खाद्यपदार्थासारखंच भाषण चांगलं झालं की वाईट, ते कुणीही सांगतो. पण ते तसं का झालं, हे मात्र सांगता येत नाही. म्हणून प्रबोधनकारांनी चांगल्या भाषणाची रेसिपीच लिहायचं ठरवलं.
– – –
शेक्सपियरच्या नाटक आणि सुनीतांमधल्या सुभाषितांचा संग्रह करण्याचं जिकीरीचं काम प्रबोधनकारांनी पूर्ण केलं. पण विल्यम डॉड या शेक्सपियरच्या अभ्यासकाचा सुभाषितसंग्रह आधीच लोकप्रिय असल्यामुळे त्याचा ग्रंथ करण्याची प्रबोधनकारांची योजना बारगळली. पण त्यामुळे हार मानतील, तर ते प्रबोधनकार कसले! मराठी, इंग्रजी आणि संस्कृत ग्रंथांचं वाचन सुरू असताना त्यांना एका वेगळ्याच विषयावर ग्रंथ लिहिण्याची कल्पना सुचली, तो विषय होता वक्तृत्व.
वक्तृत्व म्हणजे भाषणाच्या कलेशी प्रबोधनकारांशी गट्टी जमली ती अगदी लहानपणापासून. त्यांनी नोंदवलंय, `भाषणशैली आकर्षक कशी असावी, हे शिक्षण मला बयपासूनच मिळालं. `बय म्हणजे त्यांची आजी सीताबाई. त्यांच्या गोष्टी रंगवण्याच्या हातोटीच्या प्रभावातून ठाकरी भाषणशैली जन्माला आली. ती शैली त्यांना शाळेत असताना अपंग गाडगीळ गुरुजींवरचा अन्याय दूर करण्यासाठी उपयोगी ठरली. अखंड वाचन आणि देवासमधील शिक्षणाने तिला आकार मिळाला. मुंबईत आल्यावर गिरगाव चौपाटीवरच्या रायडिंग स्टोनवर उभं राहून त्यांनी जाहीर भाषणांचा सराव केला. स्वदेशीच्या चळवळीत भाषणं ऐकली आणि मोठमोठ्या मंचांवर केलीदेखील.
`केरळकोकीळ`कार कृष्णाजी आठल्येंसारख्या रसाळ वत्तäयाचं त्यांना मार्गदर्शनही मिळालं. पुढे नाटक कंपनीत काम, पत्रकारिता, सेल्समनगिरी, भाषेचं अध्यापन, समाजकार्याची आवड आणि मित्रांसोबत रंगवलेले गप्पांचे फड या गोष्टी त्यांच्या वक्तृत्वासाठी पोषकच ठरल्या. हिंदू मिशनरी सोसायटीच्या कामात त्यांच्या वक्तृत्वाला बहर आला. ध्वनिलेखन म्हणजे शॉर्टहँडच्या शौकापायी त्यांनी मोठमोठ्या देशी परदेशी वक्त्यांची भाषणं लक्षपूर्वक ऐकली आणि शब्दशः नोंदवूनही काढली. या सगळ्या प्रवासामुळे ते वक्तृत्वशास्त्रावर पुस्तक लिहिण्याच्या दिशेने गेले.
