ग्रहस्थिती : मंगळ मेष राशीत, रवि, शुक्र मिथुन राशीत, बुध कर्क राशीत, केतू कन्या राशीमध्ये, गुरू, हर्षल वृषभ राशीमध्ये, राहू, नेपच्युन मीन राशीत, प्लुटो मकर राशीमध्ये, शनि कुंभ राशीत. विशेष दिवस : ९ जुलै विनायकी चतुर्थी, ११ जुलै कुमारषष्ठी.
मेष : नोकरी, व्यवसायात आपलाच हेका चालवू नका. संयमाने काम पूर्ण करा, अतिउत्साह टाळा. सकारात्मक विचारांवर भर द्या. नव्या कल्पनांना आकार देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. व्यवसायात बुद्धिकौशल्याच्या जोरावर यश मिळेल. तरुणांसाठी चांगला काळ आहे, पण घाई गडबड धोकादायक ठरेल. नोकरदारांना समाधान मानावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी यशदायी काळ. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक बाजू गडबडेल, नियोजनपूर्वक निर्णय घ्या. संततीच्या वागण्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
वृषभ : नोकरीत कामाचे कौतुक होऊन उत्साह वाढेल. नव्या नोकरीच्या संधी स्वीकारताना काळजी घ्या. मित्रांचा सल्ला कामी येईल, पण विचार करूनच निर्णय घ्या. संततीच्या वागण्याबोलण्याकडे अधिक लक्ष द्या. व्यवसायात काही निर्णय घेताना अडचण येऊ शकते. पण भावनेत अडकू नका. मित्रांशी वागताना बोलताना काळजी घ्या. तरुणांच्या बाबतीत संधीचे सोने करण्याचे योग आहेत. काहींना धार्मिक कार्यासाठी वेळ द्यावा लागेल. भागीदारीत धीराने घ्या. मनासारख्या घटना घडतील.
मिथुन : नोकरी-व्यवसायात हुशारी कामी येईल. शिक्षणाच्या बाबतीत विचार करूनच पुढे जा. व्यवसायात यशासाठी झटावे लागेल. सार्वजनिक ठिकाणी वागताना बोलताना काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रात अति आत्मविश्वास टाळा. लेखक, कलाकारांना मानसन्मानाचे योग आहेत. नोकरीच्या निमित्ताने केलेल्या प्रवासाचा आरोग्यावर परिणाम होईल. नोकरीत चांगले अनुभव येतील, वरिष्ठ शाबासकी देतील. छंदामधून काहींना नव्या संकल्पना सुचतील. सरकारी क्षेत्रात अडकलेली कामे मार्गी लागतील. खेळाडूंना स्पर्धात्मक यश मिळेल.
कर्क : घरात आणि बाहेर लक्षपूर्वक काम करा. आत्मविश्वास ढळू देऊ नका. सार्वजनिक जीवनात, व्यवसायात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. घरात किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करा. मालमत्तेचे व्यवहार करताना काळजी घ्या. सोशल मीडियावर काळजी घ्या. शेअर, लॉटरीमधून चांगला लाभ होईल. मात्र, त्याचा अतिरेक नको. उच्चशिक्षणासाठी विदेशात प्रयत्न सुरू असतील तर ते मार्गी लागतील. लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. धार्मिक सहलीचे आयोजन होईल. नवीन ओळखीच्या व्यक्तीला माहिती देण्याचे टाळा.
सिंह : घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला कामी येईल. वादात पडू नका, मध्यस्थी टाळा. सर्वाधिक वेळ कुटुंबासाठी खर्च होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. तरुणांचा मौजमजेवर खर्च होईल. नोकरी-व्यवसायात कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. तरुणांना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. व्यवसायात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, पण थोडे नमते घेऊन पुढे चला. ध्यानधारणा, योगासाठी काही वेळ सत्कारणी लावा. आध्यात्मिक कार्य घडेल, दानधर्म देखील होईल. वाहन चालवताना घाई टाळा.
कन्या : छोट्या कामातून मानसिक समाधान मिळाल्याने कामातला उत्साह वाढेल. जुन्याबरोबरच नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. योग्य नियोजन करून पुढे चला. मित्रांच्या सल्ल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. मनासारख्या घटना घडतील. नोकरीत विरोधात वातावरण तयार होईल. काम करत राहा, त्यामुळे भविष्यात चांगला फायदा होईल. घरात वाद टाळा. ज्येष्ठांची आणि लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात अनोळखी व्यक्तीशी अधिकचे संभाषण नको. व्यवसायात विस्ताराच्या योजना लांबणीवर टाका. सरकारी कामे रेंगाळल्याने चिडचिड होईल.
