कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आपापलं काम मन लावून आणि चोखपणे करणारी माणसं भारी असतात. कामांच्या ठिकाणी या माणसांचं आपलं आपलं असं एक छोटंसं जग असतं. त्या जगात त्यांचं कसब, अनुभव, प्रश्न सोडवण्याची बुद्धी, सगळी कामं वेळेत करण्याचा नेमकेपणा, नीटनेटकेपणा यांना खूप महत्त्व असतं. त्या जगात डोकावलं आणि रमलं तर तिथे मजा अनुभवायला मिळतात. अशाच कामात रमलेल्या करामती लोकांच्या गमतीजमती सुजॉय रघुकुल यांनी ‘अंदर की बात’ या पुस्तकात लिहिल्या आहेत. किशोरवयीन मुलाचेच अनुभव सांगणारं, त्याच वयोगटातील मुलांसाठीचं हे पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. त्यातलीच ही एक गोष्ट.
– – –
परीक्षा संपत आल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी जवळ येऊ लागली की मला काका-मामा-आत्या यांच्याकडे जाण्याचे वेध लागायचे. पण या वर्षी आमच्या आई-वडिलांचे प्लॅन्स काही वेगळे होते. बरेच दिवस घरातलं फर्निचर बदलण्याचं त्यांच्या मनात होतं आणि यंदाच्या मे महिन्यात त्याचा मुहूर्त काढण्यात येणार होता. शाळेला सुट्टी, बाहेर रणरणतं ऊन त्यामुळे मी घरातच असणार, असं गृहीत धरून दिवसभर सुतारकाम करण्याचं त्यांचं प्लॅनिंग होतं.
माझी सुट्टी अशी घरातलं फर्निचर बदलण्यात वाया जाणं मला अजिबातच मान्य नव्हतं. दिवसभर ती ठोकपीट आणि घरभर कचरा कोण सहन करणार? मी विरोध करून बघितला, कुरकुर करून बघितली; पण कुणी बधलं नाही. ‘फर्निचर करायचंय आणि तू घरीच थांबायचंस. आता तू मोठा होतोयस. घरातल्या जबाबदार्या तू घ्यायला हव्यात.’ वडिलांनी आदेश काढला. माझा नाइलाज झाला. म्हटलं, भोगा आता फर्निचर-शिक्षा!
वडिलांसोबतच्या लढाईत माझा पाडाव झाल्यानंतर आमच्या घरी कोण कोण येऊ लागलं. वडिलांची एक मैत्रीण इंटीरियर डिझायनर होती. एक दिवस ती आली. तास-दोन तास बराच खल झाल्यानंतर ती परत गेली. दोन दिवसांनी सोबत आणखी एका मुलीला घेऊन आली.
ही मुलगी तिची असिस्टंट. त्या दोघींनी आमच्या घरातील खोल्यांची बारकाईने मापं घेतली. कुठे कॉलम आहे. कुठे पिलर आहे, कुठे खटकी आहे नि कुठे काय आहे, असं काय काय ते बोलत होते नि डायरीतल्या कागदावर नोंदवत होते. टेलर जशी आपली मापं कोड आकड्यांमध्ये नोंदवतात, तसंच मला हे वाटलं.
मग चार दिवसांनी वडिलांची मैत्रीण, तिच्या सोबतची मुलगी आणि आणखी एक माणूस असे तिघं आले. आमच्या मावशीबाईंनी काही डिझाइन्स आणली होती. आई-वडिलांनी ती बघितली. मग थोडीफार चर्चा, प्रश्न, खुलासे असा कार्यक्रम पार पडला. मावशीबाईंसोबत आलेला माणूस शांतसा बसून होता, बोलत काही नव्हता. त्याचे कपडेही साधेसे. बुशशर्ट आणि ढगळ पँट. हातात टिकटिक घड्याळ. सगळ्यांचं बोलणं तो फक्त ऐकत होता. डिझायनर मावशीने काही विचारलं तर फक्त एखाद-दोन वाक्यांत बोलत होता. होऊन जाईल, करून घेतो, पाहतो, काही अडचण नाही, एवढंच त्यांचं बोलणं. थोड्या वेळाने मंडळी निघाली तेव्हा मावशीने त्यांची ओळख करून दिली. ती म्हणाली, ‘हे आपले मिस्त्री. हे येतील उद्यापासून कामाला.’
