गणेश चतुर्थी आणि मोदक यांचे नाते घट्ट. उकडीचे किंवा तळणीचे, मोदक नैवेद्य असतोच. उकडीचे मोदक तसे किंचित अवघड, पण एकदा त्याची मेख समजली की लुसलुशीत मोदक अगदी सहज जमू लागतात.महाराष्ट्रात मोदक मुख्य. काही राज्यात मोदकसदृश पक्वान्न असते अथवा काही अन्य. सर्वसाधारणपणे किनारपट्टीत ओले खोबरे, गूळ, तांदूळ असणारा नैवेद्य दाखवला जातो. देशावर चणाडाळ, गूळ, पुरण असणारे पक्वान्न, काही जागी खीर, लाडू; थोडक्यात गोड धोड अगदी मुबलक.
उकडीचे मोदक सगळ्यांना आवडतात, पण बरेचदा उकड नीट निघत नाही, वरील आवरण, चाती चामट होते, सारण कमी पडते, मोदक उकडताना फुटत राहतात. अर्थात भक्तीने दाखवलेला नैवेद्य कसाही असला तरी देवाला पोहोचतो, पण मन खट्टू होते. उकडीचे मोदक करायला प्रथम उकड अगदी व्यवस्थित जमायला हवी. आज उत्तम उकड आणि सुरेख मोदक यांची क्लृप्ती पाहू. तसेच भारताच्या विविध भागातील काही वेगळे नैवेद्य तसेच काही तिखट पदार्थ पण बघू.
उकडीचे मोदक
पिठी घरी करणार तर जुने तांदूळ असावेत. धुवून, वाळवून, दळून, वस्त्रगाळ करून पिठी घ्यावी. हल्ली बाजारात चांगली पिठी मिळते, ती पण चालू शकते.
साहित्य : उकडीसाठी तांदूळ पिठी -१ वाटी
पाणी – पाऊण वाटी
किंचित मीठ
जाड बुडाच्या भांड्यात, पाणी उकळायला ठेवावे, थोडे तूप घालावे.उकळी आली की मीठ घालून त्यात पिठी घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. गॅस मंद हवा. एक मोठी वाफ घ्यावी, झाकण असू द्यावे.
परातीत उकड काढून, तूप लावलेल्या हाताने चांगली तिंबून घ्यावी. हाताने पसरता आली पाहिजे.
सारण : ओले खोबरे – १ वाटी
गूळ – आवडीने पण खूप नको.
खसखस थोडी, कोरडी शेकवून
वेलची पूड
आवडीने काजू बदाम भरड करून
खोबर्याला गूळ फासून थोडा वेळ ठेवावे. ओलसर दिसू लागले की जाड बुडाच्या भांड्यात छोट्या आगीवर पारदर्शक होईतो शिजवावे. फार कोरडे करू नये की ओलसर नको, गोळा व्हायला हवा. शेवटी खसखस, वेलची घालून काढावे.
मोठे भांडे/ इडलीपात्र घेवून त्यात अर्धे पाणी घालावे.
त्यात किंचित वेलची पूड पण टाकावी, म्हणजे मोदकाला बाहेरून सुद्धा सुवास लागतो.
चाळणीत केळी पान/ स्वच्छ सुती पंचा अंथरावा. पाणी चाळणीला स्पर्श करता कामा नये हे पाहावे.
चाती करण्याच्या दोन पद्धती आहेत.
हाताने अथवा लाटून. अनुभव नसल्यास चक्क लाटून घ्यावे. तांदूळ पिठी लावावी.
हाताने करणार तर हाताला तूप लावून अंगठा आणि तर्जनी (पहिले बोट) याने पातळ वाटी करावी.त्यात सारण भरून चातीला कळ्या घ्याव्यात. एक दोन मोदक केले की मग जमू लागते. मोदक पाण्यातून बुडवून उकडायला ठेवावा. पाच ते सात मिनिटांत होतो. वरून केशर काडी घालावी.
सुका मेवा मोदक
साहित्य : खजूर बी काढून तुकडे करून
२ वाटी सुका अंजीर
१ वाटी काजू बदाम पिस्ते अक्रोड मनुका व थोडी खसखस मिळून
हे कोरडे शेकवून भरड पूड करा.
