ऑफिसमधील माझ्या सगळ्या मुलाखती घेऊन संपलेल्या होत्या. काही उमेदवार वेळेत हजर राहिले नव्हते, त्यामुळे आपोआपच ते मुलाखतीतून बाद झालेले होते. उरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन मी दुपारचे जेवण करायला जाण्यासाठी बॅग उचलली. तेवढ्यात बाहेर गोंधळ ऐकायला आला. कसला गोंधळ आहे म्हणून बघण्यासाठी गेले तर एक बत्तीस तेहतीस वर्षांची स्त्री मोठमोठ्याने बोलत होती. कपाळावर मोठी टिकली, सावळा रंग, मोठे डोळे, लांबसडक केसांची भरपूर तेल लावून घातलेली वेणी, दोन्हीही हातभरून बांगड्या, पायाच्या बोटात जाड चांदीची जोडवी, भडक रंगाचा पंजाबी ड्रेस, मोठ्या काळ्या मण्यांचे जाड मंगळसूत्र असा वेष होता.
मला आता बाईंचा आवाज ऐकायला येऊ लागला होता, ‘सर, ऐका ना मी काय म्हणते. मी वेळेवरच निघाले होते. पण काय झाले की माझ्या जावेची मुलगी शाळेतून आली आणि रडायला लागली. तिला भूक लागलेली होती. माझ्या सासूबाई घरात होत्या. पण तुम्हाला तर ठाऊक आहे, या सासू वगैरे बायका काही करतात का? लहान मुलीला असं भुकेजलेले सोडून निघता आलं नाही हो मला. तिला खायला करून दिले आणि मग आले लगेच मुलाखतीला. म्हणून थोडासा उशीर झाला. छान तिखटाचा सांजा केला होता बघा. तुम्हीदेखील खाऊन बघा. अजून गरम आहे. आणलाय मी…’ असे म्हणून तिने डबा उघडला. पिशवीतून चमचा काढला आणि सरळ एकेक चमचा सांजा प्रत्येकाच्या हातावर प्रसादासारखा ठेवायला सुरुवात केली.
‘सावकाश खा बरं का, गरम आहे.’ असेही वर म्हणायला लागली.
बहुधा ती कोणाच्या तरी ओळखीची असेल म्हणून दुर्लक्ष करून मी आत जायला वळणार तेवढ्यात तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि उत्साहाने ती माझ्याकडे आली, ‘मॅडम, घ्या ना सांजा घ्या.’
ती जितक्या उत्साहाने म्हणाली त्यापेक्षा दुप्पट संथपणाने मी म्हणाले, ‘मला सांजा आवडत नाही आणि तुम्ही कोण आहात? कोणाच्या नातेवाईक आहात का?’
एखाद्या बोर्ड मीटिंगमध्ये समोरचा माणूस काय म्हणतो आहे याचा आपल्याला हवा तसाच अर्थ काढून पुढे बोलणार्या माणसाप्रमाणे त्या म्हणाल्या, ‘मॅडम, माझ्या हातचा सांजा खाऊन बघा. नंतर कधीही दुसर्याच्या हातचा सांजा खाण्याचे नाव काढणार नाहीत तुम्ही.’
बाईंनी ‘तुम्ही कोण’ या माझ्या दुसर्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केलेले होते.
तितक्यात पटकन चव्हाण पुढे आले आणि ते म्हणाले, ‘ओ बाई, तुम्ही सांजा वाटत फिरू नका. मुलाखत आता होणार नाहीये. तुम्ही घरी गेलात तरीही चालेल.’
मग माझ्याकडे बघून चव्हाण म्हणाले,
‘मॅडम, ही आनंदी. मुलाखतीसाठी आलीये.’
मी पुरती गोंधळले होते. मुलाखतीसाठी आली होती तर मग सांजा कुठून आला मध्येच? दु:खाचा किंवा आनंदाचा अभिनय करताना भारत भूषणच्या चेहर्यावर जे गोंधळलेले भाव असायचे तसेच माझ्या चेहर्यावर होते. ते चव्हाणांनी पुरते ओळखले. ‘मॅडम, ही आजच्या आपल्या सेल्स असिस्टंट पदासाठी मुलाखतीसाठी आलेली आहे. पण तिला यायला उशीर झाला आहे.’
मी काही म्हणायच्या आधी आनंदीने पुढची सूत्रं हातात घेतलेली होती, ‘ते काय झालं मॅडम,’ असे वाक्य टाकून मगाशी या लोकांना सांगितलेले कथानक पुन्हा दोन चार वाक्याची अॅकडिशन घेऊन तिने मला ऐकवले होते. ‘म्हटलं आता पुतणीसाठी सांजा करतेच आहे तर इथल्या सगळ्या लोकांसाठीसुद्धा आणावा,’ असे म्हणून सांज्याचा डबा पुन्हा एकदा तिने माझ्या पुढे धरला. आरसे-आरसे असलेल्या चक्रव्यूहात आपण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबतो तसे माझे झाले. पुन्हा सांजाच समोर आला. आपल्याला मुलाखतीला यायला उशीर झाला कारण आपण सांजा करत बसलो यात तिला काहीच गैर वाटत नव्हते. मला तिच्या निरागस भावाचे फार अप्रूप वाटले. या वयापर्यंत माणूस आपला निरागसपणा हरवून बसलेला असतो. आनंदी मात्र तशीच लहान राहिलेली होती. पण मुलाखतीची वेळ संपली होती त्यामुळे आमच्याकडे काहीही इलाज नव्हता. तिला आम्ही परत पाठवले.
आनंदीचे नशीब मात्र जोरदार होते. काही दिवसात सेल्स असिस्टंटच्या अजून काही जागा निघाल्या आणि खाल्ल्या सांज्याला जागून आमच्या ऑफिसच्या लोकांनी तिला पुन्हा मुलाखतीला बोलावले. यावेळी उशीर झाला तर मात्र पुन्हा ही संधी मिळणार नाही हे तिला सांगितले गेले होते. घडले वेगळेच. ती वेळेच्या जवळपास दोन तास आधी पोहोचली.
आता तर काय ऑफिसमधील सगळे कर्मचारी मागच्या जन्मापासून तिच्या ओळखीचे असल्यासारखे ती वागत होती. आल्या आल्या ती जाऊन सगळ्यांना भेटली. ‘आले किनई वेळेवर’ असे प्रत्येकाला म्हणत होती. हळूच बॅगेमधून डबा बाहेर काढला. माझेही आत लक्ष लागत नव्हते. मुलाखतीला वेळ होताच. मी बाहेर येऊन मॅडम काय करत आहेत ते बघत उभी राहिले. डब्यातून रव्याचे लाडू बाहेर निघाले. ती प्रत्येकाच्या हातावर एकेक रव्याचा लाडू ठेवू लागली. यातील कुठलीही कृती शांतपणे नव्हती. तिच्याकडे प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कथानक असते. तेनालीराम किंवा बिरबलाच्या कथांसारखे मला ‘आनंदी कथा’ असे एक वेगळे पुस्तकच लिहून काढावे असे बर्याचदा वाटते. तिला रव्याच्या लाडूंसाठी जाड रवा लागतो, मग तो बाजारातून आणलेला रवा बारीकच कसा होता त्यामुळे तिला त्याचे लाडू कसे करावेसे वाटले नाहीत. म्हणून मग तिने तो रवा दुकानदाराल्ाा सांगून कसा बदलून घेतला, अशी एक लांबलचक कथा होती. देवळातील कथेकरी बुवांची कथा ऐकावी तशाच भक्तिभावाने आमच्या कार्यालयातील सगळेच ‘रव्याच्या लाडवांची कथा’ ऐकत होते. प्रसाद म्हणून सुग्रास रव्याचे लाडू मिळालेच होते. नंतर बाईंनी माझ्याकडे होरा वळवला. ‘घ्या ना मॅडम.’ तिच्या कथेला घाबरून मी पटकन लाडू घेऊन टाकला.