ते गेल्यानंतर तासा-दोन तासांतच माणसांचा वावर सुरू झाला. प्लायवुडचे मोठेच्या मोठे तक्ते घरात आले. लाकूड आलं. सिमेंटच्या छोट्या गोण्या आल्या. व्हाइट सिमेंटच्या पिशव्या आल्या. विविध आकारांच्या खिळ्यांची पाकिटं, फेविकॉल, पॉलिशचे डब्बे, सँडपेपर्स असं काय काय येऊन धडकू लागलं. घरातली एक खोली या चित्रविचित्र सामानांनी नुसती भरून गेली. उद्यापासून रंगणार्या फर्निचर सोहळ्याची तयारी झाल्याचं या सामानाकडे बघून कळत होतं.
दुसर्या दिवशी सकाळी घरच्यांचं चहा पिता पिता पेपर वाचन चालू असतानाच दाराची बेल वाजली. दार उघडलं तर समोर मिस्त्रीकाका उभे. सोबत आणखी तीन-चार माणसं. प्रत्येकाच्या हातात मोठमोठ्या पिशव्या. पिशव्यांमध्ये सुतारकामाची सगळी हत्यारं नि अवजारं भरलेली. त्यांना बघताच बसल्याजागी वडील म्हणाले, ‘या या… सामान इकडे ठेवा.’ लगेच मंडळी आत आली. सामान ठेवलं. सगळे घुटमळत उभे राहिले. वडील त्यांना म्हणाले, ‘तुम्ही बसा ना. चहा घ्या नि मग काम सुरू करा.’ सगळे संकोचून सोफ्यावर टेकले. तेवढ्यात डिझायनर मॅडम आल्या. अपटुडेट कपडे. सोबत परफ्यूमचा सुगंध होताच.
चहा झाल्यानंतर लगेच मंडळी उठली, सामानासह आतल्या खोलीत गेली. मिस्त्रीकाका सगळं काम समजून घेत होते. शांतपणे. त्यांचे बाकीचे सोबती पिशव्यांमधलं सामान काढ, अवजारांची मांडामांड कर, नको असलेली अवजारं बाजूला काढून ठेव- अशा कामांत गुंतली. मावशीबाई गेल्यावर मिस्त्रीकाकांनी चार्ज हाती घेतला आणि कामाला सुरुवात केली. म्हणाले, ‘खोलीचं दार बंद करून घेतो. मशिन चालेल, आवाज येईल. तुम्हाला त्रास होईल. आम्ही लागतो आता कामाला.’
मला खरं तर त्यांचं काम बघायचं होतं; पण त्यांनी दार बंद केल्याने माझा
प्लॅन फसला. थोड्या वेळाने घरातले सगळे आपापल्या कामाला गेले आणि मी एकटाच घरात भुतासारखा बसून राहिलो. मी बाहेरच्या खोलीत नि मिस्त्री गँग आतल्या खोलीत.
दोन-तीन तास असेच गेले. आतून नाना प्रकारचे आवाज ऐकू येत होते. ठोकपीट चालली होती, लाकूड कापण्याचे आवाज ऐकू येत होते. जुनं फर्निचर तोडण्याचे, त्यातील काही चांगले भाग सुटे करण्याचे आवाज ऐकू येत होते. आतमध्ये काय चाललंय हे बघण्याची माझी उत्सुकता वाढत चालली होती. मग अचानक काम थांबल्यासारखं वाटलं. दार उघडलं गेलं. मंडळी बाथरूममध्ये घुसली. हात-पाय-तोंड धुऊन जेवायला बसली. सगळ्यांनी घरून डबे आणले होते. मी त्यांना पाणी तेवढं नेऊन दिलं.
