जीवन आणि कला यांचे नाते शरीर आणि आत्मा यांच्यासारखे आहे. शरीर असेल तरच आत्मा वास करतो, आत्म्याविना शरीर व्यर्थच. आपली जी नेहमीची दिनचर्या चालू असते, त्या प्रत्येक कृतीमध्ये कलेचा अंश असतो. दगडाने झाडावरचे फळ पाडावयाचे असेल तरी त्यामध्ये कला ही आवश्यक असते. कोणी म्हणतात, कलेचा अंश शरीरात आई-वडिलांच्या जीनकडून आलेला असतो. मग आई-वडिलांकडे कसा आला… त्यांच्या आई-वडिलांकडून… शेवटी निसर्गाने दिलेले दान म्हणून आपण त्यावर थांबतो.
कला सर्वव्यापी आहे. ती पशू-पक्षी या सर्वांमध्ये सामावलेली आहे. शिंपी पक्ष्याने बांधलेली कलात्मक घरटे वा फांदीवर चोचीने खोदलेल्या अतिशय संरक्षित बिळात लपून पिल्लांच्या सुरक्षेसाठी टेहळणी करणारा सुतार पक्षी आठवा. जीवन-मरणाच्या खेळात आपापल्या कलेनुरुप आपले जीवन कंठित असतो. प्रत्येक प्राणीमात्राचा जीवनप्रवास कलेच्या मार्गातून जातो, ती पायवाट असू दे की हमरस्ता. उपजत कलेत सुधारणा व्हावी, ज्यामुळे जीवन अधिक आनंदमय होईल म्हणून आपण गुरुच्या-दैवताच्या अधीन व्हायचा प्रयत्न करतो. एकच नाव समोर येते, सर्वज्ञात म्हणजे गणपतीचे.
`लय’ चराचरात व्यापलेली आहे. पृथ्वीच्या फिरण्यातही लय बिघडली तर उत्पात माजेल, वार्याची लय बिघडली तर वादळ घोंघावेल, लाटांची लय बिघडली तर त्सुनामीला आमंत्रण, संगीत लयबद्ध नसेल तर कर्णकर्कश होईल. त्याचप्रमाणे जीवनाचा लय न बिघडविण्यासाठी `कला’ हे मोठे साधन आहे. उपजत कला जपण्यासाठी व तीमध्ये नावीन्य/परिवर्तन आणण्यासाठी तिची उपासना करणे गरजेचे आहे. हाती मोदक लाडू, त्रिशूळ-डमरु, वक्रतुंड, लंबोदर, सर्वज्ञानी, जो चौदा विद्यांचा दाता, चौसष्ट कलांचा अधिपती तो गणपती याची आराधना कोणत्याही शुभकार्याच्या समयी प्रथम केली जाते. स्थापत्य, शिल्प, नाट्य, संगीत यांचा हा अधिपती. व्यास ऋषींनी एकही क्षण न थांबता महाभारत सांगितले, तर त्यांचा लेखनिक व्हायला मी तयार आहे, असे त्याने सांगितले.ती अट महर्षाr व्यासांनी मान्य केली आणि सलग तीन वर्षांत महाभारत काव्य दोघांनाही पूर्णत्वास नेले.
बाप्पाप्रमाणे सगळ्या १४ विद्या, ६४ कला ठायी नसल्या तरीही काही विद्या व कला अंगी मुरलेल्या ‘भाईं’ची इथे आठवण येते. त्यांना महाराष्ट्राचे एक नंबरी बहुरुपी व्यक्तिमत्व म्हणून लोकमान्यता मिळाली होती. धो-धो वहाणार्या पाण्यासारखे हास्याचे फवारे उडविणारा विनोदी स्वभाव, पण, त्यांचे तत्त्वज्ञान ऐकून सहज तोंडात बोटे जात, गायकी आणि संगीतामधील हुनरबाजीने `वाह’ हा शब्द अवकाशात घुमत राही. प्रेक्षकांमधील संवादात उत्स्फूर्त हशा, ते प्रेक्षकगृहात उभे राहिले की चैतन्य संचारायचे, तीच वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात जागोजागी पाठ सोडायची नाहीत. मराठीवर प्रभुत्व असलेले लेखक, नाटककार, अभिनेता, विनोदकार, कथाकार, पटकथा लेखक, संगीतकार, गायक असलेल्या अवलियाचे नाव पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) ऊर्फ भाई ऊर्फ महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व.
