बाळासाहेबांनी रविवारची जत्रा या त्यांच्या बेहद्द लोकप्रिय व्यंगचित्र सदरात १९७५ साली ही भीती व्यक्त केली होती. आज ५० वर्षांनंतरही तोच धोका असावा, हे मायमराठीचे दुर्भाग्य. मराठी माणसाचा स्वाभिमान तेव्हा ‘कोणीही यावे टिकली मारून जावे’ अशा अवस्थेला पोहोचला होता, म्हणूनच तर बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला होता. तेव्हाचे दिल्लीश्वर महाराष्ट्राला पाण्यात पाहात होते, मराठी भाषेचा दुस्वास करत होते, भूमिपुत्रांवर अन्याय करत होते. बाळासाहेबांनी त्याविरोधात मराठी माणसांची एकजूट केली, त्यांची ताकद पाहून ज्यांनी त्यांच्याशी युती केली, त्यांनीच आता ‘गरज सरो, वैद्य मरो’ या नात्याने शिवसेनेला दूर तर लोटलं आहेच, पण शिवसेनेचे दोन तुकडे करून दाखवल्याच्या मस्तीत आता मराठी माणसाचा स्वाभिमानही डिवचला आहे शाळेत पहिलीपासून हिंदीसक्ती लादून. मराठी माणसांनी, मराठी बहिणींनी गोड आश्वासनांना आणि तात्पुरत्या लाभांना भुलून आपली माणसं समजून विश्वासाने सत्ता सोपवलेले हे गणंग आता बेताल, बेपर्वा आणि बेमुर्वतखोर झालेले आहेत… मराठी स्वाभिमानाच्या वाघाला खडे मारून डिवचू नका रे दळभद्री मराठीद्वेष्ट्यांनो, तो वाघ डरकाळी फोडेल तेव्हा तुमच्या शुभ्रवस्त्रांची फुकटात पीतांबरं होऊन जातील, हे लक्षात ठेवा!