वेलची, जायफळ पूड
खजूर अंजीर थोड्या तुपात मंद आगीवर लाल करून घ्यावे.
सर्व साहित्य गार झाले की त्यात वेलची पूड घालून, व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. मोदकाच्या साच्यातून मोदक काढावेत. अथवा छोटे लाडू करून काडीने मुखर्या द्याव्यात. फार सुंदर लागतात.
सोप्पे झटपट रवा बेसन लाडू
साहित्य : बेसन रवाळ १ वाटी
जाड रवा १ वाटी
सुका मेवा
पिठीसाखर आवडीने
वेलची व जायफळाची पूड
तूप
कृती : रवा व बेसन एकत्र करून, त्यात किंचित पातळ तूप आणि कोमट पाणी घालून घट्ट तिंबून, त्याचे मुटके करावेत.
तूप गरम करून त्यात सुका मेवा थोडा परतून बाजूला काढून घ्यावा.
त्यातच थोडे तूप घालून मुटके, लालसर रंगावर तळून घ्यावेत. आग मंद हवी.
भाजलेला सुका मेवा थोडा भरडून घ्यावा की लाडू बांधताना त्रास होणार नाही.
मुटके गार झाले की फोडून, मिक्सरमधून पूड करून ती चाळून घ्यावी. त्यात सुका मेवा व पिठीसाखर घालून मिसळून घ्यावे.
यात थोडे थोडे करून कडकडीत तूप घालत, लाडू बांधावेत. तूप एकदम घालू नये.
रवाळ आणि चवदार लाडू होतात. बेसन रवा भाजत राहायला नको.
आवडत असल्यास केशर काडी लावू शकतो.
झटपट मोतीचुर लाडू
कळ्या न पाडता एकदम फास्ट होणारे लाडू
साहित्य : चणा डाळ १ वाटी भिजवून. ५/६ तास टपटपीत भिजली पाहिजे.
साखर १ वाटी
पाणी तितकेच
तूप
पिस्ता काप
खायचा लाल रंग
कृती : भिजवलेली चणा डाळ निथळवून, खरबरीत भरड वाटून घ्यावी. गुळगुळीत नको. दाणेदार हवी.
याचे गोळे करून तुपात लालसर तळून घ्यावे.
भजी करतो तसेच.
थोडे गार झाले की मिक्सरमधून रवाळ करून घ्यावे. पूड नको.
साखरेत पाणी घालून कच्चा पाक करावा. लाल/पिवळा रंग व वेलची पूड घालून नंतर त्यात डाळ वाटण घालून मंद आगीवर, थोडे घट्ट होईतो ढवळून घ्यावे.
आता कोमट असतानाच लाडू वळून घ्यावेत.
वरून हवे तर पिस्ता/ काजू/ बदाम काप लावावेत. विकतच्या लाडवात अख्खी वेलची असते, हवी तर तशी घालावी.
फोडणी उकड
तामिळनाडूत हा पदार्थ हमखास केला जातो. त्याला कारा पिडी कोझुकाट्टई म्हणतात (नुसता कोझुकाट्टई म्हणजे आपले नेहमीचे उकडीचे मोदक). थोडेफार आपल्या निवग्र्या असतात तसेच.
मोदक केले की उकड हमखास उरते. टाकून देणे जिवावर येते.
अशावेळी हा झटपट होणारा प्रकार. शिवाय गोड खाऊन कंटाळा येतो, त्यावर एक उतारा.
उरलेली उकड घेवून त्यात मीठ, चिरलेले आले, मिरची घालून त्याचे छोटे गोळे करून इडलीप्रमाणे उकडून घ्यावेत.
तूप गरम करून त्यात राई, कढीलिंब, हिंग, सुक्या लाल मिरच्या यांची फोडणी करून, उकडलेले गोळे त्यात घालून, ढवळून घ्यावे. मीठ पाहून वरून किंचित साखर, ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून ढवळून द्यावे.
पौष्टिक चवदार पदार्थ तयार.
आवडत असल्यास वरून लिंबू घ्यावे. उरलेली उकड अशी कामी येते.
सोपे आणि झटपट असे पदार्थ बाप्पा आणि पाहुणे सर्वांना आवडतील नक्की.
मोरया.