प्रबोधनकारांचे शब्द म्हणजे आगच. फारच दुर्लक्षित असलेल्या आणि अगदी सुरुवातीच्या काळातल्या `कुमारिकांचे शाप` या छोट्या पुस्तकातले शब्दही त्याला अपवाद नाहीत.
– – –
प्रबोधनकारांचे विचार हे निखारेच होते. तो काळच तसा होता. चटका लागल्याशिवाय युगानुयुगे अन्याय अंगवळणी पडलेला समाज बदलण्यासाठी तयारच होत नव्हता. त्यांना प्रबोधनकारांसारखेच ज्वलंत विचारांची गरज होती. आजही हा विचार महत्त्वाचा आहे. आता तेव्हासारखे जरठबाला विवाह होत नाहीत, बालविधवा नाहीत आणि त्यांचे हालही नाहीत. विधवांवरचे अन्यायही खूप कमी झालेत. मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलंय. त्या स्वतःच्या पायावरही उभ्या राहिल्यात. पण म्हणून मुली म्हणून होणारा अन्याय संपलाय असं कुठेय? आजही हुंडा आहेच. बालविवाह संपलेत असं नाहीच. स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण धडकी भरवणारं आहे. त्यामुळे हुंड्याच्या निमित्ताने महिलांविषयी अत्यंत आधुनिक दृष्टिकोन मांडणार्या `कुमारिकांचे शाप` या पुस्तकातले खाली दिलेले उतारे आजही महत्त्वाचे ठरतात.
‘सध्याच्या वधुपरीक्षणाच्या पद्धतीने आम्ही आमच्या कुमारिकांना वेश्या बनवीत आहोत, असे जे एका आधुनिक नाटककाराने जळफळून उद्गार काढले आहेत ते सर्वस्वी खरे आहेत, यांत मुळीच संशय नाही. हिंदु स्त्रियांच्या पातिव्रत्याबद्दल आणि त्यांच्या शालीनतेबद्दल मोठमोठी पुराणे झोडणारे आम्ही लोक त्याच स्त्रियांच्या कौमार्यावस्थेत, त्यांच्या विवाहनिश्चयाच्या वेळी त्यांचे वाटेल तितक्या वेळा, वाटेल त्या तरुणांपुढे वाटेल तसे खेचून आणून वधुपरीक्षणाच्या नावाखाली वेश्यांच्या पानपट्टीसारखे घाणेरडे प्रदर्शन करतो, त्या कुमारिकांच्या निष्कलंक मनोवृत्ती नष्ट करण्यास कारणीभूत होतो.’
‘या एका हुंडापातकामुळे आम्ही अनेक दोषांचा प्लेग आमच्या समाजक्षेत्रांत आम्ही होऊन आणला असून त्याच्या बाधेने आजपर्यंत लाखो कुटुंबांचा सत्यानाश झालेला व होत असलेला आम्ही उघड्या डोळ्यांनी पहात आहोत. तेव्हा धन्य आमच्या धर्माच्या औदार्याची आणि धन्य आमच्या उदार मनोवृत्तीची!’
‘हुंडा हा ब्राह्मविवाहाचा आत्मा आहे असे जर सुशिक्षित तरुणांना खरोखरच वाटत असेल, तर बेहत्तर आहे कोणी आम्हाला प्रत्यक्ष ईश्वरद्रोही म्हटले तरी. आम्ही असे ठणकावून सांगतो की धिक्कार असो त्या स्मृतींना, त्या धर्मशास्त्रांना आणि त्या आमच्या शिक्षणाला!!!’
