• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

इतिहासाचा वेगळा दृष्टिकोन

- सचिन परब (प्रबोधन-१००)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 3, 2025
in प्रबोधन १००
0

प्रबोधनकारांचं हिंदू जनांचा र्‍हास आणि अध:पात हे पुस्तक अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. त्यातल्या इतिहासाची एक झलक आपण गेल्या आठवड्यातल्या भागात पाहिलीच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा असा बौद्ध धर्माच्या उदयानंतरचा काळ या पुस्तकात मांडला आहे. त्याचा हा संपादित भाग.
– – –

महाभारतीय युद्धकाळ आणि बौद्ध धर्माचा उदयकाळ यांमधील कित्येक शतकांचा जो अवधि गेला, त्याला कृष्णयुग अथवा अंधाराचा काळ हेंच नांव देणें योग्य होईल. ज्या अनेक संस्थांनी आमच्या सामाजिक जीवन-नियंत्रणाला भलभलतीं वळणें लावलीं, त्यांचा प्रादुर्भाव या कृष्णयुगांतच झाला. याच युगांत स्त्रिया आणि शूद्र यांच्या हक्कांवर व जीवनावर गदा पडली. ब्राम्हणांच्या भिक्षुकी सत्तेचा पारा बेसुमार वाढला, कडक जातीभेद निर्माण झाला. स्त्रीस्वातंत्र्याला प्रतिबंध पडला आणि शूद्रांना शुद्ध गुलामगिरीचें दास्य मिळाले, ते याच कृष्णयुगांत. बौद्ध धर्माचा उदय म्हणजे सर्व बाजूंनीं हिंदुस्थानच्या सुवर्णयुगाची मंगल प्रभातच म्हटली पाहिजे. या युगानें स्त्रियांना स्वातंत्र्य दिले आणि जातीभेदाच्या पिळून निघालेल्या शूद्रांचा सर्वतोपरी उद्धार केला.
त्या काळच्या समाजघटनेने ब्राम्हणांना जें एक अत्युच्च महत्त्वाचें स्थान दिलें, त्याचा त्यांनी स्वजाति-वर्चस्वासाठीं भरपूर फायदा घेतला. ब्राम्हणेतरांकडून हव्या त्या निमित्तानें हवी तीं घबाडें लाटण्यांत त्यांनी दरोडेखोरांच्याहि वर ताण केली म्हटलें तरी चालेल. ब्राम्हण म्हणजे धर्मज्ञाते! पण त्यांनी खर्‍या धर्माचें ज्ञान बाजूला ठेवून, लोकांची अंधश्रद्धा ज्या गोष्टीनीं वाढेल, असल्या भोळसट व खुळचट तत्त्वांचा सर्रास प्रसार करून, आपल्या `भूदेव`पणाची उच्च मानाची टिक्की कायम राखून ठेवली. धर्माच्या बाबतीत बरें वाईट ठरविण्याचा किंवा प्रत्यक्ष आचरणाचा अधिकार क्षत्रिय वैश्यांनाहि होता. पण या भटांनीं त्यांच्या शिक्षणांत आणि ज्ञानप्राप्तीच्या मार्गांतच असा गोंधळ करून ठेवला की त्यांना मिळणारे शिक्षण म्हणजे भोळसटपण वाढविणार्‍या अंधश्रद्धेच्या धार्मिक दंभाचें आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची वाढ खुंटवून, त्यांना नेहमी भटांच्या दरार्‍यांत आणि गुलामगिरीत डांबून ठेवणारें असेंच करून ठेवलें.
बौद्ध धर्मानें हिंदुस्थानाला अधर्माच्या कुमार्गावर ढकलून दिलें, या वैष्णवांच्या खोडसाळ आरोपांत काडीइतकेंहि सत्य नाही. हिंदुस्थानच्या अध:पाताच्या दोषाचें खापरच जर कोणाच्या टाळक्यांत फोडायचें असेल, तर तें वास्तविक न्यायानें भिक्षु ब्राम्हणांच्याच होय. आपलें पाप दुसर्‍याच्या पदरीं बांधण्याची भटांची फार जुनीच खोड आहे. शिवाय, बौद्धधर्मावर भटांनी केलेले आरोप एकतर्फी आणि बौद्धधर्म हिंदुस्थान सोडून परागंदा झाल्यानंतर अनेक शतकांनी केलेले असल्यामुळें, त्यांना कवढीचीहि किंमत नाही.
