गुन्हेगारी टोळ्या अमली पदार्थ गिर्हाइकांपर्यंत नेमके पोचवतात कसे, हाच प्रश्न पोलिसांना सतावत होता. हे छुपे मार्ग त्यांना शोधून काढायचे होते. त्यांनी वेगवेगळी पथकं त्यासाठी नियुक्त केली. सगळ्याच पोलिस यंत्रणेची मदत घ्यायचं ठरवलं. फक्त त्यांच्या भागातल्या गुन्हेगारांना रोखायचं असलं, तरी इतरही पोलिस ठाण्यांची मदत लागणार होती. या गुन्हेगारांचं सगळं नेटवर्कच उद्ध्वस्त करायचा त्यांचा प्रयत्न होता.
– – –
“हल्ली रोज तुम्हाला पोलिस स्टेशनला यायला उशीर होतोय, गावडे. काल तर मंत्र्यांचा दौरा होता आणि तुम्ही बंदोबस्ताला आला नव्हतात. ही काय पद्धत आहे?“ इन्स्पेक्टर कार्लेकरांचा आवाज आज चढला होता.
“साहेब, आजपर्यंत ड्यूटीत कधीच कसूर केला नाही. पण यावेळी कारणच तसं आहे,“ हवालदार गावडे पडलेल्या चेहर्याने म्हणाले.
“काय कारण आहे?“
“बायकोच्या नात्यातला एक पोरगा ड्रग्जच्या नादाला लागला होता साहेब. हॉस्पिटलमध्ये होता. काल तो गेला. तिकडेच जावं लागलं मला,“ गावडेंनी हे सांगितल्यावर मात्र कार्लेकरांचा पारा एकदम खाली आला.
“अहो काय सांगताय? हे आधी कुणालाही का सांगितलं नाहीत? तुमच्यावर रागावण्याची वेळ आली नसती,“ ते समजुतीच्या स्वरात म्हणाले.
“साहेब, काय सांगणार? आपण पोलिसात असून ड्रग्जचा धंदा रोखू शकत नाही, आपल्याच नात्यातला एक तरूण मुलगा व्यसनाच्या आहारी जातो, आपण काहीही करू शकत नाही. डोळ्यासमोर त्याचं मरण बघावं लागतं, यापेक्षा वाईट गोष्ट काय असणार?“ बोलताना गावडेंच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. पोलिसांमध्येही एक सहृदय माणूस दडलेला असतो, याचीच ती प्रचीती होती.
“ड्रग्जचा एवढा व्यापार चालतो या भागात?“ कार्लेकर जरा काळजीनं म्हणाले.
“आपल्याला खबर लागली की सापडतील ते अड्डे आपण उद्ध्वस्त करतो साहेब. पण या लोकांची टोळी मोठी आहे. ते दरवेळी नवीन युक्त्या, नवीन जागा शोधून काढतात. व्यसन करणार्यांना बरोबर त्याची खबर लागते. एकदा व्यसन लागलं की माणसाला पोखरून संपवल्याशिवाय ते साथ सोडत नाही. या लोकांना रोखणं अवघड आहे, साहेब,“ गावडे तळमळीने बोलत होते.
“पोलिसांनी ठरवलं तर काहीच अवघड नसतं, गावडे. आपण या लोकांचे सगळे अड्डे उद्ध्वस्त करू, त्यांचे उद्योग बंद पाडू. कुठल्याही परिस्थितीत त्यांना धंदा करू द्यायचा नाही,“ कार्लेकरांनी निर्धार व्यक्त केला आणि गावडेंसह सगळ्याच पोलिसांना जोश आला. हा नवा साहेब नक्की काहीतरी धाडसी काम करणार, याची त्यांना खात्री वाटायला लागली.
कार्लेकरांनी याआधी ज्या ज्या ठिकाणी काम केलं, तिथले अमली पदार्थांचे व्यवहार बंद पाडले होते. त्यांची नजरच अशी होती की धंदा करणार्या टोळ्यांनाही दहशत वाटायची. कधी कुठला माल पकडला गेला तर माल आणि गुन्हेगार, दोघंही सुटू शकणार नाहीत, अशी मजबूत केस ते उभी करायचे.
