हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर त्यांना हे व्यंगचित्र निश्चित आठवलं असतं आणि त्यांनी ते दाखवून आपल्या नातवाला, आदित्य ठाकरे यांना निश्चितच शाबाासकी दिली असती. बाळासाहेबांनी ही भेदक रविवारची जत्रा रेखाटली आहे १९७७ साली. इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या घोषित (हे महत्त्वाचे) आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनतेने जनता पक्षाला भरघोस मतांनी निवडून दिलं तेव्हा या पक्षाचे नेते काँग्रेसी राजवटीपेक्षा वेगळी राजवट राबवून दाखवतील, अशी आशा होती. प्रत्यक्षात या मंडळींनी सत्ता हाती येताच काय केले, ते इथे दिसते आहे. जनतेच्या पैशांनी सरकारी दौरे काढून विदेशवार्या करण्यात यांनी धन्यता मानली. आज महाराष्ट्रात अशा प्रकारचे दोन दौरे निव्वळ आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटमुळे रद्द करण्याची पाळी मिंधे सरकारवर आली. बाळासाहेबांच्या कमालीच्या जिवंत आणि वेगवान अशा व्यंगचित्राने तेव्हा जे साधलं असेल, तेच आदित्य यांनी शब्दांच्या फटकार्यांनी साधलं, हे पाहून बाळासाहेबांना किती आनंद होत असेल.