पण हसू आणि आसू यांच्या मिश्रणात हुकमत सिद्ध होते. हास्यदरबारातील हुकमी चार एक्के ही या नाट्याची आणखीन एक जमेची बाजू. घराघरापर्यंत पोहचलेले हे दिग्गज विनोदवीर आणि त्यांच्या यातील भूमिका हे प्रमुख आकर्षण ठरते. प्रसाद खांडेकर याचा अक्षर हा काहीदा संयमी पण निर्णायक ठरतो. सहकार्यांना चांगली साथसोबत त्यातून मिळते. पॅडी कांबळे याचा बाबा प्रवेशापासूनच धम्माल उडवितो. हाडांऐवजी ‘स्प्रिंग’ त्याच्यातून फिरतात असा भास होतो. पेटीसह एक गाणं, वेशांतरातलं नृत्य मस्तच. विशाखा सुभेदार हिची ‘आई’ लक्षवेधी ठरते. नम्रता आवटे-संभेराव हिची पूजा काही प्रसंगात हेलावून सोडते. या ‘टीम’मध्ये ती फिट्ट बसली आहे. प्रत्येकाचे प्लस पॉईंट लक्षात ठेवूनच त्याचा पुरेपूर वापर केलाय. त्यामुळे नाट्य कुठेही पकड सोडत नाही.
पुरुषांनी स्त्रीपार्ट करण्याची मध्यंतरी लाटच आली होती. भरत जाधव, विजय चव्हाण (मोरूची मावशी), प्रसाद ओंकार (नांदी), पुष्कर श्रोत्री (हसवा फसवी), प्रणव रावराणे (वासूची सासू), संतोष पवार (राधा ही कावरी-बावरी, सुंदरा मनामध्ये भरली), वैभव मांगले (माझे पती करोडपती)- अशी यादी भली मोठी होईल. पण विनोद करताना ते अश्लीलतेकडे झुकण्याची शक्यता अधिक असते. इथेही पॅडी आणि प्रसाद कथेची गरज म्हणून स्त्रीपार्ट करतात. अशा ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ची मजा काही औरच! ज्याची तुलना चॅनलवरल्या कार्यक्रमांशी करता येणार नाही. रसिकांची या प्रवेशाला उत्स्फूर्त दाद मिळते. रंगभूमीवरली ‘मार्मिक’ व्यंगचित्रे बघितल्याचे समाधान हशा-टाळ्या यातून प्रगट होते. ही अर्कचित्रे उभं नाट्यगृह दणाणून सोडतात.
संगीत-गाणं-नृत्ये ही बाजूही रंगतदार जमलीय. सचिन पिळगांवकर यांच्या सुरात ‘कुर्रऽऽऽ’ हे टायटल साँग ताल धरायला भाग पाडते. गर्भारपणाचा सात महिन्यांचा कालावधी या एका गाण्यातून आणि नृत्यातून सुरेख बांधला आहे. जो अप्रतिमच. वसंत आला की ऋतूंनाही कंठ फुटतो. सौंदर्याला शब्द सुचतात अन् शब्दांच्या कविता होतात. असं म्हणतात. यात गर्भधारणेतील देहबोली नाचत-गात नजरेत भरते. एखादं स्वप्नदृश्य साकार व्हावं त्याप्रमाणे घडतं. निष्पर्ण झाडाच्या फांद्यांनाही मातृत्वाची चाहूल लागते. सारं काही मनाचा ठाव घेणारे. यात अमोघ फडके याने प्रकाशयोजनेतून कमाल केलीय. अमीर हटकर याचे संगीत, संतोष भांगरे याची नृत्ये आणि तेजस रानडे याची गीते यांचं ट्युनिंग विलक्षणच. उलेश खंदारे यांची रंगभूषाही नोंद घेण्याजोगी. किचनसह देखणा दिवाणखाना आणि हॉस्पिटल याचे नेपथ्यही कथानकाला पूरक. विशेषतः डिलिव्हरीच्या प्रसंगातील नाट्यात कल्पकता दिसते. भिंतीवरले चित्रे आणि प्रकाशदिवे ही वेगळेपणा दाखविणारी आहेत. नेपथकार संदेश बेंद्रे यांनी दोन्ही ‘दृश्ये’ सजविली आहेत. जी श्रीमंत थाटाची. एकूणच तांत्रिक बाजू मजबुतीने उभी करण्यात आलीय. निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली नाही.
देशात प्रत्येक मिनिटाला पंधराएक हजार मुलं जन्माला येतात खरी, पण अशीही दांपत्यं आहेत ज्यांना पंधरा वर्षे वाट बघूनही आशेचा किरण दिसत नाही. एका गंभीर अशा मातृत्वाच्या कौटुंबिक विषयाची खिल्ली न उडविता त्याला मनोरंजनाची व आशेची यात जोड आहे. ‘कुर्रऽऽऽ’ प्रयोगातून धम्माल अॅक्शन कॉमेडीचा ‘हास्यस्फोट’ अनुभवण्यास मिळतो.
‘कुर्रऽऽऽ’
लेखक / दिग्दर्शक – प्रसाद खांडेकर
नेपथ्य – संदेश बेंद्रे
संगीत – अमीर हटकर
नृत्ये – संतोष भांगरे
प्रकाश – अमोघ फडके
गीते – तेजस रानडे
व्यवस्थापक – सुनिल नार्वेकर
सूत्रधार – गोट्या सावंत
निर्माती – विशाखा सुभेदार / पुनम जाधव
संस्था – व्ही. आर. प्रोडक्शन / प्रग्यास क्रिएशन