हे शीर्षक तुम्हाला प्रसिद्ध लेखिका कमल देसाई यांच्या ‘काळी हॅट घालणारी बाई’सारखं वाटलं असेल कदाचित! त्याला काय आपला विलाज नाही. मला ती कोथिंबीरवाली बाई रोज दिसते. अगदी रोजच्या रोज.
कधी या तिठ्यावर कधी त्या कोपर्यावर, कधी चिंचेच्या झाडाखाली, कधी आलं-लिंबू-मिरचीवाल्याच्या बाजूला. कधी रसरशीत फळांच्या रांगेत टोकाला, कधी कांदे-बटाटे-लसूणच्या बाजूला कधी मेथी-पालक-कांदापातीच्या रांगेत तर कधी नारळांच्या मोठ्या ढिगाच्या बाजूला… ओल्या गोणपाटावर हिरव्यागार कोथिंबिरीचा सुवासिक पिसारा फुलवून बसलेली असते.
उंच गोरी सडसडीत. भरघोस केसांचा आंबाडा बेफिकीरीने बांधलेला. चाफेकळीसारखं नाक (यु नो… साधारण माझ्यासारखं). गुलाबी आकाशी किंवा मोतिया रंगाची साडी. थोडा हसरा चेहरा. मर्यादशील वागणं.
एखाद्या कारागिराने फक्त पाचूचेच दागिने घडवावेत, तशी ही फक्त कोथिंबीरच विकते. सुंदर-सुवासिक हिरवीगार कोथिंबीर.
त्याच्या जोडीला किमान हिरव्या ओल्या मिरच्या का नाही ठेवत ही? कोथिंबिरीच्या शीतलतेला झळ बसेल म्हणून?
नवरा असताना छानसं वाटोळं लालभडक कुंकू असायचं… गळ्यात काळ्याभोर मण्यांची पोत असायची. आता गोंदणावर एक मातकट तपकिरी टिकली असते. नवरा गेल्यावर ती घाटावर परत गेली नाही. मला इथंच करमतंय म्हणाली. कधी ती नसली तर तिचा कॉलेजात जाणारा मुलगा बसतो.
काय म्हणून असेल तिचं हे कोथिंब्रीचं व्रत… कोण जाणे! तिची आई आणि आजी पण बहुतेक कोथिंबीरच विकत असतील.
लग्न ठरवण्याच्या टायमाला हिच्या बापाने ठणकावून सांगितलं असेल, ‘तुमी काय बी विका… कांदे बटाटे विका… नायतर मासेमटण विका. पण आमची लेक लगीन झाल्यावरबी कोतबिरच इकंल. हे तुमास्नी मान्य आसल तरच फुडली बोलणी. नायतर आपला चा पिवून आपुन रामराम करूया.’
मग चर्चा मसलत झाली असेल. मुलाने उगाचच जरा चेहर्यावर नापसंती दावली असेल.
‘ही कोण एवढी मोठी लागून गेली. कायम कोतबिरच विकणार म्हणं..! जावूंदे राहूंदे बाबा..! हिथल्या चहालाबी कोथिंबिरीचाच वास येतुया.’ तो पुटपुटला असेल.
‘आरं पण एवढी एक गोष्ट सोडली तर बाकी कायबी नाव ठेवायला जागा न्हाई. पोरगी सुलक्षणी दिसतेया.’
‘बरं बाबा… तुम्ही म्हणत असाल तर चालंल मग..’
मुलगी कोथिंबिरीच्या फुलांसारखी नाजुक, सुवासिक हसली असेल (साधारण आपली अभिनेत्री सुलोचना डोळ्यासमोर घ्या), लगीन पक्कं झालं असेल. लग्नात कोथिंबिरीच्या वड्या असतील किंवा ठेचा असेल, असं म्हणून मी आता लेख वाढवत बसत नाही. तुम्ही इमॅजिन करू शकता.
असो… कधीकधी ती माझ्या दवाखान्यात येते… मेडिसीन घेते. कधी इंजेक्शन हक्काने मागून घेते. एक छानसं गोड टॉनिक घेते. नंतर तिने दिलेल्या पैशांना खूप वेळ ताज्या सुवासिक कोथिंबीरीचा वास येत असतो. थंड पित्तनाशक कोवळी सुगंधी कोथिंबीर.
