प्रबोधनकारांचं महत्त्वाचं पुस्तक `भिक्षुकशाहीचे बंड` ही भारतातल्या जातीय अत्याचारांचा इतिहास मांडतं. देशाच्या अवनतीला ब्राह्मणी वर्चस्ववाद कसा कारण आहे याची साधार मांडणी करतं.
– – –
`भिक्षुकशाहीचे बंड` हे प्रबोधनकारांचं महत्त्वाचं पुस्तक ९ मे १९२१ रोजी प्रबोधनकारांनीच प्रकाशित केलं. इतर प्रकाशकांच्या व्यवहाराला कंटाळून त्यांनी स्वतःच पुढची पुस्तकं छापण्याचं ठरवलं होतं. मूळ पुस्तक साधारण १८० पानांचं आहे आणि त्याची किंमत २ रुपये इतकी आहे. त्याआधी `कोदण्डाचा टणत्कार` या ग्रंथाने केशव सीताराम ठाकरे कोण आहेत याची ओळख महाराष्ट्राला झालीच होती. त्याने ब्राह्मणी इतिहासलेखनाला सुरूंग लावलाच होता. त्यापुढे जाऊन खंडनाच्या पलीकडे नव्या इतिहासलेखनाच्या मांडणीला हात घालण्याची गरज होती. त्यानुसार पाठोपाठ `ग्रामण्याचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंड` हे पुस्तक आलं आणि गाजलंही. या दोन पुस्तकांच्या मालिकेतले तिसरं पुस्तक म्हणून `भिक्षुकशाहीचे बंड`चा विचार व्हायला हवा.
पाक्षिक `प्रबोधन` सुरू होण्याच्या आधी लोकजागृतीसाठी ग्रंथलेखन हेच माध्यम प्रबोधनकारांनी प्रामुख्याने हाताळलं. त्यासाठी त्यांनी ‘वङ्काप्रहार ग्रंथमाला’ नावाचा उपक्रम सुरू केला होता. त्यात निर्बुद्ध चालीरीतींवर हल्ला करण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार `भिक्षुकशाहीचे बंड` हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. `वङ्काप्रहार माले`चा हेतू प्रबोधनकारांनी या पुस्तकातच नोंदवून ठेवला आहे. तो असा, `गेली वीस वर्षे स्वाध्याय, मनन व निरीक्षण करीत असतांना आमच्या मनावर जे जे संस्कार झाले, बुद्धीला जी जी तत्त्वे विचारांती पटली व प्रवासांत ठिकठिकाणच्या विद्वानांशी चर्चा करून आमच्या हिंदू समाजांतल्या सामाजिक, धार्मिक व नैतिक अनेक अन्यायांची आम्हांला जी प्रत्यक्ष प्रचिती आली, त्या सर्वांचे निःपक्षपणाने, स्पष्टोक्तीने यथाशक्ती उद्घाटन करण्याचा आम्ही निश्चय करून, नवमतवादाचा पुरस्कार करणारी ही वङ्काप्रहार ग्रंथमाला गुंफण्याचे कार्य हाती घेतले आहे.`
वङ्काप्रहार ग्रंथमालेचा उद्देश सांगताना प्रबोधनकारांच्या संपूर्ण जगण्याचाच उद्देश उलगडताना दिसतो, `आम्हाला राजमान्यतेची चाड नाही, लोकमान्यतेची पर्वा नाही, स्वकीय परकीयांच्या निंदास्तुतीची अगर वर्तमानपत्री चित्रगुप्तांच्या शिखंडी हल्ल्यांची दिक्कत नाही. उच्चनीचत्वाचा भेद आम्ही साफ झुगारून देऊन, सर्व देशबांधव एकाच दर्जाचे आहेत, या भावनेने आम्ही कोणाच्याही रागलोभाची पर्वा न करता सत्य गोष्टी स्पष्ट बोलून दाखवू. कोणी कितीही प्रतिकार केला तरी यात खंड पडणार नाही. आमची लेखणी व जिव्हा थांबविण्याची शक्ती एका मृत्यूमध्ये आहे. इतर कोणाच्याही मानवी शक्तीचे ते सामर्थ्य नव्हे!`
युरोपात राजेशाही आणि पुरोहितशाहीचा संघर्ष झाल्यामुळे तेथील ख्रिस्ती पुरोहितशाहीचा सांगोपांग आढावा घेणारं संशोधन झालं. विपुल ग्रंथलेखन झालं. तसं भारतात काही झालेलं नाही आणि आजही होताना दिसलं नाही. आपल्याकडची पुरोहितशाही चाणाक्ष असल्याने तिने राजसत्तेशी कायम जुळवून घेतलं. तशीच ती युरोपसारखी एकपदरी नाही. इथल्या पुरोहितशाहीच्या वर्चस्वाला फक्त धार्मिक पदर नाहीत, त्यातला जातीय पदर तिला सामाजिक, आर्थिक, राजकीय पैलू जोडतो. त्यामुळे भारतीय पुरोहितशाहीवर लिहिणं सोपं नाही. त्या दृष्टीने प्रबोधनकारांनी केलेलं हे लिखाण महत्त्वाचं ठरतं. अशा पद्धतीचं हे पहिलं लिखाण नसलं तरी आधुनिक काळातल्या महत्त्वाच्या लिखाणापैकी एक आहे. मात्र त्याकडे दुर्लक्षच झालेलं आहे.
