काल कावळ्याची आणि किरीटची ईडी कार्यालयात भेट झाल्याची बातमी मला समजली, तेव्हाच आज या भेटीची बित्तंबातमी विस्तृतपणे देण्यास कावळ्या माझ्या घरी येणार याचा शंभर टक्के अंदाज मला आला होता; तसेच झाले. कावळ्या मिठाईचा बॉक्स नव्हे, तर चकना आणि विदेशी मद्याची बाटली घेऊन आला. मी म्हटलं, मला वाटलंच तू सेलिब्रेट करायला येणार. पण किरीटला अजून अर्धा जामीन मिळालाय, फुल मिळाला की आपण फुल बाटल्या मागवू. पण तू मला आता त्या किरीटाची टेप लावू नकोस. राज्यात इतक्या सनसनाटी गोष्टी घडत असताना असे किरीटासारखे आणि चिलटासारखे मिळमिळीत विषय गप्पांसाठी नको. त्या आक्रस्ताळी सदावर्तेविषयी किरीट काय बोल्ला ते बोल.
त्यावर कावळ्याने आवंढा गिळला आणि म्हणाला, मी किरीटजींकडे तो विषय काढताच ते म्हणाले, ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर आपण आताच बोलणे योग्य होणार नाही. शेवटी तो लाखो आंदोलकांचा नेता आहे. त्याने सहा महिने एसटी कामगारांचे आंदोलन पेटवत ठेवले. त्याच्यासारखी पॉवर माझ्या अंगात असती तर मी सारा महाराष्ट्र हादरून सोडला असता… पण तो नेता होता की महाजोकर होता हे आधी मला सांगा, मी किरीटजींना विचारले. त्यावर किरीटजी म्हणाले, नेता असाच लागतो. त्याने संपावरील कामगारांचे आंदोलन शेकोटीसारखे नव्हे तर अग्निप्रलयासारखे धगधगत ठेवले पाहिजे. कामगारांना आपल्या बोलण्याने, भाषणाने, नाचण्याने, उड्या मारण्याने आणि घोषवाक्याने ऑक्सिजन दिला पाहिजे. हे खायचे काम नाही… मग मी उखडलो, म्हणालो, पण त्यांनी कामगारांचे लाखो रुपये खाल्ले ना वर्गणीच्या नावाखाली. प्रत्येक कामगारांकडून म्हणे पाचशे पन्नास रुपये घेतले त्याने आणि त्यातून अमाप रक्कम गोळा केली. त्यातून लोकांना टोप्या लावून अवैध मार्गाने प्रॉपर्टी, जमीन आणि काय काय खरेदी केले त्याची आता चौकशी सुरू आहे. जेलची हवा खाऊन महाराष्ट्र दर्शनही करून आला. सार्या महाराष्ट्रातील कोर्टाकडून त्याच्यावर अनेक आरोपाखाली अफरातफरीचे गुन्हे दाखल झाले आहे. असा सर्कीट माणूस तुमचा आदर्श म्हटल्यावर त्या ईडीचे बारा वाजलेच समजा. तुम्ही त्याच्यावर `ईडी’च्या वतीने गुन्हा का नाही दाखल करत? त्याने तर लाखो एसटी कामगारांना त्यांच्या बायकापोरांना खोटे नाटे आमिष दाखवून देशोधडीला लावले. नशीब, वेळेवर त्याचे बिंग फुटले म्हणून. नाहीतर एसटी हा शब्द महाराष्ट्रात पुन्हा ऐकायला मिळाला नसता. मग तुम्ही भाजपवाले, ते फडणवीस, पाटीलजी, दरेकर, मुनघंटीवार एसटी कामगारांचा संप चिघळत ठेवण्यासाठी आझाद मैदानावर पाठिंबा का देत होता? अहो, त्या सदावर्त्याकडे नोटा मोजण्याचे यंत्र कुठून आणि कशासाठी आले याची चौकशी आपल्या ईडीला करायला हवी. त्या सदावर्त्याने लाखो एसटी कामगारांसकट भाजपलाही चुना लावला याची आता तरी नोंद घ्या. नाहीतर निवडणुकीत जनताच