अशी आहे ग्रहस्थिती
राहू-मंगळ-हर्षल मेषेत, बुध-शुक्र वृषभेत, बुध ३ जुलैपासून मिथुनेत, रवि मिथुन राशीत, केतू तुळेत, शनि (वक्री) कुंभेत, गुरु-नेपच्युन मीनेत, प्लूटो-मकरेत, चंद्र-कर्केत, त्यानंतर सिंह- कन्या आणि सप्ताहाच्या अखेरीस तुळेत.
मेष – जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून कार्यरत राहा. मंगळाचे स्वराशीत लग्नी राश्यांतर राहूबरोबर अंगारक योगात. त्यामुळे तापटपणा, तामसी वृत्ती वाढेल. काळजी घ्या. कौटुंबिक स्थिती उत्तम राहील. मात्र, वैवाहिक जोडीदार, व्यावसायिक भागीदार यांच्यामध्ये शीतयुद्ध घडू शकते. ८ आणि ९ जुलै चिंतेत जाईल. स्वस्थानातील गुरु-नेपच्युन योगामुळे आध्यात्मिक क्षेत्रात रमाल. देवदर्शनाचे योग जुळून येतील.
वृषभ – खिसा भरलेला राहील. पण, खर्च करताना काळजी घ्या. बुधाचे धनस्थानातील राश्यांतर आणि लाभातील गुरु त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम राहतील. २ आणि ३ या तारखांना गुरु-चंद्र नवपंचम योगामुळे अपेक्षापूर्ती होईल. विद्यार्थ्यांना यशप्राप्तीचा मार्ग सापडेल. व्ययस्थानातील मंगळ आणि राहूमुळे खर्च वाढेल. व्यापार-उद्योगातील स्थिती बेताची राहील. आरोग्याची काळजी घ्या. पोस्ट, विमा क्षेत्रात अपेक्षित लाभ होतील. गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. पत्रकार, लेखापरीक्षकांना चांगला आठवडा.
मिथुन – लग्नातील रवि-बुधादित्य योगामुळे अंदाज अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील. गुरु-चंद्र नवपंचम योगामुळे अचानक आर्थिक लाभ मिळेल. शनि-मंगळाच्या षष्ठस्थानावरील दृष्टीमुळे काहींना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, दशमातील गुरुची कृपादृष्टी राहील. कर्जाच्या बाबतीत मार्ग निघेल. व्ययस्थानातील स्वराशीच्या शुक्रामुळे सहलीचा आनंद द्विगुणित होईल. नोकरदारांना अच्छे दिन येतील. पगारवाढ, प्रमोशन होईल.
कर्क – चंद्र लग्नात, भाग्येश गुरुसोबत नवपंचम योग त्यामुळे येणारा काळ चांगला जाईल. घरातील हेव्यादाव्यांवर पडदा पडेल. व्ययस्थानात येणारा बुध खर्च वाढवेल. मात्र, स्वराशीतील शुक्र उत्पनाचे स्रोत वाढवेल. नोकरीनिमित्ताने प्रवास घडेल. भाग्यातील गुरु-नेपच्युन योगामुळे आध्यत्मिक कार्यात रमाल. वाहन चालवताना काळजी घ्या. ध्यानधारणेत रमाल. मानसिक स्वास्थ चांगले राहील.
सिंह – आधीच्या कामांचे चांगले रिझल्ट मिळतील. रवीचे लाभतील भ्रमण आणि सोबत येणारा बुध. त्यामुळे चांगले आर्थिक लाभ होतील. कामात यश मिळेल. पत्नीकडून मदत मिळेल. अष्टमातील गुरुमुळे अपचन- गॅसेसच्या समस्या जाणवतील. वारसाहक्काने लाभ पदरात पडतील. बिनव्याजी पैसे वापरण्याची संधी मिळेल. बंधुवर्गासोबत सलोख्याचे वातावरण ठेवा. संततीच्या शैक्षणिक करियरमध्ये आणि शेअर बाजारात लाभ मिळतील.
