जेव्हा-जेव्हा शिवसेनेवर संकट कोसळले तेव्हा-तेव्हा संकटाशी मुकाबला करून शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याचे काम पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. एखाद्या शांत, संयमी आणि धीरोदात्त सेनानीप्रमाणे ते शिवसैनिकांना लढण्याचे बळ देतात. एकाच वेळेस शिवसेनेच्या ४० आमदारांनी स्वार्थासाठी, लालसेपोटी पक्षप्रमुखांची साथ सोडली. त्यामुळे शिवसेनेवर संकट कोसळले असले तरी संकटाला संधी मानणारे उद्धव ठाकरे हे निष्ठावंत शिवसैनिक, मराठी माणूस यांच्या पाठिंब्यावर शिवसेना मजबूत करतील आणि निवडणुकीत घवघवीत यश संपादन करतील. गेल्या २० वर्षांचा शिवसेनेचा इतिहास हेच सांगतो.
२००३ साली एक ऐतिहासिक घटना घडली. महाबळेश्वरच्या शिवसेनेच्या शिबिरात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पक्षाच्या घटनेत दुरूस्ती करून प्रथमच ‘कार्यप्रमुख’ हे पद निर्माण करण्यात येऊन या कार्यप्रमुखपदाची जबाबदारी मा. उद्धवजींच्या खांद्यावर सोपविली गेली. तशा २००३ सालापूर्वी अनेक संघटनात्मक जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या होत्या. १९८९ साली सुरू झालेला ‘सामना’ आणि १९९५ साली महाराष्ट्रात स्थापन झालेले ‘शिवशाही’ सरकार या दोघांच्या जडणघडणीत उद्धव ठाकरेंचे योगदान मोलाचे होते. आता कार्यप्रमुखपदाची ही नवीन जबाबदारी त्यांच्यावर आली होती. कार्यप्रमुखपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांना शेतीतील काय कळते, असा आरोप त्यांच्यावर तेव्हा होत होता. त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘मला शेतीतले काही कळत नाही, परंतु मला शेतकर्यांच्या वेदना कळतात, त्यांच्या डोळ्यातील अश्रू व भावना कळतात.’ खर्या अर्थाने उद्धवजींनीच शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी तेव्हा लढा दिला. शेतकर्यांच्या डोक्यावरील कर्ज कायमचे काढून त्यांचा सात बारा कोरा करणार, असे आश्वासन वेळोवेळी केलेल्या भाषणामधून त्यांनी दिले. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आश्वासनाच्या पूर्ततेसाठी ठोस पावले उचलली. त्यांनी करून दाखवलं.
२००५ आणि २००६ साली संघटनेच्या अंतर्गत धुसफुशीला, फाटाफुटीला उद्धवजींना सामोरे जावे लागले. आधी नारायण राणे मग राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यावेळी त्यांच्यावर नाना आरोप झाले. उद्धवजी शिवसेना संपवणार, सेना संपली, अशी चोहो बाजूंनी टीका केली. त्यांच्या कार्यशैलीबद्दल व नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. राणे आणि राज बाहेर पडल्यानंतर उद्धवजींच्या नेतृत्वाचा कस लागणार होता. त्यांना कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळाली. श्रीवर्धन विधानसभा पोटनिवडणूक आणि रामटेक लोकसभा पोटनिवडणूक जिंकून त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आणि नेतृत्वाची पकड घट्ट केली. त्यानंतर २००७, २०१२ आणि २०१७च्या मुंबईसह अनेक महानगरपालिकेत त्यांनी शिवसेनेला घवघवीत यश मिळवून दिले. त्यावेळेसही करून दाखवलं.
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यावेळेस देखील उद्धवजी शिवसेनेचे नेतृत्व सांभाळू शकणार नाहीत, बाळासाहेबांच्या पश्चात त्यांना जबाबदारी पेलवणार नाही, उद्धव म्हणजे बाळासाहेब नाहीत, बाळासाहेबांप्रमाणे उद्धवजींचा आदेश शिवसैनिक मानणार नाहीत, अशा एक ना अनेक शंका-कुशंकांचे काहूर राजकीय विश्लेषक व विरोधकांनी माजवले. या सर्वांवर मात करीत ते शांत व संयमी राहून कार्यरत राहिले. निवडणूक आयोगाच्या संघटनात्मक घटनेनुसार २३ जानेवारी २०१३ रोजी उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून घोषित झाले. त्यांची घोडदौड सुरू झाली. एका धीरोदात्त सेनानीप्रमाणे त्यांनी शिवसैनिकात जोश निर्माण केला आणि शिवसेनेला वाढवले, एक पाऊल पुढे नेले.
