• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अनासक्ती अशीही, सांगे बालुशाही

- वैभव भाल्डे (सुग्रास)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 4, 2025
in खानपान
0

काल अनेक वर्षांनी जोशीकाका-काकूंकडे जाण्याचा योग आला. अनेक जुन्या आठवणी, गमतीजमती एखाद्या चलचित्रासारख्या नकळत डोळ्यापुढे तरळून गेल्या. भेटीने व गप्पांनी पोट भरलं तरी, काहीतरी खाल्ल्याशिवाय कसं जाऊ देईन तुला, असं म्हणत काकूंनी चिवडा व इडली चटणीबरोबर एक बालुशाही दिली. आठवणींचं आणखीन एक पान उलगडलं गेलं जणू त्यामुळे! लहानपणीच्या शाळेच्या वाटेवरच्या दोन्ही हलवायांच्या दुकानांमध्ये ही बालुशाही हमखास दिसायची, स्थानिक भाषेत खाजा म्हणायचे तिला! बाकी रंगीतसंगीत पण आकाराने आटोपशीर पदार्थांमध्ये हा साखरेच्या पांढर्‍या पाकाचे आवरण ल्यायलेला, तुलनेने मोठ्ठा पदार्थ फार लक्ष वेधायचा. फारशी आणली किंवा खाल्ली जायची नाही तेव्हा ही बालुशाही! मेदूवड्यासारखा मध्ये खड्डा असलेला हा चपटा गोल गरगरीत प्रकार नेमका सर्वप्रथम कधी व कुठे खाल्ला ते काही स्मरत नाहीये, मात्र तो आजतागायत मनापासून आवडतो, हे नक्की. आता पुण्याला तर पेढ्याच्या आकाराच्या लहान बालुशाहीसुद्धा मिळतात, एकदम मोठी खाल्ली जात नाही म्हणून काढलेला उपाय! उत्तर भारतात या पक्वान्नाचे फारच कौतुक आहे. साजुक तुपात तळलेली व साखरेच्या पाकात आकंठ बुडालेली ही मिठाई, जिभेवर ठेवताच विरघळली तरच खरी मजा!
मध्यंतरी ऑफिसमध्ये एका मित्राच्या बायकोने आम्हा सर्वांसाठी खूप हौसेनी बालुशाही बनवून पाठवल्या होत्या. माझ्या पाककलेच्या आवडीची कल्पना असल्याने त्याचबरोबर तिने एका चिठ्ठीवर बालुशाहीचे साहित्य आणि कृती पण लिहून पाठवलेली! एक वाटी मैद्यामध्ये चवीपुरते मीठ व पाव चमचा खायचा सोडा घालून, दोन चमचे गरम तुपाचे मोहन घालून मिश्रण घट्ट दह्यात भिजवायचे. अगदी कडकही नाही, पण फार सैलही नाही असा गोळा बनला की जरा वेळ मुरू द्यायचा. मग हाताने आकार देऊन बालुशाही साजुक तुपात मध्यम आचेवर तळून घ्यायची, गरम असतानाच साखरेच्या दोनतारी पाकात जरा वेळ बुडवून बाहेर काढून ठेवायची. पाकात आवडीनुसार केशर, वेलदोडे वगैरे घालता येतातच. तसेच तयार बालुशाहीला हव्या त्या सुक्यामेव्याने सजवताही येतेच. गार झालेल्या बालुशाहीवर बाहेरून जमलेल्या साखरेच्या पाकाचा पांढरट थर व त्याने येणारी चमक हीच तिची खासियत! सुयोग्य प्रमाणात पाकाचा गोडवा आत शिरू देणारी व अतिरिक्त साखरेला बाहेरच राहू देणारी ही बालुशाही, अनासक्तीचाच एक पाठ देते नाही का?
मिळतंय म्हणून ओरबाडून घेण्यापेक्षा, आवश्यक तेवढेच घेण्याचा एक आवश्यक संदेश देते ही मिठाई. कितीही गोड लागला तरी ऊस मुळासकट खाऊ नये हे तुकोबारायही सांगूनच गेलेत की. बरेचदा अतिहव्यासापायी साठवलेल्या गोष्टी उपयोगी ठरण्यापेक्षा त्रासदायकच ठरतात.
सूर्यास्तापर्यंत जेवढं धावाल तेवढी जमीन तुमची होईल असा फतवा निघाल्यावर जमिनीच्या अतिलोभापायी एकजण असाच ऊर फाटेपर्यंत धावतो, अखेरीस एवढा श्रमतो की प्राणच जातात त्याचे. जमीन मिळूनही तिचा उपभोग घ्यायला तोच राहात नाही. ते धावणं व श्रमणं सगळंच व्यर्थ ठरतं त्याचं! अनेकांना परिचित असलेली ही गोष्ट खरंच एक नवा दृष्टिकोन देते, नाही का?
किती व काय मिळवायचेय हे सीमित केले तरच मिळवलेल्या गोष्टीचा उपभोग घेता येतो आणि त्यासाठी केलेल्या कष्टांचे चीज होते. नुसतेच जमा करण्याच्या मागे लागलो तर त्या संचयाचे केवळ ओझे बनते व कालांतराने ते सगळेच व्यर्थ ठरते हे निश्चित! साचलेल्या पाण्याचे डबके बनते तर वाहत्या पाण्याचा निर्मळ प्रवाह!
आपल्या पूर्वसंचिंतामुळे व सत्कर्मांमुळे अनेकदा भरभरून मिळायला लागतात सर्वच गोष्टी, त्या सगळ्यांचा अनादर न करता सुयोग्य वापर जरूर करावा, पण घेता घेताच देणार्‍याचे हात घेऊन तो प्रवाह पुढे चालवावा. त्यातून कित्येकांना नकळत मिळणारी सकारात्मकता सर्वात जास्त लाभते ती आपल्यालाच.
साधनामार्गातही आपापल्या कुवतीनुसार लाभलेले ज्ञान वाटल्यानेच वाढते, स्वार्थी वृत्तीने केलेला अनाठायी अट्टाहास कधीच आपल्याला पुढे नेत नाही. अर्थात हे ज्ञानामृताचे वाटप अनुभवसिद्ध असले तरच ते अपेक्षित परिणाम साधते. केवळ शब्दपांडित्याने हवा तो सकारात्मक प्रभाव होऊ शकत नाही हेच खरे. म्हणूनच बालुशाहीच्या गोडव्यासारखेच ते ज्ञान आधी मनोमन अंगिकारून मग पुढे दिले किंवा बाकी बाबतीत जरूरीपुरते राखून अतिरिक्त गोष्टी इतरांना दिल्या की आसक्तीचा अंमल कमी होतो व पुढच्या वाटचालीचा मार्ग सुकर होतो हे नक्की.

Previous Post

माझेही खाद्यजीवन!

Next Post

हाय फाय दरोडेखोर!

Next Post

हाय फाय दरोडेखोर!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.