सुरुवातीला चहाची मोहिनी भारतीय समाजावर पडली नव्हती. परंतु साहेबाचे अनुकरण करणार्या भारतीयांनी साहेबांच्या चहापानाचंही अनुकरण केलं. घरगुती पन्हं, लिंबू सरबत मागे पडून चहापान हे भारतीयांच्या जगण्याचा भाग बनलं. भारतात चहाचा व्यवसाय १८३०च्या दशकात सुरू झाला.
– – –
खिडकीत बसून पाऊस बघताना घेतलेला चहा, चिंब भिजून टपरीवर घेतलेला चहा, वाट बघत घेतलेला चहा, भेट झाल्यावर घेतलेला चहा, डोक्याला ताप देणार्या मीटिंगनंतरचा चहा, रविवार सकाळचा चहा, रविवार संध्याकाळचा चहा… अबब!! चहा घेण्याच्या कारणांची यादी केली तर ती जगातील सगळ्यात मोठी यादी ठरेल आणि ती भली मोठी यादी वाचतानाही चहा हवाच, या अजून एका कारणाची त्यात भर पडेल. चहा पिण्याची अनेकानेक कारणं असतात हेच चहा व्यवसायाच्या यशाचं ओपन सिक्रेट आहे.
या फक्कड चहाची गोष्ट एका दंतकथेने सुरू झाली. चीनमध्ये इ.स.पूर्व २७३७च्या सुमारास, सम्राट शेनाँग प्रवासात उकळलेले पाणी वाटीतून पीत असताना जवळच्या झाडाची काही पाने त्याच्या पाण्यात पडली आली, ज्यामुळे पाण्याचा रंग आणि चव बदलली. सम्राटाने पेयाचा एक घोट घेतला. पानांमुळे बदललेली पाण्याची चव आणि शरीराला तजेलदार करणारे गुणधर्म पाहून तो आनंदाश्चर्यचकित झाला आणि त्या वाफाळलेल्या औषधी पेयाची सुरुवात झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. पुढे काही शतकांत चहा चीनमध्ये औषध म्हणून वापरला जाऊ लागला तरी तिथे चहाचे व्यावसायिक उत्पादन सांग राजवटीच्या काळात सुरू झाले. या काळात चहा परिपूर्ण जीवनशैलीसाठी उपयुक्त मानला जाऊ लागला. बौद्ध भिक्षूंच्या ध्यानधारणेत दीर्घकाळ बैठकीसाठी, जागरणासाठी चहाची महती वाढू लागली. पुढे तांग राजवटीत चहा-संस्कृती बहरली. व्यापारी मंडळींनी चहा चीनमधून कोरियात आणि जपानमध्ये पोहोचवला. जपानी लोकांनी तर चहाला ‘चानोयु’ या धार्मिक विधीत सामील केलं. पुढे १६व्या शतकात पोर्तुगीज आणि डच व्यापार्यांच्या माध्यमातून चहा चीनमधून युरोपमध्ये पोहोचला. सातासमुद्रापार प्रवास करून आणलेली चहाची पानं सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती, म्हणूनच युरोपमध्ये हे पेय प्रथमतः उच्चभ्रू वर्गामध्ये प्रसिद्ध झाले. १६६१मध्ये इंग्लंडच्या कॅथरीन ऑफ ब्रागांझा या पोर्तुगीज राजकन्येने सतराव्या शतकात इंग्लिश राजा चार्ल्स दुसर्याशी विवाह केला, त्यातच आपली मुंबई ब्रिटिशांना आंदण दिली गेली होती. या लग्नामुळेच खर्या अर्थाने चहा पोर्तुगालमधून इंग्लंडमध्ये आला.
कॅथरीनने इंग्लिश दरबारात चहापानाची परंपरा सुरू केली. राजघराण्याला देवत्व बहाल केलेल्या ब्रिटिशांनी चहाची परंपरा पुढे वाढवली. भारतात चहात दूध टाकून पिण्याची पद्धतही इंग्रजांकडूनच सुरू झाली.
