ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाने महाराष्ट्रातलं विशेषतः पुण्यातलं वातावरण तापलं होतं. जेधे-जवळकर या तरण्याबांड नेतृत्वाने बहुजन चळवळीला एक नवा तजेला दिला होता. त्यात प्रबोधनकार पुण्यात आल्याने त्यात भर पडली होती. त्यात प्रबोधनमध्ये एक महत्त्वाचा लेख छापला गेला.
– – –
प्रबोधनकारांचे सर्वात महत्त्वाचं पुस्तक कोणतं? या प्रश्नाचं बेलाशक उत्तर रंगो बापूजी यांचं चरित्र असं देता येतं. सातार्याच्या गादीचे शेवटचे छत्रपती प्रतापसिंह आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य पणाला लावणारे निष्ठावान सेवक रंगो बापूजी यांची अंगावर काटा आणणारी कहाणी या ग्रंथातून समोर येते. या शेकडो पानांच्या पुस्तकाच्या लिखाणाची पहिल्या पाऊलखुणा अवघ्या पन्नास-साठ पानांच्या ‘सातार्याचे दैव का दैवाचा सतारा!’ या पुस्तकातून मिळते. या लिखाणाची प्रेरणा छत्रपती शाहू महाराज होते.
वेदोक्त प्रकरणात छत्रपतींना शाहू महाराजांना काही सनातनी ब्राह्मणांनी फार त्रास दिला होता. तेव्हा झालेल्या चर्चेत प्रबोधनकारांनी शाहू महाराजांना सांगितलं की असा त्रास दिलेले ते पहिले छत्रपती नाहीत, तर छत्रपतींना सनातन्यांनी दिलेला त्रास हा अनेकपट जास्त होता. प्रतापसिंहांची कहाणी ऐकल्यावर त्यांचं चरित्र लिहिण्याचा आग्रह महाराजांनी प्रबोधनकारांकडे केला. त्यानंतर काही महिन्यांनी १९२२च्या शिवजयंतीला प्रबोधनकार सातार्यात शिवजयंतीचं भाषण द्यायला जात होते. तेव्हा पुणे स्टेशनवर त्यांना शाहू महाराज भेटले. त्या भेटीत महाराजांनी त्यांना आदेश दिला, अरे आता कितीदा तुम्ही सोळाशे सत्तावीस साली शिवाजी जन्मला हे पालुपद गात बसणार? माझी आज्ञा आहे तुला, तेथे तो सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास इत्थंभूत सांगून, दे त्या सातारच्या मावळ्यांना भडकावून.
महाराजांची आज्ञा प्रबोधनकारांनी शब्दशः प्रत्यक्षात उतरवला, हे वेगळं सांगायलाच नको. ब्राह्मणेतर पक्षाने तीन दिवस राजवाड्यासमोरच्या विस्तीर्ण पटांगणात प्रबोधनकारांची व्याख्याने आयोजित केली होती. त्या निमित्ताने हा इतिहास शंभर वर्षांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आला. तेव्हा प्रबोधनकारांनी केलेलं भाषण हिंदवी स्वराज्याचा खून या शीर्षकाखाली लेखस्वरूपात पाक्षिक प्रबोधनमधे प्रकाशित झालं. हा सगळा इतिहास आपण याच स्तंभात पूर्वी पाहिला आहे.
त्यानंतर प्रबोधनकारांनी हा विषय शंभर वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र या ग्रंथात मांडण्याचं ठरवलं. तशी घोषणाही त्यांनी वारंवार केली. पण छत्रपती शाहू महाराजांच्या अकल्पित मृत्यूने याला पहिला धक्का दिला. प्रबोधनकारांच्या संकल्पाचे मुख्य आधारच कोसळले. पण महाराजांनीच मृत्यूशय्येवर असताना प्रबोधनकारांकडून छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजीचं चरित्र लिहिण्याचं वचन घेतलं. ते प्रत्यक्षात आणता आणता प्रबोधनकारांच्या नाकी नऊ आले. थोडी उसंत मिळताच, त्यांनी शंभर वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र या शीर्षकाने काही लेख प्रबोधनमध्ये छापायला सुरुवात केली. त्याचबरोबर रंगो बापूजींच्या इतिहासाची साधनंही प्रकाशित केली.