उदारमनस्क बौद्ध धर्माची, त्याच्या जन्मभूमींतच, जी वाताहात व हद्दपारी झाली, तिचा हिंदु जनांच्या र्‍हासाशी आणि अध:पाताशी बराच कार्यकारण भावाचा संबंध आहे. यांत मुळींच संशय नाही. माझें तर असे स्पष्ट मत आहे की हिंदुस्थानांतून बौद्ध धर्माची हद्दपारी झाल्यामुळेच हिंदु समाजाचा सर्वतोपरी अध:पात झाला. कारण, भटांभिक्षुकांच्या धार्मिक झब्बूशाहीच्या पचनीं पडल्यामुळे हिंदु समाजाला एकराष्ट्रीयत्वाची घटना करता आली नाहीं. एकराष्ट्रीयत्वाची त्यांची भावनाच ठार मेली, आणि परचक्रांपासून देशाचें संरक्षण करण्यासाठीं ऐक्य भावनेची जी पोलादी तटबंदी लागते, ती भावनाच मुळी त्यांना पारखी होऊन बसली. कसाहि आणि कितीहि विचार करा, एक गोष्ट स्पष्ट सिद्ध होते कीं या हिंदु राष्ट्राची मान जर कोणी कापली असेल तर ती भटांब्राम्हणांच्या भिक्षुकशाहीनेंच होय. या शाहीचें जसजसें पृथ:करण करावें, तसजसें प्रत्ययानें हेंच म्हणावें लागतें कीं राष्ट्राचा घात करण्यापेक्षा अधिक कसलाहि गुण या भिक्षुकशाहीत नाहीं; आणि जोंपर्यंत तिचा धिंगाणा चालूं आहे, तोंपर्यंत हिंदुंच्या पदरी राष्ट्रघातापेक्षा निराळें कांहींच फळ पडणें शक्य नाहीं.
पण खरें म्हटलें तर बौद्धधर्म म्हणजे प्राचीन हिंदु-भारतांत भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडविणारा बोलशेविक बाँम्बगोळाच होता. यामुळेंच भिक्षुकशाही बौद्धधर्मावर वारंवार उखडते. एवढ्यासाठींच सनातन वर्णाश्रम धर्माच्या काटेकोर सोंवळ्या कुंपणाचा बागुलबोवा भटेंभिक्षुकें वारंवार दाखवित असतात. बौद्धधर्माच्या उदार छत्राखाली जे निरनिराळे आश्रम व संघ निर्माण झाले, त्यांत लोकांनीं प्रवेश करून, भिक्षुकशाहीचा पांजरपोळ सताड रिकामा टाकू नये, म्हणून भटांनी या इतक्या बंधनांची खबरदारी घेतलेली होती, हें सांगायला नकोच.
अर्थात् भिक्षुकशाहीनें बौद्धांविरुद्ध निकराचा हल्ला चढविला. हा हल्ला केवळ तात्त्विक क्षेत्रांतला नसून, बौद्धांना चिरडण्याच्या कामीं ब्राम्हणांनी सांपडेल त्या संधीचा फायदा घेतला आणि अखेर शस्त्रांनाहि हात घालून, रक्तपाताची पुण्याई कमावली. दोनहि पक्ष वर्दळीवर आलेले. कोणीहि माघार घेई ना. अशा अवस्थेंत हें ब्राम्हण-बौद्ध युद्ध भयंकर रीतींने अनेक शतकें एकसारखे चालूं होतें. या उद्विग्न इतिहासाच्या काळांत सारा देश मानवी रक्तांत न्हाऊन निघाला. मनुष्यांची बेसुमार कत्तल झाली. छळ आणि अत्याचारांचा तर कडेलोट झाला. जिकडे पहाल तिकडे मत्सर, हेवा, निंदा, द्वेष, खुनशीपणा यांचा सुळसुळाट जगाच्या इतिहासांत धार्मिक मतमतांतरांचे पुष्कळ रक्तपाती झगडे झाले; नाहीं असे नाही. परंतु भिक्षुकशाहीनें बौद्ध धर्माविरुद्ध केलेल्या झगड्यांतले अत्याचार इतक्या राक्षसी वृत्तीचे आणि चिळस आणणारे होते, कीं त्याला जगाच्या अत्यंत घाणेरड्या इतिहासांत सुद्धां दुसरी तोड आढळणार नाही.
