शाळेतील बालवर्गापासून प्राथमिक शाळेतील पहिली-दुसरीच्या वर्गातील मुलांना सकाळी पुरेशी झोप मिळालीच पाहिजे, त्यामुळे त्यांना सकाळी सातची शाळेची वेळ योग्य नाही, असं मत राज्यपालांनी व्यक्त केल्यानंतर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला त्याचे शाळेतील लहानपणीचे दिवस आठवले. पहिल्यापासून सकाळचीच शाळा असल्यामुळे वर्गात बसल्यानंतर डुलक्या काढण्याशिवाय आम्हा दोघांनाही दुसरं कसलंच काम नव्हतं. शिकून काय फायदा होणाराय किंवा पीएचडी मिळवून काय दिवे लावणारायत या अजितदादांच्या आताच्या मताप्रमाणे तेव्हा आमचं दोघांचंही मत बनलं होतं. यावरून आम्हाला किती दूरदृष्टी होती, हे लक्षात येईल. शाळेतील देखण्या मुली आणि बाई यांना आम्ही नेहमीच रिस्पेक्ट दिला. त्या कितीही लांबवर असल्या तरी वर्गात येताना त्यांची चाहूल लागताच पोक्या त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नाना मर्कटचेष्टा करायचा त्यामुळे त्यांनाही हसूं यायचं. आम्ही त्यांच्याकडे कधीही वाकड्या नजरेने पाहिलं नाही. जे काय बोलायचं ते तोंडावर. पण डुलक्या काढण्यातच आमचा जास्त वेळ जात असल्यामुळे फावल्या वेळात अभ्यास सोडून हे बाकीचे उद्योग सुरू असायचे. बाई फळ्यावर लिहित असताना पोक्या काहीतरी विक्षिप्त बोलून किंवा नकला करून मुला-मुलींना हसवायचा. बाईंनी मागे बघितल्यावर मात्र वर्गात चिडीचूप शांतता पसरायची. कॉपी करून कसेतरी पास झाल्यावर आम्ही जेलमधून बाहेर आल्यासारखे रस्त्यावर आलो आणि आमचे पोटापाण्यासाठी वेगळेच धंदे सुरू झाले. त्यातून प्रगती करत आज राजकारणाच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचलो. खरं तर माझ्यापेक्षा आमच्या पोक्याला राजकारणात जास्त रिस्पेक्ट आहे. हातपाय पसरत तो कधी भाजपच्या आतल्या गोटात पत्रकार म्हणून शिरला आणि पुरेसा मालामाल कसा झाला हे त्यालाच माहीत.
तर मूळ मुद्दा हा की छोट्या मुलांना जशी पुरेशी झोप हवी तशी मंत्र्यांनाही पुरेशी झोप सकाळी मिळाली तर ते अधिक प्रâेश होऊन राज्य चालवू शकतील हा विश्वास पोक्याला आहे. त्यामुळे सकाळी व जेवल्यानंतर दुपारची झोप घरी काढून चारनंतर सभागृहाचं कामकाज फक्त चार तास ठेवावं ही पोक्याची रास्त मागणी आहे. त्याने याबाबत माझा सल्ला विचारताच सत्ताधारी मोठ्या नेत्यांना विचार असा सल्ला मी दिला आणि त्याने तो मानलाही. गेला त्यांच्या मुलाखती घ्यायला.
-नमस्कार सीएम साहेब. मंत्र्यांना पुरेशी झोप मिळण्यासाठी सभागृहाचं कामकाज सायंकाळी फक्त चार ते आठ यावेळेत चालवावे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. त्याबाबत आपली प्रतिक्रिया काय?
-कामकाज चालू असतानासुद्धा झोप घेता येते, हे सभागृहात तुम्ही पाहिलंच असेल. त्यामुळे पुरेशी झोप घेऊनच सभागृहात यावं असं मलाही वाटतं. त्यामुळे विकासकामाच्या चर्चेला वेग येईल. हे खरंय. तरीही याबाबत आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा सल्ला घेतल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. तुम्ही बाकी मंत्र्यांनाही विचारा.
