ग्रहस्थिती : गुरू, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, रवि-बुध सिंह राशीत, शुक्र कर्क राशीत, मंगळ-बुध सिंहेत, प्लूटो मकर राशीमध्ये, केतू तूळ राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीमध्ये, मंगळ कन्या राशीत. विशेष दिवस : २९ सप्टेंबर प्रौष्ठपदी पौर्णिमा, २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी.
मेष : व्यवसायात नवा मार्ग शोधत असाल तर तो सापडेल. व्यावसायिक वृद्धी झाल्याने आर्थिक बाजू भक्कम राहील. घरासाठी अचानक काही खर्च करावा लागू शकतो. नोकरीत समतोल ठेवून काम करा. कामानिमित्ताने बाहेरगावी जावे लागू शकते. काही मंडळींना बंधू, मामा, मावशी यांच्याकडून चांगले सहकार्य मिळेल. सोशल मीडियावर वावरताना काळजी घ्या. सामाजिक कामासाठी भरपूर वेळ खर्च होईल. धार्मिक कार्यासाठी दान-धर्म होईल. मुलांकडे विशेष लक्ष द्या.
वृषभ : तरूण मंडळींना नव्या शैक्षणिक संधी उपलब्ध होतील. शिक्षणक्षेत्रात मानसन्मान होईल. कलाकार, संगीतकार, चित्रकारांना नव्या संधी मिळतील. जमीनजुमल्याच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. नवे घर घेण्याचा विचार पुढे जाईल. कुटुंबासाठी वेळ द्याल. नोकरीत कामाचे वेळापत्रक पाळा, आजचे काम उद्यावर ढकलू नका. मित्रांबरोबर वावरताना, बोलताना काळजी घ्या, जुना वाद डोके वर काढू शकतो. कमी बोला आणि जेवढ्यास तेवढे ठेवा. व्यावसायिकांचे जुने येणे वसूल होईल.
मिथुन : अडकून राहिलेली सरकारी कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांच्या विस्ताराच्या योजनांना गती मिळेल. प्रेमप्रकरणातून डोकेदुखी वाढेल. नोकरीत ठिकाणी वरिष्ठांचा रोष ओढवून घ्याल. बदलीचे प्रसंग घडू शकतात. मौज-मजेवर खर्च टाळा. वाहन जोरात दामटू नका, अपघाताला निमंत्रण द्याल. सकारात्मक विचार करा, त्याचा चांगला होईल.
कर्क : काही मंडळी प्रसिद्धीच्या झोतात येतील. मोठे सामाजिक कार्य घडेल. तरुणांचा भाग्योदय करणार्या घटना घडतील. व्यावसायिकांना अच्छे दिन अनुभवायला मिळतील. अचानक धनलाभ होईल. कौटुंबिक कामासाठी भरपूर वेळ खर्च होईल. व्यावसायिकांची थकीत येणी वसूल होतील. नोकरीत काम वाढल्याने धावपळ होईल. तिचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. हाडाचे दुखणे त्रास देऊ शकते.
सिंह : नोकरीत कामाची नवीन संधी मिळेल. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कर्ष घडवून आणणारा काळ. नवीन नोकरीची संधी गवसेल. व्यावसायिकांना स्पर्धात्मक यश मिळेल. लेखक, पत्रकारांना प्रसिद्धी मिळवून देणारा काळ आहे. सोशल मीडियावर काळजी घ्या, मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. तरुणांना नवी दिशा मिळेल. मित्रांना उधारउसनवारीने पैसे देणे टाळा. ज्येष्ठांच्या आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील.
कन्या : व्यावसायिक, नोकरदारांना आर्थिक नियोजन करावे लागेल. अति आत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. मोठी चूक घडू शकते. मुलांच्या विदेशातील शिक्षणाचा विषय मार्गी लागेल. कुटुंबाबरोबर प्रवासाला जाल, पण, त्यात बेरंग होऊ शकतो. नोकरदारांनी डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे. नातेवाईकांशी बोलताना चेष्टामस्करी नको, गैरसमज निर्माण होऊ शकतात. तरुणांना यशदायक काळ. व्यावसायिकांना सप्ताहाअखेरीस यश मिळेल.
तूळ : घरात आनंदाचे वातावरण राहील. शुभघटना कानावर पडेल. काहींना मोठे आर्थिक लाभ मिळतील. नोकरीत वरिष्ठांच्या बोलण्याला विरोध करू नका. मत व्यक्त करू नका. नाकासमोर चाला. सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नकाच. कौटुंबिक जीवनात शब्दाने शब्द वाढेल. तिथेही प्रतिक्रिया देणे टाळा. छांदिष्टांना नव्या संधी उपलब्ध होतील. मेडिकल क्षेत्रात उत्तम काळ. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : काही दिवसापासून निर्णय घेण्यात अडचण निर्माण झाली असेल तर आता त्याचे पर्याय उपलब्ध होईल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. एखादी नवी जबाबदारी मिळेल. मुलांची काळजी घ्या. ज्येष्ठांना विरोध करून पुढे जाऊ नका. भागीदारीत कुरबुरीचे प्रसंग घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे पद मिळू शकते. घरात खर्च वाढवणारे प्रसंग निर्माण होतील. गर्भवती महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
धनु : आर्थिक नियोजनात चूक करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीत बाहेरगावी जाण्याची संधी मिळेल. घरासाठी भरपूर वेळ द्याल. कामाचा झपाटा वाढेल. व्यावसायिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, उत्साह वाढेल. नव्या योजना आकार घेतील. आर्थिक ओघ वाढेल दिसेल. काही मंडळींना मनासारखी नोकरी मिळेल. दाम्पत्यजीवनात आनंद मिळेल. जुन्या गुंतवणुकीमधून लाभ मिळेल.
मकर : नोकरीत चांगली स्थिती राहील. बढती, पगारवाढीचे योग आहेत. शेती व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. मौजमजेवर वेळ खर्च होईल. व्यावसायिकांना नव्या ऑर्डर मिळतील. कलाकारांचा मानसन्मान होईल. सामाजिक क्षेत्रात चांगला अनुभव येईल. व्यावसायिकांना कामानिमित्ताने प्रवास करावा लागेल. त्यात चोरी-नुकसानीचे प्रकार घडतील, सावध राहा.
कुंभ : मनासारख्या घटना घडतील, कामाचा उत्साह वाढेल. रिसर्च, मेडिकल या क्षेत्रात उत्तम काळ. पर्यटनाला जाण्याचे प्लॅन निश्चित कराल. नव्या ओळखीमुळे अडकलेले काम मार्गी लागेल. संततीकडून शुभवार्ता कानी पडेल. कलाकार, पत्रकारांसाठी उत्तम काळ राहील. उधार-उसनवारी देणे टाळा. काहींना अनपेक्षित धनलाभ होतील.
मीन : कोणतेही महत्वाचे निर्णय घेणे टाळा. आर्थिक फटका बसू शकतो. कलाकार, खेळाडू, लेखक, संगीत सर्जकांसाठी काळ चांगला राहील. शुभघटना कानावर पडू शकते. नोकरीच्या ठिकाणी थोडी काळजी घ्या, व्यावसायिक क्षेत्रात कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे प्रकृतीवर ताण येऊ शकतो. कुटुंबामध्ये वावरताना सबुरीने घ्या. भूलथापांना बळी पडून फसव्या प्रलोभनात अडकू नका. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. बंधूवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा.