ग्रहस्थिती : गुरु, हर्षल मेष राशीमध्ये, बुध धनु राशीमध्ये, प्लूटो मकर राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, शुक्र तूळ राशीत, रवि, मंगळ वृश्चिक राशीत. विशेष दिवस : ४ जानेवारी, कालाष्टमी.
मेष : व्यवसाय-नोकरीच्या ठिकाणी स्थान भक्कम होईल. तरुणांचे मनोबल उंचावणार्या घटना घडतील. व्यावसायिकांना चांगले अनुभव येतील. घरातील वातावरण आनंददायी राहील. नववर्षाची सुरुवात चांगली होईल. आवडत्या सहकार्यांचा सहवास लाभेल. धार्मिक पर्यटन घडेल. विद्यार्थ्यांना कर्तबगारी दाखवण्याची संधी मिळेल. पत्नीशी बोलताना शब्दांचा वापर योग्य प्रकारे करा. विदेशातील कामे मार्गी लागण्यात विलंब होईल.
वृषभ : तरुणांना नवी संधी मिळायला विलंब होईल. नोकरीच्या ठिकाणी नम्रता ठेवा. वाद टाळा. घरातले मालमत्तेचे विषय पुढे ढकला. प्रेम प्रकरणात निराशा वाढेल. लॉटरी, सट्टा यांपासून दूरच राहा. खेळाडूंना यश मिळेल. काहींना समाधानकारक फळे मिळतील. नोकरीत कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळेल. मित्रांच्या चेष्टामस्करीकडे दुर्लक्ष करा. येणार्या नवीन वर्षाची सुरुवात आध्यात्मिक कार्याने होईल.
मिथुन : व्यावसायिकांची उलाढाल वाढेल. कुटुंबात वाद घडतील. जपून राहा. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या नव्या संधी चालून येतील. नोकरीत बदली होईल. नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात यश मिळू शकते. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट एजन्ट, मेडिकल व्यावसायिक यांची आर्थिक बाजू बळकट होईल. कलाकार, शिल्पकारांचा सन्मान होईल. घरातील ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल.
कर्क : व्यावसायिक क्षेत्रात बुद्धिकौशल्याच्या जोरावर परिस्थितीचा सामना कराल. नोकरीत पगारवाढ, बढतीचे योग जुळून येतील. सामाजिक कामात वेळ खर्च होईल. लेखक, पत्रकार, संपादकांना प्रसिद्धीचे योग जुळून येतील, मानसन्मान होईल. सार्वजनिक ठिकाणी वाणीवर नियंत्रण ठेवा, वाद टाळा. येणे वसूल झाल्याने खिशात पैसे राहतील. महागडी वस्तू खरेदी कराल. कुटुंबासह सहलीला जाल. वाहन चालवताना काळजी घ्या. भागीदारीत थोडे जमवून घ्या.
सिंह : घरात उत्साहाचे वातावरण राहील. युवकांना आनंद देणार्या घटना घडतील. व्यावसायिकांचा उत्कर्ष होईल. निर्णय घेताना घाई केल्यास आर्थिक फटका बसू शकतो. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा मिळेल. संस्मरणीय घटनांचा अनुभव मिळेल. नोकरीत भाग्योदय होईल, नवीन जबाबदारी मिळेल. धावपळ होईल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या, चैनीवर पैसे खर्च करू नका. अचानक आर्थिक लाभ वाढेल. महिलांनी आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये.
कन्या : आरोग्याची काळजी घ्या. जुना आजार पुन्हा डोके वर काढेल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रलंबित सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील, पण, खर्च वाढतील. त्यामुळे चिडचिड होईल. नोकरीत अरे ला कारे करू नका. वादाचे प्रसंग टाळा. मनासारख्या घटना घडवणारा काळ असला तरी जपूनच पावले टाका. बहीण-भाऊ यांच्याकडून चांगले सहकार्य मिळेल. व्यावसायिकांनी काम करताना सावधतेने पावले टाकलेली बरी.
तूळ : तरुणांना ओळखींतून चांगले सहकार्य मिळेल. प्रेरणादायी घटना घडतील. घरातील वातावरण आनंदी राहील. कलाकारांच्या उत्कर्षाचा काळ आहे. नोकरीत सन्मान होईल. गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. नववर्षानिमित्त मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. आध्यात्मिक कार्याला वेळ द्याल. दानधर्म होईल. संशोधक, शिक्षकांकडून चांगले काम घडेल. सल्ले देण्याच्या भानगडीत पडल्यास मन:स्ताप होईल.
वृश्चिक : नातेवाईक, मित्रमंडळींशी बोलताना काळजी घ्या. खर्च वाढवणारे प्रसंग घडतील. विवाहेच्छुंसाठीr चांगला काळ आहे. चित्रकार, कलाकार, शिल्पकारांना नव्या संधी चालून येतील. विशेष कलाकृती आकाराला येईल. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळतील. मार्वेâटिंग, इंजिनीरिंगमधील व्यक्तींसाठी चांगला काळ आहे. नोकरीत कामाशी काम ठेवा, सल्ले देऊ नका. आर्थिक बाजूवर विशेष लक्ष ठेवा. कागदपत्रे तपासूनच सही करा. सोशल मीडियावर काळजी घ्या.
धनु : नवीन वर्षात मनासारखे यश मिळेल, मन आनंदी राहील. तरुणांना स्पर्धात्मक यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांना यशोमार्ग सापडेल. घरात धार्मिक कार्य होईल. नोकरी, व्यवसायात अधिक वेळ द्याल. मुलाकडून चांगली बातमी कानी पडेल. नवीन वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करा. घरातल्या ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आध्यात्मिक क्षेत्रातून मानसिक समाधान मिळेल.
मकर : तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन व्यवसायाच्या कल्पना आकाराला येतील. नोकरीत एकाग्रता ठेवा, छोटी चूक महागात पडेल. कोणत्याही कामात अति आत्मविश्वास दाखवू नका, फसगत होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. घरातील ज्येष्ठांचा सल्ला माना. संगीतकार, कलाकारांना संधी चालून येतील, आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होईल. खेळाडूंना स्पर्धेत यश मिळेल. सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मित्रांबरोबर वाद टाळा.
कुंभ : यशदायक काळ अनुभवाल. काहीजणांना संमिश्र घटनांचा अनुभव य्ोईल. तरुणांना नोकरीच्या संधी मिळतील. घरात छोटे समारंभ घडतील, त्यात मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची चांगली साथ लाभेल. कामातला हुरूप वाढेल. व्यावसायिकांना कामासाठी प्रवास करावा लागेल. व्यवसायाचे नियोजन करताना काळजीपूर्वक पावले टाका. व्यवहारात पारदर्शीपणा ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात चांगले अनुभव येतील. सहल घडेल.
मीन : घरात आनंदाच्या बातम्या कानी येतील. विवाहेच्छुसाठी चांगला काळ. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. व्यावसायिकांना काळजीपूर्वक काम करावे लागेल. घरात वाद घडू शकतात. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना काळजी घ्या. कलाकार, संगीतसर्जकांसाठी चांगला काळ आहे, नव्या संधी चालून येतील. नोकरीत बुद्धीचातुर्याच्या जोरावर वरिष्ठांचे मन जिंकाल. गर्दीत वाद टाळा. मुलांकडून सुवार्ता कानावर पडेल. विदेशात शिक्षण घेण्याचा विषय मार्गी लागेल.