केक फ्रेश आहे का? हा प्रश्न केक विकत घेताना नेहमी विचारला जातो. ताजा केक खाण्याची लज्जत काही औरच असते. याच फ्रेश विचाराने प्रेरित होऊन ‘फ्रेश क्रीम केक‘ या नवीन संकल्पनेसह २००८ साली ‘अरोमा‘ हे केक शॉप लोअर परळ येथे उघडणारे अनिल पाटील हे मराठी व्यावसायिक चवदार ताजे केक आणि वक्तशीरपणाच्या जोरावर ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. आज ते ‘केक स्पेशालिस्ट’ असले तरी त्यांची कौटुंबिक बिझिनेस पार्श्वभूमी बेकरीची आहे. बेकरी व्यवसायात १९२२ ते २०२२ अशी १०० वर्षांची परंपरा जपणार्या कुटुंबातील, अनिल यांनी पाव बटर खारी या पारंपरिक व्यवसायातून स्वतःला अपडेट करत फ्रेश क्रीम केक हा नवीन कॉन्सेप्ट सुरू केला.
ते सांगतात, ‘आमची गोष्ट सुरू होते स्वातंत्र्यपूर्व काळात, १९२२ साली माझे आजोबा गोविंदराव जाधव यांनी (आईचे वडिल) डिलाइल रोड, मुंबई इथे प्रभात हिंदू बेकरी सुरू केली. आजोबांचा जन्म सांगलीतल्या शेतकरी कुटुंबातला. पुढच्या पिढीच्या उन्नतीसाठी व्यवसाय करावा, म्हणून त्यांनी मुंबईला स्थलांतर करायचं ठरवलं, तेव्हा त्यांचं वय असेल अवघं २०-२२. पण कसलाही अनुभव गाठीशी नसताना केवळ जिगर आणि जिद्दीच्या जोरावर ते गिरणगावात (लालबाग परळ) दाखल झाले. त्यांच्या लक्षात आलं की या भागात साधारणपणे ४० कापड गिरण्या होत्या. हे काम तीन पाळ्यांमधे चालायचं. पहिल्या पाळीला हजर राहण्यासाठी कामगार सकाळी पाच वाजता उठायचे. गिरणी कामगाराचं काम अंगमेहनतीचं. त्यामुळे त्याला परवडणार्या दरात रोज सकाळी पाच सहा वाजता भरपेट नाश्ता मिळायला हवा. पण, ते जमणार कसं? कारण पाव, बटर, खारी बनवणार्या बेकर्या गिरणगावापासून फार दूर होत्या. हीच गरज आजोबांनी हेरली. आणि पावाचा व्यवसाय करायचा ठरवलं. या व्यवसायात पारशी लोकांची मोनोपॉली होती. एका पारशी बेकरीमधल्या अनुभवी कामगारांना सोबत घेऊन आजोबांनी सुरुवात केली. त्या काळात फार विरोध सहन करावा लागला. गावातील काही नातेवाईकांनी तर पाव बनवतो म्हणून आजोबांशी संबंध तोडले, कारण पाव खाल्ला तर धर्म बुडतो अस गावागावात मानलं जाई. पोर्तुगीजांनी विहिरीत पाव टाकून हिंदूंचं धर्मपरिवर्तन केल्याचं ऐकिवात असतंच. त्यामुळे हा घरंदाज शेतकरी शेती सोडून पावाचा व्यवसाय का करतो, असा गावच्या लोकांना प्रश्न पडायचा.
