मराठी रंगभूमीवर बालनाट्यांची परंपरा आहे. पूर्णवेळ आणि स्वतंत्र असणारी ही रंगभूमी पुढे नेण्यात नानासाहेब शिरगोपीकर, सुधाताई करमरकर, सई परांजपे, रत्नाकर मतकरी, वंदना विटणकर, विद्या पटवर्धन, नरेंद्र बल्लाळ, जयंत तारे यांच्यासह अनेकांनी एका काळात मोलाची कामगिरी पार पाडली. संवेदनशील बालमनाच्या संस्कारासाठी काही निर्मितींमध्ये खुबीने ‘डाव’ मांडला गेला. एकीकडे मनोरंजन आणि दुसरीकडे संस्कार तसेच संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
बदलत्या काळात ‘बालनाट्ये’ ही फक्त मे महिन्याची किंवा दिवाळीतल्या सुट्टीतली करमणूक, इतपतच मर्यादित राहिलेली नाहीत, तर ती कायमस्वरूपी निर्मिती ठरत आहेत. त्यासाठी सुट्टीच्या वेळापत्रकाची जुळवाजुळवी करण्याची गरजच नाही. एका मध्यंतरानंतर दोन बालनाटके आज व्यावसायिक रंगभूमीवर सुरू आहेत. त्यात एक आहे रत्नाकर मतकरी यांचे ‘अलबत्या-गलबत्या’ आणि दुसरे हृषिकेश घोसाळकर यांचे ‘माय फ्रेंड गोरीला’! एकात चेटकीण तर दुसर्यात गोरीला बच्चेकंपनीसोबतच पालकांचेही आकर्षण ठरताना दिसतोय.
मानवाचे निसर्गाशी अतूट नातं आहे. ते निभावण्यासाठी मानवानेही आपल्या कर्तव्याचे पालन करावयास हवे. तेव्हाच निसर्गचक्र सुरळीत राहील. सजीव टिकावेत यासाठी विविध ‘प्रयोग’ सुरू आहेतच. पक्षी, झाडं, प्राणी, जंगल, नदी-नाले याची छोटेखानी सफर घडविणार्या ‘नेचर क्लब, नेचर ट्रॅक’सारख्या संस्था आजकाल काम करताना दिसतात. निसर्गाशी पूर्वी असलेली घट्ट नाळ शहरीकरणामुळे तुटल्याने मानवाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शारीरिक-मानसिक हानीच होतेय. जगणं कोंडवाड्यासारखं झालंय. काँक्रीटच्या जंगलातून निसर्गच हरवलाय. त्यामुळे एका मोकळ्या श्वासासाठीही धडपड सुरू असते. यातूनच ‘निसर्गाकडे चला!’ हा विषय नव्या आंदोलनाचा आणि जनजागृतीचा ठरतोय. नेमकी त्याची आठवण ‘माय फ्रेंड गोरीला’ या दोनअंकी व्यावसायिक बालनाट्याच्या प्रयोगातून येते.
शहरीकरणामुळे ब्लॉकमध्ये कोंडलेले, सोबतच ‘बॉन्साय’ संस्कृतीला कंटाळलेले छोटे-मोठे दोस्त एक पूर्ण दिवस जंगलात म्हणजे ‘नॅशनल पार्क’मध्ये भटकंती करण्याचा निर्णय घेतात आणि सुरू होते घटनांची वेगवान मालिका. निसर्ग आणि एकेक प्राण्यांची भेट. त्यामुळे निर्माण झालेला थरार, यातून नाट्य गुंतवून ठेवते. पालकांनाही भुरळ पाडण्याची ताकद यातील प्रसंगात आहे. जंगलातला हा अनुभव रोमांचकारीच म्हणावा लागेल. जंगल सफारीसाठी आलेले बालगोपाळ कोणता ‘निसर्गमेवा’ सोबत घेऊन जातात हा विषय सार्या देशांच्या सीमारेषा पार करणारा आहे.
यातील म्होरक्या बनलेला शाम जंगलात भटकंती करण्याचा बेत निश्चित करतो. त्या भूमिकेत चिंतन लांबे याने बाजी मारली आहे. नेतृत्व करण्यासाठी आवश्यक बाबी त्याच्याकडे दिसून येतात. भूमिकेची चांगली समज त्याच्याकडे आहेच. ‘टॉमबॉय’ बनलेली चिक्कू सायली चौघुले हिने जबाबदारीने साकारली आहे. तिच्यावर एक गाणंही रचलं गेलं आहे. ‘जंगल सफारी’साठी घराबाहेर पडणार्या ‘टीम’मध्ये सर्वात कमी वयाचा कलाकार प्रधिर काजरोळकर याने रसिकांचे लक्ष वेधले. अन्य भूमिकेत रमा भेरे, जागृती बरप (दोन वाघोबा), हर्ष पाटील (हत्ती), सोहम पवार (नागोबा), राजेंद्र तुपे (माकड), अर्चिश टक्के (अवधूत) आणि नेहा चव्हाण, इशिता कदम, स्वरा वाडकर, ईश्वरी मंत्री यांनीही कमाल केली आहे. बालकलाकारांची तयारीची टीम ही जमेची बाजू यात आहे.
