ऐंशीच दशक येईपर्यंत हिंदीतले आघाडीचे बहुतांश कलाकार बोहल्यावर चढले होते. काहींनी बोहल्याच्या विरुद्ध मार्ग स्वीकारून अविवाहित राहण्याचा मार्ग स्वीकारला. याउलट ऐंशीच्याच दशकाच्या आसपास मराठीतील सुपरस्टार कलावंतांचे सूर जुळले आणि त्यांच्या दारात वाजत गाजत वरात आली. यातली पहिली सुपरस्टार जोडी होती सचिन आणि सुप्रिया पिळगावकर (सबनीस). सचिन आणि सुप्रिया दोघांनी अभिनय क्षेत्रातील करियरची सुरुवात अगदी बालवयापासून केली. १७ ऑगस्ट १९५७चा जन्म असलेला सचिन चित्रपटसृष्टीत चांगले स्थिरावला होता. ‘नदिया के पार’, ‘शोले’, ‘गीत गाता चल’ अशा कित्येक सिनेमांतून त्याने छाप पाडली होती. एकदा सचिनच्या आईंनी दूरदर्शनवर एका कार्यक्रमात नाच करणार्या गोड मुलीला बघितलं, नाव होत सुप्रिया सबनीस. लगेच त्या सचिनला म्हणाल्या, ‘अरे सचिन, ही बघ छान आहे मुलगी, सुप्रिया सबनीस, करून टाक हिच्याशी लग्न.’
एक दोन दिवसांनी वर्तमानपत्रात, ‘म्हातारे अर्क, बाईत गर्क’ या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाची जाहिरात होती, कलाकारांत एक नाव होतं सुप्रिया सबनीस. त्या नाटकातील अजय वढावकर हा मित्र असल्याने सचिन पहिल्या प्रयोगाला गेला. १ ऑगस्ट १९८३चा तो दिवस. ‘नवरी मिळे नवर्याला’ या आगामी चित्रपटासाठी अभिनेत्री शोधण्याचं काम सुरू होतं, सुप्रिया त्या भूमिकेसाठी योग्य वाटल्याने तिला ती भूमिका ऑफर झाली. तिचा तो पहिलाच सिनेमा असणार होता. सेटवरचा वावर, अभिनयातला भाबडेपणा यामुळे सचिनला सुप्रिया आवडू लागली. पण दोन अडचणी होत्या. सुप्रियाला दुसरं कुणी आवडतं का आणि मनातली भावना व्यक्त केल्यावर सुप्रियाने सिनेमा सोडून दिला तर? त्यामुळे शूटिंग संपेपर्यंत काहीही सांगायचं नाही असं सचिनने ठरवलं. शूटिंग संपलं, फक्त सचिनचं ‘अलबेला आला आला जयराम आला’ हे गाणं चित्रित व्हायचं बाकी होतं. सचिनने सेटवरच सुप्रियाला मागणी घातली. १७ वर्षांच्या सुप्रियाने चार दिवसांचा वेळ मागून घेतला, पण पुढच्याच दिवशी होकार कळवला. ‘नवरी मिळे नवर्याला’ प्रदर्शित होऊन सुपरहिट झाला. सचिनच्या चित्रपटक्षेत्राच्या पार्श्वभूमीमुळे सुप्रियाच्या घरून आधी विरोध झाला, पण दोघांचा निर्णय पक्का आहे हे कळल्यावर १ डिसेंबर १९८५ रोजी दादरच्या राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात थाटात विवाह सोहळा संपन्न झाला. सुप्रिया सबनीस ही सुप्रिया पिळगावकर बनली.