‘ही घाणेरडी खरकटी काढून टाकून हिंदु समाजाचे वैवाहिक क्षेत्र स्वच्छ करण्याची सद्बुद्धी जर आमच्यात अजूनही जागृत व्हावयाची असेल, तर पाश्चात्य राष्ट्रे आम्हाला त्यांच्या पायतणाचीही किंमत देत नाहीत आणि आमच्या राष्ट्रीय चळवळींना ‘साबणाचा फेस’ समजतात, ते खरोखरच वावगे नाही. स्वतःच्या तोंडावरच अनेक सामाजिक जुलमांचा चिखल लागलेला असताना राष्ट्रीय स्वातंत्र्याची मागणी करायला जेव्हा आम्ही जातो, तेव्हा आमच्या मूर्खपणाची डिग्री किती अंशापर्यंत उंच चढली आहे हे दाखवायला परमेश्वराने आता एक नवीन मूर्खोमीटर यंत्र काढले पाहिजे खास!’
‘शेदीडशे कवड्यालाही महाग असलेल्या मुलीच्या बापाने एवढा हुंडा कसा आणि कोठून आणून द्यायचा? बरं, मुलीला तर अविवाहित ठेवता येत नाही असे पडले धर्मशास्त्र! तेव्हा काय करणार बिचारा! प्रसंगाकडे लक्ष देऊन अपत्यप्रेमास रजा देतो आणि डोळे मिटून पाऊणशे वयोमानाच्या जिवंत प्रेताच्या गळ्यात आपली कोवळी पोरगी खुळा बांधून मोकळा होता. त्याचप्रमाणे विषयवासना अनिवार म्हणून म्हणा, पुत्र नसला तर नरकात पडण्याची धर्मशास्त्र्यांनी दिलेली तंबीवजा भीती टाळण्यासाठी म्हणा, किंवा आपल्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करण्यासाठी म्हणा, एकामागून एक अशी अनेक लग्ने करून एकाच घरात छप्पन सवतींचे सवते सुभे निर्माण करणार्या नित्यनव्या नवरदेवाला आपली मुलगी देणारे लोक म्हणजे हुंडा देण्यास असमर्थ असलेले मुलींचे बापच होत.’
‘समजू लागल्या दिवसापासून गुणसंपन्न, प्रेमळ आणि तरूण पतीची अपेक्षा करीत राहिलेल्या गरीब कुमारिकेवर बापाच्या दरिद्री परिस्थितीमुळे अवचित एखाद्या जख्खड थेरड्यापुढे किंवा पूर्वीच्या जिवंत नऊ बायकांच्या तांड्याच्या यजमानापुढे त्याची पत्नी म्हणून उभे रहाण्याचा प्रसंग आला असता त्या बिचारीच्या मनाची स्थिती काय होत असेल याची कल्पना जावे त्याच्या वंशा तेव्हां कळे! वांद्र्याच्या कसाईखान्यात दररोज शेकडो गाईंचा गोवध होतो म्हणून आपण हिंदू लोक– हातात सत्ता नसताही– वर्तमानपत्रांतून आणि व्याख्यानांतून केवढ्या जोराने व किती त्वेषाने आपला संताप व्यक्त करतो. परंतु तेच आम्ही अन्यायद्वेष्टे आणि न्यायप्रिय हिंदू लोक आमच्याच हातांनी हजारो मुग्ध कुमारिकांना विषमविवाहाच्या प्रचंड शिळेवर ताडकन् आपटून त्यांच्या आयुष्याची माती करताना मात्र एखाद्या विवेकी साधूप्रमाणे संतापाचा जोर मनातल्या मनात दडपून, उलट शुभमंगल सावधान म्हणून दात काढून टाळ्या पिटतो!! हे गौडबंगाल नव्हे काय?’
‘एखाद्या श्रीमंत रावसाहेबाची किंवा निदान खाऊन पिऊन सुखी असणार्या ऐदोपंताची पहिली बायको त्याच्या ३५व्या वर्षी मेली की तिच्या तेराव्याला पंधरा दिवस होतात न होतात तोच दहा बारा वर्षांची कुमारिका त्याला बायको मिळते. पाचएक वर्षांत ती बिचारी भरल्या मळवटाने मरते न मरते तोच तिसरी अप्रौढ कुमारिका हातात माळ देऊन त्याच्यापुढे ढकलण्यात येते. अशी ही लग्नाची आवृत्ती कम्ाीत कमी पाच सहा वेळा भोगण्याचे ऐश्वर्य पुष्कळांनी प्राप्त करून घेतल्याची उदाहरणे प्रत्येक आळीत आणि गल्लीतही दाखविता येतील.’