कन्या – नोकरीत यश-मानसन्मान, अधिकार मिळतील. बुधाचे दशमातील भ्रमण, सोबत रवि यामुळे सरकारी नोकरदार, राजकारणी यांच्यासाठी चांगला आठवडा आहे. कामे सुरळीत पार पडतील. २ ते ४ जुलै हे दिवस चांगले जातील. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मित्रांशी शत्रुत्व टाळा. कमिशन एजंट, दलाल, व्यावसायिकांसाठी चांगले दिवस आहेत. भागीदारी व्यवसाय करणार्यांना चांगले लाभ होतील. कलाकारांसाठी लाभदायक आठवडा.
तूळ – पंचमात वक्री शनि, सप्तमात मंगळ-राहू त्यामुळे जोडीदाराबरोबर समज-गैरसमजातून वादंग निर्माण होतील. प्रेमप्रकरणात अपयश येईल. शुक्राचे अष्टमातील भ्रमण झाल्याने मृत्यूपत्र, वारसाहक्क या माध्यमातून काहींना आर्थिक लाभ होतील. नवमेश बुध भाग्य भावात असल्याने लांबचे प्रवास घडतील. शिक्षणक्षेत्रात चांगल्या संधी चालून येतील. प्रकाशकांसाठी चांगला काळ राहील. वडिलांची मदत होईल. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ आहे. शुभकार्यात वितुष्ट येईल.
वृश्चिक – नोकरीच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. सुखस्थानात वक्री शनि षष्ठम् भावावर दृष्टी ठेवून असल्याने एखादे शुक्लकाष्ठ मागे लागू शकते. प्रकृतीच्या तक्रारी निर्माण होतील. आर्थिक समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक सौख्याचा आनंद मिळेल. भागीदारीत चांगले आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवी गुंतवणूक करताना सावध पवित्रा घ्या. चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवू नका. नियमबाह्य कामे टाळाल तर फायद्यात राहताल.
धनु – चांगले अनुभव येतील. सुखदायक आठवडा राहील. शनि-मंगळ-बुध-गुरु-शुक्र हे सर्व ग्रह स्वतःच्या राशीत आहेत, त्यामुळे मनासारखी कामे पूर्ण होतील. कुटुंबासाठी वेळ द्याल. पंचमातील मंगळ-राहूमुळे खिसापाकीट भरलेले राहील. नवीन घर दृष्टीपथात येईल. शुक्र षष्ठम भावात असल्यामुळे कला-साहित्य, संगीत यामध्ये काम करणार्यांसाठी आगामी काळ चांगला आहे.
मकर – अंदाज चुकतील. ताकही फुंकून प्या. कामांत अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे चिडचिड होऊ शकते. सुखस्थानात अंगारक योग, कुटुंबस्थानात वक्री शनि त्यामुळे अस्वस्थता जाणवेल. गुरु योग्य मार्ग दाखवेल, त्यामुळे दिलासा मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नव्या व्यवसायाची आयडिया सुचेल. पण पाऊल सांभाळून टाका.
कुंभ – चांगले यश मिळेल. कुटुंबासाठी वेळ द्याल. शुभकार्य पार पडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. संततीबाबत शुभवार्ता कानी पडेल. शिक्षण क्षेत्रातील मंडळींना चांगला काळ आहे. कामानिमित्ताने परदेश प्रवासाच्या संधी चालून य्ोतील. बोलताना नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल.
मीन – भाग्याची चांगली साथ मिळेल. वडिलांच्या ओळखीचा फायदा होईल, त्यामधून एखादे काम झटकन मार्गी लागेल. नाटककार, गायक, संगीतकारांसाठी चांगला आठवडा राहील. शेती व्यावसायिकांना फायदेशीर आठवडा राहील. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी जावे लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या. २ आणि ३ तारखेला होणारा गुरु-चंद्र नवपंचम योग सामाजिक, राजकीय, शिक्षण, वकिली या ठिकाणी जोरदार फळे देईल.