प्रबोधनकार पुण्यात स्थिरावत असताना ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ जोरात होती. पुण्यातलं वातावरण प्रचंड तणावग्रस्त होतं. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या तरुण जोडगोळीने बहुजन अस्मितेच्या चळवळीत नवा जोम आणला होता. त्यात प्रबोधनकार पुण्यात आल्याने या लढ्याचं वैचारिक नेतृत्व त्यांच्याकडे चालत आलं. याच काळात सातार्याच्या गादीवर नवीन दत्तक बालछत्रपती बसले. त्यांच्या दत्तकविधान समारंभाच्या निमित्ताने प्रबोधनकारांनी जुलै १९२५च्या अंकात ‘सातार्याचे दैव का दैवाचा सतारा!’ हा लेख प्रसिद्ध केला. आधीच्या अंकात त्याची जाहिरात करून त्याविषयी उत्सुकताही निर्माण केली होती. महाराष्ट्राला अज्ञात असणार्या या ऐतिहासिक कालखंडाची तत्कालीन संदर्भात मांडणी त्यांनी या संपादकीय लेखात केली. या ऐतिहासिक लेखाला वर्तमानातल्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचीही पार्श्वभूमी होती.
या लेखाचं पुस्तकही आलं. त्यात याच विषयावरचा हिंदवी स्वराज्याचा खून हा आधी प्रकाशित झालेला लेख जोडून १९२५ सालीच प्रबोधन लघुग्रंथमालेतलं तिसरं पुस्तक म्हणून ‘सातार्याचे दैव का दैवाचा सतारा!’ या नावाने प्रकाशित केलं. या पुस्तकाची पहिली आवृत्ती ४८ पानांची होती. त्याची पुढची आवृत्ती प्रबोधनकारांचे कोल्हापूर येथील सत्यशोधक मित्र दासराम जाधव यांनी १९३२ साली प्रकाशित केली. हा लेख आणि त्याचं पुस्तक यांनी महाराष्ट्राच्या समाजमनाला एक नवं वळण लावलं. इतिहासाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिला. म्हणून हा लेख काही भागांत तुमच्यासमोर जसाच्या तसा देत आहोत.
सातार्याचे दैव का दैवाचा सतारा!
सातारा! एकच शब्द आणि तीनच अक्षरे. पण त्यांत किती सुखदु:खाच्या गोष्टी, आशा निराशेचा इतिहास आणि अंगावर रोमांच उभे करणार्या स्फूर्तीची व हृदयविदारक कल्पनांची साठवण झालेली आहे! हिंदवी स्वराज्याच्या पुनर्घटनेचा धडाडीचा भगीरथ प्रयत्न येथेच झाला आणि या स्वराज्याच्या बलिदानाचा भिक्षुकी यज्ञ येथेच धडाडला. छत्रपतीच्या सार्वभौम सत्ताप्रसाराची दिव्य भक्ती येथेच प्रथम फुरफुरली व अटकेपार गुरगुरली आणि छत्रपति मालकाची स्वारी पेशवे नोकरांच्या वैâदखान्यांत येथेच झुरणीला लागून बेजार झाली. समाज-धर्मकारणांच्या क्षेत्रांत आज मगरूर झालेल्या व राजकारणात सार्या महाराष्ट्राची स्वयंमान्य बडवेगिरी करविणार्या चित्पावन बृहस्पतींच्या लौकिकाची प्राणप्रतिष्ठा येथेंच साजरी झाली, आणि चित्पावनांनी आपल्या आत्मप्रतिष्ठेखातर छत्रपतीच्या प्राणाची व सत्तेची आहुती याच नगरात दिली.
जिंजीच्या आत्मयज्ञांत महाराष्ट्राची राष्ट्रीय इभ्रत तावून सुलाखून काढणारे पुरुषोत्तम येथेच नांदले आणि त्याच इभ्रतीचे हातपाय चित्पावनांनी केवळ आपल्या स्वार्थासाठी इंग्रजी डावपेचांच्या लोखंडी सुखळांत येथेच बांधले. शिवरायाच्या नावासाठी तमाम हिंदुस्थानात रक्ताचे सडे घालणारे वीर महावीर येथेच थरारले आणि भिक्षुकी पेशवे राहूंचे छत्रपतीला खग्रास ग्रहण लागताच ब्राह्मणभोजनाच्या खरकट्या पत्रावळी व द्रोणांचे पर्वतप्राय खच येथेच पडले. भिन्नभिन्न संस्कृत्यनुरूप महाराष्ट्रांतील यच्चयावत् सर्व ब्राह्मण ब्राह्मणेत्तर जातींचा देशहितासाठी व राष्ट्रोद्वारासाठी याच सातार्यात उद्धार झाला आणि चैनी व रंगेल शाहू छत्रपतीच्या राजविलासी मग्नतेचा फायदा घेऊन चित्पावनांनी चित्पावनेतरांना माजी पाडण्याच्या कटाचा भिक्षुकी पाया येथेच घातला.