कार्लेकरांनी धाडसी निर्णय घेतले, वरिष्ठांची परवानगी काढली आणि ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या रॅकेट्सकडून अमली पदार्थांचा व्यवहार सुरू असल्याची खबर होती, त्या सगळ्या ठिकाणी छापे घातले. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. सगळ्या खबर्यांना कामाला लावलं आणि एकेकाला शोधून शोधून आत टाकलं. लाखो रुपयांचा माल जप्त झाला. कार्लेकर आता निश्चिंत झाले.
काही दिवस असेच गेले, पण काही टोळ्या अजूनही हा धंदा करत आहेत; राजरोस नाही, पण छुप्या मार्गाने त्यांचे तेच उद्योग सुरू आहेत, याची कुणकुण लागलीच. कार्लेकर भयंकर संतापले.
“ह्यांची सगळी नेटवर्क उद्ध्वस्त केली, तरी हे ड्रग्ज विकायचे नवे मार्ग शोधतात कुठून?“ कार्लेकरांचा रागाचा पारा चढला होता.
“साहेब, डिमांड आहे, म्हणून सप्लाय आहे. त्यांना गिर्हाइकं मिळतात. लोक ह्या नशेसाठी पैसे उडवायला तयार असतात म्हणून असे गुन्हेगार तयार होतात आणि ते वेगवेगळ्या मार्गानं धंदा करत राहतात. लोकांची डिमांडच बंद व्हायला पाहिजे,“ गावडे मनापासून बोलत होते. आपला जवळचा नातेवाईक ह्या व्यसनाच्या आहारी जाऊन जीव गमावून बसल्याच्या दुःखातून अजूनही ते पूर्ण सावरले नव्हते.
“सगळेच लोक स्वतःच्या हौसेने जात नाहीत, काहींना फसवलं जातं, काहींना जबरदस्तीने दिलं जातं, त्यातून व्यसन लागतं. मुळात गुन्हेगारांना रोखणं हे आपलं काम आहे. बाकी समाजप्रबोधनही सुरू राहीलच,“ कार्लेकरांनी त्यांना समजावलं. यावेळी त्यांना कुठलीही कसर बाकी ठेवायची नव्हती.
गुन्हेगारी टोळ्या हे अमली पदार्थ गिर्हाइकांपर्यंत नेमके पोचवतात कसे, हाच प्रश्न त्यांना सतावत होता. हे छुपे मार्ग त्यांना शोधून काढायचे होते. त्यांनी वेगवेगळी पथकं त्यासाठी नियुक्त केली. सगळ्याच पोलिस यंत्रणेची मदत घ्यायचं ठरवलं. फक्त त्यांच्या भागातल्या गुन्हेगारांना रोखायचं असलं, तरी इतरही पोलिस ठाण्यांची मदत लागणार होती. या गुन्हेगारांचं सगळं नेटवर्कच उद्ध्वस्त करायचा त्यांचा प्रयत्न होता.
—
टण टण टण!
विद्यामंदिर शाळेची घंटा झाली आणि धरण फुटून पाण्याचा लोंढा बाहेर पडावा, तशी सगळी मुलं पटापटा गेटच्या बाहेर पडली. पालकांकडे, बस, रिक्षा, व्हॅन्सकडे जाऊ लागली. एक मध्यम उंचीचा, टपोर्या डोळ्यांचा चुणचुणीत मुलगा बाहेर आला आणि एका माणसानं त्याला हाक मारली.
“गौरव?“
त्या मुलानं चमकून बघितलं. समोर उभ्या असलेल्या माणसाला तो काही ओळखत नव्हता.
“तू मला ओळखलं नाहीयेस, मला माहितेय. मी विशाल. मला विशालदादा म्हटलंस, तरी चालेल,“ त्यानं ओळख करून दिली. लगेच एक मोठंसं चॉकलेट पुढे केलं. कुठल्याही अनोळखी माणसानं दिलेला खाऊ घ्यायचा नाही, हे गौरवला चांगलं लक्षात होतं; पण आज कुठलातरी एक दादा तुला भेटायला येणार आहे, तुझ्याशी गप्पा मारणार आहे, हे त्याला बाबांनी कालच सांगून ठेवलं होतं. त्यामुळे गौरवला लगेच सगळं लक्षात आलं. विशालदादाशी त्याची लगेच गट्टी जमून गेली. बाबांना न्यायला यायला वेळ होता. शिवाय, विशालदादानं स्वतः त्याला घरी सोडतो, असं सांगितलं होतं. हा दादा त्याला एकदम आवडूनच गेला.