प्रबोधनकार हिंदू धर्माविषयी आस्थाच बाळगतात. हिंदू धर्मावर परकीय सत्ताधार्यांकडून होणार्या अन्यायाविरुद्ध भयंकर कोरडे ओढतात. पण हिंदू धर्मातल्या पुरोहितशाहीलाही तितक्याच निर्दयपणे झोडपून काढतात. धर्मातल्या दलालांवर केलेली टीका म्हणजे धर्मावरची टीका नाही, याचं भान प्रबोधनकारांची पुस्तकं आपल्याला करून देतात. त्यातलं `भिक्षुकशाहीचं बंड` हे पुस्तक थेट या विषयावरचंच असल्याने महत्त्वाचं ठरतं. पुरोहितशाहीला दिलेली भिक्षुकशाही आणि भटशाही ही त्यांनी दिलेली भारतीय नावंच प्रबोधनकारांचा रोखठोक दृष्टिकोन सांगून जातात. भारतीय पुरोहितशाहीचा इतिहास सांगतानाच त्यांनी केलेल्या अन्यायाचा पाढा तर त्यांनी मांडला आहेच, पण त्याचे देशावर झालेले दुष्परिणामही स्पष्ट शब्दांत सांगितले आहेत.
प्रबोधनकारांच्या पुस्तकांना फारशा प्रस्तावना नाहीतच. बहुतांश पुस्तकांत त्यांनी स्वतःच मनोगतं लिहिली आहेत. त्यामुळे वेगळ्या प्रस्तावनांची गरजही वाटत नाही. त्याला काही अपवाद आहेतच. विशेषतः ‘माझी जीवनगाथा’ला धनंजय कीर यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रबोधनकारांच्या जीवनाचं मर्म सांगते. पण त्यापेक्षाही महाडच्या गोविंद गोपाळ टिपणीस यांनी `भिक्षुकशाहीचे बंड`ला लिहिलेली प्रस्तावना महत्त्वाची ठरते. भारतीय समाजावरच्या पुरोहितशाहीच्या वर्चस्वाची सम्यकपणे केलेली चिकित्सा हे तिचं वैशिष्ट्य आहे. `महाराष्ट्र साहित्य` नावाचं नियतकालिक चालवणार्या टिपणीसांनी प्रबोधनकारांच्या वैचारिक मांडणीतल्या तसेच शैलीच्या मर्यादाही स्पष्ट दाखवून दिल्या आहेत. मात्र त्यांनी प्रबोधनकारांच्या वैचारिक निष्पक्षतेची वारंवार ग्वाही दिली आहे.
