□ विधानसभा अध्यक्षांचा वेळकाढूपणा सुरूच
■ त्यांचा दोष नाही. त्यांची नेमणूकच त्यासाठी केलेली आहे तथाकथित महाशक्तीने.
□ न्यायाला मुद्दाम उशीर करणे हा महाराष्ट्रावर अन्याय – आदित्य ठाकरे यांची टीका
■ या अन्यायाचा वचपा आता मतदान होईल तेव्हा काढायचा, मिंधे आणि त्यांच्यामागे उभी असलेली दळभद्री महाशक्ती महाराष्ट्रातून बाहेर फेकून द्यायची.
□ महाराष्ट्रीयन नॉट अलाऊड… मुलुंडमध्ये गुजरात्यांची दादागिरी
■ भाजपच्या नादी लागलेल्या मराठी माणसांनीही सकल बंधुत्वाचे नारे देण्याआधी विचार केला पाहिजे की मुंबईतून आपलं अस्तित्त्व आणि महाराष्ट्राची कणखर ओळख नष्ट करायला निघालेले नतद्रष्ट कोण आहेत…
□ मराठी असल्याने मलाही मुंबईत घर नाकारले होते – पंकजा मुंडे
■ तुमची ही कथा, तर इतरांचं काय होत असेल? पण, तेव्हा तुमचा बाणा दाखवून का नाही दिलात? की पक्षाच्या धोरणापुढे हा अपमानही गोड करून घेतलात?
□ विरोधकांच्या मतदारसंघातील विकासकामे रोखणे मिंधे सरकारच्या अंगलट
■ मुळात आपल्यासारख्या बेकायदा सरकारला हे अधिकार आहेत, असं समजणं हाच केवढा मोठा अगोचरपणा आहे.
□ मिंधे सरकारचा दलाल मंत्रालयासमोर कंत्राटवाटप करतो – नाना पटोले यांचा आरोप
■ हे दलालांनी दलालांसाठी चालवलेलं दलालांचंच तर राज्य आहे, वेगळं काय होणार?
□ पुढील निवडणुकीत सोसायट्यांच्या आवारात मतदान केंद्रे
■ काही दिवसांनी घरोघर जाऊन बोटं दाबून घेणार वाटतं मशीनवर.
□…तर अधिकार्यांचे हातपाय तोडू – बच्चू कडूंचे भंडार्यात खळबळजनक विधान
■ कोयता गँग जॉइन केली की काय यांनी? मंत्रिपदाच्या नावाखाली चुना लागलेला आहे, त्याचा काहीतरी वापर करावा लागतो ना!
□ आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयात सर्व मजल्यांवर संरक्षक जाळी
■ म्हणजे आत्महत्या करा, पण आपल्या घरी करा, रस्त्यात करा, मंत्रालयाच्या समोर करा… फक्त मंत्रालयाच्या मजल्यावरून उडी टाकून करू नका… त्यापेक्षा कोणावर अशी आत्महत्या करण्याची पाळी येऊ नये, असा जनहिताचा कारभार केला तर?
□ युतीत आता ताकद दाखवावीच लागेल – प्रफुल्ल पटेल यांचा मिंधे आणि भाजपला सूचक इशारा
■ अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं… आणि डायरेक्ट बेबनावाची, घटस्फोटाची भाषा?
□ दिलेल्या मुदतीत कुणबी प्रमाणपत्र द्या – मनोज जरांगे मागणीवर ठाम
■ आता नवे वाटेकरी आल्यावर कुणबी उपोषणाला बसतील, मग काय करणार?
□ आमदार अपात्रता प्रकरणात जाणीवपूर्वक विलंब – जयंत पाटील यांचा विधानसभा अध्यक्षांवर आरोप
■ निवडणुकीपर्यंत बेकायदा बांडगुळं बोडक्यावर बसून राहणार राज्याच्या.
□ मुरबाडमध्ये विद्यार्थ्यांचा ओंडक्यावरून जीवघेणा प्रवास; मिंधे सरकारच्या गतिमान कारभाराची पाटी कोरीच
■ असं कसं, हा ओंडका गतिमान नेत्यांनी भेट दिला असेल, त्यांचे फोटो असतील त्यावर, पाहा जरा नीट.
□ पमनानी आणि जानकरांचे बंगले कधी पाडणार? बगलबच्च्यांना वेगळी ट्रीटमेंट का? – सामाजिक कार्यकर्ते योगेश मुंदडा यांचे उपोषण
■ ती काय साधी माणसं वाटली का?
□ नवी मुंबईत भाजप पदाधिकार्याचा गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना
■ परदेशात पळून बंगला बांध बाबा, कोणी शोधायला पण येणार नाही तुला… गॅरंटी आपली!
□ भाजपचा राष्ट्रीय सदस्य असलेल्या मुख्याध्यापकाची मनमानी; दोन महिने दांडी, तरी पगार खात्यात
■ अहोरात्र देशकार्याला जुंपून घेतलंय त्याने आणि तुम्ही काय फडतूस शालेय कामांसाठी धारेवर धरताय त्याला?
□ शिवसेना सुप्रीम कोर्टात जाताच राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा अखेर रद्द
■ अर्रर्र… आता टाइमपास करायला नवी काय युक्ती लढवावी बरं…
□ आदिवासींचे खरे शत्रू मिंधे सरकारच; शहापूर तालुक्यात झळकले फलक
■ आदिवासींना कळलं ते बाकीच्यांना हळुहळू कळत जाईलच…
□ मुरबाडच्या शेतकर्यांनी वर्गणीतून बनवला पूल; मिंधे सरकारला जमले नाही ते गावकर्यांनी केले
■ आता मतं मागायला आले की पुलापलीकडून हाकलून द्या…
□ जागावाटपावरून मतभेद होणार नाही याची काळजी घेऊ – शरद पवार
■ करा अथवा मरा अशी लढाई आहे… फुटकळ मतभेदांत अडकले की संपलेच.