ऑस्ट्रेलियात टीम इंडियातील खेळाडूंसोबत ड्रिंक पार्टी करण्याच्या नावाखाली शेकडो चाहत्यांना लुबाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्टीचे एक तिकीट तब्बल 31 हजार रुपयांना विकले गेले आहे. मंगळवारी तब्बल 200 व्यक्ती सिडनीला पोहोचले त्यावेळी तेथील पोलिसांनी त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांना सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
टीम इंडिया व ऑस्ट्रेलियामधील एक दिवसीय टी- 20 सामना सुरू असताना स्टेडियममध्ये या पार्टीचे पोस्टर्स लागले होते. या पोस्टर्सवर टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत पार्टी करा, त्यांची मुलाखत घ्या असे लिहलेले होते. सिडनीतील ‘मनजित व्हार्फ’ येथे मंगळवारी 4 जानेवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना भेटता येणार म्हणून अनेकांनी ही तिकीटं विकत घेतली होती.
मात्र मंगळवारी एक एक चाहते मनजित व्हार्फच्या इथे जमा होऊ लागले. त्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी त्या लोकांनी त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मनजित व्हार्फचा मालक दीप गुजराल याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत दीपने त्याला या इव्हेंटबद्दल माहित असल्याचे सांगितले आहे. ‘मला सप्टेंबर महिन्यात एका व्यक्तीचा फोन आला होता त्याने मला या इव्हेंटबद्दल सांगितले. आमच्या रेस्टॉरंटमध्ये चांगले जेवण मिळते त्यामुळे अनेकदा हिंदुस्थानी खेळाडू आमच्या रेस्टॉरंटमध्ये येतात. त्यामुळेच त्याने आमच्याशी संपर्क साधला असेल. सुरुवातीला त्याने 75 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर डिपॉझिट म्हणून देतो सांगितले. त्यानंतर त्याने अवघे 1000 डॉलर पाठवले. आम्ही त्याला बाकी रकमेबाबत विचारले तर त्याने काहीच रिप्लाय दिला नाही. त्यामुळे आम्हाला वाटले की हा कार्यक्रम रद्द झाला असावा’, असे दीपने सांगितले आहे.
सौजन्य : दैनिक सामना