या पुस्तकात विविध प्रकरणं नाहीत. सलग एकच लेख लिहिलेला आहेत. त्यात प्रत्येक नवीन मुद्द्याला एक नंबर दिलाय. असे २५ मुद्दे यात आहेत. पुस्तकाच्या अगदी सुरवातीला `सत्यात नास्ति परोधर्म` म्हणजे सत्यासारखा परमधर्म दुसरा नाही असं सुभाषित आहे. तर मुख्य लेखाची सुरवात गायत्री मंत्राने झाली आहे. ते प्रबोधनकारांवर त्या वेळी असणार्या हिंदू मिशनरी सोसायटीच्या प्रभावाचं लक्षण आहे. गायत्री मंत्राच्या खाली डॉ. रा. गो. भांडारकर यांचं एक कोटेशन आहे. त्यात पुस्तकाचं सार आलेलं आहे. `आम्हा हिंदू लोकांना अनेक शतकांपासून अनेक प्रकारच्या जुलूमांखाली रहावयाची सवय झाल्यामुळे आमच्या समाजातील नीतिबल अगदी नाहीसे झाले आहे. राजकीय जुलूम, आचार्यांचा जुलूम आणि सामाजिक किंवा जातीचा जुलूम अशा तीन प्रकारच्या जुलूमांखाली आम्ही इतके दडपून गेलो आहो की आम्हांस मान वर करता येत नाही.`
प्रबोधनकारांनी लिहिलेल्या भिक्षुकशाहीच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा तर तो असा सांगता येईल. आज हिंदूंना जगभर सन्मान नसला तरी ऋग्वेद काळातली मूळ भारतीय संस्कृती श्रेष्ठ होती. त्यानंतर भिक्षुकांनी वर्णसंकराचं भूत उभं करून चातुर्वण्याच्या जागा जातीभेद घट्ट केले. पुराणांच्या कादंबर्यांनी ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या कथा लिहिल्या. वर्षानुवर्षं सांगून त्या बहुजन समाजाच्या माथी मारल्या. `भट्ट सांगे आणि मठ्ठ ऐके` यामुळे बहुजनसमाज परावलंबी झाला. त्याला गौतम बुद्धांनी नवविचारांच्या जोरावर याला विधायक वळण लावलं. त्यानंतर मायावादाने पुन्हा हिंदूंच्या अवनतीला सुरवात केली. त्याविषयी त्यांनी लिहिलंय.
`हिंदूं लोकांच्या अवनतीला जी काही अनेक कारणे झाली, त्यातच अनादिसिद्धत्वाची कल्पना ही एक राक्षसी आहे. याच राक्षसीच्या उदरांतून मायावाद जन्मलेला आहे. नवविद्वेषाचे पिंड खाऊन खाऊन फुगलेल्या या मायावादाने हिंदू लोकांना खरेखरे नामर्द बनवून त्यांची जीवनसंवेदना अगदी ठार मारून टाकली आहे. या मायावादाने त्यांना कट्टे निराशावादी बनविल्यामुळे जगाच्या संसारात किंवा जगाच्या चतुर्वर्गव्यवस्थेत त्यांना आजला शूद्रत्वाचा दर्जा प्राप्त झाला आहे.`
भारताच्या अवनतीसाठी प्रबोधनकार मनुस्मृतीला दोष देतात, `ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना गुणभ्रष्ट करण्यात कसकसे अत्याचारी प्रयोग अमलात आणले, हे पाहूं इच्छिणारांनी मनुस्मृतीचा नीट अभ्यास करावा. मनुस्मृती हे राष्ट्राचा जीव हळूहळू घेणारे एक जालीम भिक्षुकी जहर आहे. ते वरून शर्करावगुंठीत असल्यामुळे कोणीही ते निमूटपणे गिळतो. भिक्षुकशाहीच्या अरेरावी वर्णाश्रम(अ)धर्माची कायदेबाजी दाखविणारा ग्रंथ हाच. या भिक्षुकी बायबलांत ब्राह्मणांची अवास्तव आणि आटोकाट स्तुती करून ब्राह्मणाची तळी आकाशापेक्षा उंच उचलून धरण्यांत आलेली असल्यामुळे सोटा हे जसे काबुली पठाणांचे दैवत, त्याप्रमाणेच मनुस्मृती हा ब्राह्मणांचा एक दैवतग्रंथ होऊन बसला आहे.`
पुढे या ग्रंथात परशुराम आणि वामन अवतारांच्या पौराणिक कहाण्यांमागचे भिक्षुकी डावपेच उलगडून सांगितले आहेत. त्यानंतर प्रबोधनकारांनी चाणक्याच्या अर्थशास्त्रापासून सम्राट हर्षवर्धनापर्यंत आणि पानिपतच्या पराभवापर्यंत अनेक आधार आपल्या मांडणीच्या समर्थनात दिले आहेत. त्यानंतर जातीभेदाचा सामाजिक इतिहासच सविस्तर येतो. वकिली, राजकारण, सावकारी असे उद्योग ब्राह्मणांनी करणं धर्मानुसार योग्य आहे का? असा प्रश्न विचारत ते त्यांच्या काळापर्यंत पोचतात. बीजशुद्धीच्या कल्पनांना वेडगळ ठरवून ते वर्णसंकराचं स्वागत करतात. हे करताना प्रबोधनकार अनेक ग्रंथांमधले मोठमोठ्या विचारवंतांचे उतारे संदर्भ म्हणून देतात.
