छत्रपती शाहू महाराजांनी जवळपास २५ वर्षं मेहनत घेऊन बहुजन समाजातल्या मुलांसाठी कोल्हापुरात बोर्डिंग सुरू केली होती. त्यात वेगवेगळ्या जातीजमातींची मुलं मिळून मिसळून राहत. हे क्रांतिकारक होतं.
– – –
प्रबोधनकारांची छत्रपती शाहू महाराजांची भेट झाली तेव्हा `कोदंडाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधक मंडळास उलट सलामी` हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. तर त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ `ग्रामण्याचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंड!` हा प्रकाशित व्हायचा होता. कोदंडाचा टणत्कारच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाची तारीख आहे, १७ नोव्हेंबर १९१८, तर ग्रामण्याचा इतिहास ९ जुलै १९१९ला प्रकाशित झालाय. म्हणजेच या साधारण आठ महिन्यांच्या अवधीत प्रबोधनकार शाहू महाराजांची पहिली भेट घेण्यासाठी कोल्हापूरला गेले असावेत. `माझी जीवनगाथा`मध्ये प्रबोधनकार १९१८ म्हणतात. ते खरं असेल तर १९१८च्या शेवटाला ही भेट झाली असावी, असं मानता येईल.
प्रबोधनकारांच्या आयुष्यात या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांची लढाई ही कायमच एकट्या शिलेदाराची होती. पण त्यांनी ज्या व्यवस्थेशी भांडण मांडलं होतं, ते एकट्याचं काम नव्हतं. त्या संघर्षात त्यांना भक्कम आधार दिला तो छत्रपती शाहू महाराजांनी. या भेटीमुळे ते खर्या अर्थाने ब्राह्मणेतर चळवळीचा भाग बनले. कोणत्याही एका चळवळीचा भाग बनावं, कोणतीही एक विचारधारा आपल्या बोकांडी लादून घ्यावी, स्वतःला एका चौकटीत डांबून घ्यावं, असा काही प्रबोधनकारांचा स्वभाव नव्हता. ते वृत्तीने आणि विचारांनी स्वतंत्रच होते. तरीही या भेटीपासून शाहू महाराजांच्या मृत्यूपर्यंत साधारण साडेतीन वर्षं मात्र प्रबोधनकारांनी महाराजांचं नेतृत्व मान्य करून त्यांच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेतलं होतं. अर्थातच त्यांनी स्वतःची स्वायत्तता कायम ठेवली होती. गरज भासल्यास या चळवळीवर आणि एकदोनदा तर थेट शाहू महाराजांवर टीका करताना ते कचरले नाहीत. शाहू महाराजांनी पहिल्या भेटीपासूनच त्यांना अनुयायी म्हणून नाही, तर महत्त्वाचा सहकारी म्हणूनच सन्मान दिला. म्हणून ही पहिली भेट महत्त्वाची ठरली.
पहिल्या नजरेच्या परीक्षेत पास झाल्यावर शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना प्रश्न विचारला की तुमची नोकरी कायम की टेम्पररी? प्रबोधनकार काम करत होते त्या मुंबई इलाख्याच्या पीडब्ल्यूडी म्हणजे आताच्या भाषेत सार्वजनिक बांधकाम खात्यातली बहुतांश पदं टेम्पररी होती. तशीच आपली नोकरीही कायमस्वरूपी नाही, असं प्रबोधनकारांनी सांगितलं. पहिल्याच भेटीत पहिलाच प्रश्न असा विचारण्यामागे शाहू महाराजांना प्रबोधनकारांविषयी असणारी आस्था दिसून येते. त्यांची मिळकत आणि आर्थिक परिस्थिती त्यांनी समजून घेतली.
या भेटीच्या वृत्तांतात प्रबोधनकार सांगतात की या भेटीदरम्यान श्रीमंत बाळा महाराज, जाधवराव आणि इतर काही अधिकारी तेथे आले. जाधवराव म्हणजे भास्करराव जाधव. पण प्रबोधनकारांनी सांगितलेले बाळा महाराज कोण, हे मात्र कळत नाही. शाहू महाराजांचं चरित्र वाचताना त्यांच्या दरबारात किंवा संपर्कात या नावाचं कुणी आढळत नाही. प्रबोधनकारांनी ज्यांचा उल्लेख श्रीमंत आणि महाराज म्हणून करावा असं तर महत्त्वाचं कुणीच नाही. शाहूचरित्राचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यासंदर्भात खुलासा करतात, `श्रीमंत बाळा महाराज नावाचं कुणी महालात असल्याचं आढळून तर येत नाही. प्रबोधनकार ज्यांचा बाळा महाराज म्हणून उल्लेख करतात ते महाराजांचे धाकटे बंधू बापूसाहेब महाराज असावेत.