लग्नानंतर बायकोने चित्रपटातून कामं करू नयेत अशी सचिनची अट होती, ती त्यानेच रद्द केली. ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातून आणि ‘तू तू मैं मैं’ या गाजलेल्या मालिकेतून ही जोडी पडद्यावर येत राहिली, ‘नच बलिये’ या डान्स शोमध्ये आपल्या अर्ध्या वयाच्या कलाकारांना धोबीपछाड देऊन या सिनियर जोडीने ट्रॉफी जिंकली, तो सिझन अजूनही प्रेक्षकांचा फेवरेट आहे. ही नवरी नवर्याला मिळून आता ३८ वर्षे झाली आहेत…
…याच सिनेमाच्या सेटवर अजून दोन कलाकार होते, जे तेव्हा एकमेकांचे परिचित होते, पण अजून मित्रही बनले नव्हते, अशोक सराफ आणि निवेदिता जोशी. ‘डार्लिंग डार्लिंग’ नाटकात अशोकबरोबर काम करणार्या गजानन जोशी यांची मुलगी निवेदिता बाबांना भेटायला आली असताना बाबांनी अशोकशी ओळख करून दिली, ती त्यांची पहिली भेट. पुढे निवेदिता चित्रपटातून अभिनय करू लागली. नवरी मिळे नवर्याला सिनेमात एकत्र शॉट नसल्याने दोघांचं बोलणं झालं नव्हतं. त्यांनी केलेला पुढचा चित्रपट होता, ‘तू सौभाग्यवती हो.’ त्या सिनेमातही दोघांचं एकत्र काम नसल्याने बोलणं किंवा मैत्री झाली नाही. अखेर महेश कोठारेच्या ‘धुमधडाका’मध्ये दोघांचा पहिला एकत्र सीन चित्रित झाला, तोही यादगार होता. सिनेमात अशोकने यदुनाथ जवळकर बनून महेशच्या वडिलांचं सोंग घेतलेलं असतं. निवेदिता त्यांच्या पाया पडते तेव्हा अशोक म्हणतो, ‘तुला इच्छित वरप्राप्ती होवो.’ त्याच्या तोंडून त्याचीच नियती बोलली म्हणायची. अशोकमामा त्या प्रसंगाबद्दल सांगतात, ‘आपल्याला कुठे माहित असतं तेव्हा, पुढे काय होणार ते?’
याच चित्रपटात नरसोबाच्या वाडीला दर्शन घेण्याचं दृश्य होतं. त्यासाठी सगळा शूटिंग क्रू तिथे पोहोचला. अशोक सराफ येणार म्हणून तिथे तोबा गर्दी. शूटिंग उरकून लोक कसेबसे आपल्या गाडीपर्यंत पोहोचत होते, त्या गडबडीत सगळे निघाले केवळ निवेदिता मागे उरली. आसपास युनिटमधला कोणीच नव्हता. प्रचंड गर्दीत साडी सांभाळत वाट काढायचा प्रयत्न करत होती ती, पण गाडी दिसत नसल्याने ती गांगरली, रडू फुटायचं बाकी असतानाच समोरून गर्दी बाजूला सारत येणारा अशोक तिला दिसला. तो तिला सुखरूप गाडीपर्यंत घेऊन गेला. निवेदिता मागे राहिली आहे, हे त्याच्या एकट्याच्याच लक्षात आलं होतं. त्या क्षणी निवेदितासाठी अशोक रियल लाइफ हिरो झाला.
पण अशोक सराफची खरी हिरोगिरी तिला पुढे कळली. १७ एप्रिल १९८७ रोजी झालेल्या अपघातातून तो पूर्णपणे बरा झाला नव्हता. पण, निर्माता आणि सहकलाकारांचं नुकसान होऊ नये म्हणून तो सेटवर येऊन जणू काही झालंच नाही, असं काम करायचा. त्याच्या या जिद्दीच्या आणि माणुसकीच्या प्रेमात निवेदिता पडली आणि ‘मामला पोरींचा’ या सिनेमाच्या सेटवर तिने ‘मी लग्न करेन तर तुझ्याशीच’ असं निवेदिताने अशोकला निक्षून सांगितलं. दोघांच्या वयांत अंतर फार. त्यामुळे तू या निर्णयाचा फेरविचार कर, असं अशोकने सुचवूनही निवेदिता आपल्या प्रेमावर ठाम होती. निवेदिताच्या सुस्वभावाने अशोकला भुरळ घातली. दोघांनी गोव्याच्या मंगेशीच्या देवळात प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. अशोक १८ वर्षांनी मोठा असल्याने निवेदिताच्या आईचा या लग्नाला होकार नव्हता. पण मोठ्या बहिणीच्या सहकार्याने तिने आईची संमती मिळवली आणि २७ जून १९९०ला त्याच मंगेशीच्या देवळात साधेपणाने अशोक-निवेदिता विवाहबद्ध झाले. गेल्याच आठवड्यात त्यांच्या लग्नाला ३४ वर्षे पूर्ण झाली.