“तू रोज स्कूल बसने घरी जातोस ना?“
“हो,“ गौरव म्हणाला.`पण आज बाबा मला न्यायला येणार आहेत,`अशी माहितीही दिली.
“कोण कोण असतं तुझ्या बसमध्ये?“ त्या दादानं विचारलं.
“सचिन, वेदा, महेंद्र, मिताली…“ गौरवनं मित्रमैत्रिणींची नावं सांगितली.
“आणि गाडीत तुम्हाला सगळ्यांना सांभाळायला कोण दादा असतात?“
“एक पीटर दादा गाडी चालवायला आणि दुसरा मोहनदादा,“ गौरवनं त्यांची नावं सांगून टाकली. फक्त तेवढ्यावर न थांबता, या दोघांच्या सवयी, कोण कसं बोलतं, कोण कसं दिसतं, कुणाला काय आवडतं, हेही सांगून टाकलं. विशालदादाला हसूच आलं. “बरं. छान वाटलं तुला भेटून. पुन्हा कधीतरी भेटू, फिरायला जाऊ, भेळ खाऊ,“ असं म्हणून विशालदादानं त्याचा निरोप घेतला. हा दादा नेमका कशासाठी आला होता, आपल्याला एवढे प्रश्न का विचारले, तेच गौरवला कळलं नाही. त्याचे बाबा त्याची वाट बघत होते. त्यांच्याबरोबर तो घरी गेला.
पुन्हा चार दिवसांनी तो दादा गेटमध्ये शाळा सुटायच्या वेळेला हजर! गौरवला याही वेळी बाबांनी कल्पना दिली होतीच. या दादाला आपण फारच आवडलेले दिसतोय, असं गौरवला वाटून गेलं.
“दादा, आज भेळ खायला जायचंय का?“गौरवनं त्याला भेटल्या भेटल्या पहिला प्रश्न विचारला आणि दादाला हसू आलं.
“चल!“ म्हणून त्यानं गौरवला आपल्या बाइकवर बसवलं. दोघं चौपाटीवर गेले, भेळ खात खात गप्पा सुरू झाल्या.
“तुझा हा पीटरदादा आणि मोहनदादा कसे आहेत रे? गप्पा मारतात का तुमच्याशी?“ विशालदादानं विचारलं.
“हो, मारतात ना,“ गौरव सांगायला लागला, “पण हल्ली हल्ली मोहनदादा जरा कमीच बोलतो.“
“का रे?“
“काय माहीत? आधीच्यासारखं आमच्याबरोबर बसत नाही, गप्पा मारत नाही. तो आणि पीटरदादाच काहीतरी बोलत असतात बराच वेळ. कधीकधी भांडणंही होतात त्यांची.“
हे सांगितल्यावर मात्र विशालचे कान टवकारले. त्यानं आता गौरवला आणखी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. गौरवला आज फक्त भेळच मिळणार होती, पण गप्पा रंगत गेल्या, तशी कोल्ड कॉफीचीही ऑर्डर सुटली आणि गौरवची चंगळ झाली.
दुसर्या दिवशी तर हा विशालदादा चक्क गौरवच्या बसमध्येच आला. गौरव नेहमीप्रमाणे सकाळी त्याच्या वेळेत बसपाशी आला. बस सुरू झाली आणि दोन स्टॉप गेले असतील, तेवढ्यात एका मुलाबरोबर हा विशालदादा बसमध्ये चढला. गौरवनं लगेच त्याच्याकडे बघून हात केला, पण विशालदादानं त्याला खूण करून, गप्प राहायला का सांगितलं, हे काही गौरवला कळलं नाही.
बसमध्ये अथर्व नावाचा एक नवीन मुलगा यायला लागला होता. त्याला बसची सवय होईपर्यंत हा विशालदादा दोन दिवस त्याच्याबरोबर येणार होता, म्हणे. गौरवला जरा विचित्रच वाटलं. बसमध्ये मोहनदादा, पीटरदादा सगळ्यांची काळजी घेतात की. मग घरातलं कुणी यायची काय गरज आहे? आणि ह्या विशालदादानं आपल्याला आधी का सांगितलं नाही? असे अनेक प्रश्न गौरवला पडले होते. अर्थात, विशालदादावर विश्वास होता, त्यामुळे तो तिथे काही बोलला नाही.