पिराजीराव घाटगे म्हणजे बापूसाहेब महाराज हे शाहू महाराजांची सावलीच होते. महाराजांनी त्यांच्याशी प्रबोधनकारांचा परिचय करून दिला आणि हुकूम केला की यांना आधी आपली सारी बोर्डिंग दाखवा. कोल्हापुरात महाराजांनी सुरू केलेली बोर्डिंगं म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याची ओळख करून देण्यासाठी बापूसाहेब महाराजांइतकी योग्य व्यक्ती दुसरी नव्हतीच. त्यांच्याविषयी चरित्रकार धनंजय कीर लिहितात, `बंधू बापूसाहेब घाटगे यांचे स्थानही शाहूंच्या चरित्रात अढळ व अपूर्व असे आहे. कोणत्याही अडचणीच्या वेळी व संकटप्रसंगी वरील मुत्सद्द्यांच्या सल्ल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा कृती करावयाची असेल, तेव्हा तेव्हा ती कृती करावयास छत्रपती बापूसाहेबांचीच योजना करीत. ते शांतपणे, व्यवहार कुशलतेने, यशस्वीपणे कार्य तडीस नेत. बापूसाहेबांची निष्ठा ही रामाला वाहिलेली लक्ष्मणाची निष्ठा. असा निष्ठावंत प्रामाणिक व कर्तृत्ववान बंधू लाभला, हेही शाहू छत्रपतींचे मोठे भाग्यच!`
असे बापूसाहेब महाराज आपली डॉककार्ट घेऊन आले आणि त्यांनी प्रबोधनकारांना महाराजांनी निरनिराळ्या जातींसाठी सुरू केलेली बोर्डिंग दाखवली. डॉककार्ट म्हणजे घोड्याशिवाय चालणारी कारच. पण तिचं रूप हे बग्गीसारखं असायचं. कोल्हापुरातली बोर्डिंग म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या शिक्षणाची गंगोत्री म्हणायला हवी. शाळा कॉलेजांची दारं उघडी करूनही गरिबी आणि जातभेद यामुळे बहुजन समाजाची मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, हे महाराजांनी पाहिलं. त्यावर उपाय म्हणून १८९६ साली त्यांनी सगळ्या जाती जमातींसाठी खुलं असलेलं पहिलं बोर्डिंग सुरू केलं. त्यात विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत केली. पण याची व्यवस्था ज्यांच्याकडे सोपवली होती, त्यांनी पहिली तीन वर्षं फक्त आपल्या ब्राह्मण जातीचेच विद्यार्थी घेतले. ते पाहून महाराजांनी वेगवेगळ्या जातींच्या नावाने बोर्डिंग सुरू केली.
काळ बघता सर्व जातींसाठी खुल्या बोर्डिंगमध्ये फारसे विद्यार्थी येणार नाहीत, हे महाराजांच्या लक्षात आलं. वेगवेगळ्या जातीच्या नावाने बोर्डिंग सुरू केली, त्याच्या व्यवस्थापनात त्या जातीचे मान्यवर लोक आणि कार्यकर्ते जोडले, तर त्या जातीचे विद्यार्थी येतील, असा त्यामागचा हेतू होता. पण ही बोर्डिंग केवळ एका जातीपुरती मर्यादित नव्हती. त्यात वेगवेगळ्या स्पृश्य अस्पृश्य जातीचे विद्यार्थी एकत्रच राहत. या बोर्डिंगांमधलं पहिलं १९०१ साली व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू झालं. आता त्याला श्री शाहू छत्रपती विद्यार्थी वसतिगृह म्हणतात. त्या पाठोपाठ दिगंबर जैन, वीरशैव लिंगायत, मुस्लिम, दैवज्ञ, पांचाळ ब्राह्मण, गौड सारस्वत ब्राह्मण, इंडियन ख्रिश्चन, प्रभू, वैश्य, सुतार, नाभिक, सोमवंशीय आर्यक्षत्रिय, देवांग कोष्टी या जातींच्या नावांची वसतिगृह उभी राहिली. संत नामदेवांच्या नावाने शिंपी समाजाचं बोर्डिंग होतं. आर्यसमाजाचं गुरुकुल सगळ्यांना सामावून घेत होतं. माधुकरी मागून म्हणजे वार लावून शिकणार्या मुलांसाठी प्रिन्स शिवाजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ बोर्डिंग उभं राहिलं. मिस क्लार्क होस्टेल अस्पृश्यांसाठी होतं. शिवाय अस्पृश्यांमधल्या जातभेदांमुळे ढोर-चांभारांसाठी वेगळं बोर्डिंगही उभं राहिलं.
