गुन्हेगारी विश्वात पॉपकॉर्नसारखा ‘पॉर्न’ फिल्मचा सुळसुळाट आमच्या उमेदीच्या काळात तरी झाला नव्हता. तेव्हा कुलाब्याच्या काही हॉटेलांमध्ये मोठ्या लोकांसाठी कॅब्रेचा शो चालायचा. तोसुद्धा शनिवारी आणि आठवड्यातून ठराविक दोन-तीन दिवस. शनिवारी फोर्टच्या ऑफिसांतून काम करणारे काही मध्यमवर्गीय आंबटशौकीन नोकरदार हाफ डे असल्यामुळे ओव्हरटाइमच्या नावाखाली हे कॅब्रे शो बघायला जायचे. आमच्या इथले फोर्टला कामाला असलेले चौघांचे एक टोळके दर शनिवारी नित्यनेमाने कॅब्रे बघून आल्यावर आम्हाला गुत्त्यावर तिथल्या धमाल गोष्टी रंगवून सांगायचे.
एकदा शाळेत असताना आम्ही मुंबईत एका जत्रेला गेलो. तिथे रस्त्यावर खेळण्यांची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आकाश पाळणे, मौत का कुवा तसेच मिठाई-खाजा-शेव-भजी यांचीही दुकाने होती. पण माझे आणि पोक्याचे लक्ष ‘त्या’ पुस्तकांच्या स्टॉलवर होते. पिवळ्या जिलेटीन पेपरचे वेष्टन असलेल्या त्या पुस्तकांसमोर उभे राहून विक्रेत्याकडे ती पुस्तके चाळायला मागितल्यावर तो वसकन अंगावर आला आणि म्हणाला, अभी नहीं, शादी के बाद पढना. तेव्हा शाळेत नववीत होतो. शेवटी वर्गातल्या एका रावड्या मित्राला ही गोष्ट सांगितली. तो म्हणाला, पंचवीस रुपये दे. उद्या तुला आणून देतो ते पुस्तक. आणि खरेच त्याने दुसर्या दिवशी ते कागदाच्या पिशवीत लपवून आणून दिले. दोन दिवसात मी आणि पोक्याने रात्री गार्डनला अभ्यासाला जातो, असे सांगून त्या पुस्तकाचा फडशा पडला. काहीतरी नवे जग पाहिल्याचे जाणवले. नेमके दुसर्याच दिवशी शाळेत सामान्य विज्ञान विषयाच्या शिक्षकांनी वर्गात आल्यावर गंभीर चेहर्याने मुलांना सामान्य विज्ञानाचे पुस्तक काढायला सांगितले आणि म्हणाले, मुलांनो मी तुम्हाला जीवनातील अतिशय महत्त्वाच्या ज्ञानाविषयी शिकवणार आहे. ‘पुनरुत्पत्ती’ हा धडा काढा. मुले एकमेकांकडे पाहून हसायला लागली. कारण त्या पानात स्त्री-पुरुष शरीराच्या वेगवेगळ्या आकृत्या आणि अवयवांची शास्त्रीय माहिती होती.
मुलांना हसताना पाहून शिक्षक भडकले. म्हणाले, मी तुम्हाला हा धडा शिकवणार नाही. तुम्ही घरी जाऊन तो वाचायचा आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे उद्या लिहून आणायची आहेत.
पुढे दोघांनीही मॅट्रिक नापास झाल्यावर शाळेला कायमचा रामराम केला आणि शिकून काही उपयोग नसल्याचे लक्षात आल्यामुळे वस्तीतच मोकळ्या मैदानात भट्टी सुरू केली. वस्तीत अनेक प्रेमप्रकरणे होती. एक-दोघांनी आडमार्गाने आम्हा दोघांच्याही बाबतीत तसा प्रयत्न केला होता. पण वस्तीत असल्या भानगडीत पडायचे नाही हा आमचा निश्चय होता आणि वस्तीतल्या पोरीबाळींना, बायकांना कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्यांना धडा शिकवायचा या इर्ष्येने आम्ही का पेटलो होतो ते आम्हालाच कळत नव्हते.
भट्टीवर धंदा करून कधीतरी पिक्चर टाकायचो. तेव्हा मुंबईत टीव्ही नव्यानेच आले होते. पण टीव्ही विकत घेण्याएवढे पैसे नव्हते. पोक्या म्हणाला, टीव्हीवरचे पिक्चर काय बघतोस, चल चेंबूरला जाऊ. रेल्वेरूळाच्या बाजूला झोपडपट्टी आहे. तिथे एका झोपड्यात माणशी वीस रुपये घेऊन ‘पॉर्न फिल्म’ दाखवतात. पोक्या एकटा गुपचूप बघून आला होता हे त्याने नंतर सांगितले. म्हटले, हा चान्स सोडायचा नाही. शाळेत शिक्षकांनी ‘पुनरुत्पत्ती’चा धडा शिकवलाच नाही. इथे कमी पैशात शिकायला मिळते तर बघून घेऊ.