मुंबईत त्यामानाने परिस्थिती बरी होती. कामगार विभागात आमची बेकरी प्रसिद्ध झाली. सकाळी स्टीलचा ग्लासभरून चहा आणि लुसलुशीत पाव हा पोटभर नाश्ता आणि दुपारी कालवण-पाव असं जेवण हा स्वस्त आणि मस्त पर्याय कामगारांना मिळाला. आज पाव किंवा बेकरी पदार्थ बनवताना यीस्ट वापरलं जातं, त्या काळात खमीर वापरलं जायचे. ही फारच किचकट प्रक्रिया होती. मालाची उपलब्धता, माहितीगार कामगारांवर अवलंबित्व, नातेवाईकांचा रोष या सर्व अडचणींना तोंड देत आजोबा पंचवीस वर्षे हा धंदा एकहाती सांभाळत होते. १९४८ साली आजोबांना माझ्या बाबांच्या रूपाने एक विश्वासू सहकारी मिळाला. माझे बाबा रंगराव पाटील वयाच्या तेराव्या वर्षी मुंबईला आले. माझे आजोबा हे त्यांचे मामा. आजोबांनी त्यांना बेकरीतच कामाला ठेवलं. बाबा पहाटे साडेतीन वाजता उठून हाताने ढकलायच्या गाडीमध्ये नरम पाव, कडक पाव, ब्रून पाव असं सगळं भरून, सकाळी साडेचार वाजल्यापासून बीडीडी चाळींमध्ये पाव विकत फिरायचे. फिरता फिरता इतर बेकरी, इराणी हॉटेलांचं निरीक्षण करायचे. स्वातंत्र्योत्तर काळात बेकरी पदार्थांबाबत लोकांची मानसिकता थोडी बदलू लागली होती. आपले लोक इराणी हॉटेलात चहासोबत, बटर, खारी, टोस्ट, नानकटाई खायला जात असत. हेच लक्षात घेऊन बाबांनी नवीन कारागीर ठेवून आमच्या बेकरीतही हे पदार्थ बनवायला सुरुवात केली. आजोबांचं त्यांच्याकडे लक्ष होतं. हा आपला व्यवसाय सांभाळू शकेल का या दृष्टीने ते त्यांची परीक्षा घ्यायचे, त्यांना वेगवेगळी काम सांगायचे, आपल्या सर्व कसोट्यांवर भाचा पास होतोय हे पाहून आजोबांनी त्यांच्या मुलीसोबत त्याचं लग्न लावून दिलं. जावई झाल्यावर बाबांना लगेच व्यवसाय भागीदारी न देता ते म्हणाले, ‘मी तुला संपूर्ण व्यवसाय सांभाळायला देतो, तू तो दुप्पट करून दाखव.’ बाबांनी चॅलेंज स्वीकारलं. व्यवसायवाढीसाठी मुंबईतील कॅन्टीन्सशी संपर्क करायला सुरुवात केली. एका महिन्यातच ते ५० मिल कॅन्टीन्सना पाव खारी पुरवायला लागले आणि अवघ्या वर्षभरातच माझ्या बाबांनी, आजोबांचं चॅलेंज पूर्ण करून दाखवलं.
अतिशय शांत स्वभाव आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला धीराने तोंड देणे हा बाबांचा सर्वात मोठा गुण होता. जिभेवर साखर ठेवून त्यांनी नवनवीन ग्राहक जोडले, कुठल्याही कामगाराला कधीच दुखावलं नाही. माझा मोठा भाऊ व्यवसायात त्यांना मदत करायला लागला. त्याला शिक्षणात फार रुची नव्हती. त्यामुळे दादाला निर्णय घेण्याची संधी फारशी मिळाली नाही, पण बाबांच्या हाताखाली सगळी कामे तो उत्तम प्रकारे पार पाडत असे. सगळं छान सुरू असताना एक दिवस बाबांना अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हा मी बारावीत होतो. अचानक आलेल्या या संकटामुळे मला शिक्षण बाजूला ठेवून या व्यवसायात यावं लागलं. त्यावेळेला माझ्या आईने बाबांना सांगितलं की याला काम करून शिक्षण देखील घेऊ दे. मग, आधी बेकरीचं काम आणि त्यातून वेळ मिळालं तर शिक्षण असा माझा दिनक्रम सुरू झाला. मी कॉलेज फार अटेंड करू शकलो नाही. फक्त परीक्षा द्यायलाच मी कॉलेजला जायचो. हळूहळू पावाबद्दल कळायला लागलं, व्यवसायात गोडी वाटू लागली.
पावाला पाव का म्हणतात?
पावाला पाव का म्हणतात याची कहाणी रंजक आहे, ब्रेड हे ख्रिस्ती लोकांचं अन्न म्हणून प्रसिद्ध होते, त्या ब्रेडची लादी मिळत असे, त्या लादीचा एक चतुर्थांश भाग म्हणजे पाव भाग हा आजचा पाव. हेच नाव भारतभर आजतागायत कायम आहे.
मी बेकरी धंदा सांभाळायला लागलो, पण वयाने लहानच होतो. त्यामुळे, मला या धंद्यातील काही कळतंय असं जुने कामगार मानायला तयार नव्हते. माझ्या निर्णयांना ते नेहमी विरोध करायचे. मी काहीही नवीन गोष्ट सुचवली की ते म्हणायचे, ‘शेठ आम्हाला एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही सांगताय तसं होणार नाही.’ त्यावर मी चिडायचो. तेव्हा बाबांनी मला समजावलं, ‘कामगारांनी तक्रार केली किंवा विरोध केला तरी त्यावर तातडीने प्रतिक्रिया देऊ नकोस, आपण घरी आल्यावर त्याबद्दल चर्चा करू. मग तू निर्णय घे. त्यांना समोर लगेच काही बोलू नकोस.’ यातूनच मी शिकत गेलो. मी संयमित निर्णय घेऊ शकतो अशी बाबांना खात्री पटली, तेव्हा त्यांनी जाहीर केलं की यापुढे बेकरीबद्दलचे सर्व निर्णय अनिल घेईल. काही चूक झाली तर होऊ दे. ती चूक तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. बाबा बाहेरून लक्ष ठेवून मला धंद्यात तयार करू लागले. माझे काही निर्णय यशस्वी ठरल्याने बाबांचा माझ्यावरचा विश्वास वाढत गेला आणि हळूहळू या धंद्यातून ते निवृत्त होत गेले.
आमच्या बेकरीची जागा मोठी होती. जुन्या पद्धतीनं सगळं काम सुरू असल्यामुळे त्यात बरीचशी जागा वाया जात होती.या जागेचा वापर करायचा ठरवून मी बाबांना म्हणालो, ‘आपण एसटीडी पीसीओ हा व्यवसाय सुरू करूया का,’ त्यावर बाबा म्हणाले की ‘अरे, हा तर पानपट्टीवाल्यांचा धंदा आहे. तुला धंद्यात पुढे जायचे की मागे यायचं आहे?‘ यावर मी म्हणालो, ‘बाबा, तुम्हीच तर मला नेहमी सांगता की कोणताही धंदा छोटा नसतो, तुम्ही मेहनत कराल त्यावर तो धंदा मोठा होत जातो.’ त्यावर बाबा म्हणाले, ‘छान! आज माझी शिकवण, तूच मला पुन्हा आठवण करून दिलीस. शाब्बास!! कर तू एसटीडी सुरू.’ या शाबासकीसोबत बाबांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा हजार रुपये दिले.
१९९५ साली आमच्याकडे एसटीडी आणि पीसीओ सुरू झाला. गिरणगावात अनेकजण कुटुंब गावी ठेवून आलेले असायचे, त्यांची गावी संपर्काची सोय झाल्याने या व्यवसायाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीन महिन्यांत मी एका पीसीओवरून पाच पीसीओ आणि तीन एसटीडी बूथ बांधले. मला त्या व्यवसायातून दहा हजार रुपये प्रॉफिट झाला. मी बाबांचे पैसे परत द्यायला गेलो, तेव्हा ते म्हणाले, ‘कर्जाऊ पैसे परत देण्याची सवय खूप चांगली आहे. तुझी व्यवहार करण्याची पद्धत मला आवडली. तू कल्पकतेने आणि मेहनतीने काहीतरी वेगळं करतोयस, तर ह्यातून मिळणारे पैसे तुलाच ठेव आणि त्यापासून काही नवीन उद्योग सुरू कर.’
ते नवीन काय असावं याचा निर्णय त्यांनी सर्वस्वी माझ्यावर सोपवला. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलत असतात. व्यवसायात काळानुरूप बदल करणं अपेक्षित असतं आणि यशस्वी बदलांसाठी आवश्यक असतो नव्या पिढीच्या कल्पनेला आधीच्या पिढीचा भक्कम पाठिंबा… माझ्या आजोबांनी बेकरी सुरू केली तेव्हा ते वन मॅन आर्मी होते, फक्त पाव विकून त्यांचा व्यवसाय उत्तम सुरू होता. दुसर्या पिढीतील बाबांनी पदार्थ वाढवून बटर, खारी, टोस्ट विक्रीला ठेवले, मिल कँटीनला डिलिव्हरी सुरू केल्या, तेव्हा त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं, ते आजोबांनी दिलेल्या पाठिंब्यावर. तिसर्या पिढीतील मी या धंद्यात आलो तेव्हा, बाबांच्या भक्कम आधारावरच मला वेगवेगळे प्रयोग करता आले.
