आज ३१ डिसेंबर. २०२२ या वर्षाचा अखेरचा दिवस. या दिवशी सरत्या वर्षाला हसत खेळत निरोप द्यायचा आणि रात्री बाराच्या ठोक्याला नव्या वर्षाचे नव्या उत्साहात स्वागत करायचे हा जगभरातला प्रघात. तो आपण पाळणार आहोतच. सरत्या वर्षाला ‘बाय बाय’ करून येत्या वर्षाला ‘हॅपी न्यू इयर’ म्हणणार आहोतच. मात्र, या वर्षाचे स्वागत करत असताना आपल्याला नववर्षात सावध राहण्याचाही सल्ला द्यावा लागणार आहे. उत्साहाने फसफसलेल्या या दिवशी हा इशारा देणे काही आनंदाचे नाही. पण नवे वर्ष आणि त्यानंतरचा भविष्यकाळ सुखाचा, समाधानाचा व्हायचा असेल, तर २०२३ सालातल्या हाका सावधपणे ऐकाव्याच लागतील.
यातला एक विषय अर्थातच राजकीय आहे. २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम आधीच वाजू लागले आहेत. छोट्या मोठ्या सर्व निवडणुका हिरीरीने लढवणे, त्या काहीही करून जिंकणे, न जिंकल्यास जिंकलेल्यांना ईडी-सीबीआयची छडी किंवा खोके दाखवून आपल्यात आणणे आणि संपूर्ण देशावर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित करणे, या एकमेव ध्येयाने पछाडलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्ष २०१९ सालापासूनच या निवडणुकांच्या तयारीला लागला असेल. या २०२४च्या पोटात काय दडलेले असेल, याचे सूचन २०२३ सालातल्या देशात वेगवेगळ्या भागांमध्ये होणार्या निवडणुकांमधून घडणार आहे. देशाची भविष्याची दिशाच या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे.
यातल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या निवडणुका आहेत मुंबई आणि परिसरातील महानगरपालिकांच्या निवडणुका. मुंबई ही दिल्लीच्या राज्यकर्त्यांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. दिल्लीवर थेट आपली पकड असली पाहिजे, असा प्रयत्न दिल्लीतल्या सगळ्या सत्ताधार्यांनी केला. पण, मुंबईतील मराठी माणसाच्या एकजुटीची वङ्कामूठ शिवसेनेच्या रूपाने जिवंत असल्याने त्यांचे मनसुबे तडीला जात नव्हते. मुंबईमध्ये मराठी टक्का कमी आहे, अन्यप्रांतीय टक्का अधिक आहे, याचे भांडवल करून मुंबईवर महाराष्ट्राचा अधिकारच कसा नाही, असे सांगणारे बोलके पोपट दिल्लीत आणि देशात कमी नाहीत. खरेतर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मुंबईवर फक्त आणि फक्त महाराष्ट्राचाच अधिकार कसा आहे आणि मुंबईवर दावा सांगणारे अन्यप्रांतीय कसे ब्रिटिशांनी येथे व्यापारासाठी आणून, सवलती देऊन वसवले आहेत, हे साधार सिद्ध करणारा तब्बल १०० पानांचा युक्तिवाद केला होता. ‘मार्मिक’ने या युक्तिवादावर आधारित चार भागांतील प्रदीर्घ लेख क्रमश: प्रसिद्ध केला आहे. तो प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक मुंबईकराने वाचला पाहिजे. मुंबईवर सत्ता प्रस्थापित करून मुंबई महाराष्ट्रात ठेवूनही महाराष्ट्रापेक्षा वेगळी करण्याचे कारस्थान सहज तडीला जाऊ शकते. नंतर राज्यकारभाराच्या सोयीचे कारण पुढे करत मुंबईसह विदर्भ, मराठवाडा यांनाही वेगळे करण्याचा डाव पुढे येऊ शकतो.
