अशी आहे ग्रहस्थिती
हर्षल-राहू मेषेत, बुध-शुक्र वृषभेत, रवि मिथुनेत, केतू तुळेत, शनि (वक्री) कुंभेत,
मंगळ-गुरु-नेपच्यून मीनेत, प्लूटो मकरेत.
दिनविशेष – २८ जून रोजी दर्श अमावस्या, २९ जून रोजी श्री टेंबे स्वामी पुण्यतिथी
– – –
मेष – आठवड्याची सुरुवात रटाळ राहील. कामाचा आळस येईल. चिंता लागून राहील. अनपेक्षित चुकलेले पैशाचे गणित अंगाशी येईल. अकारण पैसे खर्च झाल्याने चिडचिड होईल. धनस्थानातील स्वराशीचा शुक्र आणि लाभातील वक्री शनी उणीव भरून काढतील. धार्मिक कार्यात रमाल. हातून दान-धर्म होईल. वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांकडून विशेष कामगिरी होईल. संततीसौख्य लाभेल. प्रवासात नव्या ओळखी होतील. नवे मित्र जोडले जातील. १ आणि २ या तारखा लाभदायक ठरतील.
वृषभ – दशमातील वक्री शनि आणि लाभातील गुरु-मंगळ-नेपच्युन हे चांगले व्यावसायिक लाभ मिळवून देतील. अपेक्षापूर्ती, सुख, आनंदप्राप्तीचा आठवडा आहे. आर्थिक लाभासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. वकील, राजकारण्यांसाठी आठवडा उत्तम राहील. नोकरदारांना अच्छे दिन अनुभवयाला मिळतील. पगारवाढीची शक्यता आहे. नव्या नोकरीची ऑफर देखील मिळेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे. कामानिमित्ताने परदेशात प्रवास घडेल. त्यातून चांगला लाभ मिळू शकतो.
मिथुन – मनाविरुद्ध पैसे खर्च करावे लागतील. मनस्वास्थ बिघडू शकते. प्रवासाचे योग आहेत. कौटुंबिक कार्यक्रमामुळे आनंददायी वातावरण राहील. लाभातील राहूचे चांगले सहकार्य मिळेल. अनपेक्षित अर्थप्राप्ती होईल. बुडत्याला काडीचा आधार मिळेल. नोकरदारांना चांगले दिवस आहेत. सासुरवाडीकडून लाभ होतील. स्वतंत्र व्यवसायात चांगले यश मिळेल. कामानिमित्ताने प्रवास घडतील. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील.
कर्क – दर्श अमावस्या अनपेक्षित घटनांची राहील. आर्थिक फटका बसेल. वायफळ खर्च टाळा. मंगळाचे भाग्यातील भ्रमण त्यासोबत गुरु यामुळे काहींना मानसन्मान मिळेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले यश मिळेल. व्यापार्यांना चांगले दिवस आहेत. कामानिमित्त प्रवास होतील. अष्टमातील वक्री शनिची दृष्टी दशमावर असल्याने व्यावसायिक निर्णय लांबणीवर पडतील. सुखस्थानातील केतुमुळे कौटुंबिक गोडवा हिरावला जाईल. संततीसौख्य मिळेल.
सिंह – रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नव्या नोकरीची संधी येऊ शकते. पैशाची अडचण सुटेल. नव्या वस्तूची खरेदी होईल. नवे मित्र मिळतील. वकील व कायद्याच्या क्षेत्रातील मंडळींना चांगले पद मिळू शकते. सरकारी सेवेतील मंडळींना उच्चपद मिळू शकते. काहांrना मानसन्मानाचे योग आहेत. स्थैर्य, यश, सन्मान यांची प्रचिती येईल.