‘आनंदी, पण लाडू खायला घातलास तरीही तुझी निवड होईलच असे काही नाही हा. तुझ्या मुलाखतीवर सगळे काही अवलंबून आहे,’ माझा मराठी स्पष्टवक्तेपणा जागा झाला होता.
‘हो मॅडम. मी चांगली तयारी करून आलेली आहे. बघाच तुम्ही,’ तिने अगदी आत्मविश्वासाने उत्तर दिले. पण तिचा हा आत्मविश्वास किती पोकळ आहे हे काही वेळातच मला समजले. त्या पदासाठी लागणारी पदवी सोडली तर तिच्याकडे काहीही नव्हते. अनुभव नाही, बोलण्याचे कौशल्य नाही. उलट वायफळ बडबडच जास्त होती. पण बाकीचे उमेदवार आनंदीपेक्षा कमी शिक्षण घेतलेले होते, शिवाय जेवढे उमेदवार हवे होते त्यात आनंदीचा नंबर लागलाच आणि आनंदी एकदाची माझ्या टीममध्ये आली.
आनंदी माझ्या टीममध्ये आली ही खरे तर अजिबातच आनंदाची बातमी नव्हती. तिला खूप प्रशिक्षणाची गरज होती. शिवाय एक विक्रेती म्हणून काय करायचे यापेक्षा काय करायचे नाही हे तिला जास्त समजावून सांगावे लागणार होते. प्रशिक्षणाच्या काळात माझे मन प्रचंड आशावादी होते. आनंदीला पुष्कळ बोलायची सवय आहे. फक्त ही बडबड कामासाठी वापरण्याचे तंत्र तिला अवगत करावे लागणार होते. पण आनंदी म्हणजे आनंदी आहे. हे प्रशिक्षण वगैरे दुसर्या कोणासाठी तरी आयोजित केले असावे अशा पद्धतीने ती तिथे उपस्थित असायची. रोज काहीतरी खाद्यपदार्थ आणायची. ते सगळीकडे वाटायची. तिला मी एकदा सांगितले देखील, ‘अगं आनंदी, तू ही असली नोकरी करण्यापेक्षा केटरिंगचा व्यवसाय कर. ते कितीतरी फायद्याचे असेल.’
हा सल्ला मी अत्यंत गांभीर्याने दिला असावा असे तिला का वाटले कुणास ठाऊक? तिने लगेच उत्तर दिले, ‘नाही हो मॅडम. काहीतरी काय! अन्न विकायचं हेच मला पटत नाही. आपण केलेले पदार्थ सगळ्यांना आवडतात हीच खरी प्राप्ती.’
आपण तिरकेपणाने बोललेले देखील तिला कळत नाही, कसे काम करणार ही? मला तिच्यापेक्षा माझीच काळजी जास्त वाटू लागली. अशा या बाईकडून मला टार्गेट पूर्ण करून घ्यायचे होते.
अत्यंत ढिसाळ काम. एखाद्या विक्रेत्याने थोडे नीटनेटके राहायला हवे या संकल्पनेला तिने संपूर्ण छेद दिलेला होता. जाईल तिथे एकतर बोलत तरी बसायचं किंवा खाद्यपदार्थ वाटत तरी सुटायचं, असे तिचे काम. गोड बोलून, कधी रागावून तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण माझ्यासमोर ती समजल्यासारखे मान्य करायची आणि नंतर मात्र ये रे माझ्या मागल्या होत असे.
टार्गेटची किती पूर्तता झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी एकदा आमचे संचालक ऑफिसमध्ये आले होते. आम्हाला तर ते भेटणारच होते पण आमच्या टीममधील लोकांची एकेक करून वैयक्तिक भेट घेणार होते. मला माझ्यापेक्षा जास्त आनंदीची काळजी वाटू लागली. तिचे टार्गेट किती आहे हे शंभर वेळा तिला समजावून सांगून देखील संचालकांसमोर तिला ते आठवेल याची मला खात्री वाटत नव्हती. जी कामे झालेली नसतील ती का झालेली नाहीत, ती कधीपर्यंत पूर्ण होतील याची मी तिच्याकडून उजळणी करून घेत होते.
