विधिमंडळाचं, संसदेचं, लोकशाहीचं पावित्र्य जपणारे, राडे न घालणारे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार कधी मिळतील आपल्याला?
– रोहित पाटील, सांगली
आपल्यासारख्या गुलामगिरी मानसिकता असणार्या लोकांच्या देशात हे शक्य नाही.
गणपतीचा बाल्या डान्स फार फेमस आहे ना कोकणात? तुम्ही कधी केलाय का? त्यांचं तुम्हाला आवडणारं एखादं गाणं सांगा की.
– श्रीपाद नलावडे, आटपाडी
हो. जाखडी नृत्य आहे हे. गणा धाव रे मला पाव रे हे गाणे.
सध्या बायोपिकचा जमाना आहे. तुम्ही कोणाच्या बायोपिकमध्ये परफेक्ट काम कराल आणि तुमचा बायोपिक आला, तर त्यात तुमची व्यक्तिरेखा कोणता कलावंत अचूक कोण साकारेल?
– ईशान बोरकर, प्रभादेवी
मला कर्मवीर भाऊराव पाटील यांची भूमिका करायला आवडेल.
सध्या काही लोक कुणावरही आणि कशावरही बहिष्कार घालत सुटले आहेत… मराठी कलावंतही यांच्या ट्रोलिंगमधून सुटलेले नाहीत… यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?
– रहीम मुल्ला, मिरज
खूप रिकामा वेळ… आणि राजकारण.
कोकणात कोणताही विकास प्रकल्प गेला की त्याला विरोध होतो. निव्वळ नारळी, पोफळी, आंबे, फणस आणि पर्यटनाच्या आधारावर कोकणाचा विकास होईल का?
– राम पटवर्धन, कांदिवली
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि लोकांची अल्पसंतुष्ट वृत्ती याला कारणीभूत आहे.
मराठीतला आजच्या पिढीतला कोणता चित्रपट दिग्दर्शक तुम्हाला आवडतो? आणि नाटकांत कोणता दिग्दर्शक आवडतो?
– पूनम चव्हाण, पुणे
नागराज मंजुळे, चंद्रकांत कुलकर्णी.
प्रेमाला उपमा नाही… असं म्हणतात, मग पोहे किंवा शिरा चालेल का?
– रसिका सावंत, पोयनाड
बाहेर या अशा विनोदातून…
तुम्ही विनोदी भूमिका करता, पण इथे जाम सिरीयस उत्तरं देता… तुमचं खरं रूप कोणतं?
– कावेरी पाटणकर, अकोला
कामाशी काम ठेवणं आणि आयुष्य तर्काने जगणं.
गणेशोत्सव असो की दहीहंडी असो की दिवाळी… या सणांचा हल्ली सात्विक आनंद कमी आणि विद्रट धिंगाणाच खूप झालेला आहे निदान शहरांमध्ये तरी… हे चित्र कधी बदलणार नाही का?
– स्वप्ना पंडित, पुणे
कधीच नाही.
बायकोशी वाकडे, त्याची चुलीत लाकडे असे का म्हणतात?
– पंढरीनाथ कार्येकर, शिरसवणी
खरंय. घरात सगळं तीच पहाते. आपण गावभर बेल घालत हिंडतो, तर घरात तिची दहशत असणार ना.
दहीहंडी हा खेळ आहे, सण आहे, उत्सव आहे, इव्हेंट आहे की काय आहे? तुम्हाला काय वाटते?
– राघव बेंद्रे, बांद्रा
उत्सव आहे मुळात, त्याचा खेळ करून आता राजकारण केलंय.
दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात एका गोविंदाचा मृत्यू झाला… त्या मृत्यूला जबाबदार कोण?
– नयन पळशीकर, माण
आपण सगळेच. जत्रेत चेंगरून मृत्यू होतात, रस्त्यावर खड्ड्यात पडून लोक मरतात. अशा सगळ्या मृत्यूला आपण सगळे जबाबदार आहोत.
तुमच्याकडे खोके पोहोचतात की नाही वेळेवर, ओक्के आहात ना एकदम?
– बाळकृष्ण शिंदे, बाळापूर
हो… अॅमेझॉनचे खोके येतात.