इंग्लंडमध्ये चहाची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढत गेली तशी इंग्रजांनी चीनकडून मोठ्या प्रमाणावर चहाची आयात करायला सुरुवात केली. चीनने चहाच्या बदल्यात इतर काहीही नको फक्त चांदी द्या अशी अट घातली. ब्रिटिश तिजोरीवर याचा भार पडू लागला. चहाच्या किंमतीमुळेच ब्रिटिशांवर अमेरिकेसारख्या मोठ्या देशावर पाणी सोडण्याची वेळ आली होती. बंडखोर बोस्टन टी पार्टीसारखे प्रयोग इतर अंकित देशांमध्ये होऊ नयेत, यासाठी खबरदारी म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमध्ये गुपचूप अफू (ओपियम) विकायला सुरुवात करून अफूच्या बदल्यात चहा विकत घ्यायला सुरुवात केली. ब्रिटिशांच्या या खेळीमुळे, तोपर्यंत अफूचा औषधी वापरच करणारी चीनमधील जनता अफूच्या व्यसनाच्या आहारी गेली. या संकटातून देश वाचवण्यासाठी चीनने कडक पाऊले उचलली, नोव्हेंबर १८३९मध्ये ब्रिटन-चीन युद्धाला तोंड फुटले. या सागरी युद्धात ब्रिटिशांनी चीनला सहज हरवले. १८४२मध्ये झालेल्या नानकिंग तहात चीनने हाँगकाँग हे बेट आणि व्यापारातील मक्तेदारी गमावली.
चहाच्या बाबतीत चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इंग्रजांनी भारतात चहाचं उत्पादन सुरू करायचं ठरवलं. यासाठी ते ईशान्य भारतात चहा लागवडयोग्य जमिनींचा शोध घेत होते. १८२३ साली रॉबर्ट ब्रूस हे स्कॉटिश व्यापारी आसाममध्ये फिरत असताना येथील स्थानिक सिंगफो आदिवासी जमात चाम या झाडाची पाने उकळून एक प्रकारचं औषधी पेय तयार करते, असं त्यांना दिसलं. ब्रूस यांनी या झाडांचे काही नमुने गोळा करून कलकत्ता येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये पाठवले. ही झाडं चिनी चहासारख्याच कॅमेलिया सिनेन्सिस या प्रजातीची आहेत असं तिथे लक्षात आलं. हे झाड आपल्या भारतीय मातीतलंच होतं. या झाडांची लागवड सुरू झाली. १८३५मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने ‘आसाम टी’ या नावाने भारतीय चहाची निर्यात सुरू केली. आसाममधील हा चहा गडद रंग आणि कडक चवीसाठी ओळखला जातो. तो इंग्लिश ब्रेकफास्ट टीमध्ये मुख्यतः वापरला जातो. १८४८ साली ईस्ट इंडिया कंपनीने चहाच्या लागवडीचे, प्रक्रिया तंत्रज्ञानाचे आणि व्यापाराचे गुपित जाणून घेण्यासाठी स्कॉटलंडचा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट फॉर्च्यून याला गुप्तपणे चीनच्या अंतर्भागात पाठवले. फॉर्च्यून चिनी अधिकार्याचा वेश परिधान करून वांग या चिनी व्यक्तीच्या मदतीने एका चहा बनवणार्या कारखान्यात गेला. तिथे हंगामातील शेवटच्या पिकाची प्रक्रिया सुरू होती. चहाच्या पानांपासून चहाची पावडर बनवण्याची प्रक्रिया फारच गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये पानं कोरडी करणे, वाळवणं, गुंडाळणे आणि काळ्या चहासाठी आंबवणे यांचा समावेश होतो. उत्तम प्रतीची चहाची रोपं गोळा करणे, लागवडीची माहिती मिळवणे आणि अंतिम स्वरूपातला चहा कसा तयार होतो हे समजून घेणे ही कामगिरी फॉर्च्यूनवर सोपवली गेली होती. फॉर्च्यूनने पाहिले की चहासाठी पाने सुमारे एक-दोन तास उन्हात सुकवली जातात. त्यानंतर ती एका मोठ्या लोखंडी कढईसारख्या