• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ध्यासपर्वाची साफल्यपूर्ती!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 6, 2024
in खेळियाड
0

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं कमावलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचं विश्वचषकाचं महत्त्व विशद करण्यासाठी आपल्याला गेल्या चार दशकांच्या भारतीय क्रिकेट प्रवासाचा आढावा घ्यावा लागेल. या ४१ वर्षांत जी स्थित्यंतरं झाली, त्याचंच फळ म्हणजे हा जिंकलेला विश्वचषक. या निमित्तानं भारताच्या यशाच्या शिलेदारांचा आणि पुढील वाटचालीचा घेतलेला वेध.
– – –

१९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतानं एक दिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकला, तेव्हा क्रिकेटजगताला या पराक्रमाचं आश्चर्य वाटलं होतं. कारण त्यावेळी विश्वविजेतेपद काय असतं, हे तेजतर्रार मार्‍यासह जगावर राज्य करणार्‍या वेस्ट इंडिजशिवाय कुणीच अनुभवलं नव्हतं. एकदिवसीय क्रिकेट प्रकार हळूहळू रुजून क्रिकेटची मोहिनी जगावर घालण्याचा प्रारंभीचा काळ होता. पण यावेळी रोहित शर्माने मिळवून दिलेल्या विश्वचषकात हे पहिलंवहिलंपण मुळीच नव्हतं. २००७नंतर १७ वर्षांनंतर ट्वेन्टी-२० प्रकारात मिळवलेलं हे दुसरं विश्वविजेतेपद, तर २०११च्या एकदिवसीय प्रकारातील विश्वचषक जेतेपदानंतर १३ वर्षांनी प्राप्त झालेला हा चौथा विश्वचषक आणि चॅम्पियन्स चषकासह बेरीज केल्यास ‘आयसीसी’च्या जागतिक जेतेपदांची भारताची संख्या पाचपर्यंत जाते. १९८३च्या संघानं त्यावेळी प्रथमच जगाला आपल्या ताकदीचं दर्शन घडवलेलं, २०२४चा संघ हा मुळातच सामर्थ्यशाली होता. रोहित, विराट कोहली जागतिक क्रिकेटमध्ये आपला खेळ आणि ब्रँडद्वारे अधिराज्य गाजवतायत. जसप्रीत बुमराचा पृथ्वीतलावरील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असा नावलौकिक आहे. हा फरक महत्त्वाचा.
१९८३ ते २०२४ हे तसं चार दशकांचं अंतर. पण यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. तेव्हा क्रिकेटपटू गरीबीत वावरत होते, नोकर्‍या करायचे. इंडियन प्रीमियर लीग नामक (आयपीएल) सोन्याचं अंड देणारी कोंबडी भारतीय क्रिकेटच्या अंगणात वावरत नव्हती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तिजोरीत खडखडाट होता. पण ४१ वर्षांनंतर आजच्या स्थितीत क्रिकेटपटूंकडे गडगंज आर्थिक सुबत्ता आहे. ‘बीसीसीआय’चा सर्वात श्रीमंत क्रीडासंस्था म्हणून रुबाब आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) अंकुश आहे. क्रिकेट सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे आकडे अब्जावधींची उलाढाल करतायत. क्रिकेट देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालंय.