गुणात्मक गुणांनी नटलेल्या या `नटराजाचे’ व्यंगचित्र अनेक वर्षापूर्वी मी ‘महानगर’ या सायंदैनिकासाठी चितारले होते. त्यामध्ये पुलंची काही अधिक वैशिष्ट्ये चितारून ते व्यंगचित्र कॅनव्हासवर रंगांच्या मैफिलीत सादर करून ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेट दिले. संपूर्ण आयुष्य कला आणि साहित्य यांना अर्पण केलेल्या पुलंनाही ते दाखविले आहे. सुरुवातीस चार वैशिष्ट्यांसहीत चार हात दाखवून नंतर त्यामध्ये दानधर्म करणारा, लक्ष्मीचा हात दाखविला आहे. त्यांनी स्वत:चे नाव कुठेही निर्देशित न करता अनेक व्यक्तींना संस्थाना त्यांच्या उत्थानासाठी भरघोस आर्थिक मदत केली असा हा पाचवा हात दुर्लभ आहे. लेखक म्हणून पेन, संगीताचे अनुयायी म्हणून हातामध्ये तंबोरा, संवादक म्हणून हा माईक घेतलेला हात, विनोदाने लोकांचा ताणतणाव कमी करणारा म्हणून हाताच्या अंगठ्यावर विदुषकाची टोपी परिधान केलेले तर चित्रपटाच्या सर्व अंगामध्ये निपुणता दाखविण्यासाठी केसांच्या बटा फिल्म रिळाच्या आकारामध्ये. नाटक हा पु.लं.च्या काळजाचा तुकडा. त्यांच्या नाटकांनी त्यांना अजरामर करून सोडलं. बटाट्याची चाळ म्हणजे मराठी चाळीतील लोकांचे आत्मचरित्रच. केसातील मुखवटा पुलंच्या कारकीर्दीच्या शिरपेचात खोवलेला तुराच! नटराज शंकराचे रुप म्हणून निळ्या रंगामध्ये तांडव करताना चितारतो आहे. पुलंच्या चेहर्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ठळकपणे दिसणारे दोन दात. संगीतकार म्हणून त्यांना बाजा पेटीच्या स्वरपट्टींचा आकार दिला आहे. शिवाय ते ठळकपणे दिसण्यासाठी पांढर्या रंगसंगतीमध्ये दर्शविले आहे. पुलंचा चेहरा बोलका, हसरा, साधारण गोलाकार व गाल अधिक बोलणारे असे चित्रित केले आहे. जादुई संगीत लेखन, फिल्म इत्यादी अस्त्रे वापरून संगीताच्या जगावर तांडवरुपी नृत्य करणारा, लयकारी पेश करणार्या वार्याच्या झुळुकेबरोबर स्पर्धा लावणार्या केसांच्या बटा. मध्यम उंचीचे `भाई’चे अर्कचित्र केले आहे. याला अर्कचित्रमय व्यंगचित्र म्हणता येईल. चैतन्य, ऊर्जा आणि नृत्यामधील उत्स्फूर्तता व सहजता दर्शविण्यासाठी ब्रशच्या फटकारे आणि उष्ण रंगसंगतीचा वापर केला आहे.
६ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईमध्ये जन्म, पार्ले टिळक विद्यालयात प्राथमिक शिक्षण, इस्माईल युसूफ कॉलेज, फर्गुसन कॉलेज-पुणे आणि एम.ए.ची पदवी सांगलीच्या वेलिंग्टन कॉलेजमधून संपादित केली, ही पुलंची शैक्षणिक गाथा. लहानपणी खोडकर, जाडजूड शरीरयष्टीचे, संगीताचा कान असणारी वल्ली. संगीताला पूरक असे घरचे वातावरण- आईबरोबर कीर्तनाला जाऊन कीर्तनकाराच्या लकबी, गाण्याच्या पद्धती यांची ते हुबेहूब नक्कल करीत. त्यामुळे त्यांना गाण्याची आवड निर्माण झाली. १२व्या वर्षी त्यांनी स्वत:ची भाषणे स्वत: लिहित व इतरांनाही ती लिहून देत. शाळेत कवितांना चाली लावीत. हार्मोनियम वाजवण्यात त्यांना विशेष रुची. भास्कर विद्यालयाचे दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडे हार्मोनियम वाजवण्याचे धडे गिरविले. एका सुदिनी त्यांच्या शाळेत नटसम्राट बालगंधर्व यांचे आगमन झाले. त्यांना हार्मोनियम वाजवून दाखविली आणि शाबासकीची थाप पाठीवर घेतली. लोकांच्या वागणुकीत व स्वभावातील विसंगती हेरून तशी ते नक्कल करीत. हा त्यांचा छंदच होता, आजोबा साहित्यिक असल्याने बालपणापासून त्यांना साहित्याची गोडी निर्माण झाली.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची, प्राध्यापकाची नोकरी केली. सरकारी बाबू म्हणूनही काही सरकारी खात्यामध्ये नोकरी केली. मराठी, बंगाली, कानडी भाषेवर प्रभुत्व. सुनिताबाईंशी त्यांचा विवाह झाला. त्या लेखिका व अभिनेत्री होत्या. १९४०पासून ते साहित्य व नाट्य क्षेत्रात ते सक्रीय झाले. त्यांनी ४० पुस्तके लिहिली. अनेक शैलींमध्ये लिखाण. तरीही विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध. चित्रपट क्षेत्रही त्यांनी लिलया पेलले. ‘गुळाचा गणपती’ म्हणजे सबकुछ पु.ल.-कथा, पटकथा, संवाद, लेखक, संगीत व दिग्दर्शकही तेच. चित्रपटांची गीते ग. दि. माडगुळकरांनी लिहिली. ‘वंदे मातरम्’ या चित्रपटात सुनिताबाई व पु.ल. प्रमुख भूमिकेत. देवबाप्पा चित्रपटातील `नाच रे मोरा’चा गाण्याने इतिहास घडविला. कालच त्याचे ध्वनीमुद्रण झाले असावे, असे ते आजही टवटवीत वाटते. त्यांचा `महात्मा’ चित्रपट हिंदी, मराठी व इंग्लिश भाषेत प्रदर्शित केला गेला. त्यांच्या अनेक अजरामर नाटकांनी मराठी मन, संस्कृती, अस्सल मराठी विनोदी साहित्याचा जगभर डंका पिटला. ‘वार्यावरची वरात’, ‘ती फुलराणी’, ‘सुंदर मी होणार’, ‘तुझं आहे तुजपाशी’ इत्यादींनी मराठी मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनात चार हास्याचे क्षणांचा वर्षाव केला. तणावमुक्त कसे राहावे याचे पु.लं.च्या साहित्याने मराठी मनावर संस्कार केले. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘आपुलकी’, ‘जावे त्याच्या देशा’, ‘पाळीव प्राणी’, ‘उरला सुरला’, ‘अपूर्वाई’ इत्यादी विनोदी साहित्य मराठीजनांच्या रोमारोमात भिनले. पु.लं.ना कलाकृतीचे मर्म अनुभवण्याचा तिसरा चक्षू होता. ते ज्या कलाकृतीला हात लावीत तिला तो परिसस्पर्शच ठरे. `वस्त्रहरण’ हे मच्छिंद्र कांबळी यांचे नाटक. त्याच्या १७५व्या प्रयोगाला पु.लं.नी हजेरी लावली व त्यावर जे भाष्य केले, त्यानंतर त्या जेमतेम चालणार्या नाटकाचे हजारो हाऊसफुल्ल प्रयोग झाले.
