रविवारचा दिवस होता, अचानक मोबाईलची रिंग वाजली, समोरून कॉलेजमधला एक मित्र बोलत होता, काय नवनाथ कसा आहेस? बर्याच दिवसांत आपली भेट नाही. आज सुटीचा दिवस आहे, थोडा वेळ काढच. मला तुला भेटायचे आहे…
मी म्हणालो, आपण दुपारी भेटूयात माझ्या दुकानावर, त्यावर तो म्हणाला, कोणत्या रे?
आता फोनवर चर्चा नको, तुला दुकानाचा पत्ता व्हॉट्सअॅपवर पाठवतो, तू ये तिकडे.
ठरलेल्या वेळेनुसार दुपारी तीनच्या सुमारास दुकानात आला. त्याने दुकान पाहिले आणि क्षणभर अवाक झाला. आमच्या गप्पा सुरु झाल्या, अचानक तो म्हणाला, नवनाथ, आजकाल लोकांमध्ये वाचनाची आवड राहिली आहे काय? दुसरा कोणताही व्यवसाय सुरु केला असतास तर त्यात तुला बक्कळ पैसे मिळवता आले असते. हे प्रकाशन, पुस्तकविक्री यातून असे किती पैसे मिळणार तुला? प्रश्न पूर्ण होताच. मी त्याला थांबवले आणि सांगितले, हा एसीमध्ये बसून करायचा व्यवसाय नाही हे मला माहिती आहे. समृद्ध मराठी साहित्य तरुणवर्गापर्यंत पोहोचवायचे, इतकेच नाही तर चांगल्या लेखनाला, लेखकांना प्रोजेक्ट करण्याचे ध्येय माझ्यासमोर आहे. सगळ्यात महत्वाचे कोणत्याही व्यवसायासाठी कष्ट केले तर यश मिळतेच. माझी ग्राऊंडवर काम करण्याची तयारी आहे. व्यवसाय ही रिस्क नसून ती एक संधी आहे, या विचाराने व्यवसायात उतरलो आहे. त्यामुळे हळूहळू का होईना, ‘पुस्तकविश्व’च्या माध्यमातून मला या क्षेत्रात यशाचे शिखर सहजपणे गाठता येईल. फक्त पुण्यामुंबईतच नाही तर जगातल्या १८ देशांमध्ये आज मी पुस्तकं पाठवतो आहे, त्यामुळे या व्यवसायात यश नक्की मिळेल असा ठाम विश्वास माझ्या मनात आहे…
शिक्षण घेतानाचे ते दिवस…
उरळी कांचनपासून १० किलोमीटर अंतरावर असणारे शिंदेवाडी हे माझे गाव… चौथीपर्यंतचे शिक्षण तिथल्याच प्राथमिक शाळेत पार पडले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी गावापासून १४ किलोमीटर अंतरावर असणारे अष्टापूर गाठावे लागले होते. दहावीत असताना मला सायनसच्या आजाराने गाठले होते. अतिप्रमाणात ऊस खाल्यामुळे ही आपत्ती माझ्यावर ओढवली होती. या आजारामुळे मला डिप्रेशन आले होते. कायम सर्दीने नाक भरलेले असायचे, त्यामुळे अर्धशिशीचा त्रास सुरु झाला होता. या सगळ्याचा परिणाम मानसिकतेवर होऊ लागला होता. दहावीत ७० टक्के मार्कांवर समाधान मानावे लागले. शाळेत पहिल्या पाचांत आलो नाही याची रुखरुख मनाला लागून राहिली. पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पडायला हवे, असे एका नातेवाईकांनी सांगितले. घरची स्थिती बेताची, त्यामुळे पुण्यासारख्या शहरात जाऊन शिक्षण घेणे माझ्यासाठी अशक्यप्राय होते. पण नातेवाईकांच्या मदतीमुळे मला विद्यार्थी सहायक समितीत प्रवेश मिळाला. तिथे निवासाची सोय झाल्यावर गरवारे कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजचे शिक्षण सुरु असतानाच सायनसचा त्रास वाढत गेला होता, त्यामुळे एकलकोंडा झालो. बारावीच्या वर्षात वाढलेल्या हाडाचे ऑपरेशन झाले, ते समितीच्या मदतीमुळेच. त्यामुळे माझी सायनसच्या आजारातून पूर्णपणे सुटका झाली.