पात्रात कोळशाच्या भट्टीवर गरम केली जातात. उष्णतेमुळे ती मऊ होऊन त्यांचा रस बाहेर येतो. नंतर ही पाने बांबूच्या रोलर्सवर घासली जातात, अगदी पीठ मळल्यासारखी. हे करताना पानांतून तेल, रस बाहेर येतो. मग पुन्हा ती सुकवली जातात. हे सगळं झाल्यावर कामगार लांबच लांब टेबलांवर बसून चहा वर्गवारी करतात– उच्च प्रतीचा फ्लॉवरी पेको, मध्यम प्रतीचा काँगू आणि सर्वात खालच्या प्रतीचा डस्ट चहा. चहाच्या प्रक्रियेत प्रुशियन ब्लू (आयर्न फेरोसायनाईड) आणि जिप्सम (कॅल्शियम सल्फेट) हे रंग परदेशी बाजारात चहा आकर्षक दिसावा म्हणून वापरले जात होते. त्यांचे नमुने फॉर्च्यूनने कपड्यात लपवले आणि लंडनला पाठवले. पूर्वीच्या वनस्पतीशास्त्रज्ञांनी चहाच्या रंगांवरून हिरवा आणि काळा चहा अशा वेगवेगळ्या प्रजाती मानल्या होत्या. परंतु फॉर्च्यूनच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले की चहाच्या दिसण्यातील फरक प्रक्रिया पद्धतीमुळे होतो. पुढे ही वनस्पती कॅमेलिया सिनेन्सिस म्हणून वर्गीकृत झाली. १८५१मधील ‘ग्रेट एक्झिबिशन’मध्ये ब्रिटनने चहासाठी वापरलेल्या रंगांचे नमुने सर्वांसमोर मांडले आणि हजारो वर्षांपासून रहस्यमय पद्धतीने बनविल्या जाणार्या चहाचे गूढ उलगडले.
या रहस्यभेदानंतर ईस्ट इंडिया कंपनीने १८५०च्या दशकात चीनच्या युन्नान प्रांतातून मोठ्या प्रमाणावर चिनी कारागीर आणि चहाबिया आणून भारतातील दार्जिलिंग भागात चहा लागवड सुरू केली. प्रशिक्षित चिनी कारागिरांनी भारतीय मजुरांना चहा प्रक्रिया शिकवली. पुढच्या काही दशकांत दार्जिलिंगमध्ये जवळपास ४०पेक्षा जास्त चहा बागा उभारल्या गेल्या. या चहा उद्योगाने ब्रिटिश अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला. युरोपमधील चहाप्रेमींना आणि राजघराण्यांनाला देखील दार्जिलिंगचा सौम्य, सुगंधी चहा आवडला. हळूहळू दार्जिलिंग चहा जगात ‘शॅम्पेन ऑफ टी’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
सुरुवातीला चहाची मोहिनी भारतीय समाजावर पडली नव्हती. परंतु पेहराव, भाषा अशा अनेक बाबतीत साहेबाचे अनुकरण करणार्या भारतीयांनी साहेबांच्या चहापानाचंही अनुकरण केलं. घरगुती पन्हं, लिंबू सरबत मागे पडून चहापान हे भारतीयांच्या जगण्याचा भाग बनलं. भारतात चहाचा व्यवसाय खर्या अर्थाने १८३०च्या दशकात सुरू झाला. भारतात प्रामुख्याने दोन प्रकारचे चहा विकसित केले गेले, एक पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा ऑर्थोडॉक्स चहा. या सौम्य, सुगंधी चहाला परदेशात मोठी मागणी आहे. दुसर्या प्रकारचा चहा म्हणजे सीटीसी (क्रश, टियर, कर्ल) म्हणजेच सर्व भारतीयांच्या घरात तयार होणारा काळसर दाणेदार चहा. तो बनविण्यासाठी चहापानांवर प्रक्रिया करून त्यांचे लहान कण बनवले जातात.
भारतातून निर्यात होणार्या चहांमध्ये आजही ‘दार्जिलिंग टी’ आणि ‘आसाम टी’ला विशेष स्थान आहे. भारताने २०२३मध्ये सुमारे २४ कोटी ५० लाख किलो चहा निर्यात केला. यात सर्वाधिक निर्यात इराण, रशिया, संयुक्त अरब अमिराती, यूके आणि यूएसए या ठिकाणी झाली. चीनखालोखाल भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे.