‘गोरीला’ची बालरसिकांना आकर्षित करणारी शीर्षक भूमिका उमेश देसाई याने साकारली आहे. गोरीलाचा टिपिकल वावर, उड्या मारणे, थेट प्रेक्षकांत प्रगटणे, फिल्मी स्टाईल मारणे यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. सार्या भूमिका ठळकपणे आणि ठसठशीतपणे उभ्या राहातात. त्यामागे साईराज प्रॉडक्शनची नाट्य कार्यशाळा असल्याने भूमिकांमध्ये शिस्त दिसते. अभ्यासही नजरेत भरतो.
‘गोरीला माय फ्रेंड’ हे टायटल साँग ताल धरायला लावणारे. संगीत हर्षदा जाधव आणि गीते नाटककार-दिग्दर्शक हृषिकेश घोसाळकर यांची आहेत. ‘टाईमपास करेंगे खुल्लम खुल्ला’ आणि ‘हिप हिप् हुर्रऽऽ’ या गाण्यांचे शब्द-ताल-सूर हे ठेका धरायला भाग पाडतात. रसिकांमधले बालगोपाळ या नाच-गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. बालनाट्य क्षेत्रातील अनुभवी स्नेहल अमृते आणि अभिनेत्री हिमांगी सुर्वे यांची नृत्यरचना मस्तच. रसिकांची चांगली दादही मिळते.
जंगलात प्राण्यांसोबतचा क्रिकेटचा सामना हे देखील यातलं एक आकर्षणच. त्यात थेट बालरसिकांचा सहभाग असल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. तर माकडाच्या एकापेक्षा एक ‘माकडउड्या’ हशे-टाळ्या वसूल करतात. मध्यंतरात आणि प्रयोगानंतर पडद्यामागे गोरीलासोबत सेल्फी काढण्यासाठी जमा झालेली बालकांची गर्दी बोलकी आहे!
एका निवासी सोसायटीचा आवार आणि जंगल या दोन्ही स्थळांभोवती नाट्य रंगविण्यात आलंय. प्रवीण भोसले आणि मंडळींनी नेपथ्यरचना करताना हालचालींना कुठेही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतलीय. इशिता कदम आणि उमेश देसाई यांची रंगभूषा नोंद घेण्याजोगी आहे.
लेखन, दिग्दर्शन आणि गीते या जबाबदार्या एकखंबी सांभाळणारे हृषिकेश घोसाळकर यांना बालनाट्य निाfर्मतीचा अनुभव असल्याने हे नाटक दोन घटका ‘रंजन आणि अंजन’ही घालते. बालमनाचा पुरेपूर विचार जाणवतो. शाब्बास लाकड्या, पाटलाच्या पोरीचं लगीन, चक्रमराजा करतो मजा, शिनचॅन विरुद्ध लिटील कृष्णा, भूतनाथ, मोटू पतलू जासूस, चमत्कार अशा बहुरंगी बालनाट्याच्या वैशिष्ट्यपूर्ण निर्मितीपासून ते सादरीकरणापर्यंतच्या प्रक्रियेत सहभाग असणारी टीमही नजरेत भरते. संहितेला पूरक दिग्दर्शन असून नाचगाण्यांनी नाट्य रंगतदार होते. उत्स्फूर्तता तर धम्मालच उडविते!
निसर्गातील एक अविभाज्य घटक असणार्या प्राण्यांच्या मुक्या संवेदनातून खूप काही अर्थ निघतो. हे मुके प्राणी जर बोलू लागले तर… हा विचारच थक्क करणारा. याचा अनुभव रंगभूमीवर सई परांजपे यांनी त्यांच्या ‘जास्वंदी’ या नाटकातील दोन बोक्यांच्या संवादातून दिला होता. तसेच बालनाट्यातही आजवर बरेचदा प्राणी प्रगटलेत. ‘कुत्रा मालकाशी प्रामाणिक तर बोके, मांजरी स्वार्थी’ असा शिक्का त्यांच्यावर बसलाय. तो पुसण्याचा प्रयत्न बालनाट्यांनी केला आहे. यात तर जंगलातल्या सर्व प्राण्यांना ‘फ्रेंड’ केलंय.
प्राणीमित्र बना, जंगलाकडे चला, निसर्ग वाचवा हा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न यात आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे निसर्गाशी दुरावलेलं नातं जपण्याची वेळ आलीय. ‘गोरीला’ करमणुकीपलिकडे जाऊन ‘पोरांनो निसर्गाकडे चला’ ही शिकवणही देत आहे. प्रयोग अप्रतिमच!
माय फ्रेंड गोरीला (बालनाट्य)
लेखन/दिग्दर्शन/गीते – हृषिकेश घोसाळकर
नेपथ्य – प्रवीण भोसले
संगीत – हर्षा जाधव
प्रकाश – बाबू शिगवण
नृत्य – हिमांगी सुर्वे/स्नेहल अमृते
व्यवस्थापक – शेखर दाते
सूत्रधार – गोट्या सावंत
निर्मिती – साईराज प्रॉडक्शन