आणीबाणीमुळे स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून आज ढोंगी गळा काढणार्या भारतीय जनता पक्षाने गेली दहा वर्षे देशात अघोषित आणीबाणीच चालवली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्याला एक महत्त्वाचे कारण होते ते लोकनायक जयप्रकाश नारायण यांना पुढे करून सुरू असलेले देशात अराजक माजवण्याचे प्रयत्न. ते ज्यांनी केले त्यांनी आणीबाणीविरोधात रान उठवून देशाची सत्ताही मिळवली. मात्र, ती औटघटकेची ठरली. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि आपापसातल्या मतभेदांमुळे हे सरकार कोसळलं आणि जनतेने पुन्हा इंदिरा गांधींवरच विश्वास टाकला. या नव्या सत्ताकाळातही त्यांच्याभोवती किती विक्राळ समस्यांचा खवळलेला सागर उसळला होता, ते १९८० साली बाळासाहेबांनी रेखाटलेल्या मुखपृष्ठचित्रातून दिसून येत होतं. तेव्हा इंदिरा गांधी यांच्यापुढचा एक प्रस्ताव संसदीय लोकशाही बरखास्त करून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा होता. परंतु, संविधानावर विश्वास आणि लोकशाहीवर दृढ श्रद्धा असलेल्या इंदिराजींनी तो मार्ग पत्करला नाही… इथे त्यांचा चेहरा देशाबद्दलच्या काळजीने केवढा कोमेजलेला, सचिंत दिसतो आहे. त्यांच्या सगळ्या देहबोलीत हतबलता आहे, अवघड पेचात सापडल्याची भावना बाळासाहेबांनी रेषांमधून किती अचूक पकडली आहे… आज केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर संकटांची मालिकाच कोसळली आहे… पूल कोसळतायत, राममंदिर गळतंय, तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांमधले पेपर फुटतायत… पण, सत्ताधार्यांच्या चेहर्यावर आहे का काही चिंता? कमी झाली आहे का मग्रुरी? आहे का सामान्य माणसाशी काही देणंघेणं? इंदिरा गांधींच्या नावाने खडे फोडणार्यांना त्यांच्या नखाची तरी सर आहे का?