या वसतिगृहांमधे गरीब विद्यार्थ्यांना राहण्याजेवण्याची मोफत व्यवस्था असे. ज्यांना शक्य होई, ते थोडंफार शुल्क देत. शिवाय महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिल्या. अभ्यासाची पुस्तकं, कपडे, वीज, कपडे धुणं, केस कापणं अशा सुविधांचा आर्थिक भारही विद्यार्थ्यांवर पडू दिला नाही. विद्यार्थ्यांना चांगलं जेवण मिळावं, यासाठी त्यांचा कटाक्ष असे. त्यासाठी ते उत्तम प्रतीचं तूप, तांदूळ, गहू, मटण पाठवून देत. ही मुलं मिळून मिसळून राहतील आणि त्यातून बहुजन समाजाचं सुशिक्षित नेतृत्व तयार होईल, अशी त्यांना अपेक्षा होती.
जवळपास २५ वर्षं तपश्चर्या करून महाराजांनी ही बोर्डिंग उभारली होती. ही बोर्डिंग कोणत्याही एका कॉलेज किवा विद्यापीठांशी जोडलेली नव्हती. त्यामुळे कुणीही मुलगा येऊन तिथे शिकू शके. अशा प्रकारच्या बोर्डिंगचे ते जनकच मानले गेले. कोल्हापूरच्या धर्तीवर भारतभर बोर्डिंग उभी राहिली. त्यातल्या पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर येथील बोर्डिंगना महाराजांनी मदतही केली. या बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांच्यासह अनेक राज्यपाल, खासदार, आमदार, केंद्र आणि राज्याचे मंत्री, न्यायाधीश, शेकडो अधिकारी, शिक्षक, वकील, तंत्रज्ञ, उद्योजक तयार झाले. ही बोर्डिंग नसती, तर यातली अनेक मुलं गरिबीत खितपत पडली असती. बोर्डिंगविषयीची ही माहिती राजर्षी शाहू गौरव ग्रंथातल्या माधवराव शिंदे यांच्या लेखातून घेतली. माधवराव हे प्रबोधनकारांचे मित्र `विजयी मराठा`कार श्रीपतराव शिंदे यांचे चिरंजीव. माधवरावांनी त्यांच्या तरुणपणात प्रबोधनकारांच्या हाताखाली प्रबोधनमध्ये कामही केलंय.
ही बोर्डिंग पाहिल्यानंतरची प्रतिक्रियाही प्रबोधनकारांनी नोंदवून ठेवली आहे. ती अशी, `आम्ही कोल्हापुरात महाराजांनी निरनिराळ्या जमातींसाठी चालू केलेली बोर्डिंगे पाहिली. महाराजांच्या नोकरीत ब्राह्मण ब्राह्मणेतर अधिकारी तर सरमिसळ होतेच. पण कित्येक ब्राह्मण अधिकारी त्यांच्या खास विश्वासातले होते. अस्पृश्य आणि इतर जमातींची विशेषतः मराठा जमातीची मुले एकाच बोर्डिंगात राहात असलेली पाहून, महाराजांच्या दलितोद्धाराविषयी, शिक्षणप्रसाराच्या निकडीविषयी कोणाचीही खात्री पटेल, मग माझी पटल्यास आश्चर्य नाही. महाराजांविषयी खालसातली वर्तमानपत्रे सदोदित करीत असलेला गवगवा सत्यावर आधारलेला नसून, त्यामागे गवगवा करणारांची काही विशेष कारस्थानी योजना असावी, असा माझा साधार ग्रह झाला.`
खालसातली म्हणजे संस्थानांबाहेरच्या ब्रिटिश सत्तेच्या भागातली वर्तमानपत्रे शाहू महाराजांवर टीका करत. वेदोक्त प्रकरणामुळे पुण्यातल्या ब्राह्मणी वर्तमानपत्रांची महाराजांवरची टीका खासगी निंदानालस्तीच्या थराला पोचली होती. महाराजांची विश्वासार्हता संपवण्याचं ते कारस्थानच होतं. प्रबोधनकारांनी कोल्हापुरातच महाराजांनी केलेलं काम पाहिलं. जातीभेदाच्या पलीकडे जाणारं त्यांचं वर्तन पाहिलं. त्यामुळे त्यांच्या सगळ्या शंका दूर झाल्या. ते पुढच्या काळात शाहू महाराजांची बाजू घेऊन पुण्याच्या ब्राह्मणी वर्तमानपत्रांशी लढण्यासाठी सज्ज झाले, त्याची ही सुरवात होती.