संचालक आले. आम्हा सगळ्यांच्या कामांचा आढावा घेऊन झाला. माझ्या टीममधील एकेकाने त्यांच्याशी बोलायला जायला सुरुवात झाली. प्रत्येकजण बाहेर आल्यावर काय काय झाले याची एकमेकांकडे चौकशी करत होते. पण आनंदी जणू आमच्या विभागात नाहीच अशी वागत होती. अकाउंट्स विभागात जाऊन कोणाशी तरी ‘महाराष्ट्रात विकल्या जाणार्या बनारसी साड्या खर्या बनारसी कशा नसतात’ यावर तिची अत्यंत महत्वाची चर्चा चाललेली होती. तिची संचालकांकडे जायची वेळ आल्यावर तिला शोधून आणावे लागले. पिवळी धमक साडी, दोन्ही हातभरून हिरव्या बांगड्या, कानातील मोठे मोठे डूल असा सगळा जामानिमा होता. बहुधा संचालकांची भेट घ्यायची म्हणून नवीन साडी नेसून मॅडम आलेल्या असाव्यात. काही बोलण्याच्या आत तर ती संचालकांच्या केबिनमध्ये घुसलेली होती.
दहा मिनिटांत बाकीचे लोक आपापली चर्चा आटोपून बाहेर पडलेले होते. पण अर्धा तास झाला तरी आनंदी आली नाही. मला काळजी वाटू लागली होती. एकच चांगली गोष्ट अशी होती की कितीही रागावले तरीही आनंदी कधीही नाराज वगैरे होत नाही. शिवाय समोरच्या व्यक्तीच्या रागावण्याने समाधान व्हावे म्हणून ती अत्यंत गंभीर चेहरा करून ते सगळं ऐकते. त्यामुळे आपण म्हणतोय ते हिला समजते आणि पटते आहे अशी बोलणार्याची भावना होते. पण ही भावना किती व्यर्थ आहे हे काही क्षणातच समजते. एकदा तर तासभर प्रचंड कष्ट घेऊन मी तिला काम कसे उत्तम पद्धतीने करायचे हे समजावून सांगितले आणि नंतर तिला विचारले, ‘समजलं का काही?’
ती म्हणाली, ‘हो मॅडम, सगळं समजलं. तुम्ही फार काळजी करता हो. एक विचारू का?’
मी म्हटले, ‘विचार ना.’
आनंदी म्हणाली, ‘मॅडम तुमची रास मेष आहे का हो? कडक बोलणार्या सगळ्या लोकांची रास मेष असते.’
मथुरेमध्ये कंसाला मारून आल्यावर कृष्णाला जर कोणी विचारले असते की ‘कसा होता मामाचा गाव?’ तर त्याला जसे वाटले असते तसेच याक्षणी मला वाटले. रास विचारणारी ही आनंदी माझ्याच राशीला यायची होती का?
तर अशा या आनंदीला समजावून सांगून संचालकांकडे पाठवून देखील आनंदी अर्धा तास आत होती, याचा अर्थ एकतर तिला तिचे टार्गेट्स लक्षात तरी नव्हते किंवा तिने ते कसे पूर्ण करायचे आहेत हे तिला सांगता येत नव्हते. मला तिची काळजी वाटू लागली. संचालकांच्या ओरड्यापासून तिला वाचवायला हवे असे वाटू लागले. मी संचालकांच्या केबिनचा दरवाजा वाजवला आणि आत गेले. आतील दृश्य बघून हसावे की रडावे ते कळत नव्हते. आनंदी डबा उघडून बसलेली होती, डब्यातील भाजणीचे वडे संचालक खात होते आणि या वड्यांची भाजणी आनंदीने घरी कशी केली याची सुरस रम्य कथा आनंदी सरांना सांगत होती.