तुम्हाला फटके देईल. दुसर्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढता ना मग या सदावर्त्यांची लफडी-कुलंगडी बाहेर काढा. ठराविक लोकांच्या अंगावर विनाकारण भुंकायला कुत्री सोडण्यापेक्षा जे तुमच्याच पक्षातील महाभ्रष्टाचारी आहेत त्यांना धडा शिकवा ना! की तुमच्यात सगळे गंगेसारखे पवित्र आणि गोदावरीसाखे शुद्ध झाले आहेत? `डंके की चोट पर’ हा त्या सदावर्त्याचा म्हणे परवलीचा शब्द होता. अशा कारस्थानी माणसाकडून आपल्या मार्गात आडवे येणार्या नेत्यांचा काटा काढणे एवढा हेतू साध्य करण्यासाठी तुमच्या पक्षाने सदावर्तेचा वापर केला. संप सुरू ठेवण्यासाठी त्यांना रसद पुरवली. शरद पवारांच्या घरावर दगडफेक करण्यासाठी कटकारस्थाने करून त्यांचा काटा काढण्यासाठी त्याला सुपारी कोणी दिली याचा शोध लावा आणि नंतर राज्यातील भ्रष्टाचार शोधून काढण्याच्या भंपक वल्गना तुमच्या खिशातच ठेवा. कुठूनतरी राज्य अस्थिर आणि बदनाम करायचे, सरकारविषयी लोकांच्या मनात, एसटी कामगारांच्या मनात संभ्रम उत्पन्न करायचा, आत्महत्या केलेल्या कामगारांच्या प्रेतांच्या चितेवर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या महागाईच्या आगीत लोकांना होरपळत ठेवायचे याला आता जनता कंटाळली आहे. तुमची प्रतिमा तर तुमच्या आजपर्यंतचा चमकोगिरीने पार डागाळली आहे. आजूबाजूला काय चाललेय याचा एकदा शोध घ्या. समाजात या सदावर्त्यासारखा आग्यावेताळ महाजोकरना सरकार आझाद मैदानावरील सर्कशीrत तुमचा पक्ष धागडधिंगा करायला प्रोत्साहन देत असेल तर तुमच्या पक्षासारखा स्वार्थी पक्ष या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. आजपर्यंत मला तुमच्याविषयी आदर वाटत होता. पण विक्रांत प्रकरणानंतर तुम्ही गायब झालात तेव्हाच मी समजून गेलो की दाल मे कुछ काला लगता है… न्यायालयाने कृपा केली म्हणून तुम्हाला अर्धवटरावासारखे तळ्यात-मळ्यात करून सोडून दिले आहे. तेव्हा काहीतरी घसघशीत बक्षीस मिळेल या आशेवर दुसर्यांचे कथित भ्रष्टाचार बाहेर पडण्याआधी स्वत:च्या आणि स्वपक्षीयाच्या पायाखाली काय जळतेय ते बघा. विक्रांतमध्ये ३८ हजारांचा भ्रष्टाचार झाला काय आणि ७८ कोटींचा झाला काय, भ्रष्टाचार तो भ्रष्टाचारच. चुकीला माफी नाही. न्यायदेवतेला चाड असतेच. ती ज्यावेळी तुम्हाला फ्रॉडच्या प्रकरणात लटकवेल तेव्हा तुमच्या मदतीला कोणीच धावणार नाही. जी अवस्था आज त्या सदावर्त्याची झालीय ना तशी तुमची होईल. तुम्ही कसेही असलात तरी मला तुमची नेहमीच दया येते. कोणीही आले नाही तरी मी तुम्हाला तुरुंगात भेटायला येईन. तोही तुमचा आवडता खमण-ढोकळा घेऊन… मी एवढे बोलल्यावर किरीटजींना गहिवरून आले. त्यांचा कंठ दाटून आला. बांध फुटणार एवढ्यात मी त्यांना टाटा करून त्यांचा निरोप घेतला. त्यांच्या डोळ्यासमोर नक्कीच सदावर्त्याचे भूत नाचत असणार!