-रामराम अजितदादा, मंत्र्याना पुरेशी झोप मिळण्यासाठी सभागृहाचं कामकाज सायंकाळी चार ते आठपर्यंतच ठेवावं या सूचनेबद्दल तुम्हाला काय वाटतं?
-तुम्ही ते चार ते आठ ठेवा नाहीतर आठ ते चार ठेवा हे मंत्री कसले दिवे लावणार आहेत? कसला उजेड पाडणार आहेत? माझ्याशिवाय एकही मंत्री पुरेसा कार्यक्षम नाही आणि मी चोवीस तास काम करू शकतो. मला झोपेची गरज नाही. मी कमी बोलतो पण जास्त काम करतो. मी मुख्यमंत्री झाल्यावर बघालच.
-हो ना. पाणीटंचाईच्या काळात दुष्काळामुळे आटलेली धरणं, विहिरी तुम्ही…
-तो विषय नको. तुम्ही दुसर्या कुणाला तरी गाठा.
-नमो नम: फडणवीस साहेब.
-नमो नम: का येणं केलंत?
-झोपु योजनेबद्दल विचारायचं होतं. म्हणजे `झोप पुरेशी’ या भावी योजनेविषयी. मंत्र्यांनाही पुरेशी झोप हवी ही अनेकांची मागणी आहे. त्यासाठी सभागृहाचं कामकाज सायंकाळी चार ते आठ या वेळेत करावं, हा प्रस्ताव आहे.
-पोक्या, तू म्हणतोयस ते खरं असलं तरी कामकाजाची वेळ इतकी कमी केल्यावर माझी घसा फोडून केलेली तावातावाने भरलेली, सर्व खर्या-खोट्या मुद्द्यांनी आकंठ तुंबलेली भाषणे कोण बरं ऐकणार? झोप काय, कधीही घेता येईल, पण माझे मातीमोलाचे, सॉरी अतिमोलाचे विचार जनतेपर्यंत कसे बरं पोहोचणार? त्यामुळे माझा या प्रस्तावाला नक्कीच विरोध असेल. या तुम्ही.
-नमस्कार किरीट सोमय्याजी, पुरेशा झोपेसाठी सभागृहाची वेळ चार ते आठ केली तर तुम्हाला चालेल का? कारण तुम्ही भाजपचे वरिष्ठ नेते आहात.
– माझी काहीच हरकत नाही. मला तर जास्तीत जास्त वेळ झोपेसाठी मिळेल तर मी त्याही वेळेचं सोनं करेन, अरे, हल्ली साधा मसाज करायला वेळ मिळत नाही. बाकीच सोडा.
-मी कशाला सोडू? तुम्हीच काय ते ठरवा. चलतो मी.
-नमस्कारम् केसरकरम्
-नमस्कार. कसं काय येणं केलंत?
-मंत्र्यांना पुरेशी झोप मिळण्यासाठी सभागृहाचं कामकाज सायंकाळी चार ते आठ करावं अशी बहुसंख्य आमदार, मंत्र्यांची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं?
– टू बी आर नॉट टूबी- जगावं की मरावं यासारखाच हा प्रश्न आहे. झोप की कामकाज मोठा गहन प्रश्न आहे. मंत्री आयुष्यात किती तास झोपतो याचा व्यत्यास काढल्यावर या प्रश्नाचं खरं उत्तर मिळेल. मी तर म्हणतो, पहाटे स्नानसंध्या करून शाकाहारी नाश्ता करून सकाळी सातला अधिवेशनाचं कामकाज सुरू करावं आणि एकला बंद करावं, घरी जावं, जेवावं. झोपावं. पुन्हा रात्री जेवावं, झोपावं. झाली ना पुरेशी झोप. जिथे मी आहे तिथे मार्ग आहे. झोप महत्त्वाचीच आहे. दिवसा पाहिलेली स्वप्नं झोपेत पूर्ण होतात. झोपा, स्वप्न पाहा, यशस्वी व्हा!