संतोषराव, थट्टी फस्टचा प्लॅन काय?
– मेघा मांजरेकर, कांदिवली
पार्टी विदाऊट लेडीज.. सॉरी
हे आपलं नवीन वर्ष नाही, आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच, असं सांगणारे संस्कारी काका-काकूंचे मेसेज तुम्हाला येतात की नाही? त्यांना काय उत्तर देता ते सांगा. म्हणजे आम्हाला पण तेच देता येईल या पिडू मंडळींना.
– रोहित पाटील, मानखुर्द
अशा लोकांना उत्तर देणं म्हणजे पालथ्या ‘लोट्यावर’ पाणी असतं.. तरीही त्यांना उत्तर म्हणून प्रश्न विचारतो, तुमची अॅनिवर्सरी कधी असते.. मुलांचा बर्थ डे कधी असतो.. तुम्हीही विचारून पाहा…स्वतःला शहाणे समजणार्या शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो.
रात्रीच्या वेळी सूर्यनमस्कार घातले तर त्यांना काय म्हणता येईल?
– अप्पा जोंधळे, बाणवली
घालुनी लोटांगण.. वंदितो चरण.. असं करावं लागतं.. नुसतं म्हणून चालत नाही…
मी तिच्यावर खूप प्रेम करतो, हे तिला माहिती नाही. ती नेहमी ‘तू खूप चांगला आहेस. तुला खूप चांगली मुलगी मिळेल’ असं म्हणते. आता मी काय करू?
– विरल जोशी, पुणे
याला म्हणतात अंगात नाही दम आणि आडनाव कदम.. आप जोशी हो, तो फिर जरा गर्म जोशी से काम लो..
ती म्हणाली, मला धार्मिक प्रवृत्तीचीच मुलं आवडतात. मी तिला भगवद्गीता दिली आणि मित्राने स्मार्टफोन दिला. ती माझ्याशी बोलायची बंद झाली आणि त्याच्याबरोबर रोज फिरते. असं का?
– राधेश्याम बंतावार, चंद्रपूर
वाचलात, उद्या उठता बसता तुम्हाला प्रश्न विचारून, त्याच भगवद्गीतेवर हात ठेवून उत्तरं द्यायला सांगितली असती तर तुम्हाला जमलं असतं? (नावात कृष्ण असला म्हणून माणूस ‘स्मार्ट’ होत नाही हे सत्य स्वीकारा.)
विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात सत्ताधार्यांनी ठेवलेल्या चहापानावर विरोधक बहिष्कारच घालतात, तर चहापान ठेवायचं कशाला? काही वेगळा पर्याय सुचतोय का?
– देवराम बांगर, अमरावती
चहापानच नव्हे तर अधिवेशनच रिसॉर्टमध्ये भरवावं, असा पर्याय आहे (आमदारांच्या वेतनवाढीवर जसं सगळ्यांचं एकमत होतं तसं एकमत नाही झालं, तर सगळ्यांच्या ढेंगाखालून जाईन).
तुमच्या घरात मुलांच्या डोक्याशी सांताक्लॉज गिफ्ट ठेवून जातो की माता लक्ष्मी भेटवस्तू ठेवून जाते?
– किरण नाईक, कोल्हापूर
मुलं आणि गृहलक्ष्मी त्यांना हव्या त्या ‘गिफ्ट भेटी’ स्वतःच घेतात आणि माझ्या डोक्याशी शॉपिंगची बिल ठेवून जातात.
भारताशी थेट संबंधच नसलेल्या कमला हॅरिस काही लोकांच्या मते भारतीय वंशाचा अभिमान उंचावत असतात आणि भारतातच भारतीय बनून राहिलेल्या सोनिया गांधी मात्र परदेशी असतात, ही काय भानगड आहे?
– गौरव साने, डोंबिवली
स्वतःच्या वंशातल्या भानगडी लपवण्यासाठी अशा भानगडी केल्या जात असाव्यात.
मी माझी नवीन कविता वाचून दाखवते असं म्हणाले की सगळे मित्र, नातेवाईक पळ काढतात. अशाने मराठी साहित्य समृद्ध कसं होणार?
– डॉमनिका गोन्साल्वीस, माजोर्डा
मराठी साहित्य आधीपासून समृद्ध आहे आणि तुमचे मित्र आणि नातेवाईक पळ काढतात, म्हणूनच बहुदा ते समृद्ध राहिलंय.
तुम्हाला पुनर्जन्म कुठे घ्यावा याचा चॉइस मिळाला, तर तो कुठे घ्याल?
– राधिका सावंत, कुडाळ
बायकोला माहीत .. सात जन्म बुक केलेयत तिने, कुठे ते विचारण्याची हिंम्मत या जन्मात तरी माझ्यात नाही.
जपानची लोकसंख्या कमी होतेय. अशाने एक दिवस एकही जपानी शिल्लक राहणार नाही म्हणतात. आपण काय करू शकतो या बाबतीत?
– सोनल डिकुन्हा, वसई
कोणा जपान्याला मदत करायला जायचो आणि तो चिनी निघायचा. उगाच आपण देशद्रोही ठरायचो. आधी जपानी माणूस कसा ओळखायचा ते शिकू या.