व्यवसायात स्पर्धा वाढली होती. पाव हे गरिबांचं खाणं मानलं गेल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले तरी पावाचे दर वाढवायला कुणी तयार नव्हते. काही बेकरींनी तर प्रॉफिट मिळवण्याकरीता कमी दर्जाचा माल वापरणं सुरू केलं, जे आम्हाला पसंत नव्हतं. पारंपारिक व्यवसाय बदल न केल्याने अधोगतीकडे किंवा दूरदृष्टीने बदल केल्याने प्रगतीकडे जातात. मी दुसरा मार्ग स्वीकारायचं ठरवलं. मी बेकरीत क्रीम केक विकण्याचं काउंटर सुरू केलं. पण पहिल्याच प्रयत्नात अपयश पदरी पडलं. तो व्यवसाय का अपयशी ठरला याचं कारण शोधताना लक्षात आलं की वीस वर्षांपूर्वी, वीस रुपयाची पेस्ट्री घेण्याची आणि दोनशे रुपयांचा केक घेण्याची मानसिकता नव्हती. आमच्याकडे पाव बटर घ्यायला येणारे लोक खिशात दहावीस रुपये घेऊन यायचे आणि आमचा शंभर रुपयांचा केक पाहून म्हणायचे, ‘एवढे महागडे केक कुठे असतात होय.‘ वारंवार हा प्रश्न ऐकून, मला धडा मिळाला की महागडे केक विकायचे असतील तर दुकान देखील महागडं दिसायला हवं.
याच काळात कुटुंबात वाद होऊ नयेत, यासाठी बाबांनी संपत्तीचे वाटे करायचं ठरवलं. मोठ्या भावाच्या वाट्याला बेकरी आली आणि माझ्या वाट्याला माहीमचं दुकान आलं. ते दुकान बाबांनी भाड्याने दिलं होतं. वाटण्या झाल्यावर मी सहा महिने पुढे नक्की काय करावं यासाठी वेळ घेतला. मला लहानपणापासून बाईकचे पॅशन आहे. मी अनेक बायकर ग्रुप्सबरोबर देशभर फिरत असतो. माझ्या मनात गाड्यांशी संबंधित व्यवसाय करावा असं होतं, पण बाबांची इच्छा होती की मी बेकरी व्यवसायातच काहीतरी करावं, कारण तो आपला पारंपारिक व्यवसाय आहे. त्यातील क्लृप्त्या मला अवगत आहेत. बाबांच्या या सल्ल्याचा मान राखत मी माझं बाईकप्रेम तूर्तास बाजूला ठेवलं आणि बेकरी व्यवसायात काय नवीन करता येईल यादृष्टीने विचार सुरू केला. माझ्या आयुष्यातलं पहिलं अपयश आमच्या बेकरीतल्या केक काउंटरचं होतं. तिथूनच पुन्हा सुरवात करायची असं ठरवलं, पण आता फक्त केक विकले गेले पाहिजेत, त्याची रचना दिमाखदार आणि आकर्षक हवी, जेणेकरून कोणत्याही ग्राहकाला माझ्या दुकानातून केक घेताना प्राऊड फीलिंग वाटायला हवं. या सर्व बाबींचा विचार करून मी लोअर परळला २४ नोव्हेंबर २००९ रोजी ‘अरोमा’ हे केक शॉप सुरू केलं. मला एकाच वेळी मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय अशा दोन्ही ग्राहकवर्गांना आकर्षित करायचं असल्यामुळे सहज उच्चारता येईल असं नाव मी केक शॉपसाठी निवडलं. लोअर परळ हा भाग मध्यमवर्गीय चाळी आणि बंद झालेल्या गिरण्यांवर उभी राहिलेली कॉर्पोरेट ऑफिसेस यांचा संगम आहे. त्यामुळे दोन्ही ग्राहकवर्ग सहज उपलब्ध झाले. आमच्या दुकानात ग्राहकांनी पाय ठेवल्याक्षणी त्याच्या सभोवती केकचा गंध दरवळायला हवा अशी माझी इच्छा होती. चाळीतील माणसाला पेस्ट्रीजचं आकर्षण होतं, तर कॉर्पोरेटमध्ये काम करणार्या माणसाला ऑफिसजवळ चांगले केक मिळण्याची सुलभता मिळाली. त्यामुळे