‘सध्या या वरदक्षिणेचे हुंड्यांत झालेले रूपांतर पाहिले म्हणजे मुलीच्या बापाकडून उकळविलेली रकम ही नवरे-मुलाच्या पौरुषत्वाची किंमत किंवा अधिक स्पष्टच सांगायचे म्हणजे त्यांच्या पुरुषपणाची किंमत म्हणणे अधिक वाजवी होईल. कारण पौरुषत्वाची किंमत घेतो म्हणणार्यांना आपल्या स्वतःची आणि आपल्या मुलाची पौरुषत्वाच्या ताजव्यात काय किंमत होईल याची पूर्ण जाणीव नसते असे नाही; तेव्हा ही मुलाच्या पुल्लिंगत्वाचीच किंमत होय, असे कबूल केल्याशिवाय त्यांची सुटका नाही. बरे, पौरुषत्वाची किंमत असे जरी घटकाभर गृहित धरले, तरी ज्या मानाने ती उकळली जाते, त्या मानाने पौरुषत्वाचा प्रभाव निदान आमच्या महाराष्ट्रांत तरी मुळीच दिसत नाही. महाराष्ट्रात पौरुषत्व शिल्लक आहे हे वाटेल तर नाटकगृहात राणा भीमदेवाचा प्रयोग करताना म्हणा किंवा भगवा झेंडा, शिवाजी महाराज, जरीपटका वगैरे शब्दप्रयोगांची रेळवेळ करून मनोवृत्ती खवळून सोडणार्या वत्तäयाच्या व्याख्यानांत टाळ्या पिटताना म्हणा; पण टाळ्या पिटून बाहेर पडल्यावर काय आहे? तात्पुरती चेतना आणि तात्पुरतेच ते नाटकी पौरुषत्व! याच्या पलीकडे आमच्या महाराष्ट्रात काहीही उरलेले नाही.’
‘साठी उलटून गेल्यावरसुद्धा निर्लज्जपणाने दशवर्षा कुमारिकेचे पाणिग्रहण करणार्या एका पंडिताचार्याने ‘‘माझे स्वतःचे वर्तन शुद्ध रहावे म्हणून लोकापवादाचे तीक्ष्ण प्रहार सहन करूनही मी हा विवाह केला,’’ असे नाही का नुकतेच जाहीर उद्गार काढले? हे उद्गार एखाद्या विधवेला काढता आले असते काय? पण आचार्य पडले पुरुष. त्यांना निसर्गाचा नियम किंचित टोचू लागला मात्र, त्यांनी ताबडतोब आपल्या ईश्वरदत्त सनदेची मागणी अंमलात आणली. नीतिमत्तेची एवढी काळजी करणार्या आणि स्वतःचे वर्तन परीटघडीप्रमाणे रहावे म्हणून पाउणशे वयमानातसुद्धा कोवळ्या कुमारिकेशी लग्न लावणार्या या विद्वान पंडितांनासुद्धा जर स्वतः संन्यस्त वृत्तीने राहणे जड जाते, तर त्यांनीच मुग्ध अननुभवी कुमारिकांपासून यावज्जन्म संन्यस्त वृत्तीची अपेक्षा करावी, हे आश्चर्य नव्हे काय? निसर्गाचे नियम पुरुषांना मात्र लागू आणि स्त्रियांना नाही, असे थोडेच आहे?’