भाजपाने २०१४चा विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी २५ वर्षांची युती तोडली आणि शिवसेनेला एकटे पाडले. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढण्यास सज्ज झाली. पक्षप्रमुखांनी या संकटाचे संधीत रूपांतर केले. भाजपाच्या महायुतीचे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, डझनभर केंद्रीय नेते, अनेक राज्यातील मुख्यमंत्री भाजपाने निवडणूक प्रचारात उतरवले, तर दुसरीकडे उद्धवजी हे शिवसेना नेते, पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक यांच्या बळावर निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने मैदानात उतरले. उद्धवजींनी एकहाती निवडणूक लढवून शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले आणि पुन्हा चमत्कार करून दाखवला.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सहज बहुमत मिळेल याची शाश्वती नव्हती. या निवडणुकीपूर्वी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्री गाठली. सेनेने भाजपाची अडचण समजून घेऊन २०१९ची लोकसभा निवडणूक भाजपाबरोबर एकत्र लढवली. केंद्रात भाजपाला घवघवीत यश मिळाले. महाराष्ट्रात महायुतीचे ४२, त्यात शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. शिवसेनेला अवघे एक केंद्रीय मंत्रिपद देऊन भाजपने पुन्हा बोळवण केली. ऑक्टोबर २०१९ची विधानसभा निवडणूक शिवसेना महायुतीत लढत असतानाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास कार्यकर्त्यांना उद्धवजींनी दिला. विधान भवनावर शिवसेनेचा भगवा फडकवणारच आणि वडिलांना दिलेले वचन पूर्ण करणारच असा निर्धार केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक बसवणारच असा निश्चय केला. या निश्चयाच्या पूर्ततेसाठी उद्धवजी निवडणुकीला सामोरे गेले. शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आणले.
भाजप दिलेल्या वचनाला जागला नाही. मग पर्यायी राजकीय हालचाली सुरू झाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करून त्याचे नेतृत्व उद्धवजींकडे सुपूर्द केले. सर्व राजकीय गणित जुळली. किमान समान कार्यक्रम आखला गेला आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे प्रथम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत शपथ घेतली. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष पूर्ण केले. त्या काळात महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले, त्याची पूर्तता करण्यासाठी दमदारपणे पावले उचलली. महाराष्ट्रातील तीस लाखांपेक्षा जास्त शेतकर्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली. १० रुपयात जेवणाची थाळीचे शिवभोजन केंद्र सुरू केले. हजारो गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरे, पोलिसांना हक्काची घरे आणि बीडीडी चाळीचा पुनर्विकासाचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व आस्थापनात ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरीसाठी सक्तीचा कायदा केला. महाराष्ट्रातील सर्व शाळात १२वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली. स्थानिक स्वराज्य संस्थांतील सर्व कारभार मराठीतून करण्याचा आणि आस्थापनावरील पाट्या मराठीतूनच असाव्यात असा आदेश काढला. मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे फक्त पाठपुरावा करून न थांबता लोक चळवळ उभारली. मुंबईत मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन केले. मुंबई पश्चिम उपनगरात मेट्रो रेल्वेचा एक टप्पा सुरू केला. जेव्हा पाहिजे तेव्हा निर्बंध घट्ट करून अंमलबजावणी केल्यामुळे महाराष्ट्र सरकारला कोरोना महामारी नियंत्रणात ठेवण्यात यश आले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राबवले. कोरोनाच्या संकटातही चौफेर विकास केला. कोरोनाच्या संकटाचे संधीत रुपांतर करून उद्धवजी ठाकरे यांनी कोरोना काळातही राज्याचे अर्थचक्र थांबू दिलं नाही. त्यांनी मुख्यमंत्रीपदी अतुलनीय कामगिरी करून दाखवली.
२९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ‘वर्षा’ बंगला सहकुटुंबासह तात्काळ सोडला. कुठल्याही मोहाने त्यांना विचलित केले नाही. ते २०१९ साली झालेल्या एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. मुख्यमंत्रीपदाची लालसा, महत्वाकांक्षा वा मोह कधीच नव्हता. आताही कोण गेले, किती गेले याचा विचार न करता उद्धवजींनी शिवसेना खासदार, आमदार, जिल्हासंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन शिवसैनिकांना धीर दिला. लोकांचे काम करण्यासाठी नवीन ऊर्जा दिली. आमदार गेलेत परंतु जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, सामान्य शिवसैनिक आणि मराठी माणूस शिवसेनेसोबत आहे, असा विश्वास उद्धवजींनी निर्माण केला.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी त्यांच्या राजकीय परिस्थितीवर कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडताना म्हटले की, मी अपक्ष आमदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत प्रथमपासून आहे आणि पुढेही राहीन. शिवसेना आक्रमक पक्ष आहे. त्याचे नेतृत्व जर इतर कुणाच्या हातात असेल तर आतापर्यंत महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहिले असते. मात्र उद्धवजी खूप शांत, संयमी व समंजस व्यक्ती असल्याकारणाने या भयंकर परिस्थितीतही शांततेने आणि संयमाने पक्षाचे नेतृत्व करीत आहे.
बाळासाहेब नेहमी म्हणायचे, ‘‘जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा आपण शांत राहायचे आणि जेव्हा बाहेर शांतता असेल तेव्हा आपण वादळ निर्माण करायचं.’’ महाराष्ट्रातील या राजकीय वादळाशी उद्धवजी हे शांत, संयमी आणि धीरोदात्तपणे मुकाबला करीत आहेत. उद्धवजी जेव्हा भविष्यात वादळ निर्माण करतील तेव्हा ही गद्दार मंडळी आणि विरोधक पालापाचोळ्याप्रमाणे उडून जातील.