अर्ध्या तासाने खोलीत डोकावलो तर तिकडे मिळेल तेवढ्या जागेत लोक लवंडले होते. कपाळावर हात आडवे ठेवून पहुडलेले होते. एखादाच कुणी जागा होता. तो मोबाइलवर बोटं चालवत बसला होता. मी तिथेच बसून राहिलो. मिस्त्रीकाकांचं लक्ष गेल्याबरोबर ते उठून बसले आणि माझ्याकडे कसनुसे पाहत हसले. दहाच मिनिटांत बाकीचेही उठले आणि यंत्रवत कामाला लागले.
आमच्या त्या खोलीचा नूरच बदलला होता. आधीच्या तोडलेल्या फर्निचरचे तुकडे एकावर एक रचून ठेवलेले होते. नव्याने आणलेलं प्लायवूड भिंतीला उभं करून ठेवलेलं होतं. पिशव्यांमधलं सामान जिकडे-तिकडे पसरलेलं होतं. लाकडाचा भुसा नि खिळे इतस्तत: पसरलेले होते. नव्या फर्निचरसाठी लागणारं लाकूड वगैरे मापात कापण्याचं काम चालू होतं. इलेक्ट्रिक कटरच्या जाडजूड वायरी इकडून तिकडे सापासारख्या फिरत स्विचपर्यंत गेलेल्या होत्या. काका मला म्हणाले, ‘बाबू, तू बाहेरच थांब. इकडे मशिनचा, कापाकापीचा बराच आवाज असेल. लाकडाची धूळही खूप उडेल. तुला त्रास होईल.’ मी म्हटलं, ‘मला इथेच थांबायचंय. नाही होणार मला त्रास. तुम्ही करा काम.’
मी एक कोपरा पकडला आणि बसून राहिलो. माणसं एका लयीत शांतपणे काम करत होती. धावपळ नाही की गडबड नाही, बोलणं नाही की आरडाओरडा नाही. मी त्यांच्या हालचाली आणि ते करत असलेलं काम पाहत राहिलो. दुपारी चारनंतर चहा करून दे, असं आई मला सांगून गेली होती. माझं लक्ष घड्याळावर होतंच. मग मी उठून चहा केला नि सगळ्यांना दिला. गटागटा पाणी पिऊन मनगटानेच ओठ पुसून सगळ्यांनी शांतपणे चहा घेतला. दोन-पाच मिनिटं थांबले की लागले लगेच कामाला. संध्याकाळी आई-वडील घरी येऊन जेवण्याची ताटं घेईपर्यंत मंडळी आतमध्ये कामात गुंतलेली होती.
रात्री आठ वाजता सगळे खोलीबाहेर आले. जसे सकाळी घरात आले होते तसेच ते दिसत होते. दुपारी मात्र कुणी शर्ट काढून ठेवला होता, तर कुणी बदली पँट घातलेली होती. हातात जेवणाच्या डब्याच्या पिशव्या, पायांत साध्याशा चपला नि नीटनेटके कपडे करून मंडळी निघाली. निघताना मिस्त्रीकाका वडिलांना म्हणाले, ‘येतो, साहेब!’
सकाळी पुन्हा गँग हजर.
दिवसामागून दिवस हे लोक आमच्या घरी येत राहिले. सकाळी दारात चपला काढून निमूटपणे आतल्या खोलीत जात. दिवसभर काम करत. रात्रीची वेळ झाली की कपडे बदलून निमूटपणे घराबाहेर पडत. जाताना मिस्त्रीकाका वडिलांना म्हणत, ‘येतो, साहेब!’
दिवसातून एकदा डिझायनर मावशी घरी येई. काम बघे, सूचना करे. मिस्त्रीकाकांशी बोले, शेड्युल लावून देई. पंधरा मिनिटांत घराबाहेर पडे. तेवढी पंधरा मिनिटं घरात शांतता असे. मावशी बोलत असताना तिला आवाज झालेला चालत नसे. तेवढा वेळ इतर कारागीर पुतळ्यासारखे आहे त्या अवस्थेत बसून असत. ती गेली की लगेच काम सुरू.