सुरुवातीपासूनच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. कोणतीही खाण्याची गोष्ट नाशवंत असते. फ्रेश क्रीम केक बनविल्यापासून चोवीस तासांत खराब होतात. उरलेल्या पदार्थांचं मी दुसरं कोणतंही बाय प्रॉडक्ट बनवू शकत नाही. म्हणूनच या धंद्यात फायदा होईल का ते सांगता येत नाही, पण वेळेत माल विकला न गेल्यास नुकसान नक्की आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेत गेलो. दुकानाचं भाडं आणि माणसांचा पगार मिळून महिन्याला पन्नास हजार रुपये खर्च होता आणि आणि पस्तीस हजार रुपये उत्पन्न येत होतं. म्हणजे दर महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये खिशातून धंद्यात टाकावे लागत होते. कोणताही व्यवसाय स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ हा लागतोच. त्यातही खाद्यपदार्थांच्या दुकानाला लोकांचा विश्वास संपादन करायला अधिक वेळ लागू शकतो. पण एकदा ग्राहकाला पदार्थाची चव आवडली की तो दुसरीकडे जात नाही.
माझं बालपण बेकरीत गेलं असल्यामुळे मला बेकरी पदार्थ कसे बनवतात ते माहीत होतं, पण सुरुवातीच्या काळात कोणतेही प्रयोग न करता धंद्यात जम बसवणं जास्त महत्वाचं वाटलं. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे केक बनविणार्या एका कंपनीकडून केक्स पेस्ट्रीज विकत घेऊन विकायचो. कालांतराने लक्षात आलं की बाहेरच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे आणि चवीचे केक्स मी माझ्या दुकानात बनवू शकतो. माझं यश पाहून आजूबाजूला काही नवीन केक शॉप उघडले होते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आणि चांगलं द्यायला हवं, या भावनेतून आम्ही दुकानांत लाईव्ह केक बनवून विकायला लागलो. आपण खाण्याची कोणतीही वस्तू विकत घेताना विचारतो की पदार्थ ताजा/ फ्रेश आहे ना? आमच्या दुकानात ग्राहकाने हे विचारलं की मी त्यांना सांगतो, तुम्ही फक्त पंधरा मिनिटं थांबा, मी तुम्हाला तुमच्यासमोर फ्रेश केक बनवून देतो. अशी जागेवर केक बनवून देणारी केकची दुकानं क्वचितच पाहायला मिळतील, कारण त्यासाठी मोठी जागा आणि जास्त माणसं कामावर ठेवावी लागतात. म्हणूनच आज नव्वद टक्के केकविक्रेते फॅक्टरीमध्ये बनवलेले केक आणून विकतात. लोअर परळमधलं केक शॉप स्थिरस्थावर झाल्यावर २०१० साली माहीमला दुसरं दुकान उघडलं. दादर, शिवाजी पार्क ते वांद्रे येथील खवय्यांनी आमच्या फ्रेश केक्सना पसंती दिली.
पावाच्या बेकरीत दोन रुपयांच्या मावा केकपासून सुरु झालेला हा प्रवास, कप केक, प्लम केक, बार केक, दांडी केक असं करत करत आज, फ्रेश क्रीम केक, फ्रूट केक, थीम केक अशा नावीन्यपूर्ण रुपांत सजून केकशॉपपर्यंत पोहचला आहे. दरवर्षी मोबाईलचे नवीन मॉडेल येतात, तसेच केकमध्ये देखील दरवर्षी नवीन ट्रेंड्स येत असतात. मी सुद्धा वेगवेगळे थीम केक डेव्हलप केले. नाताळमध्ये प्लम केक, दांडी केक यांना विशेष मागणी असते. फालुदा केक फार कमी ठिकाणी मिळतो, तो तुम्हाला आमच्याकडे मिळेल.