देशाच्या राजकारणात दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्याची धमक फक्त तीन प्रांतांत राहिली आहे. पश्चिम बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वाधिक योगदान असलेल्या या राज्यांनी कायम दिल्लीकरांवर अंकुश ठेवला आहे. त्यामुळेच ही राज्ये दिल्लीकरांच्या नजरेत कुसळासारखी खुपत असतात. महाराष्ट्राचे तुकडे पाडून तो शबल करण्याचे कारस्थान तडीला न्यायचे असेल तर महाराष्ट्रद्वेष्ट्यांना आधी मुंबईपासून सुरुवात करावी लागणार आहे. सरत्या वर्षात शिवसेनेतील गद्दारांना फोडून, मिंधे करून, राज्यातील लोकप्रिय महाविकास आघाडी सरकार सत्तेतून खाली खेचून तथाकथित ‘महाशक्ती’ने या दिशेने सुरुवात केली आहे. मुंबई आणि एमएमआरडीए परिसरातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत सामदामदंडभेद अशी सगळी हत्यारे वापरून या परिसरावर कब्जा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील सध्याच्या बेकायदा सरकारचे जनक करणार आहेतच. मुंबईकरांनी आणि मराठीजनांनी सावध राहण्याची गरज आहे. या निवडणुकांबरोबरच कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशासह ईशान्येकडील राज्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपला मात मिळाली, तर २०२४चे चित्र वेगळे असेल.
२०२२ हे वर्ष सरत असताना मावळता सूर्य सगळ्या जगावरच पुन्हा एकदा कोरोनाचे सावट ठेवून अस्तंगत होणार आहे. वर्ष संपत आले असताना चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्याच्या बातम्या येत आहेत. अमेरिका, ब्राझील यांच्यासह अन्य काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने डोके वर काढल्याचे चित्र आहे. कोविड १९च्या पहिल्या लाटेच्या वेळी नमस्ते ट्रम्पसारखे अनावश्यक इव्हेंट आणि मध्य प्रदेशातील सरकारच्या पाडापाडीत मग्न राहिलेल्या केंद्रसत्तेने विमान प्रवाशांची कडक चाचणी करायला विलंब केला आणि हा विषाणू भारतात शिरला. सगळ्या देशाला त्याने लॉकडाऊनच्या बेड्यांमध्ये जखडले. आताही गुजरातसह अन्य निवडणुकांची धामधूम संपल्यानंतर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला अपशकुन करण्यासाठी सत्ताधार्यांना कोरोनाची आठवण झाली आहे. संसदेत मास्क घालून येणारे पंतप्रधान संध्याकाळी लग्नात विनामास्क हास्यविनोद करताना दिसतात, तेव्हा त्यातून जनतेने काय संदेश घ्यायचा? कोविडचे संकट राजकारणासाठी वापरण्याइतके हलके नाही. कोविड हा सर्दीतापाचा प्रकार नाही, तो शरीरसंस्थात्मक आजार आहे. अनेक भारतीयांना तो होऊन गेलेला असल्याने हर्ड इम्युनिटी वाढून आपण सुरक्षित झालो आहोत, असा भ्रम बाळगणे आणि सौम्य लक्षणांमुळे हा आजारच सौम्य मानणे प्राणघातक ठरू शकते. कोविडच्या पहिल्या लाटेच्या वेळी कुटुंबप्रमुखाच्या आस्थेने आणि वडीलकीच्या नात्याने महाराष्ट्राला आधार आणि दिलासा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर होते, राजेश टोपे यांच्यासारखा अथक कष्ट उपसणारा आरोग्यमंत्री राज्याला लाभला होता. आता ‘करोना कधीच हद्दपार झाला आहे’ असे बिनदिक्कत सांगणारे हाफकिन-मित्र आरोग्यमंत्री आहेत आणि जे स्वत:च महाशक्तीच्या तकलादू आधारावर लडखडत उभे आहेत, असे मिंधे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा आपली आपणच सावधगिरी बाळगलेली बरी!