भिक्षुकांच्या नैतिकतेच्या कल्पनांतला विरोधाभास मांडताना ते लिहितात, `जी एकाला नीती वाटते, तीच दुसर्याला अनीती वाटते. प्राचीन काळचे कडकडीत कर्मठ ब्राह्मण गोमांसभक्षक होते. आताच्या काही ब्राह्मण बुवांना डोळ्यावरच्या रांजवणवाडीला सुक्या बोंबलाचा तुकडा शिवविताना सतरा वेळा नाक मुरडण्यात ब्राह्मणपणा वाटतो. तर कित्येकांना पाण्यातली शुद्ध मासळी सपाटून खाणे हाच ब्राह्मणपणाचा ट्रेडमार्क वाटतो.`
त्या काळात सुरू असलेल्या वेदोक्त पुराणोक्त वादाचाही समाचार प्रबोधनकारांनी घेतला आहे. स्त्रियांची गुलामगिरी आणि अस्पृश्यांवरचे अत्याचार या दोन गोष्टी जोवर संपत नाहीत, तोवर स्वातंत्र्य मिळालं तरी त्याला अर्थ उरणार नाही. राजकीय स्वयंनिर्णयाचा फोलपण सांगताता ते भारतातल्या बहुजनसमाजाने स्वतःच स्वतःचे निर्णय घेण्याचा आग्रह धरतात. बौद्धिक आणि वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र बाणा दाखवण्याचा सल्ला देतात. ते सांगतात, `बौद्धिक गुलामगिरीने माणसासारख्या माणसांना पशूपेक्षाही पशू बनवण्याचा व्यापार बिनधोक चालवणार्या भिक्षुकशाहीच्या सामाजिक व धार्मिक अवडंबराचे जोपर्यंत आमूलाग्र उच्चाटन होणार नाही, तोपर्यंत या हिंदू राष्ट्रांत स्वातंत्र्याचे बीज कधीच जीव धरणार नाही.`
प्रबोधनकारांनी शंभर वर्षांपूर्वी दिलेला हा इशारा आजही महत्त्वाचा आहे. आपल्याला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं खरं पण अजूनही आपल्या समाजात भेदाभेद आहेतच. हे भेदच आपल्याला खर्या स्वातंत्र्याचा अर्थ कळू देत नाहीत. जोवर स्त्रिया भिक्षुकशाही कर्मकांडांच्या सापळ्यातून स्वतःची सुटका करून घेणार कोणत्याही सामाजिक प्रबोधनाला अर्थ उरणार नाही, अशी मांडणी करणारा `राष्ट्रदेवतांची पायमल्ली` हा स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याची घोषणा त्यांनी या पुस्तकाच्या शेवटच्या परिच्छेदात केली आहे. पण पुढे `प्रबोधन` नियतकालिकाच्या धावपळीत अडकल्यामुळे असावं कदाचित, पण त्यांना असा ग्रंथ काही लिहिता आला नाही. नाहीतर `कोदंडाचा टणत्कार`, `ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास` आणि `भिक्षुकशाहीचे बंड` या तीन ग्रंथांच्या मालिकेत आणखी एका ग्रंथाचा समावेश झाला असता. अर्थात याच काळात लिहिलेलं `हिंदू धर्माचे दिव्य` हे पुस्तक सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं.
(भिक्षुकशाहीचे बंड हे पुस्तक prabodhankar.com या वेबसाईटवर वाचता येईल.)