चहाचा प्रवास लहानशा रोपातून फुटणार्या कोवळ्या पानांपासून सुरू होतो. ही पाने हाताने किंवा मशीनने तोडली जातात. चहाच्या झाडाला वर्षातून दोन वेळा नवी पालवी फुटते. ही पालवी म्हणजे रोपाच्या अग्रावरील कोवळी दोन पाने आणि मधलं एक इवलसं कळीसारखं पान. म्हणजे इंग्रजीत ‘टू लीव्ह्ज अँड अ बड.’ ही पालवी चहाच्या जगात सर्वोत्कृष्ट प्रतीची मानली जाते. भारतात चहाचे दोन मुख्य हंगाम (फ्लश) आहेत. पहिला हंगाम मार्च ते एप्रिल दरम्यान असतो. या काळातलं कोवळं, हलकं पान अत्यंत सुगंधी आणि सौम्य असतं. दार्जिलिंगचा फर्स्ट फ्लश चहा जगभरात प्रसिद्ध आहे. याची किंमतही सर्वाधिक असते. दुसरा हंगाम हा मे-जून दरम्यान येतो. यावेळच्या पानात अधिक घट्टपणा, रंग आणि चव असते. ते अधिक ‘ब्रिस्क’ किंवा ‘कडक’ चहा तयार करतं. यामुळे त्याची मागणी देशविदेशात मोठी असते. त्याखालोखाल मॉन्सून फ्लश (जुलै ते सप्टेंबर) आणि ऑटम फ्लश (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) असेही हंगाम येतात, परंतु त्या चहात पहिल्या दोन सीझनसारखा दर्जा नसतो.
कोणत्याही हंगामात खुडलेली पाने चहा कारखान्यात नेली जातात. तिथे वाळवणं (विल्टिंग), आंबवणे (फर्मेंटेशन), शुष्कीकरण (ड्रायिंग) आणि ग्रेडिंग अशा टप्प्यांमधून ती पाने चहा पावडरमध्ये रूपांतरित होतात. प्रत्येक ब्रँडच्या चहाची चव वेगळी असते, याचं कारण म्हणजे विविध बागांमधील चहाचे केलेले मिश्रण (ब्लेंडिंग). फर्स्ट फ्लश, सेकंड फ्लश, दार्जिलिंग आणि आसामचा कडक चहा एकत्र करून त्याचा एक विशिष्ट स्वाद, रंग दिला जातो. ग्राहकाची आवड आणि क्रयशक्ती लक्षात घेऊन प्रत्येक ब्रँडच्या चहाची नवीन चव निर्माण करणारा अवलिया म्हणजे चहा टेस्टर. हा माणूस रोज शेकडो कप चहा चवीनं, रंगानं, वासानं, घटकांनी तपासत असतो. प्रत्येक बॅचमध्ये काय बदल आहे, कोणता ब्लेंड ग्राहकांसाठी योग्य असेल, देशी की विदेशी चव यामध्ये फरक असावा हे सर्व तो इंद्रियानुभवातून ठरवतो. चहा टेस्टर हे चांगले करिअर आहे. आयआयपीएम बंगलोर, जोरहाट (आसाम) याठिकाणी ‘टी टेस्टिंग’चे विशेष अभ्यासक्रम चालवले जातात. हे तज्ज्ञ पुढे जाऊन टाटा टी, ब्रुक ब्रँड यांच्यासारख्या नामांकित चहा ब्रँडसाठी सिग्नेचर ब्लेंड तयार करतात.
फाइव्ह स्टार हॉटेल ते रस्त्यावरील टपरी इतक्या भिन्न आर्थिक गटांना हवाहवासा वाटणारा चहा हे फक्त एक पेय नसून ती एक संस्कृती आहे आणि काही देशांसाठी तर राष्ट्रीय अस्मितेचा भाग आहे. व्यापारी कंपन्यांनी या पेयाला एक स्टेटमेंट बनवलं. चहाच्या जगतातील सर्वात जुनी आणि आजही कार्यरत असलेली कंपनी म्हणजे इंग्लंडची ट्वायनिंग्ज. १७०६ साली थॉमस ट्वायनिंग यांनी लंडनमध्ये स्थापन केलेली पहिली टी रूम आजही चालू आहे आणि १७८७मध्ये तयार झालेला ट्वायनिंग्जचा लोगो आजही विनाबदल वापरला जाणारा जगातील सर्वात जुना ब्रँड लोगो आहे. या कंपनीने इंग्लंडमध्ये चहा ही एक प्रतिष्ठेची आणि रोजच्या जीवनातील अविभाज्य सवय बनवण्यास मदत केली. यानंतर फ्रान्समधील मारियाज फ्रेरेस (१८५४), इंग्लंडमधील ब्रूक बॉन्ड (१८६९) आणि लिप्टन (१८९०) यांसारख्या कंपन्यांनी चहा उत्पादन, व्यापार आणि पॅकेजिंगमध्ये क्रांती घडवून आणली. काही कंपन्यांनी हे पेय सुलभ, स्वस्त आणि कार्यक्षम वितरणाच्या जोरावर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. हेच ब्रँड्स पुढे भारत, श्रीलंका आणि आप्रिâकेसारख्या देशांत चहाशेतीच्या आणि उद्योगाच्या विस्ताराला कारणीभूत ठरले.