भटाभिक्षुकांच्या पुण्याईनें या निर्लज्ज युद्धांत भिक्षुकशाही अखेर विजयी झाली आणि तिनें बौद्धधर्माला हिंदुस्थानच्या हद्दपार करण्याचें श्रेय मिळविलें. परंतु अरेरे! या विजयाचा हिंदुस्थानवर काय घोर परिणाम झाला! हिंदु समाजाच्या सामाजिक जीवनाच्या आरपार चिंधड्या उडाल्या! या ब्राम्हणबौद्ध युद्धाचा पूर्ण मुद्देसूद इतिहास अझून लिहिला जावयाचा आहे. तसा तो कधीं तयार झाला आणि आमच्या हिंदुजनांनी त्याचा मननपूर्वक अभ्यास केला की या भिक्षुकी विजयानें सारा हिंदु समाज बदपैâली व्यसनांत आकंठ कसा बुडाला; त्याच्या संघटनेचे तीन तेरा कसे वाजले; सर्व बाजूंनीं र्‍हासाची पोखरण कशी पडली; आणि मुसलमानांचें परचक्र येण्यापूर्वींच कित्येक वर्षे हा समाज किती लुळा पांगळा आणि कमकुवत होऊन बसला होता, याचे स्पष्ट खुलासे पटतील.
भटी वर्चस्वाचा हा बुरूज केवढा जुलमी आणि किती हरामखोर होता व आजहि आहे, याची कल्पनाच केलेली बरी. वाचकांना नीट कल्पना यावी, म्हणून मी आमच्या हिंदुसमाजाच्या रचनेचें एक शब्दचित्र रेखाटतों. हिंदुसमाज म्हणजे एक मोठा थोरला उंच मनोरा आहे. जिवंत माणसे एकावर एक रचून त्यांच्या ढिगारांनी हा बनविलेला आहे. प्रत्येक माणसाला पोलादी तारेंत जखडून त्याची खुरमुंडी मोट बांधलेली आहे. अशा लक्षावधि मोटा एकावर एक ठेवीत ठेवीत कळसाला त्यांचे घुमट साधले आहे. या मनोर्‍याच्या पायथ्याला अस्पृश्य शूद्रांच्या गठड्या रचलेल्या आहेत. हवा आंत बाहेर येऊं जाऊं न देणारी एक दणदणीत, जाडजूड, लोखंडी शिळा त्यांच्या डोक्यावर ठेवलेली आहे. तिच्यावर स्पृश्य शूद्रांच्या वळकट्या दाबून बसविल्या आहेत. त्यांच्या ही डोक्यांवर लोखंडी जाड शिळा. त्यावर वैश्यांना कोंबून बसवले आहेत. त्यांच्या टाळक्यांवर आणखी एक लोखंडी शिळा, त्यावर क्षत्रिय उभे आहेत. त्यांच्याहि मस्तकांवर लोखंडी शिळा आणि त्या शिळेवर ब्राम्हण उभे आहेत.
इ.स. ७५०त दक्षिण हिंदुस्थानांत कुमारील भट्ट नामक ब्राम्हण धर्ममार्तंडाने बौद्धांचा नायनाट करण्याचा पायंडा घालून ठेवलेला होताच. इ.स. ८३० मध्ये श्रीशंकराचार्यांनीं त्याच पायंड्यावर पाऊल ठेवून, रजपूत राजांची मनें बौद्धांविरुद्ध खवळून सोडण्याची कामगिरी हातीं घेतांच, काश्मीर नेपाळ पंजाब रजपुतांना आणि गंगा यमुना नद्यांमधल्या बिहारादि उत्तर पश्चिम व मध्य हिंदुस्थानच्या सर्व प्रदेशांतून सर्रास बौद्धजनांच्या छळांचा आणि ससेहोलपटीचा भयंकर उपक्रम, रजपूत राजांनी आणि त्यांच्या ब्राम्हणी-हिंदु सहाय्यकांनी सुरू केला.बिचार्‍या बौद्धांची स्थिति या वेळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी होती. त्यांची खेडी उद्ध्वस्त करण्यांत आली. घरेदारे जाळली, लुटली गेली. बायकांची अब्रू घेण्यात आली. पुरुष आणि मुलांना कोठे हद्दपार केले, तर कोठे त्यांची सर्रास कत्तल करण्यात आली. अशा या हलकल्होळांतून जे बौद्धजन कसे तरी लपून छपून वाचले, त्यांना समाज व व्यवहार-बहिष्कृत करून, लोकवस्तीपासून पार दूर पिटाळून लावले. अर्थात् त्यांना कमालीतली कमाल नीच अवस्था प्राप्त झाली. उदरनिर्वाहासाठी सुद्धा त्यांना साध्या माणुसकीला साजेशोभेशा सामान्य शिष्ठतेचीहि बंदी करण्यांत आली. आज आमच्या डोळ्यांपुढे वावरणारे हारी, डोम, मच्छी, चांभार, केवरा, बागडी, नामशूद्र, महार, धेड, मांग इत्यादि अस्पृश्य जनांचे संघ यात छळवाद होऊन बहिष्कृत पडलेल्या बौद्धजनांचेच अवशिष्ठ भाग आहेत.