एका खोलीतलं काम झालं की दुसर्या खोलीतलं. मग स्वयंपाकघरातलं नि मग बाहेरच्या बैठकीच्या खोलीतलं. असं एकेक काम पूर्ण होत गेलं. आमचं घर बदलून गेलं. या दिवसांमध्ये माझी मिस्त्रीकाकांशी गट्टी तर जमलीच, पण इतरांशीही दोस्ती झाली. त्यांचं काम बघून बघून मलाही ते करावंसं वाटे. आधी काका तयार नव्हते, पण नंतर ‘दमादमाने हात लाव बाबू… सगळी हत्यारं आहेत. काही जखम झाली तर साहेब मला बोलतील…’ असं म्हणत त्यांनी मला त्यांच्या अवजारांना हात लावू दिला. मग मीही कुठल्या लाकडाला खिळा ठोकून बघ, ठोकलेला खिळा वाकवून उचकटून बघ, टाकून दिलेल्या लाकडाला हँडड्रिलने भोकं मारून बघ, असं करून बघू लागलो. तिथे दोन-तीन आकाराच्या करवती होत्या. त्या मला लाकडावर चालवाव्याशा वाटत होत्या. पण मगरीच्या दातासारखं त्याचं अणुकुचीदार पातं हाताळण्याची हिंमत होत नव्हती. मग काकांनी मला करवत कशी धरायची नि चालवायची ते दाखवलं. शक्तीचं नि कौशल्याचं काम होतं ते. पटाशी तुलनेने सोपी होती. तिला एका बाजूला लाकडाची मूठ होती नि दुसर्या बाजूला धारदार चपटं लोखंडी पातं. लाकडावर ते ठेवून मुठीवर बारीक बुक्की मारली की लाकडाचा तुकडाच पडायचा खाली.
तिथे आणखीनही बरीच अवजारं होती. दोन लोखंडी पट्ट्या एकमेकांना नव्वद अंशांत जोडणारा गुण्या तिथे होता. लाकडाच्या दोन फळ्या बरोब्बर काटकोनात बसवल्या गेल्या आहेत ना, हे बघण्यासाठी तो वापरला जात होता. लाकूड कापताना ते हलू नये म्हणून ते पकडून ठेवणारं एक जड लोखंडी साधन तिथे होतं. लोखंडी जबड्यात लाकूड घट्ट बसवायचं नि मग ते कापायचं, असं त्याचं काम. त्याला ‘भिडं’ म्हणतात, असं काका मला म्हणाले. लाकडाचा पृष्ठभाग गुळगुळीत करणारे दोन आकारांतले रंधे तिथे होते. एकीकडून दुसरीकडे रंधा ओढला की लाकडाचा समतल नसलेला पापुद्रा बरोब्बर बाहेर निघे. गोल गोल आकाराचा हा कुरळा पापुद्रा अलगद झेलायला मजा येई. लोखंडी डबीत आपोआप जाणारे पत्र्याचे टेप,
हॅक्सॉ, इलेक्ट्रिक कटर, स्पिरिट लेव्हलर, नाना आकाराचे स्क्रू ड्रायव्हर, पिन्सर म्हणजे पकडी (ज्यांना काका लोक जमुरा म्हणायचे), लाकडाचा पृष्ठभाग गुळगुळीत करणारे राउटर अशी कितीतरी अवजारं तिथे असत. ती हाताळायला आणि जमतील तेवढी चालवायला जाम मजा यायची. वेळ कसा गेला ते कळतच नसे.