‘पुरुषवर्ग जर कोणत्याही क्षेत्रांत तुमच्याविरुद्ध दांडगाई करू लागेल किंवा तुमच्या हक्कांची पायमल्ली करण्याकरिता जुलमी रीतीने वागू लागेल तर त्याचा प्रतिकार करून त्याला ताळ्यावर आणण्याची कामगिरी सहजच तुमच्याकडे येत आहे. बिकट परिस्थितीचे अभेद्य पर्वत निश्चयाच्या नुसत्या मुसंडीने चक्काचूर करण्यात स्त्रीजाती किती निष्णात असते हे जिजाबाईने आणि अहल्याबाईने सिद्धच केले आहे. तुमच्यासारख्या देवतांना या हुंडारूपी महिषासुराचे मर्दन करावयास मुळीच जड जाणार नाही, अशी माझी खात्री आहे. हृदयात त्वेषाचा जोर होऊन तुमच्या वक्र भृकुटीवर निश्चयाचे निशाण फडकू द्या मात्र, गेली ५-६० वर्षे मोठमोठ्या धनुर्धरांची हबेलंडी उडविणारा हा हुंडा राक्षस ठिकच्या ठिकाणी मरून पडेल.’
‘आता, वधुपक्षाने आपल्या नरड्याला लागलेली हुंड्याची तात तोडण्याकरिता मुलींच्या लग्नवयाची मर्यादा दूर झुगारून दिली पाहिजे आणि पूर्वीच्या धर्मशास्त्राज्ञेप्रमाणे वराकडून मुलीला मागणे येईल तेव्हाच तिचे लग्न करायचे; एरवी आपण होऊन धडधडीत शास्त्राच्या हेतुविरुद्ध वराच्या शोधाकरिता मुळीत तंगडतोड करायची नाही, असा कायमचा संकल्प केला पाहिजे. वराकडून मागणी आल्यावाचून माझ्या मुलीचे लग्न मला कर्तव्य नाही, असा दृढ संकल्प मुलीच्या बापांनी केल्याशिवाय हुंड्याचा प्रघात मोडणे शक्य नाही. वधुच्या वयोमर्यादेच्या मनुष्यकृत आणि स्वार्थपाचित नियमापुढे मेंढराप्रमाणे मान न वाकविता मुली आपल्या बापांच्या घरी अविवाहित राहिल्या तर त्यात काही विशेष बिघडणार नाही.’
‘आजन्म अविवाहित राहून मी स्वराष्ट्रसेवा किंवा समाजसेवा करीत राहीन अशी जर तरुणांना प्रतिज्ञा करून राहता येते, तर कुमारिकांनाच ते का करता येऊ नये? काय समाजसेवा करणार्या सुशिक्षित कुमारिका आजला नाहीत? का पूर्वी कधीकाळी नव्हत्याच? गार्गी, सुलभा, वडवा या वेदकालीन वेदांच्या ऋचा रचणार्या स्त्रिया कोण होत्या? महाभगवद्भक्त मीराबाई आणि ज्ञानोबांची बहीण मुक्ताबाई या आमरण कुमारिकाच होत्या ना? आता आमच्या सगळ्याच कुमारिका मीराबाई, मुक्ताबाई जरी निपजल्या नाहीत, तरी अविवाहित राहणे हे कोणत्याही दृष्टीने पातक नसून, त्यांना समाजसेवेचे अनेक मार्ग सध्या खुले झालेले आहेत; त्यांपैकी ज्या मार्गात त्या शिरतील त्यात आमच्या महाराष्ट्रीय कुमारिका पुरुषांपेक्षाच नव्हे, पण इतर सर्व भारतीय महिलावर्गापेक्षा कांकणभर सरस कामगिरी करून दाखविल्याशिवाय खास राहणार नाहीत, अशी आमच्याच महाराष्ट्रीय इतिहासाची ग्वाही आहे. भगिनींनो, तुमच्या वैवाहिक संस्कारांत घुसलेल्या या हुंडाराक्षसाचे मर्दन करणे हे आता तुम्हीच मनावर घेतले पाहिजे.’