पु.लं.च्या वाणीने वा अभिप्रायाच्या दोन शब्दांनी अनेक सर्जनशील कलाकारांच्या अंगणात यशाच्या फुलांचे मळे फुलले. त्यांचे एखाद्या कलाकृतीचे निरीक्षण अगदी अभ्यासपूर्ण असल्याने त्यांनी दिलेली प्रतिक्रिया रसिकमान्य व्हायची. त्यामुळे अनेक सर्जनशील लोक पु.लं.नी प्रतिक्रिया द्यावी यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवीत.
पुण्याच्या बालगंधर्व कला दालनात सर्व मराठी व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन १९९२ साली आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या घरी त्यांना तीन-चार व्यंगचित्रकाराबरोबर भेटण्याचा योग आला. त्यावेळी अर्थातच व्यंगचित्र हाच चर्चेचा विषय होता. त्यांचे आवडते व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण. त्यांच्या व्यंगचित्रांना गुणात्मक अभ्यास एवढा भारी होता की ऐकून आम्ही सर्व अवाक् झालो. ते म्हणाले `कॉमन मॅन’ची व्यंगचित्रं पाहिल्याशिवाय दिवस पूर्णत्वाला जात नाही. त्यांच्या कल्पना एवढ्या मार्मिक व भन्नाट असायच्या की ज्यांच्यावर ते व्यंगचित्र बेतले ती व्यक्तीही हास्यात बुडून जायची. लक्ष्मण यांची व्यंगचित्रांची रचना अचूक समतोल साधणारी होती. त्यामधील एकही रेषा इकडे-तिकडे झाली तर ते व्यंगचित्र एका बाजूस कललेले वाटायचे. एवढे ते परफेक्शनिस्ट होते. त्याचवेळी मी त्यांचे समोर बसून अर्कचित्र काढले. ते आर. के. लक्ष्मण यांना `कॉमन मॅन’ म्हणायचे. त्या गप्पा म्हणजे एक ठेवाच!
अष्टपैलू पु.लं.च्या व्यंगचित्रात दाखविल्याप्रमाणे विनोदी साहित्य, कॅसेटस् फिल्म यांनी अनेकांना नैराश्येच्या काळोखातून बाहेर काढले. कोरोनाच्या काळात पु.लं.च्या कलाकृतींनी जगण्याची हिम्मत दिली, अजूनही आपण सुंदर जीवन जगू शकतो हा आत्मविश्वास बाधितांमध्ये निर्माण केला. पद्मविभूषणसारखे अनेक पुरस्कार पु.लं.ना दिल्याने त्या पुरस्कारांची महती वाढली. पुरस्कार अत्युच्च शिखरावर पोहोचले. कलांच्या अधिपतीप्रमाणे मराठी विनोदी साहित्याचा प्रवास पु.लं.च्या नावाने सुरु होतो म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर एक तरी कला आत्मसात केली पाहिजे असे ते नेहमी सांगत.
अफाट कल्पनाशक्ती, अचूक निरीक्षण प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोन, विनोदी आणि प्रत्येक कलेप्रति असलेली आत्मीयता यांनी विणलेले साहित्यिक कलाकृतींचे भरजरी वस्त्र पांघरून मराठी रसिकजन बिनघोर निद्रेच्या स्वाधीन होत राहील. अनंतकालापर्यंत त्यांना १२ जून २००० रोजी स्वर्गाच्या रंगमंचावर हास्याचा वर्षाव करण्यासाठी बोलावणे आले. कायमचे…