पण, म्हणून या जगज्जेतेपदाचं मोठेपण मुळीच कमी होत नाही. गेल्या वर्षी भारताला अन्य दोन क्रिकेटप्रकारांमध्ये जगज्जेतेपदानं थोडक्यात हुलकावणी दिलेली. जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविजेतेपद हे दोन्ही मिळवण्याच्या भारताच्या वाटेत ऑस्ट्रेलियाचा पहाडासारखा अडथळा होता. त्यामुळे, विराट-रोहित आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या त्रिकुटानं गेली काही वर्षं ‘एकच ध्यास… विश्वचषक जिंकणं’ हा मंत्र जपला होता. अपयशांतून खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रत्येक वेळी भारतानं नवभरारी घेतली. ताजी भरारी ही स्वप्नपूर्तीची होती.
१९८३ हे भारतीय क्रिकेटचं पहिलं स्थित्यंतर. तोवर सर्व विश्वचषकांचं यजमानपद क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडनंच भूषवलं होतं. पण १९८७मध्ये विश्वचषकाचं यजमानपद भारतानं मिळवलं. याआधीच्या तीन विश्वचषकांत प्रुडेन्शियल नामक विश्वचषक आपल्या देशात आला, तेव्हा रिलायन्स झाला. त्यानंतर ‘आयसीसी’वरही भारताचं प्रस्थ निर्माण करण्यात आणि ‘बीसीसीआय’ला सोन्याचे दिवस दाखवण्यात जगमोहन दालमिया या कोलकात्याच्या व्यावसायिकाचा सिंहाचा वाटा.
पण भारतीय क्रिकेटनं दुसरं स्थित्यंतर अनुभवलं, ते २००७मध्ये. योगायोगानं याच कॅरेबियन भूमीवर. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताला एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकात साखळीतच गाशा गुंडाळावा लागलेला. द्रविडच्या माथी लागलेला तो एक अपयशाचा शिक्का त्याला अश्वत्थाम्याप्रमाणे छळत होता. पण द्रविडनं युवकांची मोट बांधून आधी देशाला १९ वर्षांखालील वयोगटाचा विश्वचषक जिंकून दिला आणि आता ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकाराचाही. हो, २००७चं स्थित्यंतर विश्वचषकाच्या अपयशानंतरचे परिणामस्वरूप होतं. झी नेटवर्कच्या सुभाषचंद्र गोयल यांनी ‘बीसीसीआय’ला काटशह देत इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) सुरू केलं. पण हा बंडखोरीचा प्रयोग फारसा रंगला नाही. क्रिकेटचा आलेख एकीकडे खालावला असताना एक सकारात्मक घटना घडली. दक्षिण आफ्रिकेत ट्वेन्टी-२० प्रकाराचा पहिला वहिला विश्वचषक रंगला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, द्रविड, सौरव गांगुली या दिग्गजांनी हा विश्वचषक न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीच्या समर्थ खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आणि धोनीसेनेनं आफ्रिकेत चमत्कार घडवला. वर्षभरातच ललित मोदी यांनी ‘आयपीएल’चं प्रमेय मांडलं. ज्यानं भारतीय क्रिकेटला तेजस्वी झळाळी आली.
देशासाठी खेळणं हेच लक्ष्य आणि ते पूर्ण न झाल्यास नोकरी करणार्‍या क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळालं. त्यानं खेळात आणि खेळाडूंकडे पैसा आला. क्रिकेटची ही लाट अधिक आत्मनिर्भर करणारी होती. चार वर्षांत धोनीनं आणखी एक विश्वचषक जिंकून दिला. ‘आयपीएल’च्या गुणवत्ता शोधमोहिमेची रसाळ गोमटी फळे मिळू लागली. ताजं यशसुद्धा याच स्थित्यंतराचा परिपाक.