भारतात बनणारा चहा परदेशी कंपनीकडून विकत घेणार्या भारतीयांना पहिला अस्सल भारतीय चहा पाजला टाटांनी. टाटा टीची सुरुवात १९६३ साली स्कॉटलंडच्या फिनले ग्रुपसोबत संयुक्त भागीदारीतून झाली. सुरुवातीला टाटा फक्त आर्थिक गुंतवणूकदार होते. चहा उत्पादन, प्रक्रिया, वितरण यांचं नियंत्रण फिनलेकडे होतं. पण १९८४मध्ये फिनलेनं भारतातून गाशा गुंडाळला आणि चहाचे संपूर्ण नियंत्रण टाटा ग्रुपच्या हाती आलं. तेव्हा टाटांकडे ५३ चहा बागा होत्या. उत्पादनाच्या बाबतीत ते जागतिक आघाडीवर होते, परंतु चहाचे मार्केट सुटा चहा विकणार्या दलालांच्या ताब्यात होते. ते चहा लिलावात खरेदी करून आपापल्या ब्रँडनावाने विकून मोठा नफा कमावत. ही पद्धत बदलण्याचा विचार टाटा केमिकल्सचे एमडी दरबारी सेठ यांनी मांडला. ते म्हणाले, ‘तुमच्याकडे चहा आहे, पण ब्रँड नाही. खरा नफा चहाच्या बागेत नसून, तो चहाच्या बॅगेत आहे. हा विचार टाटांनी स्वीकारला. तोपर्यंत चहा बागेत तयार झाल्यानंतर ग्राहकापर्यंत पोहोचायला आठ महिने लागत. पण टाटांनी उत्पादन, प्रक्रिया आणि पॅकेजिंग सगळं ताब्यात घेऊन चहाची पाने तोडल्यापासून फक्त १६ दिवसांत ग्राहकाला चहा पोहोचवण्याची व्यवस्था उभी केली. याशिवाय वेगवेगळ्या बागांमधून चहा गोळा करून ब्लेंड न करता टाटांनी चहा ‘नॉन-ब्लेंडेड’ ठेवला, त्यामुळे चहाचा कडकपणा आणि सुगंधही टिकून राहिला. पॅकेजिंगमध्ये ‘फ्लेक्सिबल पॉलिपॅक’ ही नवी संकल्पना आणली. त्या काळात ती मोठी क्रांती होती. पॉलिथिन पॅकेटमध्ये चहा ताजा राहात होता. टाटा टीने इतर ब्रँडेड कंपन्यांपेक्षा किंचित स्वस्त आणि स्थानिक अनब्रँडेड कंपन्यांपेक्षा किंचित महाग असा संतुलित दर ठेवला. त्यामुळे ग्राहकाला गुणवत्ता, टाटा नावाचा विश्वास आणि योग्य किंमत सगळं एकत्र मिळालं. भारताच्या विविध राज्यांमध्ये चहा पिण्याची शैली, चव आणि किंमतीचं भान वेगवेगळं आहे. हे लक्षात घेऊन टाटांनी ‘एक ब्रँड सर्वांसाठी’ हा मार्ग सोडून कमी उत्पन्नगटासाठी ‘टाटा अग्नि’, उच्च उत्पन्नगटासाठी ‘टाटा टी गोल्ड’, हॉटेल उद्योजकांसाठी ‘टाटा टी डस्ट’, बिहारसाठी जाड पानांचा ‘दानापूर लीफ’, तर मध्यमवर्गीयांसाठी ‘टाटा टी प्रीमियम’ असं वर्गीकरण केलं. टेटली हा त्या काळातील जगातला दुसर्या क्रमांकाचा चहा ब्रँड. २००० साली टाटांनी हा ब्रिटिश ब्रँड रु. १९०० कोटींना खरेदी केला. ज्यांनी आपल्याला चहा प्यायला शिकवलं त्या ब्रिटिशांची कंपनी विकत घेऊन टाटांनी एक वर्तुळ पूर्ण केलं.