जिथे जाईल तिथे रमणे हा आनंदीचा स्वभाव आहे. आमच्या गाडीच्या विम्याच्या योजना विकायला जिथे जाईल तिथे ती गप्पा मारत बसायची. कामाविषयी बोलण्यासाठी ऑफिसमध्ये बोलावले की हमखास जेवणाच्या वेळी यायची. छान चार पुडाचा डबा समोर उघडायची. म्हणायची, ‘मॅडम तुमच्यासाठी भरलं वांगं करून आणलं आहे. जेवण करा, मग आहेच की काम.’ जेवता जेवता भरल्या वांग्यासाठी वांगी कशी निवडायची, कुठला मसाला टाकायचा, तो मसाला घरी कसा करायचा. आमच्या शहरात कुठल्या दुकानात चांगले मसाले मिळतात. तिचा भाजीवाला कसा ठरलेला आहे. अशा सगळ्या माहितीच्या कथा ऐकाव्या लागत. अध्येमध्ये घरच्या गप्पा मारायची. त्यावरून हे समजायचे की तिच्या घरचे काही सगळे चांगले चाललेले नव्हते. नवरा कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये उत्पादन विभागात होता. फार पगार असेल असे नव्हते. आनंदीला मूलबाळ नव्हते. सासू खूप बोलायची. दोष नवर्यात होता. पण घरी तसे काही सांगितलेले नव्हते. आनंदीला नोकरी लागल्यावर सासूने घरातून बाहेर काढले होते. ‘आता तुम्ही दोघेही कमावता तर तुमचे स्वत:चे घर भाड्याने घेऊ शकता’ या कारणाने दोघांना दुसरीकडे पाठवले होते. आनंदीचा उत्साह एवढा होता की रोज सकाळी डबा करून तो सासूकडे घेऊन जाई. जावेच्या मुलीला हिच्या हातचे पदार्थ आवडतात म्हणून घेऊन जाई. एकट्या मुलीसाठी कसे न्यायचे म्हणून सगळ्यांसाठीच डबा नेत असे. मला तर आनंदी वेडी वाटत होती. आजकालच्या जगात असे वागून कसे चालेल, असे कितीदा वाटत असे. पण आनंदी म्हणजे आनंदी आहे.
एकदा वटपौर्णिमेच्या दिवशी मला फोन केला, ‘मॅडम, मी ऑफिसला येणारच आहे. पण पूजा करून येणार आहे. तुम्हाला यायचे का माझ्याबरोबर पूजा करायला?’
मी नको म्हणाल्यावर नाराजीने परत म्हणाली, ‘पण मी ऑफिसमध्ये आल्याशिवाय जेवण करू नका मॅडम.’
म्हणजे त्या दिवशी आनंदी काहीतरी वेगळे खायला करून आणणार. नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये येता येताच खाद्यपदार्थ सगळ्यांना वाटत आली. आज चार पुडाचे दोन डबे होते. भजी, कुरडई, आमरस, पुरणपोळी, वरण, भात असा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक होता. गळ्यात चार पाच गरसोळी घातलेली, दोन्ही हात भरून बांगड्या, काठापदराची लालभडक साडी, कमीत कमी वीस पंचवीस बायकांनी हिला हळदी कुंकू लावलेले असावे इतके कपाळ भरलेले होते, डोळ्यातील काजळ डोळ्यातून बाहेर आल्याने सगळा चेहरा काळा झाला होता, वेणीला चार पाच गजरे आणि दोन गुलाबाची फुलं लावलेली होती, जे जे कोणी काहीही देईल ते सगळे घातलेच पाहिजे असा तिचा नियम होता. त्या दिवशी यम तिच्या नवर्याच्याच काय तिच्या ओळखीतील कोणाच्याही जवळपास फिरण्याची देखील हिंमत करू शकला नसता. असा सगळा वेष घेऊन बाई आमच्या विमा योजना विकायला जाणार होत्या. तिला घरी जाऊन कपडे बदलून यायला सांगितले. नको म्हणाली. सासू तिच्या घरी आलेली आहे. घरी गेले की ती किरकिर करते. त्या दिवशी तिने गप्पा मारण्याव्यतिरिक्त काहीही काम केले नाही.