कन्या – मोठे यश मिळवून देणारा आठवडा आहे. संधीचा फायदा घ्या. म्हणाल ती पूर्वदिशा राहील. विवाहेच्छुंची अपेक्षापूर्ती होईल. सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी, लेखक, प्रवचनकार यांच्यासाठी मानसन्मानाचा काळ असेल. बौद्धिक मार्गाने चांगली धनप्राप्ती होईल. दानधर्म कराल. खाणीशी निगडित मंडळींनी यश मिळेल.
तूळ – पंचमातील वक्री शनीची दृष्टी सप्तम भावावर, सप्तमेश मंगळ षष्ठ भावात त्यामुळे महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. दाम्पत्यजीवनात थोड्या कुरबुरी होतील. १ आणि २ जुलै रोजी पैशाचे प्रश्न मार्गी लागतील. वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून धनलाभाचे योग जुळून येतील. राजकारण्यांना पदप्राप्तीचा योग. परदेशात जाण्याची संधी मिळेल. उच्चपदस्थांसोबत गाठी-भेटांrमधून नव्या संधी मिळू शकतात.
वृश्चिक – विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील. परीक्षेत मनासारखे यश मिळेल. दाम्पत्यजीवनात आनंद मिळेल. पत्नीला लाखमोलाची भेट दिली जाईल. सुखस्थानातील वक्री शनी दुधात मीठ टाकेल. प्रेमप्रकरणात गुरु सांभाळून घेईल. मैत्रीविवाहासाठी अनुकूल काळ आहे. आरोग्याच्या समस्या जाणवतील. खाणे-पिणे बेताने करा. षष्ठात राश्यांतर करणारा मंगळ अनेक समस्यांचे बीज पेरत आहे, काळजी घ्या.
धनु – प्रलंबित कामे वेगाने मार्गी लागतील. सुखस्थानातील गुरु जीवन सुरळीत सुरु ठेवेल. अडकलेले काम पूर्ण करण्यास मामाकडून चांगली मदत होईल. संगीतक्षेत्रातील कलावंतांना लौकिक मिळेल, चांगली आर्थिक प्राप्ती होईल. मेडिकल क्षेत्रातील व्यापार्यांना लाभदायक काळ आहे. नवे घर घेणार असाल तर गती मिळेल. जमिनींची कामे मार्गी लागतील.
मकर – शनि वक्री धनस्थानात असल्याने पैशाचे गणित चुकेल. गुरुबळ चांगले असल्याने विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ आहे. सुखस्थानातील राहू आणि दशमातील केतू हे गृहसौख्य आणि व्यावसायिक ताळमेळ बसवण्यास बाधा पोहचवतील. खेळाडूंसाठी चांगले दिवस आहेत, स्पर्धेत पदकाची कमाई होईल. प्रसिद्धी मिळेल. आवडीच्या क्षेत्रात पतप्रतिष्ठा मिळेल. कानाच्या आजारांची काळजी घ्या. शुक्राचे पंचमातील भ्रमण लाभदायक आहे.
कुंभ – नवीन क्षेत्रातील कामाला चांगले चालना मिळेल. शनिचे वक्री भ्रमण, धनस्थानात गुरु-मंगळ आणि नेपच्यून. योगकारक शुक्र सुखस्थानात त्यामुळे कौटुंबिक सौख्य, स्थैर्य यांचा अनुभव मिळेल. साडेसाती असली तरी व्यवसायवृद्धी होईल. लक्ष्मीप्राप्तीचा काळ. नोकरीत संधी चालून येईल. त्याचे सोने करा. १ आणि २ या तारखांना कर्जाचा प्रश्न सुटेल. पैसे जरा जपून वापरा.
मीन – धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. मानसिक समाधान मिळेल. घरात शुभकार्ये घडतील. कामानिमित्त प्रवास होतील, त्यातून नव्या ओळखी होतील. नोकरदारांना कामासाठी परगावी जावे लागू शकते. आईची काळजी घ्या. शिक्षणक्षेत्रात अधिकार मिळतील. मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांना पदोन्नतीच्या काळ आहे. नवी गुंतवणूक कराल. वाहन घेण्याचा योग आहे.