प्रेमात आयुष्य खराब होतं आणि शेताचीही नासाडी होते, असा मेसेज एका मित्राने पाठवला आहे… आयुष्याची खराबी कळली, शेताची नासाडी काही कळली नाही… तुम्हाला कळलं का?
– समर सोळंकी, वैभववाडी
भेटायचं ठिकाण त्यांचं शेत असावं हो.
आंब्यांचा सध्याचा भाव पाहता काही काळाने आंब्याचा सुगंध घेण्याचेही पैसे पडतील असं वाटायला लागलं आहे… गरीबाने आंबे खाऊच नयेत का हो?
– मनाली सातपुते, हडपसर
हापूस खायला नाही परवडत तर रायवळ खा… ते कुठेही मिळतील.. स्वस्तात… अगदी फुकटही.
वैैभवजीनु, सावंतवाडीच्या ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमधे तुमी कित्याक काम करूक नाय?
– अनिल रा. तोरणे, (तळेगाव दाभाडे)
माका मालवणी येवुक नाय ना…
माझे दोन प्रश्न
आयुष्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी काय करावे?
येईल त्या प्रवाशासोबत चालत राहावे
जगातला सर्वात सुखी माणूस कोण आहे?
– अशोक परशुराम परब, ठाणे
निर्लज्ज
कोकणातल्या माणसांना फणसाची उपमा देतात, ते तुम्हाला पटते का? हे फणस कापे की बरके?
– विवेक करमरकर, दादर
हो… मी स्वतः त्याचं उदाहरण आहे… हसू नका या वाक्यावर
आजवर दोन बायोपिक्समध्ये पु. ल. देशपांडे दिसले, दोन्हीकडे उत्तम कलावंत असूनही कुठेच ते पुलंसारखे वाटले नाहीत. असं का होत असावं?
– पद्मा चौधरी, गिरगाव
पण जशास तसं कुणीच दिसत नाही… दिसायलाही सारखा हवा आणि कामही यायला पाहिजे… असं नाही होणार…
पोषाखी इतिहासकाळ, महाराष्ट्राच्या कुठल्याच भागात बोलली न जाणारी ग्रामीण भाषा, हिडीस भरजरी साड्या नेसलेल्या बायका, बावळट विनोद, त्याच त्याच निस्तेज लोककला यांच्यातून मराठी मनोरंजनविश्वाची सुटका कधी होणार?
– संजय पाटील, बोरिवली
काहीही बोलू नका… भावना दुखावतात
कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे?
– रोहिणी नवाथे, पनवेल
गरीबाच्या खांद्यावर पोटाचे ओझे
जीवनगाणे गात चरावे, हे गाणं एका बाईच्या तोंडी ऐकून धक्का बसला, ते गायीच्या तोंडी असायला हवे ना?
– तन्मय नखाते, बडोदा
पण गाय गवत चरते… जीवनगाणे नाही…
एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकीन मी ती स्वप्राणाने, असे कवी केशवसुत म्हणतात… जी स्वप्राणाने फुंकायची तयारी आहे, ती तुतारी ज्याची त्याने आणायला नको काय?
– जयंत कापडणीस, विलेपार्ले
आपण तसेच आहोत पण… कुणीतरी काहीतरी आणून दिलं तर आपण काहीतरी करणार!
कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील काय, या भोंग्याखाली दडलंय काय?
– रामनाथ सोळंकी, नागपूर
राजकारण
पुष्पा, आरआरआर आणि आता केजीएफ-२… दक्षिणी सिनेमाने हिंदी सिनेमासृष्टीवर पूर्ण पकड बसवली, असं अनेकांना वाटू लागलं आहे. तुमचं मत काय?
– विहंग बोरकर, धुळे
होय, असे झाले आहे खरे…
दंगल पेटवून त्यावर राजकीय पोळी भाजणार्या नेत्यांची मुलं दंगलीत कधीच उतरत नाहीत, हे त्यांच्या चिथावणीने दंगे करून आयुष्याची बरबादी करून घेणार्या मुलांना कधी कळत कसं नाही?
– यदुनाथ गवळी, पारनेर
त्यांचे आईबाप हुशार आहेत…