दोन दिवस विशालदादा बसमधून प्रवास करत राहिला. शाळा आली, की उतरून तो त्याच्या कामाला निघून जायचा. बराच वेळ गप्पगप्पच असायचा. बसमधली मुलं कधी अंताक्षरी खेळायची, कधी डबा खायची, कधी दंगामस्ती चालायची. विशालदादा मात्र एकाच बाजूला उभा राहून काहीतरी बघत असायचा. नाहीतर फोनवर काहीतरी करत असायचा.
चार-पाच दिवस गेले आणि शाळेच्या मधल्या सुटीत विशालदादाची पुन्हा भेट झाली. यावेळी त्याचा चेहरा वेगळाच दिसत होता. त्यानं गौरवला जे काही सांगितलं, त्यावरून गौरव जरासा घाबरला. विशालदादानं त्याला धीर दिला. समजावून सांगितलं. त्याचवेळी त्याचे बाबाही तिथे आले. विशालदादा जे सांगतोय ते नीट लक्षात ठेव, असं त्यांनी गौरवला समजावलं आणि त्यानं मान डोलावली.
दुसर्या दिवशी संध्याकाळी गौरव स्कूलबसमध्ये बसला. बस निघाली, वाटेत काही मुलं आपापल्या घरापाशी उतरली. बसमध्ये थोडीच मुलं उरली होती. गौरवही त्यात होता. त्यानं त्याच्या मित्रांना खूण केली आणि आपल्याजवळ डबा खायला बोलावलं. सगळ्यांना खुणेनं काहीतरी समजावलं. बहुतेक त्यांनाही आधी काहीतरी माहीत होतं. शेवटचा स्टॉप जवळच आला होता, तेवढ्यात पीटरदादानं एका ठिकाणी बस थांबवली. इथे कुणीच उतरणारं नव्हतं, मग बस का थांबली, हे मुलांना कळलं नाही. मोहनदादा बसमधून उतरला आणि शेजारीच असलेल्या एका पानाच्या टपरीपाशी गेला. त्याच्या शर्टच्या आत लपवलेलं एक पार्सल तिथे दिलं आणि तो परत वळणार, तेवढ्यात तिथे गोंधळ झाला. कुणीतरी मोहनदादाला एकदम धरलं, चार पाच जणांनी त्याला गराडा घातला. इकडे बस चालवणारा पीटरदादा हे बघून एकदम सावध झाला. बसमधून उडी टाकून तो पळून जाणार, एवढ्यात त्यालाही दोघांनी धरलं आणि पकडून ठेवलं. समोरच एक पोलिसांची गाडी उभी होती. त्यात दोघांना नेण्यात आलं. विशालदादा समोरून बसमध्ये येताना दिसला आणि गौरवला हायसं वाटलं. त्याच्याबरोबर एक पोलिस अधिकारी होते.
“साहेब, हाच तो स्मार्ट मुलगा, माझा मित्र, गौरव,“ विशालदादानं ओळख करून दिली.
“आणि हे कोण आहेत माहितेय का? इन्स्पेक्टर कार्लेकर,“ विशालदादा म्हणाला. गौरवनं लगेच उभं राहून त्यांना कडक सॅल्यूट केला आणि कार्लेकरांना हसू आलं.
“हा तुझा विशालदादा म्हणजे आमच्या पोलिस खात्यातले सबइन्स्पेक्टर विशाल आहेत बरं का!“ कार्लेकर म्हणाले आणि गौरवला ते ऐकून छान वाटलं. कार्लेकरांनी मग सगळ्या मुलांना घरी सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था केली. गौरवच्या आईवडिलांना फोन करून सहकार्याबद्दल विशेष धन्यवाद दिले.
“या टोळीबद्दल खबर मिळाली होती. कुणालाही संशय येऊ नये म्हणून ते स्कूलबसमधून अमली पदार्थांची पार्सल इकडून तिकडे पोचवतात, हेही समजलं होतं, पण यांना रंगेहाथ पकडणं गरजेचं होतं. तुमच्या मुलानं त्या कामात भरपूर मदत केली. त्यानं जी बारीकसारीक माहिती दिली, त्यामुळेच आम्हाला नीट सापळा रचून गुन्हेगारांना पकडता आलं!“ कार्लेकर कौतुकानं गौरवच्या बाबांशी बोलताना म्हणाले. जाताना त्यांनी सगळ्या मुलांना आवर्जून प्रेमानं एकेक चॉकलेट आणि छोटंसं गिफ्टही दिलं आणि मुलं खूश झाली.