त्याशिवाय व्हाइट फ्लॉरेस्ट, चोको फॅन्टसी, चोको प्रिमिअम असे चाळीस प्रकारचे केक आम्ही बनवतो. अर्थात अजूनही डच ट्रफल, बटरस्कॉच, ब्लॅक फ्लॉरेस्ट, पायनेपल, रेड वेलवेट, चॉकलेट हे फ्लेवर्स आपल्याकडे जास्त विकले जातात. त्याच्या पेस्ट्रिज आम्ही जास्त बनवतो. एखादा समारंभात ऑर्डर केलेल्या केकमध्ये अंड्याचा वापर केलेला असेल आणि तिथे काही पाहुणे शाकाहारी असतील किंवा वाराला नॉनव्हेज न खाणारे असतील, तर ते केकचा आस्वाद घेऊ शकणार नाहीत. यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच फक्त शाकाहारी केक बनविण्याचा निर्णय घेतला. पण अंडं न वापरता देखील आम्ही बनव्ालेला शाकाहारी केक अंड्याच्या केकपेक्षा चवदार झाला पाहिजे याची काळजी घेतली. लाइव्ह केक बनवताना अंड्याचा वापर केला तर दुकानात दुर्गंधी पसरू शकते ही भीती देखील होती. आम्ही जेव्हा दुकानात नवीन शेफ कामाला ठेवतो, तेव्हा त्याला स्पष्ट सूचना देतो, मी बनवून दिलेल्या रेसिपीमध्ये जराही बदल करायचा नाही. काहीही झालं तरी क्वालिटीसोबत तडजोड करायची नाही हे आमचं ब्रीद वाक्य आहे.
पूर्वी बेकरी म्हटली की डोळ्यासमोर पाव बटर खारी नानकटाई असे मोजकेच पदार्थ यायचे. मांजरीला चार काळी पिल्लं आणि एक पांढरं पिल्लू व्हावं तसा पारंपरिक बेकरीत केकचा जन्म झाला. काही काळाने केक बेकरीमधून बाहेर पडून त्याने स्वतःचं वेगळं दुकान थाटलं, वेगळा ग्राहकवर्ग तयार केला. केकशॉपमध्ये येणार्या प्रिमिअम ग्राहकांशी संवाद साधताना सौजन्यशील वृत्ती ठेवावी लागते. नीटनेटकेपणा, सजावट, स्वच्छता, याबाबत त्या ग्राहकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, याचं भान ठेवावं लागतं. इंग्रजीतून बोलणारा एखादा उच्चभ्रू ग्राहक आला तर तुम्हाला त्या भाषेत त्याच्याशी बोलता आलं पाहिजे. उत्तम चवीसोबतच केकच पॅकिंग आकर्षक असेल तरच घरी बसून ऑर्डर करणारा ग्राहक तुम्हालाच पुन्हा पुन्हा ऑर्डर देईल. पदवी मिळाल्यानंतर मी बिजनेस मॅनेजमेंट शिकायला वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. तिथे मिळालेल्या व्यवस्थापनातील ज्ञानामुळे माझ्या धंद्याबद्दल विचार करण्याच्या कक्षा रुंदावल्या. माझी बायको शीतल हिने दुकानाची बरीचशी जबाबदारी स्वीकारली. आज आमचं नाव झाल्यावर फ्रँचायजी घेण्यासाठी अनेक लोक संपर्क साधतात. पण लाईव्ह केक कॉन्सेप्टमध्ये, केकसाठी वापरलं जाणारं रॉ मटेरियल जर एखाद्याने उन्नीस बीस केलं, तर इतकी वर्षे जपलेल्या नावाला बट्टा लागू शकतो. त्यामुळे तूर्तास फ्रँचायजी देण्याचा विचार मी बाजूला ठेवला आहे.‘
आज अनेक पारंपरिक व्यवसाय स्टार्टअप आणि मोठ्या भांडवलदारांच्या रेट्यात नेस्तनाबूत होत आहेत. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या धंद्याला नावीन्याची जोड मिळाली तर बेकरीतून मिळालेल्या बाळकडूतून एक फ्रेश क्रीम केकचा ब्रँड तयार होऊ शकतो, हे अनिल पाटील यांनी दाखवून दिलं आहे. मार्केटचा अभ्यास करून केलेले सुयोग्य बदल म्हणजे पारंपारिक धंद्याच्या केकवरचं आयसिंग विथ चेरी ऑन द टॉप ठरतं.. एकदम फ्रेश!!