१९९१च्या उदारीकरणानंतर मार्केट खुलं झालं आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्स भारतात आले. टाटांप्रमाणेच भारतीय ग्राहकांच्या मनात खोलवर रुजलेला दुसरा मोठा ब्रँड म्हणजे ब्रूक बॉन्ड, १८६९मध्ये इंग्लंडमध्ये स्थापना झालेल्या ‘ब्रूक बॉन्ड’चा रेड लेबल’ चहा भारतात घराघरात पोहोचलेला असून त्याचा ‘स्वाद अपनेपन का’ हा भावनिक संदेश आजही लोकांना जोडून ठेवतो. पुढे हे ब्रँड हिंदुस्थान युनिलिव्हरकडे गेल्यानंतर ‘ताज महल’, ‘ताजा’ यांसारख्या उप-ब्रँड्ससह त्यांनी उत्पादन अधिक विस्तारलं.
स्थानिक ब्रँड्समध्ये उल्लेखनीय आहे वाघ बकरी चहा, ज्याची सुरुवात १९१५मध्ये नारायण देसाई यांनी अहमदाबादमधून केली. आज हा चहा देशभरात आणि मिडल ईस्टसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारातही लोकप्रिय आहे. ‘एक कप वाघ बकरी चहा आणि अनेक आठवणी’ अशी भावनिक साद ते जाहिरातीतून घालतात. अशा नात्याचं दुसरं उदाहरणं म्हणजे सोसायटी टी, जो मुंबईतल्या मराठी, गुजराती आणि पारसी चहाप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे. कटिंग कडक चहासाठीचा गडदपणा आणि स्थानिक चव यामुळे या ब्रँडने खास जागा निर्माण केली आहे.
चहा आता स्वादापुरता मर्यादित राहिलेला नाही, लोकांना त्यात खास अनुभव, आरोग्यदायी गुणधर्मही हवे असतात. त्यामुळे टेटली, टाटा टी यांसारख्या कंपन्यांनी वेळोवेळी नैसर्गिक स्वाद, सुगंधी मिश्रण, पॅकेजिंग आणि आरोग्यविषयक फॉर्म्युलेशन्स तयार केली आहेत. ग्रीन टी, हर्बल फ्यूजन, डीटॉक्स टी अशा उत्पादनांच्या माध्यमातून चहा कंपन्या नव्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. एखाद्या लहानशा गोष्टीचं ब्रँडमध्ये रूपांतर होण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती जाहिरात. पण, चहाची जाहिरात करताना अनेक मर्यादा पडतात. टीव्हीवर, रस्त्यावरील फलकावर, बॉक्स पॅकिंगवर प्रत्येक चहा ब्रँड लाल रंगाचा अतिरेक करताना दिसतो. ज्यामुळे किराणा दुकानात सर्व चहाचे ब्रँड्स एकसारखे दिसतात. त्याचप्रमाणे, ‘ताजेपणाचा घोट’, ‘सकाळची सुरुवात’, ‘विश्वासाचं नाव’ यासारखी साचेबद्ध वाक्यंही आता ग्राहकांच्या मनावर परिणाम करत नाहीत. त्यामुळे आता चहाच्या अनुभवाला नव्या भाषेत मांडण्याची वेळ आली आहे. स्थानिक बोली, विशेष चव, वास्तवाचा स्पर्श आणि नव्या पिढीच्या दृष्टिकोनातून सादरीकरण करायला हवं.