खूप वर्षापूर्वी एका कन्नड डॉक्टरनी लिहिलेली आणि मी वाचलेली गोष्ट आठवली. एक पंधरा सोळा वर्षांची मुलगी तापाने आजारी पडून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असते. त्या मुलीचे वडील मजुरीवर काम करणारे असतात. ते काही रोज दिवसभर तिच्याजवळ थांबू शकत नाहीत. पण रोज ते तिला भेटायला येताना मल्लिका म्हणजे मोगर्याचा ताजा गजरा आणून उशीजवळ ठेवून देतात. नंतर काही दिवसात ती बरी होऊन घरी जाते. पण डॉक्टरांना कुठेतरी ती बरी होण्यात मल्लिकेचा मोठा रोल असल्याचं मनापासून वाटतं राहातं!
तसं त्या कोथिंबीरवाल्या बाईचं मन आणि शरीर स्थिर आणि स्वस्थ असण्यात कोथिंबीर विकण्याचा मोठा रोल आहे… असं असून नसून वाटत राहातं…
बाकी सर्व ठीक. आज दुपारपासून लांबून कुठूनतरी पाळण्याची गाणी ऐकू येत आहेत. हलके हलके जोजवा… बाळाचा पाळणा! बारसा आहे कुठेतरी… ही रेकॉर्ड नाहीये… बायका नटून थटून आल्यात, लहान मुलींनी छानसे जरीचे परकर पोलके घातलेत आणि पाळण्याला हलके झोके देत सोता गाणी म्हणताहेत. शेजारणी आहेत. वाडीतल्या आहेत. गावातल्या आहेत. नात्यागोत्यातल्या आहेत.
कालपासून बारशाला जायचंय, बारशाला जायचंय, असं घोकत असतील. साडी, दागिने, गजरा, बाळंतविडा सगळी जय्यत तयारी झाली असेल. सकाळपासून सगळं झटपट आवरलं असेल. जेवणी खावणी झाकपाक आवराआवर सगळं करून झाल्यावर जराही न पडता लगेचच तयारी सुरू केली असेल. तयारी करता करता गाणं आठवून कदाचित टिपूनही ठेवलं असेल. कालपासून गुणगुणून झालं असेल…
…आता एवढं मनापासून म्हणताहेत की बाळासारखीच त्यांनाही तीट लावावी असं वाटतंय. मातृहृदय चहुबाजूने येकवटलंय. पितृहृदय खूषच खूष दिसतंय. गाणी काय खूप गोड आवाजात आहेत, असं नाही. काही जाडेभरडेही आहेत. पण गोडच वाटतायत. जरा रवाळ दळलेल्या बेसनपिठाचा लाडू झकास लागतो तसे अस्सल वाटतायेत… त्यांचे मायेने माखलेले आवाज!
कुलभूषणा गौरीच्या नंदना बाळा जो जो रे… आळवताहेत…
लिंबोणीच्या झाडामागे… हे पण दुपारीच म्हणून झालं…
हलके हलके जोजवा, बाळाचा पाळणा, हे गाणं पण दणक्यात म्हणून झालंय.
आता थोड्याच वेळात बाळाचं नाव ठेवलं जाईल. आत्याच्या पाठीवर मुठक्यांची दाटी होईल. सगळीकडे पेढेबर्फी वाटली जाईल. त्या सुंदर पाळण्याभोवती सगळ्यांची प्रसन्न गर्दी आहे. बाळा किंवा बाळे, जेव्हा तुम्ही थोडे मोठे व्हाल, तेव्हा यांच्यापैकी कुणी तुम्हाला, ‘जा, पटकन जावून जरा कोथिंबीरीची जुडी आणून दे किंवा दूध पिशवी आणून दे म्हटलं तर ऐकशील ना?
खूप प्रेमाने ओथंबून गाणी म्हणतायत दुपारपासून…! मोठं झाल्यावरही यांना कधी तोडू नका. दुखावू नका. नेहमी चांगल्या मार्गावर राहा. तुम्ही समाजात आहात म्हणून खूप आधार आणि चांगल्या अर्थाने वचक वाटत राहू दे त्यांना कायमचा!