हिंदूंच्या हिंदुत्वरक्षणाचे व प्रसाराचे प्रयत्न येथेच झाले आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर भेदाच्या विषवल्लीचे पुणेरी बीज प्रथम येथेच पेरले गेले. गाई ब्राह्मणांच्या संरक्षणाचे प्रतिज्ञाकंकण चढविलेले छत्रपति याच सातार्यात गाजले आणि ब्राह्मणी धर्माच्या यज्ञात त्याच छत्रपतींना पेशव्यांनी जिवंत भाजून, टोपकरी सेनेला गोमांसाच्या मेजवान्यांनी येथेच संतुष्ट केले. भट घराण्याची पेशवाई चिटणिशी कलमाच्या मखलाशीत येथेच जन्म पावली आणि पेशव्यांच्या मखलाशीने चिटणिशी घराण्याची राखरांगोळी येथेच झाली. क्षत्रिय मराठ्यांच्या दणकट क्षात्रतेजावर ब्राह्मणांच्या जानवी शेंड्यांचे रक्षण याच राजधानीने केले; आणि अखेर त्याच ब्राह्मणांनी आपल्या जानवी शेंड्यांच्या वर्चस्वासाठी परकी टोपकरांशी संगनमत करून, मराठ्यादि अखिल चित्पावनेतरांना शूद्राधम ठरविण्यासाठी छत्रपति प्रतापसिंहाचा गळा याच सातार्यांत भर मध्यान्ह रात्री कापला.
ब्राह्मणी विद्येला उत्तेजन देणारी वेदशाळा छत्रपतीनीं येथेच स्थापन केली आणि कायस्थ मराठ्यादि क्षत्रियांना शूद्र ठरविण्याचीं भिक्षुकी कारस्थाने अखेर येथेच शिजली. विद्यासंपन्न भिक्षुकांना छत्रपतीनी शालजोड्यांची खैरात येथेंच वाटली आणि त्याच भिक्षुकांच्या सैतानी कारस्थानांनी हद्दपार होणारी छत्रपतीची मूर्ती एका मांडचोळण्याशिवाय उघडी नागडी स्वराज्य स्वदेशाला येथेच मुकली. छत्रपतींच्या पायाच्या धुळींतून पंत सचिव, पंत आमात्य, पंत प्रतिनिधि, पंत पेशवे इत्यादि भिक्षुकी पंते येथेच निर्माण झाली आणि अखेर त्याच पंत संतांनी ब्राह्मणी कारस्थाने रचून छत्रपतीला ह्याच सातार्यांत अखेरची धूळ चारली. रायगडला विस्कटलेली स्वराज्याची घडी दैवाच्या सतार्याने सातार्यात बसविताना छत्रपति राजाराम महाराजानी ब्राह्मणांना आकंठ अमृतभोजन घातले ते येथेच आणि ब्राह्मणी वर्चस्वाचा भिक्षुकी डोला उभारण्यासाठी छत्रपतीचा, व त्याबरोबरच हिंदवी स्वराज्याचा कंठ चरचरा चिरून ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांचा सूड उगविला तोहि येथेच.
ब्राह्मणांना चारलेल्या अमृताच्या मेजवान्यांचे पारणे अखेर हिंदवी स्वराज्याच्या खुनाच्या मुखशुद्धीत पार पडले. दैवाचा सतारा फिरला, रायगड डळमळला, छत्रपति हाल हाल होऊन मोगलांच्या छावणीत ठार मारला गेला; पण महाराष्ट्रातल्या खर्या राष्ट्रवीरांचा धीर सुटला नाही. त्यांनी लगबग करून कर्नाटकांत राजकारणी नाटक केले आणि स्वराज्याच्या अकल्पनीय पुनर्घटनेने मोगली मुत्सद्देगिरीला चारी मुंड्या चीत केले. सातार्याचे दैव उदयाला आले. पण पुन्हा देवाचा सतारा फिरला आणि ४ सप्टेंबर १८३९च्या मध्यरात्री बारा वाजता छत्रपति प्रतापसिंहाच्या हद्दपारीने सातार्याचे दैव फिरले आणि भिक्षुकांच्या देशद्रोहाला, धर्मद्रोहाला आणि राष्ट्रद्रोहाला हिंदवी स्वराज्याचा अखेरचा बळी पडला. ब्राह्मणांनी हिंदवी स्वराज्याचा खून केला.