भारतात चहा हे फक्त पेय नाही, भावनांचा, सवयी आणि सांस्कृतिक ओळखीचाही भाग आहे. आज भारतातील चहा उद्योगाचा एकूण व्याप ११,७०० कोटी रुपयांहून अधिक आहे. यामध्ये ५०टक्के हिस्सा किरकोळ विक्रीचा आहे आणि १५टक्केपेक्षा जास्त चहा परदेशात निर्यात केला जातो. आसाम हे राज्य सर्वाधिक चहा उत्पादन करतं. त्यानंतर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ यांचा क्रम लागतो. सर्वाधिक चहा पिणार्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात आघाडीवर आहेत.
हॉटेल्स आणि चहा दुकानांमध्ये डस्ट टी म्हणजेच भुकटी चहा सर्वाधिक वापरला जातो. कारण तो जलद तयार होतो, अधिक तीव्र चव देतो, शिवाय खर्चाच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरतो. डस्ट टी हा चहा उत्पादन प्रक्रियेतला बारीक भुसा असतो. चहा वेचण्यानंतर पाने वाळवताना, रोलिंग करताना आणि वर्गवारी करताना जे बारीक तुकडे व धूळ तयार होते, त्यातून डस्ट टी हा सर्वात स्वस्त चहाप्रकार बनतो. या नैसर्गिक बायप्रॉडक्टच्या किमती पूर्ण पानाच्या चहाच्या (लीफ टी) तुलनेत ३०टक्के ते ५०टक्केपर्यंत स्वस्त असतात. डस्ट टीचे अतिसूक्ष्म कण गरम पाण्यात झपाट्याने विरघळतात, त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होते. ज्या ग्राहकांना स्ट्राँग चहा आवडतो ते ग्राहक या चहाला विशेष पसंती देतात.
खरे चहाबाज मात्र भेटतात मोकळ्या हवेतील टपरीवर. तिथला ‘कटिंग’ चहा म्हणजे दोन घोटात ऊर्जा आणि स्वर्गसुख देणारा देणारा साथीदार. अगदी बिल गेट्ससारख्या अब्जाधीशालाही कटिंग चहा प्यावासा वाटला, यातच त्याची खासियत कळते. कामाची मीटिंग असो वा ऑफिस संपल्यावर मित्रांसोबत टाकलेल्या गप्पा असोत; रस्त्याच्या आडोशाला उभ्या असलेल्या टपरीवर मिळणारा आठदहा रुपयांचा कटिंग चहा सोबत असला की आयुष्याला बहार येते. मात्र टपरीवर मिळणार्या चहाच्या बाबतीत स्वच्छतेचा अभाव हा मोठा प्रॉब्लेम असतो. एकाच बादलीतील पाण्यात सगळ्यांनी वापरलेले चहाचे काचेचे ग्लास बुचकळून काढणं, ही इथली सफाईची कल्पना असते. तरीही लोक तिथेच चहा पितात, कारण पर्याय नाही. याला महाराष्ट्रभर पर्याय निर्माण केला येवले चहावाल्यांनी. पुण्यातल्या अमृततुल्य या नावाने लोकप्रिय असलेल्या चहादुकानांची ही ब्रँडेड दुकानसाखळी. त्यांनी चहाचा दर (१० रुपये) टपरीएवढाच ठेवला, पण स्वच्छता राखली. हा चहा वाहत्या पाण्यात धुतलेल्या स्वच्छ कपात मिळतो. चहाची चव सगळ्या दुकानांमध्ये एकसारखी असते. पारंपरिक व्यवसाय नव्या पद्धतीने सादर करून यश कमावण्याचं हे उत्तम उदाहरण ठरलं. बघता बघता मुंबईतील रेल्वे स्टेशनांपासून राज्यातील अनेक एसटी स्थानकांसमोर आणि गर्दीच्या ठिकाणी येवले चहाच्या फ्रँचायजी सुरू झाल्या. त्यांच्या यशातून प्रेमाचा चहा, पंढरपुरी चहा, रॉयल चहा अशा नावांच्या दुकानसाखळ्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. मात्र अनेक ठिकाणी गरज, जागा आणि ग्राहकसंख्येचा अभ्यास न करता दुकानं उघडल्याने अनेकांना फार काळ टिकता आलं नाही.