अनेक वर्षं वेगवेगळ्या प्रकारची भाषणं ऐकल्यावर त्यांना पुस्तक लिहावंसं का वाटलं, हेही त्यांनी नोंदवून ठेवलंय, `काही केवळ विद्वत्तेच्या प्रदर्शनासाठी बोलत. त्यांची व्याख्याने श्रोते पुराणिकाच्या ठराविक धारणीसारखी फक्त भक्तिभावाने ऐकत. ऐकत म्हणजे काय? तर एका कानाने ऐकून दुसर्या कानाने बाहेर सोडीत. कसं काय झालं व्याख्यान? तर वक्ता विद्वान, विलक्षण अभ्यासू, आपल्याला काय समजणार त्यात, हा परिणाम. कित्येकांची भाषणे मधुरमधुर शब्दांचा नुसता सडा. श्रोत्यांनी नुसता तो ऐकावा नि कौतुक करीत सभागृहाबाहेर पडावे. कित्येकांचे भाषणापेक्षा हातवारेच जबरदस्त. असले नाना प्रकार पाहून वक्तृत्व परिणामकारक असावे कसे आणि ते कमावण्यासाठी उमेदवारांनी स्वाध्यायाची, आवाजाच्या कमावणीची, हावभाव नि मुद्राभिनयाची कसकशी तयारी केली पाहिजे, इत्यादी अनेक मुद्द्याची मी ४-५ वर्षं टिपणे करीत होतो आणि त्याविषयीची पाश्चात्य पुस्तके अभ्यासत होतो.`
प्रबोधनकारांना पाश्चात्य पुस्तकंच अभ्यासावी लागणार हे उघड होतं. कारण वक्तृत्वशास्त्र या विषयावरची चांगली पुस्तकं तेव्हा मराठीत किंवा इतर भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता कमीच. कारण तेव्हा अशा स्किल डेवलपमेंटची पुस्तकं फारशी नव्हतीच. मात्र प्रबोधनकारांच्या तत्वविवेचक छापखान्यातल्या पहिल्या नोकरीतले पहिले बॉस लक्ष्मण नारायण जोशी उर्फ लखूनाना यांनी रुळलेल्या नेहमीच्या विषयांना टाळून तरुणांना उपयुक्त विषयांवर लिहिलेलं सापडतं. त्यामुळे वैचारिक किंवा ललित लिखाणाची पलीकडे जाण्याची दीक्षा त्यांच्याकडून प्रबोधनकारांना मिळालेली असल्याचा कयास बांधता येतो. शिवाय प्रबोधनकार ज्यांना गुरू मानत त्या कृष्णाजी आठल्येंच्या `केरळकोकीळ` मासिकातही असं लिखाण असायचं. त्याचाही प्रभाव असावा. विशेष म्हणजे पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रबोधनकारांनी दादा आठल्येंच्या कवितेच्या चार ओळी उद्धृत केल्या आहेत, हे इथे नोंदवायला हवं.
वक्तृत्वशास्त्रावर मराठीत त्याआधीही काही छोटी पुस्तकं होती, हे प्रबोधनकारांनीच प्रस्तावनेत नोंदवलं आहे, `मराठी भाषेत वक्तृत्व विषयाचे निरूपण करणारी दोन तीन लहान लहान चोपडी आमच्या पाहण्यात आहेत, परंतु आमचे पुस्तक त्यांपेक्षा अगदीच स्वतंत्र धर्तीवर लिहिले आहे, हे बहुश्रृत वाचकांस तुलनात्मक वाचनानेही कळण्यासारखे आहे. शिवाय `प्रत्यक्ष शिक्षणाच्या व्यावहारिक व आनुभविक सूचना` हे जे आमच्या पुस्तकाचे विशेष धोरण ठरविले आहे, ते या तीनही चोपड्यांत नाही.` वक्तृत्वशास्त्र विषयावरच्या मराठीत आधी उपलब्ध असणार्या पुस्तकांना चोपड्या म्हणून प्रबोधनकारांनी अगदीच बेदखल केलेलं आहे. ती त्यांची शैलीच आहे. ती पुस्तकं अगदीच टाकाऊ नव्हती, असं मानलं तरीही प्रबोधनकारांच्या `वक्तृत्वशास्त्र`चं महत्त्व कुठेही कमी होत नाही.