तिची कित्येक टार्गेट्स आम्हीच पूर्ण करत असू. बाकीची टीम कित्येक हजारांचा बोनस घेत असताना आनंदी मात्र जेमतेम कोणाच्या तरी मदतीने टार्गेट पूर्ण करून पगार घेत असे. तिला पूर्ण पगार मिळावा ही जणू काही माझी आणि इतरांची जास्त गरज होती. खाण्याच्या आणि बोलण्याच्या व्यतिरिक्त ऑफिसची कामे करायची असतात याची तिला आठवण करून द्यावी लागे.
जितकी वर्षे आनंदी आमच्या कंपनीत नोकरीला होती तितकी वर्षे ती अशीच काम करत राहिली. तिच्यात अजिबात बदल झाला नाही. तिने बहुधा तिचे सगळे कप्पे बंद करून घेतलेले होते. एका विशिष्ट धाटणीचे जगणे तिने स्वीकारलेले होते आणि ती तसेच जगणार होती. खळखळत वाहणार्या नदीसारखी आहे ती. नुसते वाहत राहणे तिला ठाऊक आहे. तिला बांधून ठेवण्याचा प्रयत्न वृथाच होता.
एके दिवशी ती माझ्याकडे आली. त्या दिवशी चक्क खायला काहीही आणले नव्हते. बडबड एकदम बंद होती. मी तिला विचारले, ‘आनंदी, तब्येत ठीक आहे ना गं बाई?’ तर म्हणाली, ‘हो मॅडम. माझं एक काम आहे तुमच्याकडे.’
मी म्हटले, ‘बोल ना. हे बघ, सुट्टी वगैरे हवी असेल तर शक्य नाही. तुझ्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. टार्गेट एवढी शिल्लक आहेत.’
ती खिन्नपणे म्हणाली, ‘नाही मॅडम. सुट्टी कायमची हवी आहे. मला नोकरी सोडायची आहे.’
मला धक्का बसला होता. सगळं चांगलं चाललेलं असताना हिला नोकरी का सोडायची आहे? या नोकरीमुळे तिचं जरा तरी ठीक चाललेलं होतं. ती सोडली असती तर आर्थिक गणित एकदम बिघडलं असतं हे मला ठाऊक होतं. खरे तर तिने नोकरी सोडली तर मला तिच्या जागी दुसरा चांगले काम करणारा उमेदवार घेता आला असता. पण मला आनंदीबद्दल ममत्व होते. आहे त्या परिस्थितीत आनंद वाटत फिरणं तिनेच मला शिकवलं होतं.
तिच्या नोकरीमुळे ती शेफारली आहे असे म्हणून ती गेली बरीच वर्षे घरच्यांचे बोलणे खात होती. पण आता तिला असह्य झाले असावे. खरे तर नवर्याची ट्रीटमेंट चालू होती. तिला पैशांची गरज होती. पण तिने ऐकले नाही. राजीनामा दिलाच. मलाच खूप काळजी वाटत राहिली. अजूनही वाटते.
मध्ये चार पाच वर्षे गेली. मागच्या वर्षी मी दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. तर जोरजोरात हाक दिलेली ऐकायला आली, ‘मॅडम, मॅडम.’ ती हाक माझ्यासाठी असेल हे लक्षात आलेच नाही. पुन्हा हाक ऐकायला आली, ‘कुलकर्णी मॅडम.’
मी इकडे तिकडे बघितले. पण आजूबाजूला कोणी ओळखीचे नव्हते. ‘मॅडम, इकडे इकडे.’
तर रस्त्याच्या पलीकडे कोणीतरी होते. गर्दीत चेहरा दिसला नाही. हात उंच करून पुन्हा आवाज आला, ‘थांबा तिथेच. आले मी.’
रस्ता ओलांडताना बघितले तर आनंदी होती. समोर येऊन उभी राहिली, ‘मॅडम, कशा आहात?’
मी म्हटले, ‘कशी दिसते आहे?’
म्हणाली, ‘मॅडम, तुम्ही नेहमी छानच असता. मला छान जगण्याची प्रेरणा हवी असली की मी तुमची आठवण काढते.’ स्वत: अत्तर सांडत जाणारी आनंदी दुसर्यांच्या सुगंधावर भाळलेली होती.
‘तू कशी आहेस आनंदी?’