भारताच्या यशाचे शिलेदार

अमेरिका आणि वेस्ट इंडिज बेटांवर जेव्हा विश्वचषक सुरू झाला, तेव्हा तेथील खेळपट्टी आणि परिणामी फलंदाजांचं झगडणं हे सत्र सर्व संघांसाठीच चिंतेचं ठरलं. नासाऊ कौंटी स्टेडियमची ड्रॉप-इन खेळपट्टी समस्त क्रिकेटजगताच्या संशोधनाचा विषय ठरली. पण भारतीय क्रिकेट संघाचं मनोधैर्य मुळीच खचलं नाही. विराट खेळपट्टीवर फार काळ तग धरत नव्हता. दोन भोपळे त्याच्या खात्यावर जमा होते. पण अंतिम सामन्यात त्यानं विश्वविराट दर्शन घडवलं. मोनालिसाच्या चित्राप्रमाणे ती खेळी डोळ्यांचं पारणं फेडणारी. कर्णधार रोहित वेळोवेळी फलंदाजीचे क्रम, गोलंदाजीतले बदल हे लीलया करीत होता. पण त्यानं केलेले हवाई हल्ले प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजांची लय बिघडवायचे. बुमरा वेगवान मारा अचूक यष्टीभेद करायचा. ४.१७च्या इकॉनॉमीसह एकूण १५ बळी घेऊन स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणार्‍या बुमराचा सामना करणं देशोदेशीच्या दिग्गज फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरलं. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनंही टिच्चून गोलंदाजी करीत सर्वाधिक १७ बळी मिळवले. भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरं स्थान मिळवतो, तो हार्दिक पंड्या. ‘आयपीएल’मध्ये रोहितला डावलून नेतृत्वाची धुरा दिल्यामुळे खलनायक झालेला हा गुजरातचा छोरा. पण पंड्यानं जसं आपल्या मध्यमगती गोलंदाजीच्या बळावर ११ बळी मिळवले, तसेच अखेरच्या षटकांमध्ये मुक्त आतषबाजी करीत धावांचा वेगही वाढवण्याचं अष्टपैलू कार्य केलं. भारताचा हा संघ जेव्हा जाहीर झाला, तेव्हा फिरकी गोलंदाजांना दिलेल्या महत्त्वाबाबत काही जाणकारांनी टीका केली होता. पण कुलदीप यादव (१० बळी), अक्षर पटेल (९ बळी) आणि रवींद्र जडेजा या फिरकी त्रिकुटानं आपली भूमिका चोख बजावली. भारताच्या फलंदाजीचंच पृथक्करण करता विराट (१५१ धावा) आणि रोहित (२५७ धावा) यांच्यासह सूर्यकुमार यादव (१९९ धावा), ऋषभ पंत (१७१ धावा), पंड्या (१४४ धावा), शिवम दुबे (१३३ धावा) आणि अक्षर (९२ धावा) यांच्या फलंदाजीचा आलेख वेळोवेळी उंचावला. रोहित वगळता अन्य कोणत्याही फलंदाजात सातत्य दिसून आलं नाही.

पुढे काय?

या ध्यासपर्वासह विराट-रोहितनं आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारातून निवृत्ती पत्करली, ती नव्या पिढीला संधी मिळण्याच्या उद्देशानं. द्रविडच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील सुद्धा ही अखेरची मोहीम… सफल आणि संपूर्ण! तसं पाहिल्यास एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकानंतर विराट-रोहितचं भवितव्य काय, हा प्रश्न ऐरणीवर होता. आपण गेल्या काही वर्षांचा जरी आढावा घेतल्यास ट्वेन्टी-२० प्रकारात हार्दिक, सूर्यकुमार, ऋतुराज गायकवाड असे काही नेतृत्वपर्याय हाताळले. शुभमन गिल, रिंकू सिंह, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, ईशान किशन असे असंख्य पर्याय रांगेत उभे आहेत. विश्वचषकासाठी संघात असलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल, यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन आणि मनगटी फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल या तिघांनाही प्रत्यक्षात संधी मिळाली नाही. विराट-रोहितचं हे पाऊल नव्या पिढीसाठी प्रेरक ठरेल. केएल राहुलला आधीच ट्वेन्टी-२०पासून दूर ठेवण्यात आलं आहे. जडेजाही वयाच्या पस्तीशीत आहे. एकंदरीतच ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर आता पुढील काही महिने भारतीय क्रिकेटमधील बदलांचे असतील. तूर्तास, अब्जावधी भारतीय जनतेला हा क्रिकेटमय आनंदाचा क्षण दिल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!

[email protected]

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

सेटवर जुळल्या रेशीमगाठी (भाग २)

Next Post
सेटवर जुळल्या रेशीमगाठी (भाग २)

सेटवर जुळल्या रेशीमगाठी (भाग २)

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.