सुप्रसिद्ध छायाचित्रकार रामचंद्र मुणगेकर उर्फ बाळ मुणगेकर (जन्म २० जुलै १९५३, स्वर्गवास १८ एप्रिल २०२२) यांच्या रूपाने एक उत्तम कलावंत आणि शिक्षक हरपला आहे. फोटोग्राफीमध्ये विशेष रुची असणार्यांसाठी प्रोफेशनल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यासाठी १९९४ सालीपासून सुरू झालेल्या मुंबई फोटो अकॅडमीमध्ये बाळ कार्यरत होते. फोटोग्राफीकडे केवळ छंद म्हणून न बघता व्यावसायिक करिअरचा दृष्टिकोन वाढविणे आणि कौशल्य विकसित करणे, यादृष्टीने त्यांनी येथे शेकडोंना मोलाचे मार्गदर्शन केले. सुमारे तीस वर्षाचा अनुभव या कामात त्यांनी सार्थकी लावला.
१९७९ मध्ये जीडी आर्ट उपयोजित कला या विभागात फोटोग्राफी स्पेशल विषय घेऊन बांद्रा स्कूल ऑफ आर्टमध्ये बाळ यांनी कलेचे शिक्षण पूर्ण केले. १९८२पासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वैयक्तिक फोटोग्राफर बनण्याइतकी त्यांनी साहेबांची मर्जी संपादन केली. विनम्र, नि:स्वार्थी आणि प्रामाणिक स्वभावामुळे ठाकरे कुटुंबाचे जणू ते मेंबरच झाले. बाळासाहेबांच्या आयुष्यातील अतिमहत्वाचे स्मरणीय क्षण आणि व्यक्तिरेखा आपल्या तिसर्या डोळ्यातून सहज हेरून साहेबांची वाहवा ते मिळवत असत.
साहेबांसारख्या श्रेष्ठ कलावंताला आवडेल असे काम सातत्याने करत राहणे सोपे नव्हते. ते त्यांनी लिलया जमवून दाखवले.
मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थी आणि कर्मचार्यांसाठी गेली दहा वर्ष फोटोग्राफी वर्कशॉपच्या आयोजनात ही त्यांचा सक्रिय सहभाग होता. महाबँक रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमार्फत उत्पन्नरहित ग्रामीण युवकांसाठी फोटोग्राफी स्किलचे ट्रेनिंगही त्यांनी दिले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने फोटो जर्नालिझम कोर्समध्येही ते मार्गदर्शक म्हणून काम करीत. गरजू विद्यार्थ्यांवर या महान छायाचित्रकाराची जणू सावलीच होती मायेची. महाराष्ट्र कोकण विभाग आणि रायगड किल्ल्याचे फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशनसुद्धा फावल्या वेळात त्यांनी केले.
साप्ताहिक ‘मार्मिक’ आणि दैनिक ‘सामना’साठीही त्यांनी फोटोग्राफी केली. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने विविध प्रसंगी त्यांचे फोटोग्राफ्स त्यांच्या कार्यात उपयोगात आणले. राजकीय बॅनर्स बनविणार्या एजन्सींना बाळ यांच्या कॅमेर्याने टिपलेले नेत्यांचे फोटो म्हणजे खूपच मोठा आधार होता. रायगड किल्ल्याचा कानाकोपरा बाळ यांनी कलात्मक नजरेतून छायांकित केला होता. प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या थोरांचे मार्गदर्शन आणि सहवासही त्यांना लाभला होता. रायगड किल्ल्याच्या छायाचित्राचे प्रदर्शन त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर आणि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया या ठिकाणी भरवले होते.
पेन्सिल स्केच आणि रेंडरिंगमध्येही त्यांचा हातखंडा होता. फोटोग्राफीप्रमाणे छायाभेद ते पेन्सिल रेंडरिंगमध्ये खेळवत असत मा. बाळासाहेब, मांसाहेब मा. संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, यांची पोट्रेटसुद्धा त्यांनी पेन्सिलमध्ये बेमालूमपणे साकार केली आहेत. अशा या हरहुन्नरी कलावंतास शतशः प्रणाम.