परंतु शंकराचार्य हे तसे ऊर्ध्व महात्वाकांक्षी होते, तसेच बुद्धिंमत्तेत तें सवाई बृहस्पति होते. विध्यंसक शंकराप्रमाणे रुद्राचें संहारकार्य करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी ब्रम्हदेवाचीहि भूमिका घेऊन विधायक कार्य केले. ब्राम्हणी धर्माचे पुनरुज्जीवन करतांनाच, त्यांनी अभिनव भारत (न्यू इंडिया) निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदुत्वाला नवजीवन दिले, असे म्हणतात. वेदान्ताची फोड करून त्यांनी हिंदुधर्माला नितांत रमणीय अशा एकतान तत्त्वज्ञानाचे स्वरूप दिलें. परंतु हें तत्त्वज्ञान अतिसूक्ष्म व दुर्बोध असल्यामुळे, सामान्य जनतेच्या मनावर त्याची कांहींच छाप बसली नाही. विशेषत: जनतेच्याच हाडारक्तामासाचे जे बौद्धजन त्यांच्या शंकराचार्यांनीं ज्या कत्तली करविल्या व अखेर त्यांचा नायनाट केला, तें शल्य जनतेच्या हृदयांत इतक्या तीव्रतेने सलत होतें की शंकराचार्‍यांच्या कोणत्याहि चळवळींत लोकांनी कसलाहि भाग घेतला नाही. ते सर्व उदासीनच राहिले.
तक्षशिला येथील महापीठाने जाहीर केलेल्या अभिनव बौद्धधर्माच्या तत्त्वांचा हिंदु जनतेच्या मनांवर इतका परिणाम झालेला होता की, शंकराचार्‍यांचा वेदान्त सर्वत्र गर्जत असतांहि, लोकांत मूर्तीपूजनाचा जुना प्रघात धूमधडाक्याने चालूंच राहिला. इतकेंच नव्हें तर तंत्रमंत्रांचे सर्व भेसूर प्रकार तें पाळीत होते. या वरून हे स्पष्टच होते की अभिनव भारत निर्माण करण्याची शंकराचार्‍यांची जी महत्वाकांक्षा होती ती सपशेल फसली. आचार्य समाधिस्त झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांत जी अध:पाताची कीड पडली, ती पुढे दिवसेंदिवस भयंकर प्रमाणांत वाढत गेली. विशेषत: आचार्यांनी मायावादाची जी कल्पना प्रचलित केली. तिचा हिंदु समाजावर इतका घाणेरडा परिणाम झाला की जिकडे तिकडे आढ्याला तंगड्या टेकणारे ऐदी आणि नशीबाला हात लावणारे निराशावादी यांचा सुळसुळाट उडाला.
वाचकहो! मुसलमानांच्या स्वार्‍या बिनधोक या देशावर का झाल्या, आणि हिंदुस्थानच्या काळजाला त्यांना सफाईत हात कां घालता आला, याची आणखी कारण-मिमांसा आपणांपुढे केलीच पाहिजे काय? मुसलमानांच्या स्वार्‍या होण्यापूर्वीच अनेक वर्षे हिंदुसमाजपद्धति सपशेल सडकी कुझकी होऊन बसली होती. प्रतिकार करण्याची कांहीहि शक्ती तिच्यांत उरलेली नव्हती. आंगावर शत्रू चालून आला असता, त्याला संघटित तोंड देण्यासाठी चटकन् एकवटण्याची आमची शक्ती आणि बुद्धीच ठार मेलेली होती. अर्थात् असल्या निर्जीव सांगाड्याला जमीनदोस्त व्हायला काय पाहिजे? एक धक्का बसतांच पत्त्याच्या किल्ल्याप्रमाणे धडाड सारा बाजार कोसळला!
(प्रबोधनकारांनी लिहिलेलं हिंदू जनांचा र्‍हास आणि अध:पात हे पूर्ण पुस्तक prabodhankar.com या वेबसाईटवर वाचता येतं.)

Previous Post

मानसोपचार तज्ज्ञांचा बाप!

Next Post

बिहारचा ‘महाराष्ट्र’ करण्याचा डाव?

Next Post

बिहारचा ‘महाराष्ट्र’ करण्याचा डाव?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.