पोक्याबरोबर दुपारी तिथे गेलो. त्या झोपड्यांच्या भिंतीवर नव्या सिनेमांची पोस्टर्स डकवली होती. आत मोठ्या झोपड्यांत टीव्हीवर व्हीसीआर लावून एका सिनेमाची कॅसेट लावली होती. बाहेर आवाज ऐकू येत होता. दरवाजाला पडदा होता. तिथे एकजण वीस रुपये देऊन तिकीट देत होता. तिकीट कोरे होते. फक्त कागदाचा तुकडा. आत बसायला दहा-पंधरा खुर्च्या होत्या. पुढे भारतीय बैठक. सर्व प्रेक्षक भरल्यावर टीव्हीवर सुरू असलेला सिनेमा बंद करण्यात आला आणि पॉर्न कॅसेट लावण्यात आली. इंग्रजी होती. चिडीचूप शांततेत ती दोघांनी पाहिली आणि अर्ध्या तासात शो खतम झाला. असे दिवसाला तिथे सात-आठ शो होतात ही माहिती पोक्याने दिली. बाहेर आलो तेव्हा डोके चक्रावले होते. कारण तिथे ती फिल्म पाहणारी झोपडपट्टीतील पाच ते दहा वर्षांची मुलेही होती. माझे आणि पोक्याचे डोकेच सणकले. वस्तीत आल्यावर नेहमी तिथे येणार्या एका पोलिसाला ती माहिती दिली. त्याने त्यांच्या वरिष्ठांना सांगितल्यावर चार दिवसात चेंबूरचे ‘ते’ धंदे कायमचे बंद झाल्याच्या बातम्या पेपरात वाचायला मिळाल्या.
नंतर काही आंबटशौकीन लोक घरी तसल्या कॅसेट आणून टीव्हीवर व्हीसीआर लावून पाहात असल्याच्या बातम्या कानावर आल्या. त्यानंतर त्या ठेवण्यास बंदी आली तरी चोरून ते व्यवहार सुरू झाले. पुढे व्हीसीआर, व्हिडीओ कॅसेट हे काळाच्या पडद्याआड गेल्यावर सीडीचे युग आले. मोबाईलयुग आल्यावर मोबाईलवर ‘त्या’ क्लिप व्हायरल होऊ लागल्या आणि त्यानंतर तर या ‘पॉर्न इंडस्ट्री’ने भारतात धुमाकूळ घातला. जगातील काही देशात तिला अधिकृत मान्यता असली तरी भारतात मोबाईलमुळे शाळा-कॉलेजातील अनेक विद्यार्थी आणि काही राजकारण्यांपासून आंबटशौकीन तरुण आणि प्रौढांपर्यंत हे लोण पसरत गेले. आता शिल्पा शेट्टीचा पती राज वâुंद्रा याच्या त्या उद्योगामुळे तो पकडला गेला असला तरी असे अनेक कुंद्रा या भारतात राजरोसपणे या धंद्यासाठी गरजू मुलींना वेठीस धरून अशी फिल्म्स, क्लिप्स बनवून त्याची विक्री करत कोट्यावधी रुपये कमावत आहेत.
ही बातमी पेपरात आल्यावर पोक्या म्हणाला, हे नवीन नाही. हे शूटिंग कुठे होते आणि त्यात कोणत्या स्त्रिया आणि पुरुष सामील आहेत हे काही विशिष्ट लोकांना ठाऊक असते. विवाहविधीत गृहस्थाश्रमातील वंशसातत्याच्या प्रक्रियेत स्त्री-पुरुष प्रेम, मीलन गृहीतच धरलेले असते. पण इथे वासनेचा बाजार मांडलेल्या विकृतीचे थैमान असते. अनेक आंबटशौकीन जिभल्या चाटत ते पाहतात, व्हायरल करतात आणि समाजातील सर्व वयोगटातील काही लोकांमध्ये हे विष भिनत जाते. मी याबाबत पोक्याबरोबर सविस्तर चर्चा केली तेव्हा तो म्हणाला, तारुण्यात काही माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल वाढती जिज्ञासा आणि त्याची पूर्ती झाली तरी आवरता न येणार्या मनातील विकृती मनातच थैमान घालत असतात. कुंद्रासारखे धंदेवाईक त्याचा फायदा घेतात आणि आपण फक्त त्याबद्दल येणार्या बातम्या वाचत राहतो. आज अनेक शालेय विद्यार्थ्यांपासून अनेक वृद्धांपर्यंत मोबाईलने ही विकृती जोपासण्याची मुभा दिली आहे. त्याचेच भयानक परिणाम समाजात दिसत आहेत. कशाकशावर बंदी आणणार आपण?