मराठी चित्रपटसृष्टीत अशोक-निवेदिता हे मामामामी. तसंच एक जोडपं आहे दादा-वहिनीचं. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दुसरे पुत्ररत्न म्हणजे रितेश. शिक्षणाने आर्किटेक्ट असलेला रितेश न्यूयॉर्कमध्ये आर्किटेक्ट म्हणून काम करत होता. अभिनयाची आवड होती. ‘तुझे मेरी कसम’ (२००३) हा रितेशचा पहिला सिनेमा. मुंबईतली ईस्ट इंडियन ख्रिश्चन असूनही दक्षिणेत काम करून तिथे मोठी स्टार बनलेली जेनेलिया डिसूझा हिचा हा पहिला हिंदी सिनेमा होता. मुख्यमंत्र्याचा मुलगा असलेला हिरो उद्धटच असेल असा जेनेलियाचा समज होता, प्रत्यक्षात मात्र रितेश तसा नाही हे जाणवल्यावर दोघांची मैत्री झाली. त्यावेळी जेनेलिया होती १७ वर्षांची तर रितेश होता २६ वर्षांचा. दोघांनाही या सिनेमासाठी मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर अॅक्टर-अॅक्ट्रेस म्हणून पुरस्कार मिळाले. मैत्रीतून प्रेम फुलत गेलं. मीडियामधील सिने फोटोग्राफर्स बांद्रा ते अंधेरी या एरियात सिनेकलाकारांच्या पातळीवर फिरत असतात, हे लक्षात घेऊन रितेश जेनेलियाला भेटायला दक्षिण मुंबईतील जागा निवडायचा. वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून दोघांनीही मीडियापासून आपलं नातं लपवून ठेवलं. दोघांचं नक्की ठरल्यावर दोघांनी आधी आपापल्या घरच्यांना सांगितलं. रितेश जेनेलियापेक्षा नऊ वर्षांनी मोठा, शिवाय तो हिंदू ती ख्रिश्चन; घरून विरोध होण्याची शक्यता होती पण दोघांच्याही घरच्या मंडळींनी समंजसपणा दाखवून लग्नाला परवानगी दिली. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी हिंदू आणि ख्रिस्ती अशा दोन्ही पद्धतींनी विवाह झाला.
इकडे हिंदी सिनेमात नव्वदच्या दशकात नवी पिढी उदयाला येत होती. शाहरुख खान आणि काजोल या जोडीचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा महामेगाहिट सिनेमा. तो पडद्यावर आला ते वर्ष होतं १९९५. त्या सिनेमात काजोलने साकारलेल्या सिमरनला तिचा हिरो राज मिळत होता, तेव्हा खर्या आयुष्यात काजोलची तिच्या खर्या हिरोशी ‘हलचल’च्या (१९९५) सेटवर गाठ पडली. शूटिंगचा पहिला दिवस, सकाळची वेळ, उबदार ऊन. एकीकडे शॉटची लगबग सुरू होती, कलाकार खुर्च्या टाकून चहासोबत गप्पा मारत होते. या सगळ्या घोळक्यापासून वेगळा बसलेला शांत, गंभीर अजय काजोलच्या नजरेस पडला. औपचारिकता म्हणून या घुम्याशी हाय हॅलो झालं. त्यापुढे बोलणं जायचा प्रश्नच नव्हता. सेटवरच हे दृश्य काजोलसाठी नेहमीचंच झालं. एकदा एका सीनसाठी अजयशी चर्चा झाली तेव्हा काजोलच्या लक्षात आलं की हा तर हुशार आहे. याची निरीक्षणं आणि मतं आपल्याला पटतायत. मग मात्र त्याच्या शांत बसण्याचं, मोजकंच बोलण्याचं तिला कौतुक वाटलं आणि दोघांची मैत्री झाली.
दोघांत मैत्री होईपर्यंत या सिनेमाचं शूटिंग संपलं. योगायोगाने दोघांची पुढची फिल्म असणार होती ‘गुंडाराज’. त्या सेटवर दोघांचं बोलणं वाढलं. दोघेही त्यावेळी अन्य जोडीदारांबरोबर स्थिरावले होते. त्यात येणारे प्रॉब्लेम्स, त्याची सोल्युशन यांची देवाणघेवाण होऊ लागली, त्यातून दोघांना एकमेकांची अधिक ओळख झाली. एकीकडे अजयचा ब्रेकअप झाला, काही दिवसांनी काजोलचाही झाला. शूटिंग संपता संपता दोघे एकमेकांसाठी खास मित्र बनले होते. १९९७ला आलेला ‘इश्क’ हा दोघांचा सुपरहिट सिनेमा ठरला. दोघांची केमिस्ट्री पडद्यावरही दिसू लागली. मग काय, ‘प्यार तो होना ही था’ (१९९८)… अजयच्या घरून लग्नाला होकार होता, पण काजोलच्या वडिलांना वाटत होतं की अवघ्या पंचविशीत, करियरमध्ये टॉपला असताना तिने लग्न करू नये. पण आठ वर्षे सिनेसृष्टीत सतत काम करणार्या आणि सिंगल मॉम आई तनुजासोबत वाढलेल्या काजोलला मात्र वैवाहिक स्थैर्य हवं होतं. अखेरीस लेकीच्या हट्टापुढे पित्याने माघार घेतली आणि लग्नाला संमती दिली.