पुस्तकांशी पहिला संपर्क
समितीमध्ये कमवा आणि शिका योजनेमध्ये काम करायचो. अप्पा बळवंत चौकात सोमण काकूंची लायब्ररी होती. त्या मला सांगतील तिथे पुस्तके पोचवायची, हे माझं काम होतं. कधी कधी एखाद्या घरी पुस्तके पोहोचवायला गेलो आणि ते घर बंद असेल, तर ती पुस्तके माझ्याकडे असायची. शाळेतल्या अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त अशी काही पुस्तके असतात हे मला तेव्हा पहिल्यांदा माहित झाले. पुस्तके वाचायची आवड मला आपसूकच निर्माण झाली आणि तिथेच माझी पुस्तकांशी मैत्री झाली.
बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंदापूरमध्ये प्राचार्य तुषार रंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण पूर्ण केले, त्यांनी मोठा आधार दिला. अडीअडचणीला मदत करताना कामाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे खर्या अर्थाने मी घडत गेलो. बी.कॉम, बीसीएचे शिक्षण पूर्ण केल्यावर २०११मध्ये पुणे गाठले आणि लेंड ए हॅन्ड या संस्थेत प्रोजेक्ट कोऑर्र्डिनेटर म्हणून नोकरी सुरू केली. आपण काही तरी उद्योग करावा आणि उदयोजक बनावे असे वाटायचे. दोन वर्षांनंतर नोकरी सोडून मित्राच्या मदतीने वॉटर फिल्टरचा व्यवसाय सुरु केला. पण त्यात यश न आल्याने तो बंद केला. त्यानंतर अमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्यासोबत फ्रीलान्सिंग काम करत होतो. दर महिन्याच्या १० तारखेला २०० रुपयाची पुस्तके घेण्याची सवय लावून घेतली.
असा सापडला यशाचा मार्ग…
आपण नेमके कुठे आहोत याचा शोध घेत असताना अचानक एक टर्निग पॉइंट आला. तेव्हा यूट्यूबवर प्रसिद्ध असलेल्या मधुरा रेसिपीचे मसाले बाजारात आले होते. त्यांच्याशी कनेक्ट होऊन त्यांच्या मसाल्याची विक्री करण्याचे काम सुरु केले. दुचाकीवर शहराच्या विविध भागांत हे मसाले मी पोहोचवत होतो. मधुरा यांचे रेसिपीचे पुस्तकही बाजारात आले होते, त्याला बरीच मागणी होती. त्यामुळे मसाल्याच्या सोबत तेही पोहोचवण्याचे काम मी करू लागलो. हे काम सुरु असताना एक वेगळीच घटना घडली. हडपसरमध्ये एके ठिकाणी मसाले देण्यासाठी गेलो असताना त्या काकूंनी माझ्याकडे रणजित देसाईंच्या श्रीमान योगी या पुस्तकाची मागणी केली. मी त्याची पूर्तता केली. तिथे मला हा नवा मार्ग सापडला. मसाल्याच्या आणि रेसिपीच्या पुस्तकांबरोबरच अन्य पुस्तके पोहचवायचं काम करताना माझी तारेवरची कसरत व्हायची. पुस्तके पोहचवण्याचे काम वाढत गेले आणि हळूहळू त्याचे व्यवसायात रूपांतर झाले.
अप्पा बळवंत चौकात दुकान…
एका मित्राने मला अप्पा बळवंत चौकात एक दुकान भाड्याने उपलब्ध असल्याचे मला सांगितले. दुकान छोटेच होते, त्यामुळे महिनाभर विचार करून अखेरीस ते भाड्याने घेण्याचे ठरवले. ते दुकान घेण्याअगोदर मी नर्हे गावात एक गोडाऊन सुरु केले होते. त्यासाठी मला एका नातेवाईकांनी कर्ज काढून दिले होते. अप्पा बळवंत चौकातील दुकान सुरु झाले तेव्हा मधुराताईंनी रेसिपीचे नवे पुस्तक लिहिले होते. ते पुस्तक तू का प्रकाशित करत नाहीस, असा प्रश्न त्यांनी केला. मला प्रकाशन क्षेत्रातला काहीच अनुभव नव्हता, पण एक पाऊल पुढे येऊन धाडस करत ते प्रकाशित करण्याचे ठरवले. ते करत असताना अनेक चुका झाल्या, अडचणी आल्या. पण त्यावर यशस्वीपणे मात करत ते आव्हान पूर्ण केले. पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर मला एक सुखद धक्का बसला. ‘३६५ न्याहारीचे पदार्थ’ हे ते पुस्तक अवघ्या सात दिवसांमध्ये संपले. या पहिल्याच अनुभवामुळे आत्मविश्वास वाढला आणि आपण प्रकाशनक्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, असे वाटू लागले. त्यानंतर वक्तृत्वाची साधना वगैरे विषयांवरची पुस्तके तयार केली, त्यांना चांगले यश मिळत गेले.
