पाऊस आला की कितीतरी शहाण्यासुरत्या लोकांना कविता ‘होतात,’ तुम्हाला काय होतं?
– हर्षद रावराणे, सोलापूर
माझं मन घट्ट होतं.
निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात, तुमचा शेजारी कोण आहे?
– वैभव चव्हाण, पुलाची वाडी, पुणे
‘मी’ही त्यांचा ‘शेजारी’ असल्याने, शेजारी कोण आहे याची मी फारशी फिकीर करत नाही.
सिनेमाची, नाटकाची दुनिया खोटी खोटी. तिच्यात खरी नाती नसतात म्हणे! इथे तुमचा कोणी सख्खा मित्र आहे का?
– दिलावर शेख, ठाणे
अहो सिनेमाच्या ‘पडद्यावरची’, आणि नाटकाच्या ‘स्टेजवरची’ दिसणारी दुनिया खोटी असते, म्हणजे इथली माणसं खोटी नसतात. ती तितकीच प्रामाणिक आणि सच्ची पण असतात. त्यामुळे ही संख्या अगणित.
तुम्हाला कविता आवडते, कथा आवडते, कादंबरी आवडते की आत्मचरित्र? तुमचे आवडते साहित्यिक कोण?
– आम्रपाली गायकवाड, चेंबूर
एकच निश्चित आवडता साहित्यिक सांगणं म्हणजे जेवणात तुम्हाला फक्त ताटभर मीठ आवडतं? की फक्त पातेलंभर चटणी? की फक्त आमटी? की फक्त भात? असं विचारण्यासारखं आहे. सुदृढ तब्येतीसाठी जसा चौरस आहार महत्वाचा, तसं ‘साहित्याची आवड’ हा दावा करणार्याचं वाचन चौफेर असावं लागतं. त्यामुळे एकाचं नांव घेणं म्हणजे बाकी अनेकांवर अन्याय करण्यासारखं आहे.
कसा पण टाका असं म्हणताय बिनधास्त, पण कधी क्रिकेटची बॅट हातात धरली आहे का? सीझन बॉल खेळलाय का? की फक्त टेनिस
बॉल क्रिकेट आणि बॉक्स क्रिकेट?
– विनय शिगवण, साष्टी
अहो मी कला क्षेत्रात आलो नसतो तर मी आज क्रीडा क्षेत्रात कार्यरत असतो. माझी दुसरी पदवी स्पोर्ट्स या विषयाची आहे. जिचा मी विद्यापीठाचा रँक होल्डर आहे. अॅथलेटिक्स, खोखो (जिल्हास्तरीय) वेट लिफ्टिंग (राज्यस्तरीय) या खेळांबरोबर क्रिकेट हा माझा प्रमुख खेळ होता. मी शालेय, महाविद्यालयीन, संघाचा कप्तान होतो. तर इंटर युनिव्हर्सिटी, डिस्ट्रिक्ट लेव्हल, क्लब क्रिकेटही खेळलो आहे. मी कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक असोशिएशनमध्ये, अनेक खेळांचा अधिकृत अंपायर, रेप्रâी म्हणून देखील काही वर्ष काम केलं आहे. मी अभिनयाच्या शिक्षणासाठी दिल्लीला शिकायला असतानाही, फिरोजशहा कोटलासह अनेक ग्राउंड्सवर मॅचेस खेळलेलो आहे. आणि मी आजही क्रिकेट खेळतो. आणि मीच नाही तर, कला क्षेत्रात स्पर्धात्मकच नव्हे तर अगदी रणजी पर्यंत खेळलेले अनेक नामवंत कलावंत आहेत.
तुम्हाला घेऊन सुपरहिरोपट काढायचा झाला तर तुम्हाला काय बनायला आवडेल? आयर्नमॅन, सुपरमॅन, स्पायडर मॅन, कॅप्टन अमेरिका, डॉक्टर स्ट्रेंज की हल्क!
– चिन्मय सुर्वे, विन्हेरे
उत्तम मानधन असेल तर तुम्ही म्हणाल ते.
स्व. राहत इंदौरी म्हणायचे, बुलाती है मगर, जानेका नै… असं ते का म्हणत असतील, काही कल्पना?
– फ्रेडरिक डिसूझा, कल्याण
आधीचा अंगाशी आल्याचा, किंवा फसवणुकीचा अनुभव असणार. बाकी काय?
तुम्हाला ज्यांच्याबरोबर काम करायची इच्छा आहे असे अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक कोण आहेत?
– स्वप्नील जोरे, सांगली
डी-निरो, अमिताभ बच्चन, अल- पॅचिनो, डॅनियल ले-लुईस, मेरिल स्ट्रिप, रेखा, तब्बू, ब्रायन र्क्यास्टन, स्पीलबर्ग, स्कॉर्सेसी, क्विंटींन टोरेन्टीनो, राजकुमार हिरानी… असे अनेक… वचनेन किं दरिद्रता. (आणि मराठीत आवडीच्या बहुतांशी अनेकांबरोबर झालंय काम करून)
‘तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर वन’ असं कोणती हिरोइन तुमच्याकडे पाहून म्हणते?
– सावनी माळवे, जालना
एका सिनेमाची हिरोईन ‘परिस्थिती’ होती. तिने म्हटलंय हे.
कोरोना संकटातून तुम्ही सगळ्यात मोठी शिकवण काय शिकलात?
– पद्मा सहस्रबुद्धे, गोरेगाव
अनेक थोर संतांनी, शास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी ज्या एका प्रश्नाची उकल करण्यात आयुष्य घालवलं, त्या प्रश्नाला फार तरुण वयातच मला भिडता आलं, तो म्हणजे ‘या भूतलावर आपल्या जगण्याचं प्रयोजन नक्की काय आहे?’
कोणती भूमिका अधिक अवघड? हुशार माणसाची की बावळट माणसाची?
– श्रीराम बजरंगे, श्रीरामपूर
बावळट माणसाची भूमिका करायला सर्वात जास्त हुषारी लागते.