काजोल आणि अजय हे दोघे खाजगी आयुष्य जपणारे लोक. लग्नात मीडियाची चकाचौंध त्यांना नको होती. पण २४ फेब्रुवारी १९९९ या दिवशी लग्न आहे ही बातमी कशी कोण जाणे, मीडियात पसरलीच. आता करावं काय? अखेर एका मुलाखतीत काजोलने लग्नाचं स्थळ सांगून टाकलं. लग्नाच्या दिवशी सगळे मीडियावाले टीव्ही कॅमेरे घेऊन त्या ठिकाणी हजर झाले. पण काही हालचाल दिसेना. दिसणार तरी कशी? कारण त्यावेळी रेशमी हिरवी नऊवारी नेसलेली काजोल आणि पांढरी शेरवानी परिधान केलेला अजय हे अजयच्या राहत्या घराच्या गच्चीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होत होते. दुसर्या दिवशी फोटो व्हिडिओ रिलीज झाल्यावर सगळ्यांना काजोलचा खट्याळपणा कळला. यावर्षी दोघांच्या विवाहास २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. वरवर दोघे एकमेकांपेक्षा वेगळे भासले तरी दोघांची मूल्ये, परस्परांविषयी आदर, कौटुंबिक कर्तव्ये याविषयी एकवाक्यता आहे, म्हणूनच या चकाकत्या सिनेसृष्टीत टॉपच्या हीरो-हिरोईनचा संसार रौप्यमहोत्सवी ठरला.
सुपरस्टारबरोबर सुखाचा संसार करण्याचं भाग्य जिला लाभलं नाही त्या डिंपल कपाडियाच्या मुलीने, ट्विंकलने आई वडिलांच्या चुकांमधून धडा घेतला. तिचं बर्यापैकी बळजबरीने स्वीकारलेलं अॅक्टिंग करियर अयशस्वी ठरलं, पण खिलाडी अक्षय कुमारशी १७ जानेवारी २००१ रोजी लग्न करून तिने घरही सांभाळलं आणि अक्षयची इमेज आणि करियरही सावरायला मदत केली.
या दोघांची भेट झाली १९९९च्या ‘इंटरनॅशन खिलाडी’च्या आऊटडोअर लोकेशनवर. दोघेही नुकतेच आपापल्या ब्रेकअपमधून बाहेर पडत होते. तेव्हा आपण १५ दिवस फ्लिंग (सिरियस नसलेलं नातं) करू असं दोघांनी ठरवलं. पण त्या पंधरा दिवसांतच दोघांना एकमेकांसोबत आधीच्या नात्यापेक्षा कंफर्टेबल वाटू लागलं. तोवर आमीर खानबरोबर ट्विंकलचा ‘मेला’ (२०००) हा सिनेमा शूट होऊन प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता. तो हिट होईल असं सगळ्यांना वाटत होतं. त्यावर एक जुगार खेळला या जोडीने. ‘मेला’ हिट झाला तर एवढ्यात लग्न करायचं नाही आणि मेला बॉक्स ऑफिसवर मेलाच, तर ट्विंकलने सिनेसृष्टीला रामराम लग्न करायचं, असं ठरलं… ‘मेला’ सुपरफ्लॉप झाला आणि ट्विंकलने चित्रपट संन्यास घेऊन १७ जानेवारी २००१ला अक्षयसोबत गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्याआधी अक्षयच्या चित्रपटांची संख्या अधिक की अफेअर्सची अधिक, अशी चढाओढ असायची; पण लग्नानंतर खिलाडी कुमारची नवीन सुधारीत आवृत्ती बघायला मिळाली आणि ती आजतागायत कायम राहिली.