दुसरे दुकान…
अप्पा बळवंत चौकातील दुकानात ग्राहकांना अपेक्षित फील मिळत नव्हता. म्हणून डहाणूकर कॉलनीत पुस्तकांची मोठी गॅलरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी मराठी पुस्तकांबरोबरच इंग्रजी साहित्य, मुलांची पुस्तके असतील असे नियोजन केले. १७ डिसेंबर २०२१ रोजी पुस्तकविश्व ही गॅलरी सुरु झाली.
असाही एक अनुभव
एकदा तिसर्या इयत्तेमध्ये शिकत असणारी एक मुलगी गॅलरीत आली. तिने विचारलं, तुमच्याकडे सुधा मूर्ती यांचे पुस्तक आहे का? मुलांना योग्य वयात पुस्तके दिली गेली तर त्याचा चांगला फायदा त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी होतो हे मला त्यामधून दिसून आले होते…
तू इथे काम करतोस का?…
आमचे कुटुंब शेती करणारे… त्यामुळे आपला मुलगा पुण्यात काय करतो हे माझ्या घरी माहिती नव्हते. जेव्हा मी डहाणूकर
कॉलनीमध्ये गॅलरी सुरु केली तेव्हा एके दिवशी मी गावावरून वडिलांना तिथे घेऊन आलो. वडिलांना गॅलरी दाखवली, तेव्हा ते मला म्हणाले तू इथे काम करतोस काय, दुकानाचे मालक कुठे आहे? खरंच छान आहे हे दुकान, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. संध्याकाळी घरी गेल्यावर मी त्यांना सांगितले की ते दुकान आपले आहे, सगळे मीच उभे केले आहे. माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. दुसर्या दिवशी गॅलरीमध्ये एक कार्यक्रम घेतला, तेव्हा आलेल्या लहान मुलांचा त्यांच्या हस्ते सत्कार केला, तेव्हा त्यांचा त्यावर विश्वास बसला…
दोन तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट… रात्रीचे साडेआठ वाजले होते, दुकानात पुस्तकांची आवराआवर सुरु होती. एक गृहस्थ गॅलरीत आली होते. ते बारकाईने निरीक्षण करत होते. माझ्याकडे येऊन म्हणाले, तुमच्या गॅलरीत मराठी पुस्तके खूप आहे, इंग्रजी पुस्तके नाहीत, असे का? मी म्हणालो, मी मराठी पुस्तके ठेवली नाहीत, तर पुढल्या २५ वर्षांनी आपली मुले मराठी पुस्तके वाचताना दिसणार नाहीत. त्यामुळे भविष्याचा विचार करून इथे मराठी पुस्तके ठेवली आहेत. माझे हे उत्तर त्या गृहस्थांना आवडले, मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी तुम्ही जे काही करत आहेत ते खूपच स्तुत्य आहे, असे सांगत तुम्हाला जर काही मदत लागली तर अर्ध्या रात्रीत कळवा असे सांगून ते गृहस्थ गेले. आज त्याची आणि माझी चांगली जवळीक झाली आहे.
विदेशात व्यवसाय वाढवायचे ध्येय
सध्या देशातील विविध भागात मराठी पुस्तके पाठवणं सुरूच असते. पण त्याच बरोबर जगातील १८ देशांमध्ये नियमितपणे पुस्तके जात असतात. भविष्यात त्यामध्ये वाढ करण्याची योजना आहे. त्याचबरोबर नवे लेखक, साहित्य यांच्यासाठी एक व्यासपीठ तयार करायचे आहे.. बघूयात कसे जमते ते…
शब्दांकन – सुधीर साबळे