‘मॅडम, मी खूपच मजेत आहे. किती दिवसांनी भेटताय मॅडम? कितीतरी वर्षांनी खरे तर. तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे,’ असे म्हणून तिने गर्दीच्या पलीकडे हाक मारली, ‘अहो, इकडे या ना. कुलकर्णी मॅडम आहेत.’
बाजारातील प्रत्येक माणसाला मी कुलकर्णी मॅडम आहे हे समजले होते. आनंदी नोकरीत असताना मी तिच्या नवर्याला भेटले होते. रस्त्याच्या पलीकडून तिचा नवरा आला. कडेवर एक मुलगा होता आणि हाताला धरून एक मुलगी होती. माझा चेहर्यावर प्रश्नार्थक चिन्ह बघून आनंदी म्हणाली, ‘मॅडम ही माझीच जुळी आहेत. ही पृथ्वी आणि हा आकाश. अहोंची ट्रीटमेंट थांबवल्यावर अचानक देवाने दान पदरात टाकलं. नोकरी सोडल्यावर वर्षभरात हे दोघे जन्माला आले.’
आनंद तिच्या चेहर्यावरून ओसंडून वाहात होता. ‘मॅडम, आमच्या घरात एकही दिवस असा नसतो ज्या दिवशी तुमची आठवण निघत नाही. तुम्ही खूप सांभाळून घेतले आनंदीला,’ आनंदीचा नवरा म्हणाला. मी फक्त हसले.
‘जा तुम्ही या दोघांना घेऊन पुढे. मी आलेच,’ आनंदी त्यांना म्हणाली.
‘कशी आहेस आनंदी?’
‘मॅडम, अहो एवढी गोड लेकरं देवाने दिली आहेत मला. मी कशी असणार. एकदम मजेत.’
मला वेगळीच काळजी वाटत होती. न राहवून मी तिला विचारलेच, ‘आनंदी, अगं तुझी नोकरी नाही. त्यांची नोकरी अशी अस्थिर. कसे भागवता एवढ्या लोकांचे? अजून तर शिक्षण सुरूही नाही झाले मुलांचे. किती काही व्हायचे आहे.’
‘मॅडम. पैसे काय येतात. जातात. ज्याने चोच दिली तो चारा देईलच. शिवाय आता ह्यांनी दुसरी नोकरी धरली आहे. थोडी बरी आहे.’ पटकन तिला काहीतरी आठवलं, तिचे डोळे चमकले. तिने पिशवीत हात घालून डबा बाहेर काढला. उघडला. त्यात रव्याचा एक लाडू होता. मला म्हणाली, ‘आताच मैत्रिणीकडे गेले होते. तिच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून लाडू करून नेले होते. मुलांनी रस्त्यात काही मागितले तर म्हणून एक ठेवला होता. बघा मॅडम, तुमचं नशीब. तुमच्यासाठी राहिला तो लाडू.’
मी आनंदाने लाडू उचलला. कारण तो मी खाताना बघण्यातच तिचा आनंद होता. आणि नुसता लाडू खाण्याची मजा नव्हतीच, त्याबरोबर लाडवांची कथा ऐकायला मिळतच होती.
त्यानंतर कितीतरी वेळ ती नुसती बडबड करत होती. आणि मग ‘भेटू निवांत’ असे म्हणून निघून गेली.
पाठमोर्या आनंदीला मी बघत उभी राहिले. बारीक झाली होती. वयाच्या चाळिशीनंतर बाळंतपण झेपलं नव्हतं तिला. गबाळा ड्रेस. एका बाजूने एकदम वर आणि दुसर्या बाजूने एकदम खाली गेलेली तिची ओढणी मला तिच्या आयुष्यासारखी वाटली. अजिबातच समतोल नाही. मग तिने ती दुसर्या बाजूने मोठी झालेली ओढणी एका टोकाने हातात धरली. आनंदीने समतोल साधला होता.
मी काय म्हणते, तुम्हालासुद्धा आनंदात राहायचे असेल तर आमच्या आनंदीला एकदा भेटाच. आणि हो, तिच्याकडून आनंदी कसे राहायचे एवढेच शिका, तिची बडबड नको.