पुढल्याच वर्षी, २००२ साली अमिताभ बच्चनने साठी गाठली आणि चिरंजीव अभिषेकच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. अभिषेकची बहीण श्वेता ही राज कपूरचा नातू निखिल नंदा याच्याशी लग्न करून कपूर खानदानाची सून झाली होती. बहिणीच्या सासरी येता जाता अभिषेकची करिश्मा कपूरशी गट्टी जमली. अमिताभने आपल्या साठाव्या जन्मदिनी, या दोघांची गाठ जुळणार अशी बातमी दिली. मात्र, वरमाय जया आणि लोलोमाय बबिता यांच्यात काहीतरी बिनसत असल्याची चर्चा सिनेसृष्टीत दबक्या आवाजात सुरू झाली. तेव्हा करिष्माचा करिष्मा बॉक्स ऑफिसवर चालत होता, पण अभिषेकचे सिनेमे सातत्याने अपयशी ठरत होते. एबीसीएलच्या फसलेल्या धाडसामुळे अमिताभची आर्थिक स्थिती देखील नाजूक होती. हे लग्न मोडलं… अभिषेकच्या लग्नाची गाठ विधात्याने जिच्यासोबत बांधली होती त्या ऐश्वर्या रायच्या आयुष्यातही तेव्हा प्रचंड उलथापालथ सुरू होती. १९९४ साली विश्वसुंदरी ऐश्वर्याने सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमाने तिच्या आयुष्यात प्रचंड यश आणि सलमान खान नावाचं वादळ आणलं. या वादळात तिचा विवेक ढळतोय असं वाटत असतानाच ‘ढाई अक्षर प्रेम के’ या सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्याला अभिषेक हा शांत, समंजस मित्र मिळाला. याआधी १९९७ साली ते स्वित्झर्लंडमध्ये भेटले होते. ऐश्वर्या बॉबी देओलसोबत ‘और प्यार हो गया’ हा पदार्पणाचा सिनेमा करत होती, तर अभिषेक ‘मृत्युदाता’ सिनेमाच्या चित्रिकरणासाठी अमिताभचा सहाय्यक बनून गेला होता. बॉबी देओलने अभिषेकला त्याच्या सेटवर डिनरसाठी बोलावलं होतं आणि या दोघांची गाठभेट घालून दिली होती.
अर्थात ते एकमेकांच्या प्रेमात पडले ते फार नंतर, ‘उमराव जान’ हा सिनेमा करताना. ऐश्वर्याचा कांदेपोहे समारंभ २००५च्या बंटी और बबली सिनेमात पार पडला. सासरेबुवा अमिताभ यांनी ‘कजरारे’ आयटेम साँग करताना आपल्याला सून पसंत आहे अशी ग्वाही दिली. ‘धूम’ सिनेमाने अभिषेकला पहिला हिट सिनेमाही दिला होता. ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही शोमुळे अमिताभही पुन्हा कोट्यधीश झाला. अभिषेकच्या लग्नाची प्रतीक्षा संपली. जगातील सर्वात सुंदर महिला २० एप्रिल २००७ रोजी बच्चन घराण्याची सून झाली. या लग्नाला आज सतरा वर्षे पूर्ण झाली. ऐश्वर्याने ‘जया अंगी मोठेपण त्यास यातना कठीण’ ही म्हण व्यवस्थित समजून घेतल्यामुळे संसार सुखाचा चालला आहे.
२००७मध्येच कपूर खानदान का चिराग रणबीर कपूर हा संजय लीला भन्साळींच्या ‘साँवरिया’मधून लाँच झाला. रणबीरने अभिनयक्षेत्रात येण्याआधी संजय लीला भन्साळीच्याच ब्लॅक सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. ब्लॅकमध्ये राणी मुखर्जीच्या बालपणीच्या रोलसाठी ऑडिशन द्यायला आलेल्या लहान मुलींमध्ये एक होती आलिया भट. दहा-अकरा वर्षांच्या आलियाने रणबीरला बघितलं आणि ठरवलं की लग्न करेन तर याच्याशीच. ‘ब्लॅक’चा सेट तथास्तु म्हणाला असावा. पुढे दोघांनीही रिलेशनशिपची वेगवेगळी वळणं घेतली, पण ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर बल्गेरियात या दोघांची जोडी जमलीच. रणबीरपेक्षा अकरा वर्षांनी लहान असलेल्या आलियाने ऋषी कपूरच्या शेवटच्या दिवसांत नीतू-रणबीर कुटुंबाला साथ दिली. आईवडिलांनी मान्यता दिलेलं रणबीरचं हे पहिलंच नातं. ऋषीच्या डोळ्यांदेखत लग्न करण्याची इच्छा पूर्ण करता आली नाही, पण, त्याचं वास्तव्य असलेल्या वास्तूतच, म्हणजे खार येथील निवासस्थानी
रणबीर-आलिया १४ एप्रिल २०२२ रोजी विवाहबद्ध झाले.
