फोनवर मैत्रिणीचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला तर बायकोला कळत नाही? काही अनुभवी मार्गदर्शन कराल का?
– बबन धारणे, शिंदेवाडी
स्वतःच्या बहिणीच्या नावाने सेव्ह करा… बायको नणंदेला फोन करणार नाही. (हा माझा अनुभव नाही. कारण मी विषाची परीक्षा घेत नाही. आणि माझा सल्ला अंगाशी आला तर माझं नाव घ्यायचं नाही.)
पलीकडची आळी पण नीट माहिती नसलेला माणूस आपल्या प्रेयसीला ‘तुझ्याइतकी सुंदर जगात कोणी नाही’ असं कशाच्या आधारावर सांगतो?
– प्रेमा बारगीर, सातारा
कारण त्याला माहीत असतं की आपली ‘ती’सुद्धा आळीच्या बाहेर पडलेली नाही… (बोलायला पैसे पडत नाही.. आणि फुकट बोलायला, ऐकायला दोघांच्याही बापाचं काही जात नाही.)
आता सगळीकडे चांगल्या दर्जाचे माइक मिळतात. हळु बोललं तरी सगळीकडे नीट ऐकायला जातं. तरी आपले नेते रेकून रेकून, मोठमोठ्याने, नाटकी शैलीत का बोलत असतात सभेतल्या भाषणांत?
– अरविंद चंदनशिवे, सासवड
अशा नेत्यांनी एवढं पण करायचं नाही का? असे नेते बिचारे मेहनत करत असतात.. एवढं पण नाही केलं तर तुम्हीच म्हणाल, हे नेते नुसते बसून खातात… (असं नेत्यांसारखं दोन्ही बाजूने बोलू नका.)
मी मित्रांसाठी थर्टी फर्स्टला सरप्राइझ पार्टी ठेवली होती. ते काही मित्रांना कळलंय, हे मला कळलंय. आता मी ती पार्टी न सांगता रद्द करून त्यांना सरप्राइज देणार आहे. कशी वाटते ही आयडिया?
– राजेश पोकळे, चेंबूर
जुमला वाटते. पण तोच यशस्वी होतो. आपला पोपट झालाय हे कुणी कबूल करत नाही (मी पण नाही). पंधरा लाखांच्या आयडियेने हे सिद्ध केलंय… (सर्वांनाच त्याची सवय झाली आहे. त्यामुळे मित्रांनाही काही फरक पडणार नाही…)
एकदम एकाच वेळी एखाद्याच्या तिन्ही प्रेयसी एकमेकींच्या आणि त्याच्या समोर आल्या तर त्याने काय करावे?
– रोहित शिंदे, औरंगाबाद
‘भोगलेले भोग’ असतील, त्यांचे प्रायश्चित्त भोगावे!!
आपला जन्म प्रेमातून नाही, तर हुंडा, वडिलांची नोकरी, आईच्या घरची चांगली परिस्थिती, जात, धर्माची, छत्तीस गुणांची जुळणी यातून झालाय, हे कळल्यावर मुलांना काय वाटत असेल?
– रोहिणी गोवर्धन, कसबा पेठ, पुणे
समाधान वाटत असेल… आपला जन्म कुठल्या लफड्यातून झाला नाही याचा… ( शेवटी स्वतःचं ते प्रेम असतं, दुसर्याचं मात्र लफडच असतं).
गावातल्या घराची काळजी, त्या घरात न राहणार्या शहरातल्या कमावत्या भावंडाने, मुलाने स्वत:चं घरसंसार सांभाळून करावी, अशी अपेक्षा का करतात आईवडील आणि गावातले नातेवाईक?
– सुवर्णा येरूणकर, विन्हेरे
चाकरमानी म्हणून मिरवण्याची ती किंमत असते… (जी नाजूक जागेच्या दुखण्यासारखी असते. परवडत नसते. पण सांगताही येत नसते…)
काय संतोषराव, काय प्लॅन थर्टी फर्स्टचा मग?
– प्रणीत पोखरे, यवतमाळ
मेतकूट भात, केळीचं शिकरण… येताय का? (अहो, मीच दुसर्यांच्या पार्टीची चौकशी करून मला कोण बोलवतोय का बघतोय? तुम्ही माझ्याकडेच काय ट्राय मारताय?)
संतोषराव, नव्या वर्षासाठी काही संकल्प केलात की नाही?
– बबन ढेपे, यवतमाळ
नवीन वर्षाचा संकल्प कोणाला सांगायचा नाही असा संकल्प केला आहे. (उगाच लोक नजर लावतात आणि संकल्प अर्धा राहतो. आता तरी संकल्प पुरा होतो का बघतो आणि पुढच्या वर्षी सांगतो.)
तुमचं नववर्ष १ जानेवारीला सुरू होणार की गुढीपाडव्याला?
– बाळासाहेब कारखानीस, सातारा
गटारीला… (काय फरक आहे सांगा?) आदल्या रात्री गटारीच साजरी करायची असेल, तर मग गटारीनंतरच नववर्ष सुरू करायला काय हरकत आहे?…