वक्तृत्वशास्त्रावर पुस्तक लिहिण्याचा हेतू प्रबोधनकारांनी एक उदाहरण देऊन सांगितला आहे, `चांगले व्याख्यान कोणते व वाईट कोणते, हे वाटेल तो सांगू शकतो, परंतु ते चांगले किंवा वाईट का? वाईट असेल तर ते चांगले होण्यास काय काय सुधारणा केल्या पाहिजेत? त्या कशा कराव्यात? असा सवाल होताच, `ते काही सांगता येणार नाही. आम्हाला ते काही आवडले नाही, एवढे मात्र खरे!` या पलीकडे पृच्छकाला दुसरा जवाब मिळत नाही. पक्वान्नांची रूची अरूची जाणणारे पुष्कळ असतात, नव्हें, सर्वच असतात, किंबहुना अमुक अमुक कमी किंवा अधिक घातले असते तर असे असे झाले असते, असे सांगणारेही काही कमी नसतात, परंतु त्यांनाच जर एकदम पाकगृहात नेऊन सांगितले की `अहो राव, आजच्या जिलब्या बिघडल्या आहेत म्हणता, तर घ्या काय वाटेल ती सामुग्री आणि स्वत: जिलब्या करून दाखवा पाहू.` तर ते ठासून उत्तर देतील की जिलब्या करता आल्या नाहीत म्हणून रूची अरूची आम्हाला कळत नाही की काय? हीच गोष्ट वक्तृत्वाची. या विषयाबद्दल प्रत्येकाला थोडेथोडे कळतच असते. परंतु विशिष्ट मुद्द्यांबद्दल त्यांच्या कल्पना नेहमी संकीर्ण असतात, स्पष्ट नसतात.`
एखादा पदार्थ चांगला झाला की वाईट हे खाणारा सांगतो, तसंच तो भाषण ऐकल्यावरही सांगतो. पण ते चांगलं किंवा वाईट का झालं, हे मात्र त्याला सांगता येत नाही. त्यामुळे चांगल्या भाषणाची शास्त्रशुद्ध रेसिपीच पुस्तकातून मांडायला हवी, अशा आजच्या भाषेत प्रबोधनकारांचं म्हणणं मांडता येईल. ही रेसिपी शोधण्यासाठी आपण सात आठ वर्षं अभ्यास करत असल्याचं त्यांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे. तर १९१४ ते १९१८ या चार वर्षांत `वक्तृत्वशास्त्र` ग्रंथाचं लेखन पूर्ण झालं, असं ते आत्मचरित्रात म्हणतात. अशाच प्रकारे एकेका विषयावर वर्षानुवर्षं अभ्यास करून पुस्तकं लिहिण्याचं व्रत त्यांनी आयुष्यभर सांभाळलेलं दिसतं.
`माझी जीवनगाथा`त `वक्तृत्वशास्त्र`चं वर्णन ते `ग्रंथलेखनाचा श्रीगणेशा` असं करतात. खरं तर प्रबोधनकारांचं `संगीत सीताशुद्धी` हे नाटक त्याआधी म्हणजे १९०९ साली प्रकाशित झालं होतं. मुळात ते ग्रंथ म्हणावं इतकं सज्जड नव्हतंच. ते एक पौराणिक, विनोदी आणि गल्लाभरू नाटक होतं. थोडे पैसे मिळावेत म्हणून प्रकाशकाच्या मागणीनुसार त्यांनी ते लिहिलं होतं. आता नऊ वर्षांनंतर वक्तृत्वशास्त्रासारखा ग्रंथ प्रकाशित करताना त्यांना ते आठवण्याचं कारणही नव्हतं.
पुस्तक लिहून झाल्यानंतर प्रबोधनकारांसमोर प्रश्न होता तो प्रकाशक शोधण्याचा. ते लिहितात, `ग्रंथाच्या बर्यावाईट भविष्याची सूत्रे प्रकाशकाच्या हातात असतात. तो नामांकित असला तर ते उजळ निपजते. असातसाच फालतू नि हंगामी असला का त्याचे, लेखकाचे नि पुस्तकाचे बारा वाजतात. प्रकाशक ग्रंथविक्रेताच असावा लागतो. नुसता प्रकाशक असून भागत नाही. प्रकाशन आणि विक्री असे दोन लगाम हाती असलेला सारथी शोधणे आणि शोधाची परमावधी करून तो लाभणे, हा लेखकाच्या चरित्रातील एक जुगारच म्हटला तरी चालेल.`
एकतर तेव्हा लेखक म्हणून प्रबोधनकार नवीन होते. त्यामुळे त्यांना सुरुवातीला फसवणार्यांचे कटू अनुभव आलेच. त्यात ते त्यांच्या सडेतोड वृत्तपत्रीय लिखाणासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे नव्या पुस्तकातही कुणावर तरी टीका असणारच असं गृहित धरून ते नाकारलं जात होतं. प्रबोधनकार हा अनुभव खास त्यांच्या शैलीत लिहितात, `वृत्तपत्री लेखनामुळे एक कडवट आणि नाकावर माशी बसू न देणारा फटकळ लेखक म्हणून माझ्या नावाचा डंका वाजलेला. अशा माणसाचा ग्रंथ छापायला घ्यायचा तर प्रथम जो तो ग्रंथ न उघडताच, यात कोणाच्या बिनपाण्याने तर नाही ना केलेल्या, असा प्रश्न टाकायचा.`
यातून मार्ग काढण्यासाठी प्रबोधनकार ग्रंथाचं बाड घेऊन पुण्याला पोचले.