तूळ : काम झाले नाही म्हणून नाराज होऊ नका, कशात गुंतून राहू नका. आध्यात्मिक कार्यामुळे मानसिक समाधान मिळेल. नोकरीत वरिष्ठांशी बोलताना काळजी घ्या. व्यवसायात कष्ट करावे लागतील. कामगारवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. प्रलोभनांपासून दूर राहा. मामाकडून चांगला लाभ मिळेल. कलाकार, संगीतकार, शेतकर्यांसाठी चांगला काळ. अचानक नवीन आव्हाने तरुणांसमोर येतील, पण त्यातून सहज मार्ग निघेल. महागडी वस्तू खरेदी करणे टाळा. मधुमेह, हृदयविकार असल्यास काळजी घ्यावी.
वृश्चिक : मनाचे आरोग्य व्यवस्थित ठेवा. नोकरीतील कामाचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. काम चोख पूर्ण करा. व्यवसायात नव्या कामाच्या संधी काळजीपूर्वक पुढे न्या. आर्थिक व्यवहारात घाई नको. शिक्षक, संशोधकांना यशदायक काळ. सार्वजनिक जीवनात वागणे-बोलणे व्यवस्थित ठेवा. कुटुंबासाठी अधिक खर्च करावा लागेल. नव्या वास्तूचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. मित्रमंडळींना आर्थिक मदत करावी लागेल. जुने येणे वसूल होईल. देवदर्शन व नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
धनु : कामाशी प्रामाणिक राहा. आपले विचार, मते इतरांवर लादू नका. तरुणांना ताणाच्या प्रसंगाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याचे गणित बिघडू देऊ नका. यशाने हुरळून जाऊ नका. व्यवसायात अपयशामुळे हतबल होऊन जाऊ नका. सामाजिक क्षेत्रात कामाचे कौतुक होईल. नवी गुंतवणूक करताना काळजी घ्या. कुटुंबात तणावाच्या प्रसंगांमुळे मानसिक स्वास्थ्य खराब होईल. नोकरीत काम से काम ठेवा. अधिकच्या बाता करू नका. प्रेम प्रकरणात मिठाचा खडा पडू देऊ नका. धार्मिक कार्यातून मानसिक समाधान मिळेल.
मकर : लेखक, पत्रकार, प्रकाशकांसाठी चांगला काळ. बँकेची कठीण कामे मार्गी लागतील. मित्रांशी जुने वाद उकरून काढू नका. नोकरीत बढतीचे योग आहेत. वरिष्ठ खूष राहतील. उच्चशिक्षणासाठीच्या प्रयत्नांना यश मिळेल. आयटी इंजीनियर, विमा एजंट, गुंतवणूक सल्लागार, औषध व्यवसायाशी निगडित मंडळींसाठी चांगला काळ. व्यवसायात संयम ठेवा. आर्थिक भुर्दंड बसू देऊ नका. नोकरीत सहकार्यांना विश्वासात घेऊन पुढे चला. गरजेइतकेच पैसे खर्च करा. पैशाचे नियोजन करा. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील. त्यांचा करियर घडवण्यासाठी चांगला फायदा होईल. आमदनी आणि खर्चाचा ताळमेळ साधा. व्यवसायात उत्साहवर्धक घटना घडतील. नोकरीनिमित्ताने विदेशात जाण्याची संधी चालून येईल. कुटुंबात किरकोळ मानापमानाकडे लक्ष देऊ नका. तरुणांचा उत्कर्ष घडेल. पावसाळा सुरू असल्यामुळे खाण्यापिण्याच्या पथ्यांवर कडक बंधने ठेवा. काहीजणांच्या नव्या ओळखी होतील, त्यातून चांगला लाभ मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ मिळेल, त्याचा योग्य विनियोग करा. मौज-मजेवर पैसे कमी खर्च करा.
मीन : आळस झटका आणि कामाला लागा. नोकरीत तुमचे मार्गदर्शन कामी येईल, पण अहंकार डोक्यात जाऊ देऊ नका. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. व्यवसायातील संधी पुढे नेताना नियोजन करा. घरात आनंददायक बातमी कानावर पडेल, छोटेखानी समारंभ होईल. मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. अचानक मित्र आर्थिक मदतीची याचना करतील, वेळ पाहून निर्णय घ्या. सामाजिक ठिकाणी कामाची वाहवा होईल. युवा वर्गाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी येईल. नोकरीच्या ठिकाणी अवघड काम मार्गी लावताना युक्ती श्रेष्ठ ठरेल, हे लक्षात ठेवा.