यानंतर यशवंतराव शिर्के, भगवंतराव विठ्ठल चिटणीस आणि स्वराज्यवादी रंगो बापूजी इत्यादि अनेक पुरुषोत्तमांनी विलायतेची कायदेबाजी लढवून थकल्यावर, रंगो बापूजीने १८५७ साली सातार्याच्या फिरत्या दैवाचा सतारा पलटविण्यासाठी स्वराज्याच्या पुनर्घटनेचा अखेरचा मर्हाटशाही धडाडीचा यत्न केला. पण ऐन घटकेलाच पंत सचिवाच्या घरभेदाच्या टोपकरी चापांत तो सापडला आणि उत्तर हिंदुस्थानात रचलेल्या व्यूहात मर्दानी झांशीवाली देवी लक्ष्मी, धोंडोपंत नानासाहेब, तात्या टोपे प्रभृति वीरांना हकनाक राष्ट्रोद्धाराच्या यत्नयज्ञांत ठार मरावे लागले. केवळ स्वार्थासाठी राष्ट्रकार्याला आग लावण्याची ब्राह्मणी कारस्थानांची ही अखंड परंपरा पाहिली की विद्यमान राजकारणांत ब्राह्मणांच्या कासोट्याच्या आधाराने आत्मोद्धार साधू पाहणार्या माणसांना माणूस म्हणणारा माणूस एक माथेफिरू तरी असावा, किंवा अजागळ गद्धा तरी असावा.
भिक्षुकांच्या हातलावणीने आणि कावेबाज टोपकरांच्या मेहेरबानीने, भावाच्या गादीवर घरभेद्या आप्पासाहेब भोसले छत्रपति म्हणून १८ नवंबर १८३९ रोजी जरी बसला, तरी सातार्याच्या दैवाचा सतारा एकदा उलटा फिरला तो कायम. सातार्याचे स्वराज्य गेले, तेव्हाच तेथल्या भोसले घराण्याचे छत्रपतित्व मेले. या पुढचे छत्रपति म्हणजे इभ्राहीम करीमच्या हरण छापाच्या छत्र्या वापरणारे दत्तक जहागिरदार! यापेक्षा अधिक काय राहिले आहे? आजचा सातारा म्हणजे पूर्वीच्या स्वराज्यरूपी आत्मा वावरलेल्या देहाचे नुसते मढे आहे. स्वराज्याच्या आकांक्षा सातार्यात कधीच जळून खाक झाल्या आहेत. भिक्षुकी कारस्थानांच्या त्या पापभूमीवर स्वराज्याचे बीज मुळी जीवच धरणार नाही, इतकी तेथील जमीन ब्राह्मणी तंत्रयंत्रादि मंत्रांनी वांझोटी बनली आहे.
सातार्याच्या आसपास त्याच पूर्वीच्या टेकड्या आणि डोंगर आजहि आहेत. अजिंक्यतारा तोच आहे. राजवाडाहि जुनाच उभा आहे. त्यातच जुन्या माणसांचे नवे वंशज कसे तरी कोठे रहात आहेत. पर बाह्य दृष्टीला दिसणार्या या जड सृष्टीत आज कसले चैतन्य आहे? डोंगर टेकड्यांतून आज स्वराज्याचा पडसाद उमटत नाही. त्यांवरून वाहणार्या वार्यांत आज कसल्याहि स्फूर्तीचा संदेश नाही. अजिंक्यतारा म्हणजे दगड मातीचा एक डोंगर. कधी काळी मामलतदारांचा फास घेऊन एकटा फेरफटका करून येण्याच्या लायकीचे जुनाट टेकाड, राजवाड्यांत तर काय, कायदेबाजी आणि कज्जेदलालीचा व्यापार भरभक्कम चालूच आहे. समर्थांच्या त्या सज्जनगडावर अवघ्या दुर्जनांचा सुळसुळाट. कोठेहि पूर्वीच्या मर्हाटशाहीचा जिवंतपणा उरलेला नाही. खुद्द सातारा शहर सुद्धा उदास आणि ऐदी दिसते. ज्या शहरात अखिल महाराष्ट्राच्या राजकारणी व स्वयंनिर्णयी चैतन्याचा खून ब्राह्मणांनी पाडला, तेथे कसले तेज आणि कसली भरभराट? आज सातारा स्वराज्याकरितां प्रसिद्ध नाही. सातार्याची प्रसिद्धी म्हणजे सातारी पेढा व ब्राह्मणांचा वेढा ह्यात आहे.
(लेखाचा उर्वरित भाग पुढील अंकात)