डिसेंबरच्या आसपास गूळ आणि पंजाबी शक्कर बनवणारी छोटी छोटी गुर्हाळं गावागावांमध्ये सुरू होतात. डिसेंबर-जानेवारीमध्ये गावाकडे गेलं की खाण्यापिण्याची चैन असते. दिवसभर उन्हामध्ये बाजा आणि खुर्च्या टाकून अंगणात शेतातले गाजर, मुळे, आवळे आणि शेजार्यांच्या झाडावरची संत्री खात बसायचे. संध्याकाळ झाली की तिथेच शेकोटी पेटवायची. शेतातून किंवा दुकानातून येताना घरातले कोणी ना कोणी ताजा गूळ, भट्टीमध्ये भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा (इकडे आपल्यासारख्या ओल्या शेंगा नाही मिळत. कोरड्या आणि भाजलेल्या शेंगा मिळतात बाजारात), भट्टीमध्ये भाजलेले फुटाणे आणि मुंगफल्ली पट्टी (शेंगदाण्याची तूप आणि गुळात बनलेली खमंग चिक्की), गुळाच्या रेवड्या, गज्जक यातलं काही ना काही घेऊन येतं. शेकोटीपाशी बसून गप्पा मारताना किलोभर शेंगा कधी संपतात कळत नाही.
या दिवसांत घराघरांमध्ये स्पेशल गूळ बनवून घेतला जातो. आमच्या घरी नुसते शेंगदाणे घातलेला गूळ, ड्रायफ्रूट घातलेला गूळ, ड्रायफ्रूट + बडीसोप, ओवा घातलेला गूळ असे दोन-तीन प्रकार तरी आपापल्या आवडीप्रमाणे बनवून घेतात. जाता येता, जेवण झाल्यावर तोंडात टाकायला या स्पेशल गुळाचे खडे छान लागतात.
गुळाइतकाच महत्वाचा पदार्थ म्हणजे शक्कर. पंजाबी शक्कर म्हणजे साखर नाही. साखरेला चिनी किंवा खंड/खांड म्हणतात. शक्कर म्हणजे गुळाची पावडर. अर्थात गुळ बनवून नंतर त्याची पावडर करत नाहीत. शक्कर वेगळी बनवली जाते. बनवण्याची प्रक्रिया गुळासारखीच असते, फक्त गुळाच्या ढेपा बनवण्याऐवजी त्याचवेळी पावडर बनवली जाते. या शक्करला आमच्या घरात खूप महत्व आहे. छोट्या छोट्या आनंदाच्या प्रसंगी शेजारीपाजारी गोड काही द्यायचं असलं की शक्कर कामाला येते. बाकी मिठाया-पेढे दिले तरी वाटीभर शक्कर देणं गरजेचं असतं, शगन असतो तो. घरात लग्नकार्य असलं की लग्नाच्या ८-१० दिवस आधीपासून शेजारपाजारच्या बायका गाणी म्हणायला घरी येतात. ढोलकी घेऊन तास-दोन तास लग्नासाठीची गाणी म्हणणं आणि नाचणं असा कार्यक्रम रोज रात्री चालतो. गाणी म्हणून झाली की घरी जाताना सगळ्यांना दोन दोन मुठी शक्कर बांधून दिली जाते. बर्याच पदार्थात गोडासाठी शक्कर वापरली जाते. अगदी काही नाही तर तूप गरम करून त्यात शक्कर कालवून घी शक्कर बनवायची. गरम गरम भात, फुलका किंवा मक्याची भाकरी आणि शक्कर जेवणाच्या शेवटची रोजची स्वीट डिश हिवाळ्यातली.
दिवाळीच्या आसपास थंडीला सुरुवात झालेली असते. यानंतर येणार्या सगळ्या सणांमध्ये हिवाळ्यात मिळणारे सगळे वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. दिवाळीनंतरच्या पौर्णिमेला पांडू पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेआधी तीन दिवसांपासून पौर्णिमेपर्यंत कधीही मां की खिचडी (आख्ख्या उडदाची खिचडी) करून मुलांना खाऊ घालतात. नंतरच्या मार्गशीर्ष महिन्याच्या संकष्टी चतुर्थीलासुद्धा इकडे खूप महत्व असते. याला इकडे फुग्गे का व्रत म्हणतात. बहुतेक आया हा उपवास करतात. या उपवासासाठी तिळाचे लाडू केले जातात, कुल्लर म्हणतात त्यांना. आपल्याकडच्या लाडूंपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे हे लाडू कच्च्या तिळाचे असतात. कच्चे तीळ आणि शक्कर एकत्र करून हे लाडू बनवतात. हे लाडू मुलांना दुधासोबत खायला देतात. याच दिवशी रताळी पण खातात.
जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी सुरू झाली की पंजाबमध्ये लोहरीची तयारी सुरू होते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी १३ जानेवारीला लोहरी साजरी करतात. आपल्याकडे जसे संक्रांतीला महत्व आहे तसे तिथे लोहरीला. घरात सुनेची किंवा नव्या बाळाची पहिली लोहरी खूप धूमधडाक्याने साजरी केली जाते. नव्या सुनेला लोहरीनिमित्ताने नवे कपडे आणि एखादा दागिना देतात. आपण जसे हलव्याचे दागिने करतो, तसेच इथे बर्याच ठिकाणी ड्रायफ्रूट्स आणि चुरमुरे वापरून दागिने बनवतात. लहान मुलांना घालण्यासाठी. माझ्या मुलाच्या पहिल्या लोहरीला खोबर्याच्या वाट्या, काजू, बदाम, शेंगदाणे, किसमिस, चुरमुरे वापरून हार बनवला होता. लोहरीच्या ३-४ दिवस आधीपासून बाजारात गाड्यांवर लोहरीच्या आहुतीसाठी भुईमुगाच्या शेंगा आणि मक्याच्या लाह्यांचे ढीग दिसायला लागतात. घराघरामध्ये लोहरी पेटवून त्यात सगळेजण आहुती टाकतात. आहुतीमध्ये मक्याच्या लाह्या, भुईमुगाच्या शेंगा, गूळ, तीळ हे पदार्थ असतात. आमच्या भागात आहुतीमध्ये घालायला तिलचौली नावाचा एक पदार्थ करतात. रात्रभर भिजवलेले तांदूळ तुपावर भाजून त्यात भाजलेले तीळ, शेंगदाणे, शक्कर आणि रेवड्या मिक्स केल्या की तिलचौली तयार. लोहरी पेटवली की गल्लीतली लहान-तरूण मुलं लोहरीची गाणी म्हणत सगळ्यांच्या घरी लोहरी मागायला जातात. ढोल, संगीत, गाणी, बोल्या आणि भांगडा-गिद्दा याशिवाय हा सण साजरा होऊच शकत नाही. गल्लीगल्लीमध्ये `सुन्दर मुंदरिए ह्हो, तेरा कौन विचारा ह्हो, दुल्ला भट्टीवाला ह्हो, दुल्ले दी धी व्याही ह्हो, सेर शक्कर पायी ह्हो, या गाण्याचे बोल ऐकू येतात. लोहरीला सरसों का साग आणि मक्के की रोटी, गन्ने के रस की खीर आणि मूलीगंडा (मुळ्याची कोशिंबीर) या पदार्थांचे महत्व आहे. काही ठिकाणी लोहरीलासुद्धा आख्ख्या उडदाची खिचडी बनवतात. त्यांच्या या कृती.
गन्ने के रस की खीर
साहित्य : अडीच तीन लिटर उसाचा रस, एक ग्लास दूध, वाटीभर भिजवलेले तांदूळ, शेंगदाणे, खोबर्याचे काप, किसमिस
कृती : उसाचा रस गाळून घ्यावा. एका पातेल्यात रस शिजवायला गॅसवर ठेवावा. रस थोडा गरम झाला की गॅसची आच कमी करावी. थोड्या वेळातच रसाच्यावर काळ्या रंगाचा थोडा फेस यायला लागेल. तो वरून चमच्याने/ गाळण्याने काढून घ्यावा. जसजसा फेस येत राहील तसतसा तो काढून घ्यावा. फेस येत राहील, तोपर्यंत रसाला उकळी येऊ देऊ नये. काळा फेस येणं बंद झाले की त्यात ग्लासभर दूध आणि वाटीभर पाणी घालावे. दूध आणि पाणी घातल्यावर परत काळसर फेस येईल. त्याला काढून घ्यावे. तो फेस तसंच राहिला तर खीर काळपट रंगाची होईल.रसावरचा फेस येणं थांबलं की त्यात रात्रभर भिजवलेले तांदूळ घालावे. तांदूळ व्यवस्थित रसात मिळून येईपर्यंत मधून मधून हलवत खीर शिजू द्यावी. खीर शिजत आली की त्यात शेंगदाणे, खोबर्याचे काप, किसमिस घालावे. तांदूळ व्यवस्थित शिजले की ही खीर थोडी घट्टसर आणि मिळून येते.
मां की खिचडी/ आख्ख्या उडदाची खिचडी
साहित्य : एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी आख्खे उडीद (८-१० तास भिजवून), पाव वाटी हरभरा डाळ (दोनेक तासभर भिजवून), चमचा दोन चमचे बारीक चिरलेले आलं, हिरवी मिरची, आख्ख्या लाल मिरच्या, हिंग, जिरे, हळद, धण्याची पूड, गरम मसाला (ऐच्छिक) मीठ आणि तूप.
कृती : कुकरमध्ये हिंग-जिरे, लाल मिरच्या आणि तुपाची फोडणी करावी. फोडणीमध्ये आले आणि हिरवी मिरची घालून परतावे. त्यात हळद आणि धण्याची पुड घालावी आणि भिजवलेले आख्खे उडीद आणि हरबरा डाळ घालावी. दोनेक वाट्या पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून किमान २० मिनिटे दोन्ही डाळी शिजू द्याव्या. डाळी शिजल्या की नंतर कुकर उघडून त्यात तांदूळ घालावे. गरज असेल तर परत थोडे पाणी घालून ५-१० मिनिट खिचडी शिजू द्यावी. आख्ख्या उडदाला आणि हरबरा डाळीला शिजायला वेळ लागतो म्हणून त्यांना आधी शिजवून घ्यावे लागते.