जेवणाच्या किंवा चहाच्या ब्रेकमध्ये काका लोकांशी होणार्या गप्पाही मस्त रंगत. एक दिवस कामासाठी आवश्यक माल यायला उशीर झाला, तेव्हा तर आमची गप्पांची मस्त मैफलच भरली. अलीकडे त्यांनी कुठे कुठे कामं केली, काय कामं केली, कशा गफलती झाल्या, त्या कशा निस्तरल्या, कुठली माणसं कशी वागली अशी किश्शांची पोतडीच त्यांनी त्या दिवशी उघडलेली. असे धमाल किस्से आपल्याकडे नाहीतच असं तेव्हा माझ्या लक्षात आलं. ‘अरे, आम्ही घरोघरी जाऊन कामं करतो ना! वृत्ती तेवढ्या प्रवृत्ती… त्यामुळे आमच्याकडे असे अनुभव असतात.’ काका सहजपणे म्हणून गेले.
त्या दिवशी महिनाभर काम करणार्या या काका गँगशी माझी खरी ओळख झाली. एक कारागीर काका बिहारमधून आलेला होता, तर एक राजस्थानहून. एक इथलाच होता. काकांना विचारलं, ‘तुम्ही कुठून आलात?’ तर काकांनी एक मोठा श्वास सोडला. म्हणाले, ‘ती फार मोठी स्टोरी आहे…’ मी म्हटलं, ‘आज काही काम नाहीये तुम्हाला. मला सांगाच…’ काका म्हणाले, ‘आम्ही मूळचे गुजरातमधले. माझे पणजोबा म्हणजे वडिलांचे आजोबा मोठा उद्योगी माणूस होता म्हणे. त्यांची तिकडे शेती होती. ती त्यांनी उत्तम कसली आणि कुटुंबाला स्थिरस्थावर केलं. त्या भागात शेंगदाण्याचं पीक भरपूर, म्हणून तेलघाणी सुरू केली. त्यात त्यांना चांगला पैसा मिळाला. त्या पैशाच्या बळावर ते व्यापारात गेले. महाराष्ट्रात त्यांचं येणं-जाणं सुरू झालं. इकडेही जमिनी घेतल्या. पण आमच्या आजोबांनी ही सगळी संपत्ती एका हयातीत गमावली. कशापायी गमावली हे तेवढं विचारू नकोस. त्यांनी नाही नाही त्या गोष्टी केल्या आणि होतं-नव्हतं ते सारं गमावलं. शेवटी वडील गुजरात सोडून महाराष्ट्रात आले आणि एका छोट्या तुकड्यावर शेती करू लागले; पण त्यात त्यांचं भागेना. दुष्काळ नि अवकाळी पावसाने उभं पीक संपायचं. पीक हाती आलं तरी बाजारात भाव मिळायचा नाही. स्वत:ची शेती असल्यामुळे आम्ही उपाशी राहिलो नाही एवढं खरं. पण वडिलांनी एकूण परिस्थिती पाहून शहर गाठलं. इकडे मिळतील ती कामं केली. बांधकामांवर मजूर म्हणूनही काम केलं. तिथे रंगकाम, प्लंबिंग, इलेक्ट्रिक काम, गवंडीकाम, सुतारकाम बघायला मिळालं. तोपर्यंत मी मोठा झालो. वडिलांनी मला सोबतीला बोलावून घेतलं. वेगवेगळ्या कामांत, हेल्पर म्हणून काम करू लागलो. सुतारकामात आपल्याला गती आहे असं लक्षात आल्याने हेच काम करू लागलो. आता हे काम मला सगळं येतं. अवघडात अवघडही. सोबत प्लंबिंग, इलेक्ट्रिक, रंगकामही येतं. फॉल्ट शोधता येतात, दुरुस्तही करता येतात. पण मुख्य काम सुतारकाम.’