रणबीर-आलिया जोडीप्रमाणेच दुसरी हिट जोडी आहे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची. यांच्या लग्नाचा मॅस्कॉटही संजय लीला भन्साळीच ठरला. २०१२ सालात गोलियों की रासलीला रामलीला या सिनेमाच्या स्क्रिप्टरिडिंगसाठी दीपिका आणि रणवीर यांची पहिली भेट झाली. दोघेही आधीच्या ब्रेकअप्समधून सावरत होते. आपण सुरुवातीला ओपन रिलेशनशिपमध्ये होतो हे त्यांनी नंतर जाहीरपणे सांगितलं. संजयला रामलीलामध्ये यांच्यात जी शारीरिक ओढीची केमिस्ट्री हवी होती, ती यातून आपसूक मिळत गेली, तो उत्तेजन देत गेला. शूटिंग ते प्रमोशन या काळात प्रेम बहरत गेलं आणि २०१५मध्ये दीपिकाने रणवीरच्या प्रपोजलला होकार दिला.
रणवीरच्या फ्लॉप काळात दीपिकाने दिलेली साथ असो की दीपिकाच्या मानसिक आजारात तिची सोबत करण्याचं रणवीरच कसब असो, या जोडीने आजच्या यंग जनरेशनला कपल गोल्स दिले आहेत.
हे कपल गोल्स देण्यात हिंदी सिनेमाच्या बाकी जोड्याही मागे नाहीत. जोडीदाराचा भूतकाळ स्वीकारून वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रीशी (कतरिना कैफ) लग्न केलेला हिरो विकी कौशल हे एक उदाहरण. दोघे फारच वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले आणि दोघांची इमेजही वेगवेगळी. विकी अभिनयकुशल, कतरिनाचा अभिनयाशी संबंध फारसा नाही, ती नृत्यकुशल. या दोघांची पहिली भेट झाली २०१९च्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये. त्यानंतर महिन्याभरात योगायोगाने वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या निमित्ताने ते एकमेकांना भेटत राहिले. कतरिना थोडीशी उतावळी आणि प्रत्येक गोष्टीचा टेन्शन घेणारी आहे. याउलट विकी शांतपणे निर्णय घेणारा आहे. विरुद्ध स्वभावामुळेच त्यांच्यात आकर्षण निर्माण झालं. राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्टमध्ये ९ डिसेंबर २०२१ ला दोघांनी लग्नगाठ बांधली. आजपर्यंत हिंदी इंडस्ट्रीत न झालेली एक गोष्ट या विवाहाच्या निमित्ताने झाली, लग्नाचे टेलिकास्ट राईट अॅमेझोन प्राईमला दिले. नागरिकत्व, वय, कुटुंब, जडणघडणीत असलेले फरक मान्य करून स्वीकारून दोघे आनंदाने सहजीवन कंठत आहेत.
या सगळ्या वळणावळणाच्या जोड्यांमध्ये त्यातल्या त्यात सरळ वळणाची जोडी आहे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची. ‘लस्ट स्टोरी’च्या (२०१८) शूटिंगनंतरच्या पार्टीत दोघांची भेट झाली, तेव्हापासून दोघांची पक्की मैत्री झाली. आपलं नातं मीडियापासून लपवण्यात दोघे यशस्वी राहिले. ‘शेरशहा’च्या (२०२१) यशानंतर दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीच कौतुक झालं, तेव्हा कुठे दोघांच्या नात्याची कुणकुण मीडियाला लागली. ही जोडी ७ फेब्रुवारी २०२३ला राजस्थानच्या सूर्यगड महालात विवाहित झाले.
हिंदी मराठी चित्रपटातील सेटवर जुळलेल्या प्रसिद्ध जोड्यांच्या या कहाण्या वाचल्यावर ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ हे कविवर्य मंगेश पाडगावकरांचे शब्द पटायला लागतात आणि सिनेमाच्या खोट्या जगात वावरणार्या हिरो हिरोईन्सनाही त्यांच्यावर प्रेम करणार्या चाहत्यांसारखंच प्रेम, ब्रेकअप आणि लग्न या त्रिसूत्रीतूनच जावं लागतं असं दिसतं.