चहा व्यवसायात एका कपमागे सरासरी ४ ते ६ रुपये खर्च होतो आणि विक्री किंमत १० रुपये किंवा त्याहून अधिक असते. त्यामुळे प्रमाणशीर विक्री झाल्यास चांगला नफा मिळू शकतो. परंतु अधिक नफा मिळवण्याच्या नादात दर्जा, चव आणि स्वच्छतेशी तडजोड केली तर ग्राहक पाठ फिरवतो. शिवाय मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळेही अनेक दुकानांचा व्यवसाय ठप्प झाला. या मॉडेलमध्ये ग्लासभर चहाऐवजी इवल्याशा, जाड कपात घोटभरच चहा मिळतो हे ग्राहकांच्या लक्षात आलं आणि काही ग्राहक पुन्हा टपरीकडे वळले. अर्थात चहा टपरीवालेही आता स्वच्छतेबाबत जागरुक होऊन कागदी कप वापरू लागले आहेत.
चहा आता तंत्रज्ञान, मार्केटिंग, ब्रँडिंग आणि नव्या ग्राहकवर्गाच्या गरजांनुसार सतत बदलतो आहे. दार्जिलिंग किंवा आसामसारख्या पारंपरिक ठिकाणांबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू या राज्यांमध्येही आता विशेष दर्जाच्या चहांची निर्मिती सुरू झाली आहे. ग्रीन टी, व्हाईट टी, ऑरगॅनिक टी, फ्लेवर्ड टी, हर्बल इन्फ्युजन यांची मागणी वेगाने वाढते आहे. ग्राहकांनाही आता पॅकेजिंग, आरोग्यविषयक फायदे, सस्टेनेबल प्रॉडक्शन अशा गोष्टींचीही माहिती हवी असते. चहा उत्पादकांनीही अधिक गुंतवणूक करून उत्पादनाच्या गुणवत्तेवर आणि ग्राहक अनुभवावर भर द्यायला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, पूर्वी सुटा चहा विकणार्या अनेक कंपन्यांनी आता टेट्रा पॅक, टी बॅग, सिंगल-सर्व्हिंग सॅशे, ग्लास बॉटल्समध्ये ‘आइस टी’ अशा नावीन्यपूर्ण स्वरूपांत प्रवेश केला आहे. सीसीडी आणि स्टारबक्सचा आदर्श घेऊन प्रीमियम आणि फ्लेवर्ड चहा विकणारे चायोज, टी ट्रेल्स, चाय पॉइंट यांसारखे नव्या पिढीचे आधुनिक टी लाऊंज शहरांत वेगाने लोकप्रिय होत आहेत. भारतातील चहा उद्योग आता हर्बल ब्लेंड्सपर्यंत विस्तारलेला दिसतो.
भारतात तब्बल ९० टक्के लोकसंख्या रोज किमान एकदा तरी चहा पिते. इतक्या मोठ्या उद्योगात काही स्पष्ट ट्रेंड दिसून येतात. एक म्हणजे ‘फंक्शनल टी’ – म्हणजे पचनास मदत करणारा चहा, स्लीप टी, स्ट्रेस रिलीफ टी अशा प्रकारांच्या मागणीत मोठी वाढ होईल. त्याचबरोबर ऑरगॅनिक आणि सस्टेनेबल शेतीवर आधारित चहाचीही विक्री वाढेल. तिसरा महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे डिजिटल विक्री – म्हणजेच ई-कॉमर्स आणि डीटूसी म्हणजे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार्या ब्रँड्सचा उदय. टी बॉक्स, टी सेन्स ही त्याची उदाहरणं. मराठी तरुणांना या व्यवसायात अनेक संधी उपलब्ध आहेत. एका बाजूला पारंपरिक चहा दुकान सुरू करता येतं. यासाठी फार मोठी गुंतवणूक लागत नाही. पण जागेचा नीट विचार, ग्राहक समजून घेणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. दुसरीकडे, सुटा चहा खरेदी करून त्याचं पॅकिंग, ब्रँडिंग करून विक्री करता येईल. पण या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमच्या चहामध्ये काही वेगळेपणा असणं गरजेचं आहे. एखाद्या विशिष्ट सुगंध किंवा स्थानिक मसाल्याच्या वापराने काही ब्रँड्स ‘वेगळे’ वाटतात आणि ते त्यांचं आकर्षण ठरतं. सचोटी आणि ग्राहकाभिमुख दृष्टी ठेवल्यास या क्षेत्रात कोणताही तरुण मोठं यश मिळवू शकतो आणि एका कप चहातूनही आपलं जग निर्माण करू शकतो.