काकांनी धडाधड आपल्या आयुष्याची गोष्ट सांगून टाकली. बाकीचे लोकही त्यांची गोष्ट बहुधा पहिल्यांदाच ऐकत होते. काकांना म्हटलं, ‘तुमची मुलं काय करतात? तेही सुतारकामच करतात का?’ काका थांबले. म्हणाले, ‘थोरला इंजिनियर झालाय गेल्या वर्षी. आयटीत नोकरी करतो मोठ्या कंपनीत. धाकटी शिकतेय. हुशार आहे. तिला इंटीरियर डिझायनिंगला टाकणार आहे. आपल्या डिझायनर मॅडमसारखी बनवायचीय तिला.’ काकांच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
मला प्रश्न पडला, की काकांचा मुलगा एवढ्या मोठ्या कंपनीत काम करतो, तर हे कशाला इतक्या मेहनतीचं काम करतात? म्हणाले, ‘बाबू, खूप वर्षं कष्टांत काढली. पोट भागवण्यात नि पोरांना शिकवून मोठं करण्यातच माझं निम्मं आयुष्य गेलं. या सुतारकामाने मला जगवलं. ते कसं सोडून द्यायचं? हात चालतील तोवर काम करत राहायचं. पैशापायी पैसा मिळतो, काम करण्याचा आनंद मिळतो. तुमच्यासारख्या चांगल्या लोकांशी ओळख होते… आणखी काय हवं!’ एक क्षण थांबून म्हणाले, ‘’माझ्या पणजोबांइतका मी तालेवार होणार नाही, पण माझं कुटुंब पुन्हा आजोबांच्या वेळेसारखं रस्त्यावर येणार नाही, एवढी सोय मी माझ्या आयुष्यात केलीय बघ.’ बोलताना काकांचा आवाज अभिमानाने थरथरत होता.
मग नाटकात स्वगत बोलतात तसं काका बोलू लागले. म्हणाले, ‘बाबू, विश्वाच्या प्रगतीत सुतारकामाला फार महत्त्व आहे. माणूस जेव्हा गुहेतून बाहेर पडला तेव्हा त्याने तयार केलेलं पहिलं हत्यार म्हणजे कुर्हाड. मग माणसाने लाकडी चाक बनवलं. त्यातून पुढे बैलगाडी बनली. माणसाने शेतीकामासाठी नांगर बनवला. नदीतून जाण्यासाठी होडी बनवली. पूर्वी देवळं नि देवळांतल्या मूर्तीही लाकडाच्याच असत. फार पूर्वी घरंही लाकडा-गवताचीच असत. एवढंच काय, किल्ल्यांच्या तटबंद्या नि राजेरजवाड्यांच्या महालातही लाकूडच वापरलं जायचं जास्त. तिथपासून आतापर्यंत माणसाच्या प्रगतीत सगळीकडे सुतारकाम आहेच पाहा. मग एवढं महत्त्वाचं काम आपण कसं सोडायचं?’ मग काका म्हणाले, ‘मी आयुष्यभर इतरांनी सांगितलेलं काम केलं. पण माझी मुलगी स्वत: डिझाइन करेल. तिच्या हाताखाली माणसं काम करतील. तो दिवस पाहीपर्यंत तरी मी हे काम करत राहणार बघ.’
आमच्या घरचं काम संपल्यानंतर काका आणि त्यांची माणसं पुढच्या घरी काम करायला गेली. त्यांनी आमचं घर नव्या फर्निचरने सुंदर करून टाकलं. सगळ्या सोयी व्यवस्थित करून दिल्या. निगुतीने आणि प्रेमाने प्रत्येक गोष्ट करून दिली.
पॉलिशकाम, रंगकाम सगळं चकाचक केलं.
काम संपवून ते निघाले तेव्हा त्यांचे हात मी हातांत घेतले. काम करून करून ते दगडासारखे टणक झालेले होते. त्यांनी मला जवळ घेतलं आणि वडिलांना म्हणाले, ‘या पोराने लळा लावला बघा मला. मी इतक्या ठिकाणी काम केलं, पण इतकं कुतूहल असलेलं पोरगं मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं.’ त्यांचा आवाज कातर झाला होता. डोळ्यांत पाणी होतं. त्यांच्याही नि माझ्याही.
अंदर की बात
लेखक – सुजॉय रघुकुल
मुखपृष्ठ व आतील चित्रं – गिरीश सहस्रबुद्धे
प्रकाशक : समकालीन प्रकाशन
पानं – ७६, किंमत – १५० रू.