अनेक नामवंत अभिनेते सांगतात की रंगमंचावर प्रवेश करण्यापूर्वी किंवा शूटिंगमध्ये कॅमेरा सुरू होण्यापूर्वी ते फार अस्वस्थ असतात, नर्व्हस असतात, पोटात गोळा आलेला असतो… तुम्हाला असं काही होतं का?
– शांताराम गोरे, परभणी
नेहमीच… आपल्याला हे काम जमेल की नाही याची नेहमी शंका येते… तीच शंका तुम्हाला विद्यार्थीदशेत ठेवते.
बाई साधी असेल तर तिला गाय म्हणतात, सरळ स्वभावाच्या पुरुषाला काय म्हणावे?
– अशोक परशुराम परब, ठाणे
बैलोबा.
‘अ आ आई, म म मका, मी तुझा मामा, दे मला मुका’ असं मी एखाद्या सुंदर युवतीला म्हटलं, तर ती मला मुका देईल का?
– मुकेश पांचाळ, अंधेरी
कुणा कुणाकुणाच्यात मामाला मुलगी देतात. तिला चालेल… नाहीतर मुस्कटात मिळेल.
जीएसटीला कोणी गुड अॅण्ड सिंपल टॅक्स म्हणतं, कोणी गब्बर सिंग टॅक्स म्हणतं… तुम्ही काय म्हणता?
– विशाल घोसाळकर, मिरा रोड
जीएसटीला गस्त घालून सक्तीचा टोल म्हणतो.
एवढ्या मराठी सिनेमांना, कलावंतांना २०२० सालासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, पण, यांच्यातला एकही सिनेमा कुठे पाहिल्याचे आठवत नाही… असे का?
– सुनंदा मेश्राम, अचलपूर
कारण अवॉर्डचा आणि लोकप्रियता यांचा फारसा संबंध नसतो.
खड्डेमुक्त भारताचं स्वप्न कधी साकार होईल?
– अनंत घरत, नागाव
आपण गेल्यावर.
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं म्हणतात, तर मग मित्राचा मित्र तो आपला शत्रू ठरतो काय?
राजू पटेल, भोकरदन
काय स्वार्थ आहे त्यावर ठरतं.
पावसाळ्यात छत गळतंय, घराला ओल आहे, पुराने घरदार उद्ध्वस्त केलं आहे, हे चित्र ज्यांनी अनुभवलं असेल, त्यांना पावसाळा रोमँटिक वाटत असेल का?
– कविता सोनावणे, चंदगड
पाऊस रोमँटिकच असतो… तो तुम्ही कसा अंगावर घेताय यावर अवलंबून आहे.
सिनेमातल्या नट्या पावसात भिजताना हमखास पांढरं शर्ट, पांढरा कुर्ता, पांढरी साडीच का नेसतात? काही शास्त्र असतं का त्यामागे?
– बबन गावकर, लांजा
लबाड… सगळं माहित आहे काळंबेरं. तरी विचारतोस?
पावसात तुमच्याही नकळत तुमच्या ओठांवर ज्या गाण्याची लकेर आपोआप येते, असं गाणं कोणतं?
– स्नेहा रॉड्रिग्ज, माणिकपूर
१) रिमझीम गिरे सावन २) ऐसे सावन में जी डरे.
सगळ्या सरकारी, खासगी कर्मचार्यांना एका वयात निवृत्त व्हावं लागतं, राजकारणी पुढारी कधी निवृत्त कसे होत नाहीत?
– बळीराम सावंत, सोनई
लबाडीला कसली आलेय निवृत्ती.
नवरा मित्र जमवून बिनधास्त घरात, बाहेर पार्ट्या झोडू शकतो, बायकोला मैत्रिणी जमवून अशी पार्टी करण्याची मुभा का नसते?
– अनन्या रेवणकर, पाताळगंगा
आता हे सगळीकडे झालंय पण… तुमच्या हिला विचारा. करतही असेल तुम्हाला माहित नसेल.
ज्याची गाणी तुम्हाला खूप आवडली होती, असा सगळ्यात अलीकडचा सिनेमा कोणता?
– मोहन गद्रे, कांदिवली
सैराट